Tuesday, March 25, 2008

निरोप

त्या दिवशी मी आणि माझा मित्र निखील, सेकंड शिफ्ट्मध्ये कामावर आलो होतो. रात्रीचे आठ साडे आठ वाजले होते. अगदी निवांतपणे संगणकाची आज्ञावली बनवण्यासाठी नक्कल करणं आणि चिकटवनं (कॉपी आणि पेस्ट हो…) चालू होतं. इतक्यात पुण्याहून वैशालीचा म्हणजेच आमच्या प्रोजेक्ट मॅनेजरचा फोन आला. तिला आमच्या अमेरिकेतील मॅनेजरला निरोप द्यायचा होता. निरोप असा होता की, अमर नाइट शिफ्ट्मध्ये कामावर येण्यासाठी निघाला असताना वाटेत महापेच्या पुलाखाली त्याची मोटारसायकल घसरली आणि तो खाली पडला. त्याच्या रुममेट्ने त्याला दवाखान्यात नेलं आहे पण आज काय तो कामावर येऊ शकणार नाही. (अमर खूप कामाचा माणूस आहे… लेकाचा अमेरिकन लोकांच्या संगणक प्रणालीला आधार देतो. तो नसेल तर आधार कोण देणार ?)

आम्ही सारं ऐकून घेतलं आणि फोन ठेवून दिला. पण फोन ठेवता क्षणी आमच्या डोक्यात उजेड पडला… आमच्या भारतातल्या मॅनेजरचा निरोप आमच्या अमेरिकेतल्या मॅनेजर पर्यंत पोहचवण्यात एक तांत्रीक अडचण होती…

वैशाली, आमची भारतातली मॅनेजर मराठी आणि आम्हीही मराठी. त्यामुळे आमचं फोनवरचं बोलणं मराठीतूनच झालं होतं. निरोप अमेरिकेत पोहोचवायचा म्हणजे तो ई पत्रामार्फत इंग्रजीतून पोहचवावा लागणार होता. आमचं तांत्रीक इंग्रजीचं ज्ञान तसं बरं आहे. पण कुणी व्यवहारिक इंग्रजीत बोलू लागलं की आमची पाचावर धारण बसते. वैशालीचा निरोप इंग्रजीत कसा लिहायचा हा गहन प्रश्न आम्हास तेव्हा पडला.

जो सन्कटात मदत करतो तोच खरा मित्र या वचनाची आठवण ठेवून आम्ही आमची अडचण निखिलला सांगितली. आणि पुढच्याच क्षणाला त्याचं इंग्रजी माझ्या इंग्रजी पेक्षाही दिव्य आहे अस सांगून त्याने हात वर केले. आता काय करायचं.. ? आम्ही मोठ्या विचारात पडलो होतो. इतक्यात आम्हास कननची आठवण झाली. कनन आमचा प्रोजेक्ट्वरचा जुनियर. लेकाचा नुकताच जी आर ई, अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी जाण्यासाठी द्यावी लागणारी इंग्रजी भाषेची परिक्षा अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता.
आम्हाला अंधारात आशेचा अख्खाच्या अख्खा सूर्य दिसला होता. आम्ही मोठ्या हुरूपाने कननला फोन करण्यासाठी आकडे दाबु लागलो… आणि इतक्यात पुन्हा एक विचार चमकून गेला… कनन आमचा प्रोजेक्ट्वरचा जुनियर. गेले वर्षभर आम्ही त्याला संगणकाच्या दुनियेतल्या कितीतरी गोष्टी शिकवल्या होत्या. त्याला विचारायचं की हे अस अस इंग्रजीत कसं लिहायचं म्हणून ?… मग त्याच्या मनातल्या आपल्या प्रतिमेचं काय होईल… तो काय म्हणेल… याला एव्हढहि इंग्रजी येत नाही….

हे सगळं विचारमंथन आमच्या मनात चालू असतानाच पलीकडे कननने फोन उचलला होता… ‘ बोल सतीश ‘ त्याचा ओळखीचा धिरगंभीर आवाज कानावर पडला आणि क्षणभर काय बोलावे हे आम्हाला कळलेच नाही. पण पुढच्याच क्षणी आम्ही स्वत:ला सावरलं. कननला अमर मोटरसायकल वरुन पडला हे सांगितलं. वेळ मारुन नेण्यासाठी कमलचा, अमरच्या रूममेटचा फोन नंबर मागण्यासाठी फोन केला होता अशी चक्क थाप मारली. हुश्श्स…

पण तरीही आमची मूळ समस्या कायम होती. निरोप इंग्रजीत कसा लिहायचा…
शेवटी ‘जगात ज्या संगणक अभियंत्याचं कुणी नाही त्यास गुगल हे संकेतस्थळ आहे’ या संत वचनास अनुसरून आम्ही गूगलवर धाव घेतली. वैशालीने मोटरसायकल घसरली हे सांगण्यासाठी ‘स्लीप झाली’ अस म्हटलं होतं. आम्ही हा स्लीप शब्दच गूगलला टाकला… आणि पुढच्या क्षणाला गूगलने His bicycle slipped off the road हे वाक्य आमच्यासमोर हजर केलं… आणि आमची एका मोठ्या धर्म संकटातून सुटका झाली… निरोपातल्या बाकीच्या वाक्यांची जमवाजमव आम्ही आमच्या अल्पमतीप्रमाणे करून एकदाचा तो निरोप आम्ही अमेरिकेस धाडला.

(आजच्या घडीला निखील आणि मी दोघेही अमेरिकेत असून खूप मोठ्या संगणक प्रणाल्याना आधार देत आहोत. निखील शिक्षणाने उपकरण शास्त्र अभियंता तर आम्ही अनुवीद्युत आणि दूर संचार अभियांत्रिकीचे पदवीधर. वर वर्णन केलेली घटना मागच्या सहा महिन्यातली असून आम्ही भारतात असताना घडलेली आहे… खूप शिव्या घातल्या आम्ही तेव्हा आताच्या शिक्षण व्यवस्थेला… संगणक अभियंता म्हणून काम करना~या अभियांत्रिकीच्या पदवीधराना व्यवहाराच्या चार ओळी इंग्रजीत लिहिता येऊ नयेत म्हणजे काय… असो, त्यानंतरचे सहा महिने आम्ही आमचं इंग्रजी सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतली… कुठेतरी चुक आमचीहि होती नाही का ?)

1 अभिप्राय:

Preeti said...

This is really nice writing from you Satish. Seriously got to know other side of you, though didnt understand who is 'Tu'. The younger friend of your seems intresting ;-). Keep up the good writting habit.