Tuesday, October 14, 2008

साद शब्दांना घालेन मी...

नसेल कुणी सोबतीस माझ्या
एकटाच ध्येयाकडे चालेन मी
वाटलंच एकाकी जर का मला
आर्त साद शब्दांना घालेन मी

Monday, October 6, 2008

गलबत किनार्‍याकडे हाकारलं नाही...

Wednesday, September 17, 2008

पाखरांची मधूरशी किलबिल...

पाखरांची मधूरशी किलबिल
अंगणी सडा प्राजक्त फुलांचा
हळूच डोकावे हसरी सकाळ
घेऊन गुच्छ नव्या स्वप्नांचा

मी दार उघडून पाहिलं तर...

मी दार उघडून पाहिलं तर
पानाफुलांनाही जाग आलेली
एक कोवळी सोनेरी सकाळ
तुझ्या हास्यात चिंब न्हालेली

Sunday, September 14, 2008

कुणी बेभान म्हणतं मला...

कुणी बेभान म्हणतं मला, कुणी वेडं समजतं मला
धरतीच्या उमाळ्याला आकाशीचा नभच समजलेला
कसा तुझ्यापासून दूर मी, अन माझ्यापासून दूर तू
दुराव्यातील हा जिव्हाळा फक्त आपल्याला कळलेला

प्रेम तुझ्या माझ्या विश्वासाची एक पवित्र गाथा आहे
कधी कबीर तर कधी मीरेचीही तशीही हीच कथा आहे
सगळेच म्हणतात इथे, माझे डोळे आसवांनी भरलेले
कळलं तुला तर मोती, नाही तर पाण्याचा साठा आहे

आहे वेदनांचा सागर ह्र्दयात, पण मला रडायचं नाही
माझे अश्रु तुझ्या प्रेमाची निशाणी, जी हरवायची नाही
माझी ओढ तुला कळो किंवा नाही, पण थोडं ऐक तू
जी गोष्ट माझी झाली नाही, ती तुझीही व्हायची नाही

भुंगा जर कधी कमळ फुलावर बसला तर पाप घडलं
आम्ही एखादं स्वप्न जिवापाड जपलं तर पाप घडलं
कालपर्यंत तल्लिन होऊन ते ऐकत होते प्रेमाचे किस्से
आणि आम्ही खरंच कुणावर प्रेम केलं तर पाप घडलं

(डॉ. कुमार विश्वास यांच्या "कोई दिवाना कहता हैं" या प्रसिद्ध हिंदी कवितेचं स्वैर मराठी भाषांतर)

तुझे भुल जाना जाना...

शुक्रवारची संध्याकाळ संपण्याच्या बेतात होती. पण संधीप्रकाशाचा कुठेही मागमुस नव्हता. अगदी लख्ख उजेड होता. इकडे कॅलिफोर्नियामध्ये रात्रीचे नऊ वाजले तरीही उजेड असतो. आपल्याकडे असं नसतं ना. सहा साडे सहा झाले की अंधार पडायला सुरुवात होते. आणि सात वाजता तर अंधार होऊनच जातो. आपल्याकडेही जर इकडच्या प्रमाणे रात्री आठ वाजता दिवस मावळतीला जाऊ लागला तर...

अरमानचं आताच साहीलशी जिमेलवर बोलुन झालं होतं. साहील त्याचा ओरकुटवरचा मित्र. कुठूनतरी "फ़्रेंड ऑफ फ़्रेंड" असं करत त्या दोघांची मैत्री जुळली होती. अर्थात आभासीच. इंग्रजीत सांगायचं तर व्हर्चुअल. जिमेलवर बोलताना इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. दोघेही गद्धेपंचविशीच्या आत बाहेर असल्यामुळे गप्पांचा ओघ मुलींकडे कधी वळला हे कळलंच नाही. अर्थात दोघेही लग्नाच्या वयाचे असल्यामुळे वायफळ बडबड न करता त्या गप्पा आयुष्याचा जोडीदाराबद्दल होऊ लागल्या. बोलत बोलता साहीलने त्याला विचारले की त्याला कशी मुलगी हवी. अरमानने त्याला वेडावून दाखवणारी स्माईली पाठवली आणि लिहिलं, "असा काही माझा 'क्रायटेरिया' वगैरे नाही रे. हा, आता एव्हढं मात्र नक्की की मुलगी मराठीच असायला हवी" आणि अचानक साहीलने विचारलं, मुलीला मराठी येतं पण ती मराठी कुटुंबातील नसेल तर... अरमान दचकला. स्वताशीच विचार करू लागला. "अरेच्चा, हा विचार कधी आपण केलाच नाही की". सांगुन टाकलं त्याने साहीलला तसंच. म्हटलं, "मला विचार करायला हवा रे".

रात्रीचे नऊ वाजले होते. जेवायची वेळ झाली होती. त्यामुळे त्याने साहीलचा निरोप घेतला. जिमेल लॉग ऑफ केलं. बाहेर व्हरांड्यात आला. आपल्याकडे साडे सहा सातला जसा संधी प्रकाश असतो तसंच काहीसं बाहेर झालं होतं. घरासमोरच्या तलावात एक बदकांची जोडी छान इकडून तिकडे पोहत होती. त्या मनसोक्त विहरणार्‍या त्या बदकांना पाहून तो मनाने कधी भारतात पोहोचला हे त्याचं त्यालाच कळलं नाही. भारतात पावसाळा चालू असेल. छान पाऊस पडत असेल आपल्याकडे. त्याच्या नजरेसमोरून अविनाश ओगलेंची ती तरल कविता सरकू लागली...

खूप पाऊस आला आणि गारा पडायला लागल्या
तसा मी खिडकी बंद करायला धावलो...
तू दार उघडून थेट अंगणात गारा वेचायला!
दोन चार हळव्या गारा माझ्यासाठी ओंजळीत घेऊन तू आलीस.
पावसात भिजलेली तू
तुझी आर्जवी ओंजळ
ओंजळीत विरघळणा‍र्‍या गारा...
मी पहातच राहिलो-
पावसात भिजल्यावर कविता कशी दिसते ते!

पापण्यांसमोर वर्षाधारा बरसू लागल्या. अरमानला अविनाशच्या "तू" मध्ये "ती" दिसायला लागली. अशीच भिजत असेल नं ती पावसात. पावसात भिजताना कशी दिसत असेल ती ? खुप अवखळपणा करत असेल नं सतरा अठरा वर्षांची असुनही... ती आपली नाहीये. किंबहुना ती आपली व्हावी अशी भावनाही मनात नाही... मग का विचार करतो आपण तिचा ? मनाच्या गर्द रानात जेव्हा आठवणींची रिमझीम बरसात होते तेव्हा पापण्यांमध्ये का ती उभी राहते ? आयुष्यात काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. कदाचीत हे प्रश्नसुद्धा त्यापैकीच असावेत...

सात आठ महिन्यांपुर्वीची गोष्ट असावी. अरमान तेव्हा भारतात होता. दिवाळी नुकतीच होऊन गेली होती. तरीही दिवाळीचा हँगओव्हर काही अजून गेला नव्हता. तो काहीसा मरगळलेल्या मनानेच मुंबईमध्ये ऑफिसला जाऊ लागला होता. एक आठवडा संपला. शुक्रवारच्या संध्याकाळी ऐनवेळी तो प्रोजेक्टच्या ज्या मोड्युलवर काम करत होता त्यामध्ये गडबड आहे असं त्याच्या लक्षात आलं. आता ती चुक दुरुस्त करुनच जाऊ म्हणजे शनिवार रविवार निवांत राहता येइल म्हणून त्याने काम चालू केलं आणि काम हातावेगळं करता करता रात्रीचे अकरा वाजले. हाताखाली काम करणार्‍या ज्युनियरला, अमेरिकेतून डोक्यावर मिर्‍या वाटणार्‍या सिनियरला मनातल्या मनात शिव्या घालत तो ऑफिसच्या गेट्मधून बाहेर पडला आणि...'पल पल तेरी याद सतायें' अशा सुमधुर आवाजात मोबाइलमधून फाल्गुनी पाठक गाऊ लागली. आता रात्री अकरा वाजता कोण आपल्या आठवणीने व्याकुळ झालं आहे हे पाहण्यासाठी त्याने तो कॉल अटेंड केला.

"नमस्कार कुलकर्णी साहेब, मी पुण्यावरुन शिंदे बोलतोय".

आपल्या सारख्या पंचवीस वर्षांच्या पोराला दुनिया कुलकर्णी साहेब का म्हणते हा प्रश्न त्याला खुप दिवसांपासुन सतावत होता. शिंदे काका पुण्याचे इस्टेट एजंट. घरांच्या खरेदी विक्रिच्या व्यवहारांमध्ये मध्यस्थी करतात. अरमानने त्याला पुण्यात घर पाहण्यासाठी सुरुवात केली होती तेव्हा त्याच्या बाबांचे एक मित्र त्यांना शिंदे काकांकडे घेऊन गेले होते. आणि तेव्हापासुन तो घराच्या निमित्ताने शिंदे काकांच्या संपर्कात होता. त्यांनी अरमानला एक घर पाहण्यासाठी पुण्याला बोलावलं होतं. अरेरे, काय छान प्लॅन केला होता दोन दिवस झोपा काढण्याचा. आता पुण्याला जावंच लागणार होतं. आणि तेही आधी खोपोलीला घरी जाऊन. सगळाच विचका झाला होता. शनिवारी सकाळी तोंडही न धुता त्याने वाशीवरून पुण्याकडे जाणारी बस पकडली आणि घरी आला. घरी आल्यावर आईने सांगितलं, बाबा दोन दिवसांसाठी बाहेर गेलेत. म्हणजे आता त्याला एकट्याला पुण्याला जावं लागणार होतं. आणि कहर म्हणजे बाबा त्याची लाडकी हीरो होंडा पॅसियन प्लस घेऊन गेले होते. मोटारसायकल घेऊन गेले होते. बसने पुण्याला जायचं या कल्पनेनंच अंगावर शहारे आले होते पण जाण्यावाचून गत्यंतर नव्हतं त्यामुळे त्याने मुकाट्याने सॅक उचलली आणि तो पुण्याच्या वाटेला लागला.

...घर खुप छान होतं. अरमानला अगदी मनापासून आवडलं होतं. थोडक्यात वैतागत का होइना पण पुण्याला एक फेरी टाकण्याचं सार्थक झालं होतं. व्यवहाराच्या गोष्टी हा आपला प्रांत नाही हे माहीती असल्यामुळे बाकी सगळं बाबा बघून घेतील असं शिंदे काकांना सांगून तो समीरकडे, आपल्या कॉलेजच्या दिवसांमधल्या मित्राकडे निघून गेला...

अरमान दुसर्‍या दिवशी सकाळी स्वारगेटला आला. मुंबईला जाणार्‍या गाड्या ज्या फलांटांवर लागतात तिकडे येवून पाहिलं अन् तो हादरला. इतकी गर्दी की विचारू नका. या मुंबईच्या लोकांना पुण्यात काय जेवण वाढलेलं असतं देव जाणे. आणि एव्हढया ट्रेन्स मुंबई आणि पूण्याच्या मध्ये धडधड करत धावत असतात तरीही बसला एव्हढी गर्दी का हे त्याला कळेना. मुंबईला जाणारी पुढची गाडी कधी आहे हे विचारण्यासाठी तो कंट्रोलरच्या खिडकीकडे जाऊ लागला. त्याच वेळी एक सतरा अठरा वर्षांची मुलगीही त्याच खिडकीकडे येत होती. पण तिच्या आधीच अरमानने कंट्रोलरला मुंबईला जाणारी पुढची गाडी कधी आहे हे विचारलं. आणि त्या मुलीने ते ऐकलं आणि ती मागे फिरली. अरेच्चा या छोटीला काय झालं ? अरे ही काहीच न विचारता परत कशी गेली ? ओहो... म्हणजे तिलाही मुंबईला जायचं आहे तर...

समीरही खोपोलीचा, त्याचा गाववाला. पण वर्षभर पुण्यात राहील्यामुळे त्याला मुंबईला जाणार्‍या गाडयांची अवस्था माहीती होती. त्याने शहाण्यासारखं अरमानसाठी तात्कालमध्ये आरक्षण केलं. आणि अगदी खच्चून भरलेल्या बसमध्येही बसण्याचं भाग्य अरमानला मिळालं. ती मघाची छोटी एक सीट सोडून पाठीमागे उभी होती. स्वारीला बसायला मिळालं नव्हतं तर. बस चालू झाली. त्याच्या बाजुची सीटही आरक्षीत होती. पण ती माणसं चिंचवडला चढणार होती. तेव्हढा वेळ तरी बसून घ्यावं असं म्हणून ती छोटी त्याच्या बाजुच्या सीटवर येऊन बसली. बोलता बोलता कळलं ती छोटी त्याच्याच कॉलेजला पहिल्या वर्षाला आहे. त्याच्याच कॉलेजला म्हणजे कर्जतच्या कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात. तीन वर्षांपुर्वी याच कॉलेजमधून तो इंजिनियर झाला, एका सेमिस्टरसाठी लेकचररशीप केली. ती खुप मोकळ्या स्वभावाची आहे हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं. ती छोटी खोपोलीला तिच्या मोठ्या बहिणीकडे जाऊन नंतर कर्जतला जाणार होती. चिंचवड आलं. त्या सीटवरची माणसं आली. त्याच्या नव्या छोटया शेजारणीला तिथून उठावं लागलं. त्याने खुप आग्रह केला तिला आपल्या सीटवर बसण्यासाठी पण नाही बसली ती. संस्कारही चांगले आहेत तर...

गाडी लोणावल्याला आली. कंडक्टरने गाडी पंधरा मिनिटे थांबेल असं सांगितलं. अरमान खाली उतरला. तिथल्याच एका हॉटेलमध्ये शिरला. ती छोटीही त्याच हॉटेलमध्ये आली. ती नको नको म्हणत असताना त्याने तिला एक मँगोला घेवून दिला. ती घटाघटा ते पीवू लागली. आणि तो मात्र तिच्याकडे एकटक पाहत राहीला. कीती निरागस दिसते ही. अगदी आजही फ्रॉक घालून शाळेत गेली तर सातवी आठवीच्या वर्गात सहज बसू शकेल. गाडी चालू झाली. आता मात्र त्याने उभं राहून तिला आपल्या सीटवर बसायला लावलं. गाडी मुंबईच्या दिशेने धावू लागली...

... गाडी खोपोलीचा घाट उतरली. अरमान आता त्या छोटीच्या बाजुलाच उभा राहीला. ती त्याच्याकडे पाहून छानसं हसली. ती त्याच्याशी गप्पा मारू लागली. आणि एका खळाळत्या झर्‍याच्या तुषारांनी तो चिंब भिजून गेला. थोडयाच वेळाने खोपोली बस स्टॅंड येणार होता. काही करून तिचा मोबाइल नंबर घ्यायला हवा असं राहून राहून अरमानला वाटू लागलं. तरीही नंबर मागायचा कसा हा प्रश्न होताच. शेवटी आपलाच मोबाइल तिच्या हातात दिला. आणि तिचा नंबर त्यात टाकायला सांगितला. तिनंही तिचा नंबर काहीही आढेवेढे न घेता मोबाइलमध्ये सेव्ह केला. एरव्ही मुलींसमोर ततपप करणारे आपण आज असा अचानक धीट कसे झालो हे त्याचं त्यालाच कळेना. तिने सेव्ह केलेला नंबर हा तिचा आताचा नंबर नसुन तिचा नविन नंबर आहे जो अजुन आठवडाभराने चालू होणार आहे हेही तिने सांगितले. अरमानला स्वताचंच हसायला आलं. आतापर्यंत ना त्यानं तिचं नाव विचारलं होतं ना तिला आपलं नाव सांगितलं होतं. तिचं नाव तिने त्याच्या मोबाइलमध्ये नंबर सेव्ह केल्यामुळे त्याला कळलं होतं. नावही खुप गोड होतं. अगदी तिच्यासारखंच. त्यानेही मग तिला आपलं नाव सांगून टाकलं. खोपोली आली. दोघेही उतरले. ती तिच्या मावशीकडे जायला रीक्षात बसली. जाताना बाय वगैरे म्हणेल असं वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही. लहान आहे ती असं त्याने स्वतःलाच समजावलं. आणि तोही घराच्या दिशेने चालू लागला...

सोमवार आला. अरमान मुंबईला आला. नेहमीचंच सॉफ्टवेअर इंजिनियरचं कॉपी पेस्टचं रुटीन सुरु झालं. तिचा नंबर सुरु झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी अधूनमधून तिचा नंबर तो डायल करू लागला. आठवडा गेला तरी तिचा नंबर काही सुरु झाला नव्हता. का कोण जाणे पण त्याला थोडंसं चुकल्यासारखं वाटू लागलं. त्याला राहून राहून वाटत होतं की आपण तिचा सध्याचा नंबर घ्यायला हवा होता. त्याला सर्वात मोठा प्रश्न हा पडला होता की तिचा तो नंबर लागत नाही तर आपण एव्हढे अस्वस्थ का झालो आहोत ? ती आपल्याला आवडते का, असं तो स्वतःलाच विचारत होता आणि नाही असं उत्तरही स्वताच देत होता. ते कसं शक्य आहे ? आपण आपल्या हाताखालच्या पोराने लिहिलेला चार ओळींचा फॉर लूप सुद्धा लॉजिकली बरोबर आहे की नाही हे पाहून घेतो. इथे तर मुलगी आवडण्याचा प्रश्न होता. असं जेमतेम अडिच तीन तासांच्या प्रवासातल्या सहवासाने ती मुलगी आपल्याला आवडू शकते का ? याही प्रश्नाचं उत्तर नाही असंच आलं. मग ही मनाची तगमग का होत आहे ? या प्रश्न्नाचं उत्तर मात्र काही केल्या त्याला मिळत नव्हतं. ती अस्वस्थता सोबत घेऊनच तो शनीवारी घरी यायला निघाला...

रविवारची नोव्हेंबर महिन्यातली संध्याकाळ. अरमानने स्लीपर्स पायात सरकवल्या आणि संध्याकाळची मोकळी हवा खाण्यासाठी तो गावाबाहेर पडला. सुर्य नुकताच मावळत होता. सारा आसमंत आरक्त झाला होता. आणि त्या कातरवेळी पुन्हा एकदा त्याच्या मनात तिच्या विचारांची गर्दी होऊ लागली. त्याने नकळत तिचा नंबर डायल केला. रींग झाली. पलिकडून तिचा हळूवार आवाज आला. त्याच्या मनाची अस्वस्थता कुठल्याकुठे पळून गेली होती. पंधरा वीस मिनिटे ती अखंड बालिश बडबड करत होती आणि तो मंत्रमुग्ध होऊन तिचे शब्द कानात साठवत होता. तिचे शब्द जणू सुर्यास्तानंतरच्या आरक्त आभाळाच्या पार्श्वभूमीवर नाचणार्‍या स्वर्गीय अप्सरेच्या पायातील पैंजणांप्रमाणे मधुर नाद करत होते...

त्यानंतर त्याचं वरचेवर तिच्याशी फोनवर बोलणं होऊ लागलं. तिची पहिल्या सत्राची परीक्षा चालू झाली होती. तरीही ती वेळ काढून त्याच्याशी बोलायची. खुप काही विचारायची. स्वतःबद्दलही खुप काही सांगायची. ती उच्च मध्यम वर्गीय घरातली मुलगी होती. कॉन्व्हेंट्मध्ये शिकलेली. सर्वात मोठ्या बहीणीचं लग्न झालं होतं. पुण्यात असते ती. दुसरी मोठी बहीण पुण्यालाच बी जे मेडिकल कॉलेजला वैद्यकीय शिक्षण घेत होती. तिलाही मेडीकललाच जायचं होतं परंतू बारावीला कमी गुण मिळाल्यामुळे नाईलाजाने अभियांत्रिकीला प्रवेश घ्यावा लागला होता तिला. अशी खुप काही सांगत बसायची ती. एकदा तीला वर्गातील हजेरी कमी पडल्यामुळे दंड भरावा लागला तेव्हा ती कशी दिवसभर रडत होती हे ती अगदी इमोशनल होऊन सांगत होती. आणि त्याचवेळी अरमान मात्र आपलं हसू आवरण्याचा प्रयत्न करत होता. असंच एकदा ती तिच्या हॉस्टेलच्या रेक्टरबद्दल बोलत होती. बाइसाहेब बोलताना खुप जोशात आल्या होत्या. 'त्या टकल्याला कसं कळत नाही. आम्ही आता शाळेतल्या मुली आहोत का. सारखं हे करु नका, ते करु नका म्हणत असतो'. तिचं ते बोलणं ऐकलं आणि अरमानला हसू अनावर झालं. ती ज्या रेक्टरला 'टकल्या' म्हणत होती ते सर तो कॉलेजला लेक्चरर असताना त्याचे वरीष्ठ सहाध्यायी होते. त्यांचा मुलगा तेव्हा त्याचा विद्यार्थी होता. हे त्याने तिला सांगताच तीही खळाळून हसायला लागली...

दिवस खुप छान चालले होते. ती आपल्याला आवडते का वगैरे विचार मनात येणं केव्हाच बंद झाले होते. ती आपली अगदी जिवाभावाची मैत्रिण आहे एव्हढीच जाणीव आता अरमानच्या मनाला व्यापून राहीली होती. त्याला आता तीची सवय झाली होती. ती सोबत नसली तरीही ती आपल्या सभोवताली ती वावरते असंच हल्ली वाटायला लागलं होतं. तसंही ती कधी स्वतःहून फोन करत नाही या गोष्टीचं त्याला कधी कधी वाईट वाटायचं. पण आपण फोन केल्यानंतर ती अगदी मनमोकळ्या गप्पा मारते यावर तो समाधानी होता. एकदा सहज म्हणून त्याने तिला विचारलं, की परीक्षा संपल्यावर तिला त्याला भेटायला यायला जमेल का म्हणून. आणि तिने हो म्हणताच, मनातल्या पाखरांनी आभाळात झेप घेतली होती...

तीची परीक्षा चालूच होती. एके दिवशी सकाळीच त्याने तिला फोन केला. त्या दिवशी तिला सुट्टी होती हे त्याला माहिती होतं. बराच वेळ बोलत राहीली ती. अगदी तिला पेपर्स कसे चांगले जात नाहीत इथपासून ते तीची आई तीला भेटायला येणारआहे इथपर्यंत सारं सांगुन टाकलं तिने. तिच्या रूममधुन तिच्या मैत्रिणींचा आवाज येत होता. सहज म्हणून त्याने तिला तसं विचारलं तर तिच्या मैत्रिणी अभ्यास करायला आल्या आहेत असं तिने सांगुन टाकलं. बराच वेळ बोलत असल्यामुळे दोन दिवसांनी फोन करेन असं तिला सांगुन त्याने फोन ठेवून दिला. तीचा मॅथ्सचा पेपर ज्या दिवशी होता, त्याच दिवशी संध्याकाळी त्याने तिला फोन केला. बराच वेळ रींग वाजत राहीली. शेवटी एक्स्चेंजचा, समोरुन प्रतिसाद मिळत नाही असा रेकॉर्डेड मेसेज ऐकला आणि त्याने फोन ठेवून दिला. अरमान थोडासा अपसेट झाला. संध्याकाळी रूमवर आला. पुन्हा एकदा तीला फोन केला. पुन्हा तेच. काहीतरी गडबड आहे हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं. एकतर तिच्या फोनमध्ये काही गडबड असावी किंवा कॉलेजमधला एयरटेलचा टॉवर तरी शांत झाला असावा. खात्री करावी म्हणून त्याने कॉलेजमधल्या एक स्टाफमधल्या मित्राला एयरटेलची अवस्था विचारली. त्याने एयरटेलचं नेटवर्क अगदी व्यवस्थीत चालू आहे असं सांगितलं. म्हणजे तिच्या फोनमध्ये काहीतरी गडबड असावी किंवा... किंवा मग ती जाणुनबुजुन आपला फोन उचलत नसावी. तो विचार मनात येताच थोडंसं वाईट वाटलं. त्याने खात्री करुन घ्यायचं ठरवलं...

दुसर्‍या दिवशी त्याने तिला मोबाइलवरुन मेसेज केला आणि त्याच वेळी आपल्या मित्राच्या मोबाइलवरुन कॉल केला. हाही कॉल तिने घेतला नाही. संध्याकाळी मित्र घरी गेला. अरमान थोडं काम असल्यामुळे ऑफिसमध्ये थांबला. साधारण आठच्या सुमारास त्या मित्राने फोन करुन सांगितलं की त्याला एका मुलीचा फोन आला होता आणि तिने अरमानला तिला फोन करायला सांगितलं आहे. अरमानने मित्राला त्या मुलीचं नाव विचारलं. तर ते तिने सांगितलंच नाही असं म्हणाला. छान, म्हणजे आपल्याला तिला फोन करायचा आहे हे तिने सांगितलं पण ती कोण हे नाही सांगितलं. तो फोन तीचाच होता हे उघड होतं म्हणून त्याने तीला पुन्हा फोन केला. आणि आताही तेच झालं. तिने फोन घेतलाच नाही. आता काय करायचं या विचारात तो पडलेला असतानाच एक विचार मनात चमकून गेला. हॉस्टेलला फोन केला तर ? कॉलेज सोडून तीन वर्ष होऊनही मुलींच्या हॉस्टेलचा नंबर आपण विसरलो नाही या गोष्टीचं त्याला आश्चर्य वाटलं. त्याने फोन केला. तिला बोलावलं. आणि फोनवर तीने जे सांगितलं त्यावर त्याचा मुळीच विश्वास बसला नाही. तिचा मोबाइल म्हणे तिने तिच्या कुठल्या बहीणीला दिला होता. ती खोटं बोलत होती हे उघड होतं. तिला आपल्याशी बोलायचं नव्हतं हे त्याला कळून चुकलं होतं. त्याने तिला कशी आहेस वगैरे विचारून फोन ठेवून दिला...

...खुप वाईट वाटलं त्याला. त्याच्या मनात विचारांची आवर्तनं चालू झाली. असं काय झालं असेल की ज्यामुळे तिला आपल्याशी बोलणं बंद करावंसं वाटलं. आणि मुळात तिच्यासारख्या समजुतदार मुलीनं असं का करावं हे त्याला समजेनासं झालं. फॉर वॉटेव्हर रिझन, तिला आपल्याशी बोलायचं नव्हतं तर तिने तसं मोकळेपणाने का सांगितलं नाही ? कदाचीत आपण तिला तुला माझ्याशी का बोलायचं नाही असंही विचारलं नसतं. ती आपली मैत्रिण होती. तिला आपल्याशी बोलायचं नाही या तिच्या मताचा आपण नक्कीच आदर केला असता...

त्याचं आयुष्य तिच्याविनाही चालूच राहिलं. तो मोबाइल नंबर तिच्याकडेच आहे हे माहीती असल्यामुळे एक दोन वेळा त्याने तिला मेसेज केला. पण काहीच प्रतीसाद मिळाला नाही. तिच्या मनाची दारं तिने आपल्यासाठी बहुतेक कायमची बंद केली होती असं त्याला वाटू लागलं होतं. पण नेमकं काय झालं असावं ज्यामुळे तिनं आपल्याशी बोलणं बंद केलं हा प्रश्न काही केल्या त्याच्या मनातून जायला तयार नव्हता. तो स्वताशीच विचार करू लागला. आपल्याला तिच्याबद्दल ओढ वाटत होती का ? आपल्या बोलण्यातून तिला तसं काही जाणवलं असावं का ? पण मग तिने तसं आपल्याशी मोकळेपणाने बोलायला काय हरकत होती ? आणि समजा आपल्याला जर तिच्याबद्दल ओढ वाटत असेल तर त्यात वावगं काय होतं ? आपण तिच्याशी फोनवर बोलताना कधीही मर्यादा तर सोडल्या नव्हत्या ना ? जर आपण तिच्या प्रेमात वगैरे पडलो आहे असा तिचा समज झाला असेल आणि तिला ते मान्य नसेल तर तिने तसं मोकळेपणाने सांगायला काय हरकत होती ? एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात येत होते. उत्तर मात्र कुठल्याच प्रश्नाचं मिळत नव्हतं. एक दोन वेळा तो वर्किंग डे ला कॉलेजला काही कामानिमित्त गेलो होता. तेव्हा तिला भेटायचं असा विचार त्याच्या मनात येऊन गेला होता. पण तो त्याच कॉलेजचा माजी विद्यार्थी आणि माजी लेक्चरर असल्यामुळे तिला भेटणं खुप अवघड आहे हे त्याला लगेच जाणवलं होतं. आणि एक निरागस मैत्री तुटली होती...

पुढे कामानिमित्त तो अमेरिकेला आला. नवी दुनिया. नविन माणसं. एका नव्या जगाशी जुळवून घेण्यासाठी त्याचा संघर्ष चालू झाला. काम करत असतानाच भारतातली एखादी आठवण चेहर्‍यावर स्मित फुलवू लागली. आई, बाबा, भावंडं, मित्रमंडळी या सार्‍यांची किंमत घरापासून दुर आल्यावर कळायला लागली. शंकर महादेवनचं 'तारे जमीनपर' चित्रपटातील 'मा' हे गाणं ऐकताना पापण्यांवर पाणी जमा होऊ लागलं. जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तो जिमेल आणि ओरकूट यांच्या माध्यमातून आपल्या मातीशी 'कनेक्टेड' राहू लागला...

एक दिवस सहज म्हणून त्याने तिच्या नावाने ओरकूटमध्ये शोध घेतला. अनपेक्षीतपणे तिचं प्रोफाईल सापडलं. फ्रेंड रिक्वेस्ट टाकली. स्क्रॅप टाकला. तिचा काहीच प्रतीसाद नाही. त्याने चिकाटी सोडली नाही. अधुनमधुन तिला स्क्रॅप टाकत राहिला. शेवटी एक दिवस तिने फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली. त्याला स्क्रॅपही टाकला. एकमेकांची विचारपुस होऊ लागली. पण त्यात पुर्वीचा जिव्हाळा नव्हता. कधी कधी त्याला वाटायचं की ती केवळ औपचारीकता म्हणून आपल्याला स्क्रॅप टाकते. त्याने एक दोन वेळा आडून आडून तेव्हा काय झालं होतं हे विचारण्याचा प्रयत्न केला पण तिने उत्तर देणं टाळलं. त्यानेही मग तिच्या भावनांचा आदर ठेऊन तिला स्क्रॅप टाकणं कमी केलं...

जेमतेम सहा महिन्याच्या टाइम स्पॅन मधील वरील सार्‍या घटना. ती पुण्याच्या स्वारगेट बस स्टँडवर त्याला दिसते काय, बसमध्ये तिच्याशी ओळख काय होते, तिच्याशी मैत्री काय होते आणि ही मैत्री ती तडकाफडकी तोडून काय टाकते. सारंच आश्चर्यकारक. आज जेव्हा तटस्थपणे तो या सार्‍या घटनांकडे पाहतो तेव्हा त्याला स्वतःवरच हसायला येतं. आपण तेव्हा कितीही नाही म्हणत होतो, अगदी तिच्या प्रेमात वगैरे पडलो नव्हतो तरीही ती आपल्याला आवडली होती याची जाणिव त्याला होते. त्याशिवाय का एक पंचवीशीमधला स्थिरावलेला संगणक अभियंता एका अभियांत्रिकिच्या पहिल्या वर्षामध्ये शिकणार्‍या सतरा अठरा वर्षांच्या मुलीला दोन दिवसांआड तिला फोन करायचा, संध्याकाळी तिच्याशी बोलून झाल्यावर दिवसभराचा सारा त्रास विसरायचा. त्याला जाणवतं की तशीही ती आजही आपल्याला आवडते . कुणालाही आवडावी अशीच आहे ती. गोड, निरागस आणि सरळ साधी. आजही वाटतं की तिला जे काही वाटलं होतं, जाणवलं होतं ते ती मोकळेपणाने बोलली असती तर ? मूळात ती आपल्याला आवडते असं आपण तिला कधीही बोलून दाखवलं नव्हतं. कारण आपल्याला स्वतःलाच तेव्हा त्या भावनांची जाणीव नव्हती. आणि तिलाही ते असं अचानक कसं जाणवलं हा प्रश्न होताच. मुलगी असल्यामुळे कदाचीत तिला ते आपल्या बोलण्यातून तसं जाणवलंही असेल. कदाचित आपण तिला खुप फ्रिक्वेंटली फोन करतो हे कळल्यानंतर तिच्या मैत्रीणींनी तिला वेडेवाकडे सल्ले दिले असतील. पण म्हणून काय असं वागायचं असतं ? एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडते आणि हे त्या मुलीला मान्य नसेल तर म्हणून काय त्या मुलीने त्या मुलाशी मैत्री तोडायला हवी असंच काही नाही. निदान तो मुलगा समजुतदार असेल, तिच्याबद्दल त्याला आदर असेल तेव्हा तर नक्कीच नाही ना ? असं तडकाफडकी बोलणं बंद करण्यापेक्षा तिनं आपल्यासमोर मन मोकळं केलं असतं तर ? तिनं म्हटलं असतं तर आपण स्वतःहून तिच्याशी बोलणं बंद केलं असतं...

...तशीही ती लहान आहे. एव्हढी विचारांची परिपक्वता कदाचित तिच्याकडे नसेल. जेव्हा तिला वाटलं असेल की ती आपल्याला आवडते किंवा आपण तिच्या प्रेमात पडलो आहे तेव्हा तिच्या वयानुसार जे तिला योग्य वाटलं तसं ती वागली असेल. तसाही आपला तिच्यावर राग नाही. कदाचित आपण तिच्या वयाचे किंवा तिच्यापेक्षा एक दोन वर्षांनी मोठे असतो तर 'ती मला आवडते' या वाक्याला आपण 'मी तिच्या प्रेमात पडलो आहे' असं नक्कीच रुपांतरीत केलं असतं आणि तिला आपलीशी करण्यासाठी जिवाचं रान केलं असतं. नव्हे आपल्या त्या वयाने ते करायलाच लावलं असतं. पण आपण तिच्यापेक्षा सहा सात वर्षांनी मोठे आहोत याची जाणिव आपल्याला आहे. त्यामुळे तिच्या मनात नसताना तिच्या प्रेमात पडण्याचा वेडेपणा आपण नक्कीच करणार नाही. पण म्हणून काही ती मनातून निघून जाणार नाही. तिच्या आठवणी कायम आपल्यासोबत असतील. तिचं ते अल्लड हसू नेहमीच आपल्या कानात गुंजेल. तिची ती निरागस बडबड आठवताच आपल्या चेहर्‍यावर स्मित उमलेल. जेव्हा कधी तिची आठवण येइल, तेव्हा मनातून हाच आवाज उमटेल,
'जगाच्या पाठीवर ती कुठेही राहो, सुखात राहो...'

Monday, July 28, 2008

जाने तू... या जाने ना...

महिन्याभरापूर्वी "मेरे बाप पहले आप" आप हा हिंदी चित्रपट पाहीला. पाहिला म्हणणे खरं तर धाडसाचे होईल. "झेलला" हाच शब्द योग्य आहे. आणि झेलला तोसुद्धा त्या पोरीसाठी. खुप गोड आहे ती पोरगी. हो पोरगीच नाही तर काय... पाच वर्षांनी लहान आहे ती माझ्यापेक्षा. केवळ तीचं ते निरागस हसू पाहण्यासाठी प्रियदर्शन, परेश रावल आणि अक्षय खन्ना यांचा पांचटपणा खपवून घेतला. (विश्वास नाही बसत हो की याच प्रियदर्शन आणि परेश रावल यांनी सुनिल शेट्टी आणि अक्षय कुमार या मारधाड द्वयींसोबत काम करून "हेराफ़ेरी" सारखा उत्तम विनोदीपट बनवला होता.)

असो. मी तुम्हाला सांगत होतो त्या गोड पोरीबद्दल. जेनेलिया डिसोझा तिचं नाव. अभिनय जमतो की नाही हे माहिती नाही पण पडद्यावरील तिचा वावर कृत्रीम नक्कीच वाटत नाही.बहुतेक ती तिच्या खाजगी आयुष्यातही अगदी अशीच असावी ती. हसरी, खेळकर... तीन तास संपताच "मेबापआ" डोक्यातून निघून गेलं. पण जेनेलियाचा पडद्यावरील हसरा चेहरा मात्र लक्षात राहीला. तिच्या बद्दल अजून काही माहीती मिळवण्यासाठी आम्ही मग गुगलला कामाला लावला. (तो गुगलही अगदी खुश झाला असेल एका सौंदर्यवतीची माहीती काढायला सांगीतली म्हणून. कारण एरव्ही आम्ही त्या बिच्या‍‌‍र्‍याला डेटाबेसमधून अशी अशी माहीती कशी आणायची, "डीस्क्रीपंसी" हा इंग्रजी शब्द अचुक कसा लिहायचा यासारखे एकदम चिंधी प्रश्न विचारतो.)

आम्ही गुगलला "जेनेलिया" हा शब्द दीला आणि म्हटलं आता शोध. त्यानेही "जो हुकुम मेरे आका" म्हणत जेनेलियाची ढीगानी माहीती आमच्या पुढ्यात ओतली. अरेच्च्या ही पोरगी आमच्यापेक्षा चक्क पाच वर्षांनी लहान आहे. वाटत नाही हो पण तसं काही. आणि तिचं सौंदर्यसुद्धा किती नैसर्गीक आहे... (लेका, गाढवीण सुद्धा सुंदर दिसण्याचं तुझं वय आहे रे. मग चित्रपट अभिनेत्री तुला सुंदर दिसेल यात नवल काय.) या पोरीनं म्हणे यापुर्वी "तुझे मेरी कसम" आणि "मस्ती" या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे म्हणे. "तुमेक" मी अजुनही पाहीला नाही पण मस्ती पाहीला आहे. डोक्याला खुप ताण देवून पाहीला पण मस्ती मधलं ती असणारं एकही दृश्य नजरेसमोर येईना. अगदी "तू नळी" (YouTube) वरही मस्ती मधली तीची चित्रफ़ीत मिळते का पाहीलं. नाही मिळाली. देव जाणे. (जाउदे ना भौ... तुला काय दुसरे कामधंदे नाहीत काय... च्यायला काहीही शोधत बसतो जालावर.)

याच दरम्यान भारतात या पोरीचा अजुन एक हिंदी चित्रपट आला होता. "जाने तू... या जाने ना". आमिर खानचा हा चित्रपट. म्हणजे आमिर खानने आपल्या भाच्याला लॉंच करण्यासाठी बनवलेला (च्यायला... लॉंच करायला आमिर खानचा भाचा काय सॅटेलाईट आहे काय ?) या चित्रपटाचा आमिर खानच्या भाच्याला किती फ़ायदा होईल हे ते दोघे मामा भाचेच जाणोत. पण या चित्रपटातील जेनेलियाची "आदिती" मात्र भाव खाऊन गेली. चित्रपटाची कथा तशी चावून चावून चोथा झालेली. चित्रपटातला शिखर प्रसंग (climax scene) तर चक्क "अमेरिकन पाय : द नेकेड माईल" या चित्रपटातून अगदी तसाच्या तसा उचललेला. (इच्छुकांनी हा "नेकेड माईल" पाहण्यास हरकत नाही. पण जरा सांभाळून. चित्रपट प्रत्येक फ़्रेममध्ये आपल्या नावाला जागतो). एका हळव्या क्षणी (किंवा भिकार क्षणी फ़ॉर दॅट मॅट्टर)हिरोला आपल्या प्रेमाचा साक्षात्कार होतो आणि मग तो इस जालिम दुनिया के सगळे बंधनको झुगारुन देके आपल्या प्यारला पान्यासाठी सुपरसॉनिक विमानांच्या काळातही घोडयावरून धाव घेतो. (पाडगांवकरांचं म्हणणं अगदी खरं आहे. प्रेम, आपलं त्यांचं सेम असतं. म्हणून तर नेकेड माईल मधला अमेरिकन हिरो काय कींवा जातूयाजाना मधला भारतीय हिरो काय, आपलं प्रेम मिळवण्यासाठी घोडयावरून धाव घेतात...)

असो. ते अडीच तीन तास संपताच "जातूयाजाना" डोक्यातून निघून गेला. पण जेनेलियाचा उस्फुर्त अभिनय मात्र मनात घर करून राहीला. पुन्हा एकदा आम्ही गुगलला कामाला लावले. "तू नळी" वर जेनेलियाच्या काही तेलुगु आणि तमिळ चित्रपटांमधील चित्रफ़ीती सापडल्या. चित्रफ़ीती तमिळ आणि तेलुगु भाषेतल्या असल्यामुळे फ़ारसं काही झेपलं नाही. पण तीचा "बोमरिलू" हा तेलुगु चित्रपट चांगला असावा हे जाणवलं. अगदी "विकी" नेही चित्रपटाच्या उत्तमतेची ग्वाही दिली. लगेच भारतीय दुकानामधून (अमेरिका निवासी भारतीय, अमेरिकेतील भारतीय दुकानाना "इंडीयन शॉप" असं म्हणतात.) इंग्रजी उपशिर्षक असलेली बोमरिलूची तबकडी आणली. पाहीली. आणि तो अप्रतीम चित्रपट पाहील्यानंतर खुप दिवसांनी एक नितांत सुंदर चित्रपट पाहील्याचं समाधान मिळालं. चित्रपट पाहताना इतका समरस झालो होतो त्या चित्रपटाशी की त्या वेळात मुळीच जाणवलं नाही की आपण तेलुगु, आपल्याला बिलकुल न समजणा‍र्‍या भाषेतील चित्रपट पाहत आहोत.

एका सुंदर प्रसंगाने चित्रपट सुरु होतो. समुद्र किनार्‍यावर एक अगदी छोटं बाळ पावलं टाकत असतं आणि त्याचे बाबा त्याला सावरत असतात. याच वेळी कथेचा निवेदक आपल्या गंभीर आवाजात सांगत असतो की वडीलांनी मुलाला त्याच्या बालपणामध्ये आधार देणे आवश्यकच आहे पण मुलगा मोठा झाल्यानंतरही त्याच्या आयुष्यात दखल देणं कितपत योग्य आहे... मुलं लहान असतात तोपर्यंत त्यांना आई बाबांचा आधार हवा असतो पण जस जशी ती मोठी होत जातात तसतसं त्यांना आई बाबांपासून स्वातंत्र्य हवं असतं. तसं नाही झालं तर त्यांची प्रचंड घुसमट होते. प्रसंगी मुलं घराबाहेर आई वडीलांबद्दल अपशब्द काढायलाही मागे पुढे पाहत नाहीत. कधीतरी ही घुसमट असह्य होते आणि मग मुलं सगळी बंधनं झुगारुन देतात. बोमरिलू याच मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत आहे.

सिद्धार्थ (सिद्धार्थ सुर्यनारायण - रंग दे बसंती मधला करण) एका सुखवस्तू घरामधला घरामधला मुलगा. दोन वर्षांपुर्वी इंजिनियर झालेला. आणि तरीही त्याच्या प्रत्येक गोष्टीवर वडीलांचा वरचश्मा असणारा. त्याने कुठले कपडे घालावेत इथपासुन ते त्याची "हेअर स्टाईल" कशी असावी इथपर्यंत सारं काही वडील ठरवणार. या सगळ्याला सिद्धु खुप वैतागलेला. अगदी मित्रांसोबत असताना पिणं झाल्यानंतर आपल्या बाबांना खुप शिव्या द्यायचा तो. मित्रांसोबत असताना तो नेहमी म्हणायचा, की त्याच्या बाबांनी त्याच्या आयुष्यात कितीही ढवळाढवळ केली तरीही दोन गोष्टी तो त्याच्या मनाप्रमाणेच करणार होता. एक म्हणजे त्याच करीयर आणि त्याचं लग्न. त्याला आवडणा‍र्‍या मुलीसोबतच तो सात फेरे घालणार होता.

आणि अशातच सिद्धुचे घरवाले त्याच्या मनाविरुद्ध त्याचं लग्न ठरवतात आणि त्याच्या मनाची घुसमट अधिकच वाढत जाते.पण एक दिवस त्याला एका मंदीरात "ती" दिसते आणि त्याच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळते. लग्न ठरलेलं असतानाही सिद्धू त्या मुलीच्या, हासिनीच्या (जेनेलिया) प्रेमात पडतो. हासिनी सिद्धुच्याच कॉलेजला इंजिनियरींगला असते.आपल्याच कॉलेजचा पासआऊट म्हणून हासिनी सिद्धुशी मैत्री करते आणि तिच्याही नकळत त्याच्या प्रेमात पडते.

चित्रपटामध्ये हा इथवरचा प्रवास इतक्या हळूवारपणे दाखवला आहे की आपल्या हिंदी चित्रपटांनी बनवणार्‍यांनी त्याचे धडे घ्यावेत. गोंधळलेला सिद्धू, अल्लड आणि अवखळ कॉलेजकन्यका हासिनी, त्या दोघांचं साध्या साध्या प्रसंगांमधून फ़ुलणारं प्रेम, सिद्धू आणि त्याच्या आई बाबांमधील प्रसंग. सारंच सुंदर. एरव्ही घरामध्ये एक अवाक्षरही न बोलणार्‍या सिद्धूचं हासिनीवरचं अधिकार गाजवताना सिद्धार्थ नारायणने केलेला अभिनय तर लाजबाब...

आपलं लग्न ठरलं आहे हे सिद्धूला हासिनीला सांगायचं असतं. तसं ते तो तिला सांगतोही. ते ऐकताच हासिनीला धक्का बसतो. ती सिद्धूपासुन दुरावते. पण ती फ़ार काळ स्वत:ला त्याच्यापासून दुर ठेवू शकत नाही आणि ती परत येते. सिद्धू आणि हासिनीचं पुन्हा एकदा भेटतात. एका रस्त्यावर, सिद्धूच्या बाबांसमोर त्यांच्या नकळत. सिद्धूचं लग्न ठरलेलं असुनही तो दुस‍र्या एका मुलीच्या प्रेमात पडला आहे, ही गोष्ट समजताच घरात वादळ येतं. बाबा सिद्धूला हासिनीला विसरून जायला सांगतात. सिद्धू सगळ्यांना एकदा तुम्ही हासिनीला भेटा, तिला समजून घ्या आणि मग हव तर जर तिचा स्वभाव पटला नाही तर मला तिला विसरायला सांगा अशी विनंती करतो. नव्हे, तो घरच्यांना हासिनीला एक आठवडयासाठी घरी आणण्याचं कबूल करतो. आणि सहलीची युक्ती करून हासिनीला तिच्या घरुन आठवडयासाठी आपल्या घरी घेऊन येतोही.

हासिनी सिद्धूच्या घरी येते. सुरुवातीला सारे तिच्याकडे दुर्लक्ष करतात पण हासिनी आपल्या अल्लड, अवखळ वागण्याने सा‌र्‍यांची मने जिंकून घेते. एके दिवशी हासिनी सार्‍या कुटूंबासोबत एका लग्न समारंभात जाते. आपल्या अल्लड स्वभावाने त्या लग्न समारंभामध्ये रंग भरते. योगायोगाने याच लग्नाला हासिनीचे बाबाही येतात. तिच्या बाबांनी एकदा सिद्धूला मित्रांसोबत दारू पिऊन रस्त्यावर आपल्या बाबांना शिव्या देताना पाहीलेलं असतं. ते सिद्धूला ओळखतात. हासिनी प्रसंगावधान राखून पुढचा प्रसंग टाळण्यासाठी समारंभातून तिच्या बाबांच्या नकळत निघून जाते. असं असुनही घरी आल्यावर सिद्धू हासिनीला तिच्या लग्नामधल्या बालिश वर्तनाबद्दल ओरडतो. या सगळ्याने हासिनी व्यथीत होते. सिद्धू पुर्वीचा जसा होता तसा आता राहीला नाही, तसंच या घरात राहण्यासाठी तिला खुप तडजोड करावी लागेल आणि ते तिच्याने होणार नाही असं सांगून ती सिद्धूच्या घरुन निघून जाते. हासिनी तिच्या घरी गेल्यावर तिच्या बाबांचा ओरडा खाते. पण ती पुन्हा असं काही ती करणार नाही असं आपल्या बाबांना वचन देते.

इकडे सिद्धू मात्र हासिनीच्या विरहात स्वत:ला हरवून जातो. सिद्धूची आई पुढाकार घेऊन त्याच्या बाबांना समजावते. चोवीस वर्षात कधीही बाबांपुढे तोंड न उघडलेला सिद्धूही आपल्या मनातील घुसमट बाबांसमोर व्यक्त करतो. गेले चोवीस वर्ष ते कसे चुकत गेले हे सांगतो. सिद्धु आपल्या नियोजित वधूच्या घरी जाऊन लग्न त्याचं त्यांच्या मुलीशी ठरलेलं लग्न मोडण्यास राजी करतो. सिद्धूचे बाबाही आपल्या मुलासाठी हासिनीच्या घरी जातात. तिच्या बाबांना हासिनी आणि सिद्धूच्या लग्नासाठी विनंती करतात. आता हासिनीचे बाबा सिद्धूला समजून घेण्य़ासाठी त्याला एक आठवडाभर आपल्या घरी राहायला बोलावतात. आणि त्यानंतर हासिनी आणि सिद्धू लग्न करुन सुखी होतात असं मानायला लावून चित्रपट संपतो...

म्हटलं तर हा चित्रपट तसा एक चाकोरीबद्ध चित्रपट आहे. प्रेमकथा, घरातील ताण-तणाव हे विषय तसे नेहमीचेच आहेत.पण चित्रपटाचं सादरीकरण निव्वळ अप्रतीम आहे. सिद्धार्थ नारायण (सिद्धू), जेनेलिया (हासिनी), प्रकाश राज (सिद्धूचे बाबा) या तीन कलावंताचा तसेच इतर सह कलाकारांचा कसदार अभिनय, कानांना गोड वाटणारं संगीत या सगळ्यामुळे चित्रपट खुप सुंदर बनला आहे. सिद्धार्थ नारायणनेच गायलेलं "आपुडॊ ईपुडॊ" हे गीत आणि "बोम्मनी गिस्ते" हे प्रेम गीत ही दोन्ही गाणी सुंदर आहेत... चित्रपट २००६ साली प्रदर्शीत झाला होता. त्यावेळचा तो सुपरहीट तेलुगु सिनेमा होता. चित्रपटाला फ़िल्मफेअर पारितोषिकही मिळालं होतं...

असो. तर "मेरे बाप पेहले आप" सारख्या भिकार हिंदी चित्रपटापासून हसत खेळत सुरु झालेली जेनेलियाची कहाणी "बोमरिलू" या नितांत सुंदर तेलुगु चित्रपटाशी थोडीशी गंभीर लिखाणाने संपली !!!

Thursday, July 24, 2008

सा‌‍‌र्‍याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या

जरी बसणार नाही या गोष्टीवर विश्वास माझा
लाभणार नाही मला पुन्हा जरी सहवास तुझा
मनाची मात्र तयारी अजून होत नाही माझ्या
सा‌‍‌र्‍याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या

जेव्हा कुणी समोरून क्षणी निघून जातं माझ्या
जणू ती व्यक्ती तू असल्याचा भास होतो राजा
तुझी मुर्ती वसली आहे दोन्ही पापण्यांत माझ्या
सा‌‍‌र्‍याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या

असलो जरी मी अफाट दुनियेमध्ये मिसळलेला
आतून मात्र मी आहे पुर्ण हरवलेला अन एकला
या एकाकी जगामध्ये मला सोडून गेली तू राजा
सा‌‍‌र्‍याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या

जरी आजही होते पापण्यांची उघडझाप माझ्या
त्या पापण्यांवरची स्वप्नं तुझीच होती रे राजा
ती सारी स्वप्नं राज्य करतात क्षणांवर माझ्या
सा‌‍‌र्‍याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या

तुझ्या त्या सहवासाच्या निखळ चांदण्यात सखे
भान हरपून अगदी विसरून जात असे स्वत:ला
केव्हाच सरलेत ते दिवस,जाणवतंय मला आता
किती अभागी मी, मुकलोय त्या स्वर्गसुखाला

माझ्या विचारांमध्ये,वेदनांच्या या जाणिवांमध्ये
आताचा क्षण हा फारच भयाण वाटतो आहे मला
ते मैत्रीचं निखळ हास्य, प्रेमाचा नाजुक धागा
हरवलेलं प्रेम व्याकुळ करत आहे या कातरवेळेला

जरी बसणार नाही या गोष्टीवर विश्वास माझा
लाभणार नाही मला पुन्हा जरी सहवास तुझा
मनाची मात्र तयारी अजून होत नाही माझ्या
सा‌‍‌र्‍याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या

(बोमरीलू या तेलुगु चित्रपटातील "नमकथपनी" या अप्रतीम विरहगीताचा स्वैर अनुवाद...)

value="http://www.youtube.com/v/63epNlvCy9U&hl=en&fs=1">

Saturday, June 21, 2008

कधी सांज ढळत असताना...

डॉ. करणिकांचं फिजीओलॉजीचं शेवटचं लेकचर संपलं.सेकंड एम बी बी एस च्या वर्गातून पांढरा शुभ्र एप्रन घातलेली भावी डॉक्टर मंडळी भराभर बाहेर पडली. अविनाशसुद्धा घाई करत वाचनालयाच्या दिशेने निघाला. आज काहीही करून ग्रे चं anatomy चं पुस्तक मिळायला हवं याच विचारात तो चालला होता. तो जिना चढून दुस~या मजल्यावर आला. त्याच्या मागोमाग मोठ्याने चपलांचा आवाज करत कुणीतरी येत असल्याचं त्याला जाणवलं. ''असेल कुणी सीनियर किंवा स्टाफ मेम्बर", तो स्वताशीच पुटपुटला.
"ए स्कॉलर", मागून आवाज आला. त्याने आवाजाच्या दिशेने वळून पाहिलं. त्याच्याच वर्गांमधील राखी कुलकर्णी स्मित करत उभी होती. पहिल्या वर्षाच्या पहिल्या टर्म ला जेव्हा त्याला फर्स्ट क्लास मिळाला होता तेव्हापासून ती त्याला स्कॉलर म्हणूनच हाक मारत असे.
" बोल"
"काही नाही रे. फ्रेंडशिप रीबीन बांधायची होती. आज फ्रेंडशिप डे आहे हे लक्षात आहे नं तुझ्या ?"
"हो पण सगळ्याच भावना शब्दांतून किंवा कृतीतून व्यक्त करताकेल्या पाहिजेत अ स नाही. भावनांची जपणूक मनातही करू शकतो आपण", त्याने स्मित चेहर्याने तिच्याकडे पाहत म्हटलं.
" ते प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबुन असतं रे राजा. शेवटपर्यंत निभावणार नं ही मैत्री ?" रंगाची छोटी रीबीन त्याच्या हातावर बांधत राखीने त्याला विचारलं."तू मला बहिणीसारखी आहेस. आणि भाऊ कधी बहीनीची साथ सोडतो का ?"
**********************************************

" And thus I conclude on the topic Dr. Freud psychology and the Society..." अविनाश मान खाली झुकवून डायसवरून उतरला. आणि सारा हॉल टाळ्यांच्या आवाजाने गजबजुन गेला.
"अभिनंदन", राखीने पुढे होऊन त्याचा हात हातात घेत म्हटलं.
" Come on यार. ती परिक्षा होती. सभेतलं भाषण न्हव्तं"
" ठीक आहे यार, परीक्षा तर परीक्षा. अभिनंदन वाया तर नाही गेलं"
"ए राखी तुला काही सांगायचं होतं पण आता नाही. दुपारी सांगेन. "
दुपारचं Patholgy च लेक्चर संपताच दोघेही कॅण्टीन च्या दिशेने निघाले. समोरून रवि आणि समीर येत होते. अविनाशचं लक्ष समीर कडे जाताच समीरच्या चेह~यावर हसू उमटलं. त्याच्या त्या हसण्याचा अर्थ अविनाश समजून चुकला. गेले वर्षभर हे अस चाललं होतं. अविनाश ला राखीवरुन चिडवणं नेहमीचंच झालं होतं. अर्थहात हे सारं राखीच्या अपरोक्ष चालायचं. अविनाश त्याकडे दुर्लक्ष करत असे. मी तिला बहीण मानतो हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असे. पण मित्र मात्र " बहिणीवरचं प्रेम उतू चाललं आहे" अस म्हणून त्याची संभावना करत असंत.
"बोल अवी, काय सांगणार होता तू ?" समोरच्या गरम चहावर फुंकर मारत राखीने त्याला विचारलं.
"राखी तुझ्या मैत्रिणी माझ्याबद्दल कुजबुजत असतात. "
"काय ?"
" हेच की, तुझं आणि माझं काही ...."
" बोलू दे नं त्याना काय हवं ते.... तू कशाला मनावर घेतो ? अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायचा असतं अवी. चल चहा थंड होतोय तुझा.."

आणि तो विषय तिथेच संपून गेला.
***********************************************

"अवी, मला तुझं pathology च जर्नल हवं आहे. कधी देशील ?"
"तुला हवं तेव्हा, पण एका अटीवर"
"काय भाव खातो रे मुलीसारखा ? ठीक आहे बाबा बोल तुझी अट"
"राखी, मी तुला जर्नल दिल्यावर थॅंक्यू म्हणावं लागेल"
"मुळिच नाही"
"का ?"
"आपल्या माणसांचे आभार मानणे मला आवडत नाही"
"बरं बाई, राहीलं. मी उद्या देतो जर्नल"
दोनच दिवसांनी राखीने अविचं जर्नल परत केलं. जर्नल दिल्यानंतर तिने आपल्या पर्समधुन एक कागद काढला. कागदाची घडी उलगडत अवीसमोर पकडला.
"अवी, स्केच छान आहे रे. त्या खालची चारोळीही अगदी छान जमली आहे.
नाकारलं आहेस जरी तू मला
तरी मी तुला नाकारलेलं नाही
वादळं तर तशी पुष्कळ आली
गलबत माघारी हाकारलं नाही

अवी, कोण आहे रे ही ?"
"कोण कोण आहे ? मला नाही माहीती"
"ए, उगाच वेड घेऊन पेडगावला जाऊ नको. हे स्केच तुझ्या जर्नलमध्ये होतं. म्हणजे हे तुला आवडणा~या मुलीचं स्केच आहे. आणि ती चारोळी हेच सांगत आहे की ती मुलगी तुला भाव देत नाहीए."
"चूप बस ना जरा."
"नाही. आधी मला सांग, कोण आहे ही ? आपल्या कॉलेजला आहे का ?"
"नाही"
"इंजिनीयरींगला ?"
"नाही"
"अवी, आता दोनच पर्याय उरतात. एक तर ती ज्युनियर किंवा सीनियर कॉलेजला आहे नाही तर मग शाळेत"
राखीच्या चेह~यावरचे मिश्कील भाव पाहून अवीला हसायला आलं. अन् तो अनावधानाने बोलून गेला, "सीनियरला. सेकंड आर्टला."
"सही."
"राखी, त्यात सही काय आहे ?" अवीने त्रासीक सुरात विचारलं.
"ए अवी, चिढतो काय एव्हढा ? वन वे ? कधी विचारलं होतं तू तिला ? काय म्हणाली ती ?"
"माझे आई, सांगतो मी तुला सारं. पण माझं डोकं खाऊ नको. मी अकरावीला असताना तिला विचारलं होतं. 'नाही' म्हणाली. बारावीला असताना विचारलं. पुन्हा ती 'नाही' म्हणाली. तिचं सुद्धा बरोबर होतं म्हणा. खूप फरक होता तिच्या आणि माझ्या घरच्या परिस्थितीमध्ये. एकदा योगायोगाने नजरेला नजर भीडली. मला तिची निरागस नजर आवडली. आणि मी कधी तिच्या प्रेमात पडलो माझं मलाच कळलं नाही. मी तेव्हा बारावीला असल्यामुळे फारसं मनावर न घेता अभ्यासात गुंतलो. पण आता मात्र पुन्हा तिला विचारावं अस वाटत आहे"
"अवी इंटरेस्टिंग आहे रे सगळं. पण एक सांगू ? तू नको विचारू आता तिला"
"का ? तू जलन वगैरे होते का ?"
"अवी, काहीही बडबडू नकोस. मला जलन व्हायचा प्रश्न येतो कुठे ? एक मुलगी म्हणून तुला सांगते, खरंच विसरून जा तू तिला. जेव्हा एखादी मुलगी एखाद्या मुलाला केवळ त्याच्या घरच्या परीस्थीतीमुळे नाही म्हणते तेव्हा ती त्या मुलाचा फक्त तिरस्कार करते. काही मुली बोलून दाखवतात. काही मुली नाही बोलत."
"तरीही मी तिला विचारणार आहे"
"ठीक आहे. जशी तुझी मर्जी. फक्त या सगळ्यात अभ्यासाकडे दुर्लक्ष
होणार नाही याची काळजी घे."
**********************************************

एम बी बी एसचं तिसरं वर्ष संपलं होतं. पेपर्स चालू झाले होते. अवी जरी पेपर्स देत होता तरी मनातून मात्र तो पुरता कोलमडला होता. त्याचं काहीतरी बिनसलं आहे हे राखीने ओळखलं. त्या दिवशी physiology चा पेपर होता. पेपर संपला. अवी एग्झाम हॉलमधून बाहेर आला.
"अवी", पाठीमागून राखीचा आवाज आला. आवाजाच्या दिशेनं त्याने वळुन पाहिलं.
"अवी काय झालं रे ?" त्याला बाजूला घेत राखीने विचारलं.
"कुठे काय झालं आहे ?" तिची नजर टाळत त्याने प्रतीप्रश्न केला.
"अवी, माझ्याशीसुद्धा बोलणार नाही तू ? एव्हढी परकी आहे का रे मी ?"
"राखी, तिचं... तिचं दुस~या मुलाबरोबर अफेअर आहे" राखीने त्याच्याकडे पाहिलं. त्याचे डोळे अश्रूनी डबडबले होते. त्याची ती अवस्था पाहून तिलाही भरून आलं.
"अवी इट्स ओके यार. फर्गेट इट. अस समज की ते स्वप्न होतं. जाग येताच संपून गेलं."
"राखी इतकं सोपं असतं का एखाद्याला विसरनं ? एकतर्फे का होईना पण मी तिच्यावर जवळजवळ चार वर्षा प्रेम केलं आहे. मनात आशा होती की आज ना उद्या ती हो म्हणेल. चार वर्ष जिवापाड जपलेलं स्वप्न कागद फाटावा इतक्या सहजतेनं तुटले आहे गं राखी"
"अवी, सगळीच स्वप्नं वास्तवात येतात अस नाही. यापूर्वीच तू मन कठोर करून तू तिला विसरून जायला हवं होतं. ती तुला आवडते म्हणून तिलाही तू आवडायला हवास अस काही नाही. आणि ज्या मुलीला तुझ्याबद्दल जराही आपुलकी नाही, ती मुलगी तुझ्या आयुष्यात यावी असा तुझा अट्टाहास का ?"
"राखी कळत आहे गं सगळं"
"पण वळत नाही असंच ना ?"
"राखी प्लीज चीडू नकोस गं, मला तुझा खूप आधार वाटतो गं"
"अवी, मी चिडत नाहीये रे. तुला वास्तवाची जाणीव करून देत आहे. अवी, माणसानं कुणावर इतकंही प्रेम करू नये की ज्यामुळे त्यानं स्वता:चं अस्तित्व विसरून जावं. मन कठोर कर. तुला भूतकाळ विसरायलाच हवा. मी अस म्हणत नाही की तू आजच आणि आताच विसर. थोडा वेळ जरूर लागेल. दोन महिने, सहा महिने कदाचित पूर्ण वर्ष जाईल. मला माहिती आहे, तू तिला नक्की विसरशील. तुला आठवतंय ? मागे एकदा तू म्हणाला होतास की तुला gynacology घेऊन एम डी करायचं आहे. खूप मोठा स्त्री रोग तज्ञ व्हायचं आहे. बास, तुझ्या या ध्येयावर लॅक्स केंद्रित कर. कुठलं एक स्वप्न तुटले तर आयुष्य थांबत नसतं अवी. तुला खूप मोठी झेप घ्यायची आहे अवी. माइंड वेळ माय डियर फ्रेन, स्काय इज द ओन्ली लिमिट फॉर यु. जोडीदार, प्रेम या सगळ्या खूप नंतरच्या गोष्टी आहेत रे. इट्स टाइम टु स्टडी. कळलं का ? वेडा कुठला. चल मला उशीर होतो आहे. येते मी. बाय"
अवी डबडबल्या डोळ्यानी पाठमो~या जाणा~या राखीकडे पाहत बराच वेळ पाहत राहीला.
**********************************************

पेपर्स संपून सेमिनार चालू झाले. त्या दिवशीचा सेमिनार संपून अवी होस्टेलला आला. संध्याकाळी मेसला जाऊन आल्यावर तो सहज म्हणून आडवा झाला. इतक्यात रूम पार्टनरने टेपरेकोर्डर सुरू केला. "सो गयी हैं सारी मंजीले..." सुरांच्या जोडीने शब्द कानावर पडू लागले. अवीचे डोळे भरून आले. आणि एका हळव्या क्षणी तो रडु लागला.
" ए अव्या, काहीतरीच. रडतो काय मुलीसारखा. एक नाही म्हणाली तर दुसरी पाहायची. तू नही तो और सही. चल उठ सेमिनारचा अभ्यास कर."
टेप बंद करत रुममेटने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.
"आणि तसाही अव्या तुला ओप्शन आहे की" शेजारच्या रूममधला अमित म्हणाला.
"अमित कुणाबद्दल म्हणतो आहेस तू हे ?" अवीला अमितच्या बोलण्याचा रोख कळला होता.
"ते तुला माहीती आहे"
"अमित" अवी जवळजवळ अमितवर ओरडलाच.
"ती माझी चांगली मैत्रीण आहे. आनी इतकंच नाही तर मी तिला बहीण मानतो."
"बहीण मानतोस" मानतोस शब्दावर जोर देत अमित म्हणाला. "आज काल सगळं चालतं रे. दादा भाई नवरोजी"
"अमित, तुझं तुला कळत आहे का तू काय बोलतो आहे ? आताच्या आता चालता हो रूममधून"
आणि अवी उशीमध्ये डोकं खुपसुन हमसाहमसी रडु लागला.
"अवी शांत हो जरा" रुममेटने समजूतीच्या सुरात म्हटले.त्या रात्री अवीला झोप अशी लागलीच नाही. सारखा या कुशीवरुन त्या कुशीवर तो लोळत राहीला. त्याच्या मनाची नुआसती तगमग चालू होती. त्याला राहून राहून प्रश्न पडत होता. का सारे मित्र माझ्या आणि राखीच्या मैत्रीबद्दल असा विचार करतात. सगळेच जर असा विचार करत असतील तर कशाला हवीय आपल्याला राखीची मैत्री ? हा विचार जेव्हा त्याच्या मनात आला तेव्हा त्याला बरं वाटलं. त्याचा श्वास थोडा हलकेच चालू लागला.
***********************************************

सेमिनार चालूच होते. अवीनं राखीशी बोलणं जवळजवळ बंदच केलं होतं. बोलला तरी अगदी तुटकपणे. आपण जे करत आहोत ते ठीक नाही हे त्याला कळत होतं. पण ते टाळणं त्याला जमत न्हव्तं. दोन दिवस असेच गेले. तिस~या दिवशी मात्र राखीने त्याला अडवलं.
"अवी, काय झालं रे ? तू मोकळेपणाने का बोलत नाहीस ?"
"राखी... " पुढे काय बोलावं हे अवीला सुचेना.
"अवी, तुला कुणी काही बोललं का ? ती काही म्हणाली का ?"
"'राखी तसं काही नाहीये गं. राखी मला वाटतं आपण आपली मैत्री इथेच थांबवु या."
"काय ? अवी पुन्हा बोल एकदा"
"राखी प्लीज..."
"अवी, तू मला नीट सांग काय झालं ते." अवी आता राखीला काय सांगावं या विचारात पडला. आणि तसंही तो काय सांगणार होता तिला. अचानक त्याच्या मनात एक विचार चमकून गेला.
"राखी..."
"हो बोल तू. मी ऐकते आहे"
"मला तुझ्याबद्दल आकर्षण वाटु लागलं आहे" दोन वर्षांच्या मैत्रीमध्ये आपण पहिल्यांदा राखीशी खोटं बोलत आहोत या गोष्टीचं त्याला खूप वाईट वाटत होतं. पण त्याच्या दृष्टीने ती एकच गोष्ट अशी होती की ज्यामुळे त्यांची मैत्री तुटणार होती.
"एव्ह्धच ना रे. म्हणून तू माझ्याशी बोलणं बंद केलं होतं ? मी मुलगी आहे रे... वाटलं तुला माझ्याबद्दल आकर्षण तर त्यात काय गैर आहे ?"
"पण राखी मी तुला बहीण मानत होतो. आणि आता हे तुझ्याबद्दल अस वाटू लागलं आहे."
"ठीक आहे रे. चल चुक झाली तुझी. ते माझ्याबद्दलचे आकर्षण वगैरे डोक्यातून काढून टाक. चुकतो रे माणूस कधी कधी. पण म्हणून काय आपली मैत्री तोडणे हा त्यावरचा उपाय नाही. काही झालेलं नाही. तू फक्त ते विचार डोक्यातून काढून टाक म्हणजे झालं."
"नाही राखी. नाही जमणार मला यापुढे तुझ्याशी बोलायला"
"कधीच बोलणार नाहीस अवी तू माझ्याशी ?"
"होय"
"ठीक आहे. जशी तुझी मर्जी. अभ्यास कर. विश यु ओल द बेस्ट". आणि त्याच्याकडे एक अश्रुभरला कटाक्ष टाकून ती चालू लागली.
***********************************************

त्यानंतर जेव्हा अवीला जाणवू लागलं की आपण चुकलो आहोत तेव्हा त्याने राखीची माफी मागितली होती. पण त्या स्वाभिमाने मूलीनं त्याला माफ करायचं नाकारलं होतं. त्याला राहून राहून वाटत होतं की मित्रांचं बोलणं आपण एव्हध मनावर घ्यायला नको होतं. तसाही आपला काय दोष होता त्यात म्हणा. आपली मनस्थिती तेव्हा स्थीर नव्हती. कुणीच आपल्या जवळ नको होतं आणि मित्र राखीच्या नावाने चिडवत होते.

त्याला हे जाणवत होतं की राखी आपल्या कुठल्याही मित्राइतकीच आपल्याला जवळची होती. आपल्याशी किती आपुलकीने आणि जिव्हाळ्याने बोलायची ती. किती मायेनं समजावायची ती आपल्याला. आई बाबांच्या नंतर इतकं निरपेक्ष आणि निस्वार्थी प्रेम फक्त राखीनेच केलं होतं. किती विश्वास टाकला होता तिने आपल्यावर. आणि आपण मात्र तिच्या मनावर अशी जखम केली की जी कधीही भरून येणार नाही.
जेव्हा आपण मनाने पुरते तुटलो होतो तेव्हा राखीनेच आपल्याला आधार दिला होता. तिनेच आपल्याला सावरलं होतं. खूप खूप रडलो होतो तेव्हा आपण. जर तेव्हा आपलं दुखणं ऐकायला राखी नसती तर काय झालं असतं आपलं ? आपल्याच वयाची असूनही किती समजून घेतलं होतं तिने आपल्याला तेव्हा.
त्याला मागचा एक प्रसंग आठवला. तनुजा चंद्राचा सूर नुकताच प्रदर्शीत झाला होता. अवीचा ग्रूप पहीलाच शो पाहून आला होता. अर्थात सोबत राखीही होती. चित्रपटातलं ते शेवटचं गाणं 'कभी शाम ढले तो मेरे दिलमें आ जाना' अवीच्या मनात घर करून राहीलं होतं. त्या गाण्यावर त्याने नंतर राखीशी चर्चा केली होती. नव्हे त्याने तिच्याशी वादच घातला होता. ते गाणं म्हणजे एक विरहगीत आहे अस राखीचं म्हणणं होतं. कातरवेळी प्रेयसीने प्रियकराला घातलेली आर्त साद म्हणजे ते गीत असे तिचं मत होतं. अवीचं म्हणणं होतं की ते गीत एक उत्कट भावगीत आहे. दोन प्रेमी जीवांच्या मधली ओढ जसं ते गीत व्यक्त करतं तसंच एका हळूवार मनाचं भावविश्व ही त्या गीतातून उलगडत जातं. ते गाणं म्हणजे भक्ताने आपल्या देवासाठी आळवलेला आर्त नाद आहे. गर्भार मातेने आपल्या गर्भातल्या बाळाशी साधलेला हळूवार संवाद आहे. आणि त्याच्या या मतापुढे राखीने माघार घेतली होती.

हे सगळं आठवताच अवी व्याकुळ झाला. "राखी ते गीत म्हणजे एक भाव गीत आहे हे मी आणखी एका उदाहरणाने सिद्ध करू शकतो. ते गाणं म्हणजे एका मित्राने आपल्या दुरावलेल्या मित्राला मारलेली एक हाक आहे" तो स्वताशीच पुटपुटला.त्याने हलकेच डोळे मिटले. व्हायोलिनचा नाद त्याच्या कानात घुमू लागला. महालक्ष्मी अय्यरचा आर्त स्वर त्याच्या मनाचा गाभारा व्यापून उरला...

कभी शाम ढले तो मेरे दिलमें आ जाना
कभी चाँद खिले तो मेरे दिलमें आ जाना
मगर आना इस तरह तुम के यहासे फिर ना जाना...

Wednesday, June 11, 2008

आली नाही जरी तुझी आठवण...

आली नाही जरी तुझी आठवण
मी तुझ्यापासुन तसा दूर नाही
असलाच दुरावा जरी अंतराचा
मनाने दूर जाणं तसं मंजूर नाही

Monday, June 9, 2008

सार्‍या तुफानांना तसा पुरून उरेन मी...

कितीही येऊ देत तुझ्या अजस्त्र लाटा
सार्‍या तुफानांना तसा पुरून उरेन मी
झेलेन असंख्य प्रहार परिस्थीतीचे अन्
एक क्षुद्र मानव असुनही जेता ठरेन मी

तसा समाधानी आहे मी...

वादळं तर तशी खुप येताहेत
गलबत माघारी हाकारलं नाही
तसा समाधानी आहे मी, जरी
स्वप्न पुर्णपणे साकारलं नाही

Sunday, June 8, 2008

माझ्यासाठी आता सारंच चांगलं आहे...

तुम्ही चांगले वागा, किंवा वाईट वागा
माझ्यासाठी आता सारंच चांगलं आहे
दिसत असलो मी हसत खेळत तरीही
माझं मन आतून केव्हाच दुभंगलं आहे

Tuesday, May 27, 2008

मी मराठी (अर्थात माझं इंग्रजी आणि मी )

साधारण १९८७ - १९८८ काळ असावा. आम्ही तेव्हा चड्डीत होतो. ('चड्डीत्त र्‍हा ना भौ' मधलं चड्डीत नाही. आम्ही तेव्हा चार पाच वर्षांचे होतो. म्हणजे चड्डीतच होतो. ) तेव्हा रामानंद सागरांची रामायण ही मालिका दूरदर्शन वर लागत असे. तो काळ दूरदर्शन चा सुवर्णकाळ होता असे म्हणतात (आता दुरदर्शनची पार दुर्दशा झाली आहे .) असो. तर ही रामायण मालिका पाहायला मी माझ्या काकान्च्या घरी जात असे. आमचं गाव कोकणातलं खेडेगाव. आख्ख्या गावामध्ये फक्त एकच दूरदर्शन संच होता. ( आणि तोही कृष्ण धवल. बहुतेक क्रावून कंपनीचा असावा.) त्यामुळे आख्खं गाव काकान्च्या घरी त्या वेळेला जमा व्हायचं. मालिका सुरू होण्यापूर्वी त्या मालिकेच्या प्रायोजकांची जाहीरात यायची. या जाहीरातींना गोरेगावच्या शाळेत जाणारी मुलं 'आडुटाइज' म्हणायची. हाच माझ्या आयुष्यात मी ऐकलेला ख~या अर्थाने पहीला इंग्रजी शब्द. तर त्या 'आडुटाइज' मधली ती निरमाची 'इसके झागने जादू कर दी' ही जिंगल (?) संपली की कानावर सूर पडायचे 'सीता राम चरित अती पावन...' आणि मग सुरू व्हायची पूर्ण भारतवर्षाला वन्दनीय असणा~या मर्यादा पुरुषोत्तमाची कहाणी.

आम्ही चौथी 'पास' झाल्यावर गोरेगावच्या शाळेत जाऊ लागलो. (यथावकाश या गोरेगावच्या शाळेला 'हास्कुल' म्हणतात आसं कळलं ) पण आम्ही आमच्या गावातल्या शाळेत असताना ऐकलं होतं की गोरेगावच्या शाळेत 'बेंजो' वर बसतात. पण हे 'बेंजो' कुठे दिसेनात. (आम्ही ज्याला बेंजो म्हणायचो ते बेंजो नसून बेंच, बसायची बाकडी आहेत हे कळायला आम्हाला सहा महीने लागले.) आम्ही पाचवीत असताना ब तुकडीत होतो. परंतु सहावी सुरू झाल्यावर आमची हुशारी (?) पाहून आमच्या आदरणीय शेख सरांनी आम्हाला सहावी अ मध्ये बसवलं. अकरा वाजता शाळेत जाण्यापुर्वी सात ते दहा या वेळात गुरं चारायला नेणारा एक खेड्यातला मुलगा आपल्या हुशारीच्या जोरावर पांढरपेशांच्या (म्हणजे नेमकं काय, हे मला आजही कळलेलं नाही ) पोरांसोबत अ वर्गात शिकू लागला. आणि अ वर्गात बसण्याचे दुश्परिणामही दिसू लागले.

... झालं अस की आमच्या एका खडूस बाईंचा (माफ करा, मॅडम चा) तास चालू होता. तास चालू असतानाच आमच्या बाकावरील मित्राची मागच्या बाकावरील पोराशी काहीतरी विचारांची देवाणघेवाण चालू होती. त्या दोघांच्या बोलण्यात तिस~याने तोंड घातलं. 'मला डिस्टर्ब करू नका रे' अस काहीतरी तो म्हणाला. तो 'डिस्टर्ब' शब्द काही मला कळला नाही. (आम्हीही ते संभाषण ऐकत होतो हे सांगणे न लगे ). आमची जिज्ञासा अर्थात जाणुन घेण्याची इच्छा काही आम्हाला स्वस्थ बसू देईना. लगेचच मित्राला विचारलं 'डिस्टर्ब' म्हणजे काय रे. आणि आमचं दुर्दैव अस की नेमकं त्याच वेळी आमच्या मॅडम नी आमच्याकडे पाहीलं. त्यानंतर काय झालं असेल हे सांगण्याची गरज नाही. त्या प्रसंगाने आम्ही इतके 'डिस्टर्ब' झालो की आजही कधी आमची जिज्ञासा (किंवा जाणून घेण्याची इच्छा ) कितीही अनावर झाली तरी कुणाला काही विचारण्याच्या भानगडीत पडत नाही. मुकाट्याने घरी येऊन शब्दकोश पाहतो किंवा गूगलवर धाव घेतो...

बहुतेक मी तेव्हा आठवीत होतो. मधली सुट्टी झाली होती. डबे वगैरे खाऊन सारे गप्पा मारत होते. बोलता बोलता एक जण म्हणाला की, 'तिने त्याला प्रपोज केले' (आम्हाला 'वन पीस' राहायचं असल्यामुळे नामां ऐवजी सर्वनामांचा वापर केला आहे ) वाक्य खूप लहान होतं. दोन नामे आणि एक क्रियापद. पण क्रियापद इंग्रजी असल्यामुळे आणि आम्हाला त्याचा अर्थ माहिती नसल्यामुळे 'तिने' 'त्याला' नेमकं काय केलं हे कळेना. 'डिस्टर्ब' चा अनुभव पाठीशी असल्यामुळे कुणाला विचारलं वगैरे नाही. सन्ध्याकाळी घरी आलो. शब्दकोश उघडला. 'प्रपोज' चा अर्थ पाहीला. आणी आम्ही चक्क हादरलो. 'टु प्रपोज' म्हणजे लग्नाची मागणी घालणे अस होतं. आठवीतल्या मुलीने आठवीतल्या मुलाला लग्नाची मागणी घातली हे काही मला झेपेना. आणी मी तो विषय तिथेच सोडून दिला.

दहावीची परिक्षा संपली. निकाल लागला. मला ७६% गुण मिळाले होते. बोलता बोलता एक मित्र म्हणाला की मला 'डिस्टिन्क्शन' मिळाली आहे. आई शप्पथ, 'डिस्टिन्क्शन' हा शब्द मी तेव्हा पहिल्यांदा ऐकला. पुन्हा अर्थ माहीती नसल्यामुळे मला 'डिस्टिन्क्शन' मिळाली आहे म्हणजे नेमकं काय झालं आहे हे कळेना. शब्दकोशात पाहिल्यानंतर कळलं की मी 'विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत' उत्तीर्ण झालो होतो.

पुढे अकरावीला विज्ञान शाखा घेतली. अभ्यासक्रम इंग्रजीत होता. पण इथे मात्र फारसं अडलं नाही. सगळे विषय इंग्रजीतून असल्यामुळे मी 'अभ्यासाच्या' इंग्रजीला चांगलाच सरावलो. पुढे अभियांत्रिकीला गेलो. इथेही इंग्रजीची अडचण जाणवली नाही. 'तांत्रीक' इंग्रजी भाषा मला अगदी व्यवस्थित जमायची. गोची व्हायची ती अतांत्रीक इंग्रजी बोलताना. यथावकाश चार वर्षानी आम्ही 'अणुविद्युत आणि दूरसंचार अभियंता' झालो. संगणक अभियंता म्हणून काम करू लागलो.

एक दिवस आम्हाला कळल की अमेरिकन ग्राहकाच्या प्रकल्पावर काम करण्यासाठी आमची निवड झाली आहे. एका सुदिनी (किंवा दुर्दिनी ) आमची ग्राहकाशी दूरध्वणीय मुलाखत 'शेज्यूल' झाली आहे. आणी आमचे धाबे दणाणले. आम्हास अमेरिकन उच्चार कळत नाही हे आम्ही चांगलेच ओळखून होतो. (ए एक्स एन, एच बी ओ, झी मुव्हीज हे चॅनेल आम्ही फक्त 'पाहायचो' ) परंतु यावरही आमच्या सुपीक मेंदूने तोडगा काढला. ती मुलाखत आम्ही स्पिकर फोन वरुन दिली. आमच्या सोबत आमची एक अमेरिकन इंग्रजी उच्चार कळणारी मैत्रीण होती. ग्राहकाने काही विचारलं की ती ते फळ्यावर लिहायची. आणी आम्ही तो फळ्यावरचा प्रश्न वाचून उत्तर द्यायचो. (ती मुलाखत व्यवस्थीत पार पडून पुढे आम्ही त्या प्रकल्पावर काम करू लागलो, हे सांगणे न लगे)

पुढे अमेरिकेत आलो. ग्राहकाच्या कार्यालायातून काम करू लागलो.आमची ग्राहक इतकी सुसाट वेगाने बोलायची की काहीच कळायचं नाही. अशा वेळी आम्ही फक्त 'ओके', 'येस', 'नो' यातलं काहीतरी एक म्हणायचो. (आणि झालेलं संभाषण नंतर लिखीत स्वरुपात ई पत्राद्वारे तिच्याकडून मागवून घ्यायचो. त्यामुळे ती तेव्हा काय म्हणाली होती हे कळायचं आणि बोलताना झालेल्या चुका नन्तर ई पत्राद्वारे सुधारून घ्यायचो)

आता मात्र 'ईंग्लिश' शिकण्याशिवाय पर्याय नाही हे आम्हाला कळून चुकले. आणि आम्ही इंग्रजीवर मेहनत घ्यायला सुरूवात केली... आणि चक्क महिन्याभरात जाणवलं की आपण खूप व्यवस्थित इंग्रजी समजू आणी बोलू शकतो.

तर अशी ही माझी इंग्रजी भाषा शिकण्याची कहाणी...

आज इंग्रजी भाषेची बिलकुल अडचण जाणवत नाही. पण जेव्हा शक्य असेल तेव्हा मी मराठीच वापरतो. माझं ओर्कूट वरील प्रोफाइल बर्‍यापैकी मराठीत आहे. माझा ब्लॉग पूर्णपणे मराठीत आहे. अगदी काल जेव्हा मी फिरायला सिक्स फ्लॅग डिस्कवरी किन्गडमला फिरायला गेलो तेव्हा तिथे शर्टवर तिथले कलाकार चित्र काढून देताना पाहिले. मी त्यातल्या एका कलाकाराकडून माझ्या शर्टवर मराठीतून नाव लिहून घेतलं. सुरुवातीला त्या अमेरिकन चित्रकाराला माझं मराठी नाव कागदावर लिहून दाखवूनही जमेना. पण मी चिकाटी सोडली नाही... आणि त्याला ते जमलं... (...शेवटी मी त्याला मराठी लिहायला लावलं)

मी जगाच्या पाठीवर ज्या भूमीत असेल, तिथल्या संस्कृतीबद्दल, लोकांबद्दल आणि त्यांच्या जीवनशैलीबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर असेल... पण त्याचबरोबर मला अभिमान असेल माझ्या मराठी भाषेचा, माझ्या मराठी पणाचा...

असशील जरी तू भाषा सार्‍या जगाची
नसेल कुणात हिंमत तुला बोलण्याची
तरी जेव्हा आईची आठवण येईल कधी
आठवेल तेव्हा मला माझी माय मराठी

Thursday, May 15, 2008

सावरणारे आहेत म्हणून...
Wednesday, May 14, 2008

मन्झील उन्हींको मिलती हैं...


Friday, May 9, 2008

प्रत्येक क्षण इथे तू जगून घे...

अशाश्वतात नसतं तसं काही
शाश्वताचं सौंदर्य तू बघून घे
क्षणा क्षणांनी बनते आयुष्य
प्रत्येक क्षण इथे तू जगून घे

Monday, April 28, 2008

अबाऊट मी...

ते शनीवारी वाशीवरुन धक्काबुक्की करत बस पकडनं ... साडेतीन तासात लोणेरेला पोहोचनं... तिथून अर्ध्या तासात घरी... आणि मग दोन दिवस मस्त ऐश...

ते पॅसीयन प्लस सुसाट वेगाने चालवत अर्ध्या तासात घरून मुगवलीला पोहचणं... अगदी निवांत बसलेल्या गणपती बाप्पाला 'वक्रतुंड महाकाय' म्हणत हाय हेलो करणं...

ते BATU ला स्टाफ्फ क्वार्टरला जाणं... BATU मध्ये मी विद्यार्थी असताना ज्याना सर म्हणत असे तेच पुढे मी लेक्चरर झाल्यावर माझे मित्र झाले... त्या माझ्या सर कम मित्रांसोबत धमाल टाइमपास करणं...

महाडच्या सावित्री नदीवरुन होणारा सूर्यास्त खूप छान दिसतो... केवळ तो सूर्यास्त पाहण्यासाठी बाइकने महाडला जाणं... आणि सूर्यास्त होताच एक अनोखा आनंद घेऊन महाड शहरात न शिरताच माघारी फिरणं...

कामानिमित्त तीन वर्ष मुंबईत काढूनही मी कधीच मुंबईकर झालो नाही... मी मला स्वता:साठी घर घ्यावं म्हणून बाबा खूपच मागे लागले तेव्हा मी पुण्यात घर घेतलं... मुंबईत नाही...

आज मी अमेरिकेत आहे. पुढे मागे जेव्हा भारतात परत येइन तेव्हा पुण्याला जाईन... मुंबईत नाही...

एव्हध मात्र नक्की की मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी... माझं घर म्हटलं की मला आठवेल... माझं वडगाव कॉंड - गोरेगाव जवळच्या एका छोटया खेडेगावामधील घर, ती सावित्री नदीला जाऊन मिळनारी काळ नदी, माझं BATU, माझे BATU मधले मित्र आणी शिवरायाच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेली माझी रायगडची भूमी...

Monday, April 14, 2008

कोडींग कभी मैंने की तो नही थी...

कोडींग कभी मैंने की तो नही थी
किसीसे कभी केटी ली तो नही थी
मगर ये अचानक हुआ क्या होहो...

तू सांसोको तेज चलाये, तू नींदोंको उडाये
कही पागल ना हो जाउ मैं बेचारा...

पहली ऑनसाइट ट्रिप का पहला नशा
दिल में उतरता जाये सनम...
रोज हाय प्रायोरिटी इश्यू लाना तेरा
हर दिन मेरी बॅंड बजाये सनम...

ये बेकरारी, ऐसी खुमारी पहले कभी तो मुझपे ना थी
कभी दिलपे ऐसी यूही गुज़री तो नही थी
कभी इतनी बुरी तरहसे लगी तो नही थी
मगर ये अचानक हुआ क्या होहो...

कितनी भाषाए यहा सीखी मगर,
काम कर रहा हूँ बस एक तुझपे
हर पल हैं मेरी विज्युअल स्टूडियो में तू
दूर जाउ तुझसे ऐसी मेरी किस्मत कहा...

दिल ये बेचारा, मजबूरी का मारा
छापता रहेगा कोड गुगलसे यहा...

चेहरे पे पहले कभी इतनी उदासी तो नही थी
यू बहकी हुई कभी ऐसी जिंदगी तो नही थी...
मगर ये अचानक हुआ क्या होहो...

तू सांसोको तेज चलाये, तू नींदोंको उडाये
कही पागल ना हो जाउ मैं बेचारा...

कोडींग कभी मैंने की तो नही थी
किसीसे कभी केटी ली तो नही थी
मगर ये अचानक हुआ क्या होहो...

Sunday, April 13, 2008

माझं बालपण मला भेटलं होतं...

योगायोगाने भेटलो आपण अन्
परकेपण तेव्हा हळूच मिटलं होतं
तुझ्या खळालत्या हास्यामध्ये
माझं बालपण मला भेटलं होतं

Saturday, April 5, 2008

तेव्हा आई तुझी खूप आठवण येते

आरक्त चेह~याने सांज ढळते
अन् पाखरांची किलबिल होते
घराकडे मी परतत असताना
आई तुझी खूप आठवण येते

तेच कुठेतरी सॅक फेकून देणे
तेच घाईघाईत कपडे बदलणे
अस्ताव्यस्त कपडे उचलताना
मात्र आई तुझी आठवण येते

एका हाताने बेसिनमध्ये भांडी धुनं
दुस~या हाताने कडवट चहा पिणं
तव्यातील चपाती जेव्हा करपून जाते
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते

पंख फुटल्यावर प्रत्येक पाखराला
आकाशी झेप तर घ्यावीच लागते
दमून जातो जेव्हा जीव पिल्लाचा
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते

आजही इथे साता समुद्रापार आई
कधीतरी डोळे भरून येतात अन्
पापण्यात तुझी मूर्ती उभी राहते
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते

Saturday, March 29, 2008

शिकवा नही किसीसे...

शुक्रवार होता तो... विक एण्ड तर दुपारीच चालू झाला होता. संध्याकाळी काम आटपून मी निवांत रमत गमत घरी आलो. पाठीला अडकवलेली सॅक जवळ जवळ फेकुनच दिली. सोफ्यावर कम्फर्टर तसंच पडलेलं दिसलं म्हणून ते उचललं. आणि मी आश्चर्यचकित झालो. अपूर्व, माझा रूम मेट एकदम अवघडल्या अवस्थेत सोफ्यावर कम्फर्टर अंगावर ओढून झोपला होता. तो असा कधीच झोपत नसे. काही तरी बिनसलं होतं. कदाचित कामाचा थकवा असेल म्हणून झोपला असेल असा विचार करून मी फ्रेश होण्यासाठी निघून गेलो...
रात्रीचे साडे नऊ वाजले होते. पोटात कावळे ओरडू लागले होते. जेवण तर सकाळचच होतं. फक्त गरम करायचं होतं. आता मात्र अपुर्वला जागं करायलाच हवं होतं. मी जोरजोराने त्याला हाका मारल्यावर तो उठला. फ्रेश होऊन आला. तरीही त्याचा चेहरा ओढल्यासारखा दिसत होता. आता मात्र माझी खात्रीच झाली की त्याचं काहीतरी बिनसलं आहे।"

काय झालं रे ?", मी आवाजात शक्य तेव्हधा हळुवारपणा आणत विचारलं.

"काही नाही रे..."

"काहीच नाही कसं अपूर्व ? तुझा चेहरा सांगतो आहे. काहीतरी झालं आहे एव्हढं नक्की"

खूपच मागे लागल्यावर अपूर्व सांगू लागला...

श्रद्धा त्याच्या शाळेत, जूनियर कॉलेजला होती. त्याच्याच गल्लीत तिचं घर होतं. त्याच्या छोट्या बहीणीसोबत ती त्याच्या घरी वगैरेही येत असे. जूनियर कॉलेजला असताना ती त्याला कधी आवडायला लागली हे त्याचं त्यालाच कळलं नाही. पण शब्द ओठावर कधी आले नाहीत. तिच्या बद्दलच्या नाजूक भावनांना त्याने मनातच ठेवलं तेव्हा. जूनियर कॉलेज संपलं. अपूर्व अभियांत्रिकीला गेला. श्रद्धाने बी एस्सी जॉइन केलं. अभियांत्रिकी कॉलेजमध्ये रूळल्यावर त्याला पुन्हा श्रद्धाची ओढ वाटू लागली. शेवटी त्याने एकदा मनाशी निश्चय करून, उसनं अवसान आणून श्रद्धाला एकटंच गाठून आपल्या भावना तिच्यासमोर व्यक्त केल्या. आणि पुढच्याच क्षणाला त्याचे डोळे पाण्याने डबडबले. श्रद्धाचं दुसर्‍या एका मुलावर प्रेम होतं. त्या मुलाचंही तिच्यावर प्रेम होतं...

पण त्याने स्वत:ला सावरलं. जणू स्वत:चीच समजूत घातली...

शिकवा नही किसीसे
किसीसे गिला नही
नसीब में नही था ज़ो
हमको मिला नही...

अपुर्वने अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं. आयटी क्षेत्रातल्या एका नामांकित कंपनीत तो संगणक अभियंता म्हणून रुजू झाला. आणि बघता बघता कंपनीने त्याला अमेरिकेत प्रोजेक्ट्वर पाठवलं. हे सगळं होत असताना तो श्रद्धाला विसरला न्हवता. मित्रांकडून जशी जमेल तशी तिची माहिती तो काढत राहिला. पुढे पुढे त्याला हेही कळलं की श्रद्धा आणि तिचा प्रियकर लग्न करणार आहेत. पण त्याला त्याचं वाईट न वाटता उलट आनंदच झाला. कारण वयाबरोबरच तो विचारांनी परिपक्व झाला होता. ती कुठेही राहावी, सुखी राहावी एव्हधीच त्याची इच्छा होती.

... आणि आज अचानक त्याला एका मित्राकडून कळलं की श्रद्धाचा तिच्या मित्रासोबत ब्रेक अप झाला आहे. श्रद्धाचा प्रियकर त्याच्याच कंपनीतल्या एका मुलीसोबत लग्न करत आहे. आणि श्रद्धाने या गोष्टीचा धसका घेतला आहे. ती या सगळ्याने खूप डिप्रेस झाली असून तिला तिच्या घरच्यांनी दवाखान्यात ठेवलं आहे.

"खूप साधी आहे रे ती. नाही सहन होणार तिला हा धक्का..."

अपूर्व अश्रुभरल्या डोळ्यांनी सारं सांगत होता.

... आणि मी मात्र त्याच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांमध्ये प्रेमाचं अनोखं रूप पाहत होतो.

Tuesday, March 25, 2008

निरोप

त्या दिवशी मी आणि माझा मित्र निखील, सेकंड शिफ्ट्मध्ये कामावर आलो होतो. रात्रीचे आठ साडे आठ वाजले होते. अगदी निवांतपणे संगणकाची आज्ञावली बनवण्यासाठी नक्कल करणं आणि चिकटवनं (कॉपी आणि पेस्ट हो…) चालू होतं. इतक्यात पुण्याहून वैशालीचा म्हणजेच आमच्या प्रोजेक्ट मॅनेजरचा फोन आला. तिला आमच्या अमेरिकेतील मॅनेजरला निरोप द्यायचा होता. निरोप असा होता की, अमर नाइट शिफ्ट्मध्ये कामावर येण्यासाठी निघाला असताना वाटेत महापेच्या पुलाखाली त्याची मोटारसायकल घसरली आणि तो खाली पडला. त्याच्या रुममेट्ने त्याला दवाखान्यात नेलं आहे पण आज काय तो कामावर येऊ शकणार नाही. (अमर खूप कामाचा माणूस आहे… लेकाचा अमेरिकन लोकांच्या संगणक प्रणालीला आधार देतो. तो नसेल तर आधार कोण देणार ?)

आम्ही सारं ऐकून घेतलं आणि फोन ठेवून दिला. पण फोन ठेवता क्षणी आमच्या डोक्यात उजेड पडला… आमच्या भारतातल्या मॅनेजरचा निरोप आमच्या अमेरिकेतल्या मॅनेजर पर्यंत पोहचवण्यात एक तांत्रीक अडचण होती…

वैशाली, आमची भारतातली मॅनेजर मराठी आणि आम्हीही मराठी. त्यामुळे आमचं फोनवरचं बोलणं मराठीतूनच झालं होतं. निरोप अमेरिकेत पोहोचवायचा म्हणजे तो ई पत्रामार्फत इंग्रजीतून पोहचवावा लागणार होता. आमचं तांत्रीक इंग्रजीचं ज्ञान तसं बरं आहे. पण कुणी व्यवहारिक इंग्रजीत बोलू लागलं की आमची पाचावर धारण बसते. वैशालीचा निरोप इंग्रजीत कसा लिहायचा हा गहन प्रश्न आम्हास तेव्हा पडला.

जो सन्कटात मदत करतो तोच खरा मित्र या वचनाची आठवण ठेवून आम्ही आमची अडचण निखिलला सांगितली. आणि पुढच्याच क्षणाला त्याचं इंग्रजी माझ्या इंग्रजी पेक्षाही दिव्य आहे अस सांगून त्याने हात वर केले. आता काय करायचं.. ? आम्ही मोठ्या विचारात पडलो होतो. इतक्यात आम्हास कननची आठवण झाली. कनन आमचा प्रोजेक्ट्वरचा जुनियर. लेकाचा नुकताच जी आर ई, अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी जाण्यासाठी द्यावी लागणारी इंग्रजी भाषेची परिक्षा अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता.
आम्हाला अंधारात आशेचा अख्खाच्या अख्खा सूर्य दिसला होता. आम्ही मोठ्या हुरूपाने कननला फोन करण्यासाठी आकडे दाबु लागलो… आणि इतक्यात पुन्हा एक विचार चमकून गेला… कनन आमचा प्रोजेक्ट्वरचा जुनियर. गेले वर्षभर आम्ही त्याला संगणकाच्या दुनियेतल्या कितीतरी गोष्टी शिकवल्या होत्या. त्याला विचारायचं की हे अस अस इंग्रजीत कसं लिहायचं म्हणून ?… मग त्याच्या मनातल्या आपल्या प्रतिमेचं काय होईल… तो काय म्हणेल… याला एव्हढहि इंग्रजी येत नाही….

हे सगळं विचारमंथन आमच्या मनात चालू असतानाच पलीकडे कननने फोन उचलला होता… ‘ बोल सतीश ‘ त्याचा ओळखीचा धिरगंभीर आवाज कानावर पडला आणि क्षणभर काय बोलावे हे आम्हाला कळलेच नाही. पण पुढच्याच क्षणी आम्ही स्वत:ला सावरलं. कननला अमर मोटरसायकल वरुन पडला हे सांगितलं. वेळ मारुन नेण्यासाठी कमलचा, अमरच्या रूममेटचा फोन नंबर मागण्यासाठी फोन केला होता अशी चक्क थाप मारली. हुश्श्स…

पण तरीही आमची मूळ समस्या कायम होती. निरोप इंग्रजीत कसा लिहायचा…
शेवटी ‘जगात ज्या संगणक अभियंत्याचं कुणी नाही त्यास गुगल हे संकेतस्थळ आहे’ या संत वचनास अनुसरून आम्ही गूगलवर धाव घेतली. वैशालीने मोटरसायकल घसरली हे सांगण्यासाठी ‘स्लीप झाली’ अस म्हटलं होतं. आम्ही हा स्लीप शब्दच गूगलला टाकला… आणि पुढच्या क्षणाला गूगलने His bicycle slipped off the road हे वाक्य आमच्यासमोर हजर केलं… आणि आमची एका मोठ्या धर्म संकटातून सुटका झाली… निरोपातल्या बाकीच्या वाक्यांची जमवाजमव आम्ही आमच्या अल्पमतीप्रमाणे करून एकदाचा तो निरोप आम्ही अमेरिकेस धाडला.

(आजच्या घडीला निखील आणि मी दोघेही अमेरिकेत असून खूप मोठ्या संगणक प्रणाल्याना आधार देत आहोत. निखील शिक्षणाने उपकरण शास्त्र अभियंता तर आम्ही अनुवीद्युत आणि दूर संचार अभियांत्रिकीचे पदवीधर. वर वर्णन केलेली घटना मागच्या सहा महिन्यातली असून आम्ही भारतात असताना घडलेली आहे… खूप शिव्या घातल्या आम्ही तेव्हा आताच्या शिक्षण व्यवस्थेला… संगणक अभियंता म्हणून काम करना~या अभियांत्रिकीच्या पदवीधराना व्यवहाराच्या चार ओळी इंग्रजीत लिहिता येऊ नयेत म्हणजे काय… असो, त्यानंतरचे सहा महिने आम्ही आमचं इंग्रजी सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतली… कुठेतरी चुक आमचीहि होती नाही का ?)

कितीही येऊ दे वादळं वाटेत माझ्या ...

जे व्हायचं होतं ते तसं होऊन गेलं
आता मी स्वत:ला सावरतो आहे
अडवून पापण्याआड चिंब आसवाना
मी भावनांचा पसारा आवरतो आहे

कोण जाणे काय झालं होतं मला
एका स्वप्नाने गात्रं भारली होती
उद्याच्या उजेडावर विसंबून मी
अंधारात एक उडी मारली होती

कशावर तरी आदळलो, आणि
जाणवलं, फसलीच आपली उडी
कुठेच दिसत नाही इथे किनारा
भरकटली आहे आपली होडी

भरून आले पाण्याने डोळे, पण
म्हटलं अस खचून जायचं नाही
आयुष्यात अस होतंच राहणार
निराशेचा गुलाम व्हायचं नाही

खेळवीत चेहर्‍यावर निरागस हसू
मी स्वत:लाच धीर इथे देतो आहे
पायात बेड्या पराभवाच्या अन्
नजेरेने उज्वल उद्याचा वेध घेतो आहे

कितीही येऊ दे वादळं वाटेत माझ्या
असंख्य तुफानाना टक्कर देईन मी
असेल जरी इथे आज अंधार चहूकडे
उद्या उज्वल यशाचा दिवस पाहिन मी

उमटवुन गेले निशान काळ्जात...

सच्चेपणा होता शब्दांत माझ्या, आणि आसवातही होता
बेईमान झालेल्या जिवलगांची, मला फिर्याद करायची नाही

उमटवून गेले निशान काळजात, ते क्षण ओराखडा काढणारे
अलविदा केलेल्या क्षणांना मला पुन्हा साद घालायची नाही

कधी स्मित फुलवायची चेहृयावर, किनार्याकडे धावणारी लाट
आता मात्रा मला पुन्हा, त्या सागराची गाज ऐकायची नाही

उलट फिरले तेच सारे, ज्यांच्या जिवाला जीव दिला होता
कबूल तेही, मला त्या वेदनांची कुणाकडे दाद मागायची नाही

बोलनंही बंद केलंय मी आता , त्या नकोशा दुस्वप्ना:बद्दल
कारण माझ्या पराभवाची कहाणी मला, लिलावात काढायची नाही

Monday, March 24, 2008

जेव्हा मला तुझी आठवण येते…

डोळे पाण्याने भरून येतात अन
वेडे मनही मग ओलावून जाते
पापण्यांत तरारते तुझी मूर्ती
जेव्हा मला तुझी आठवण येते

पाठीवरचा हात तुझा…

एव्हढ्याशा ओंजळीत माझ्या
तुझं विशाल आभाळ मावू दे
पाठीवरचा हात तुझा, मित्रा
क्षण दोन क्षण असाच राहू दे

साद तुला मित्रा घालतो मी…

तुझ्याच शोधात जिवलगा
एकटा अथक चालतो मी
जीव शब्दांत ओतून माझ्या
साद तुला मित्रा घालतो मी

नसो कुणी सोबतीस् माझ्या…

उगवला नाही जरी सूर्य इथे
तरीही गीत उजेडाचे गाईन मी
नसो कुणी सोबतीस् माझ्या
तरीही साथ सत्याची देईन मी

जेव्हा हरवून जातात दिशा सार्‍या…

जेव्हा हरवून जातात दिशा सार्‍या
प्रत्येक लाट आयुष्याला हादरा देते
बावरल्या मनाने किनारा शोधताना
तुझी मला खूप आठवण येते

मी तुझं निरागस रूप पाहिलं होतं…

श्रावणाच्या या संतत जलधारांतून
मी तुझं निरागस रूप पाहिलं होतं
पाणी फक्त मेघांतुनच नव्हे तर
माझ्या डोळ्यांतूनही वाहिलं होतं

समर्थ आहे तुफान झेलण्यास मी…

मी कधीच म्हटलं नाही तुला की
मित्रा मला तुझी पूर्ण साथ हवी
समर्थ आहे तुफान झेलण्यास मी
फक्त एक विश्वासाची सांज वात हवी

कसं जगावं आयुष्य हे…

कसं जगावं आयुष्य हे कधी
तुम्हीच मला शिकवलं होतं
त्याच शीदोरिच्या जोरावर
मी अश्रूना नेहमी थोपवलं होतं

मेघ त्याना भेटावयास आलेले…

मान वर करताच जाणवलं मला
पर्वत शिखर नभात हरवून गेलेले
न्याहाळून पाहिलं एकटक जेव्हा मी
कळलं, मेघ त्याना भेटावयास आलेले

सावळं घनश्याम रूप तुझं…

सावळं घनश्याम रूप तुझं मी
काळ्याभोर मेघांतून पाहिलं होतं
आकाशीचं अमृत तेव्हा जणू
त्या जलधारांतून वाहिलं होतं

थोडी प्रेमाची बरसात…

तप्त झाला आहे आसमंत सारा आज
थोडी प्रेमाची बरसात इथेही होऊ दे
तसं नसतं कुणीच कुणाचं इथे तरीही
जिव्हाळ्याची रुजूवात इथेही होऊ दे

तू सर्वव्यापी सर्वसाक्षी…

चढलो नाही मी कधीही
पायरी तुझ्या मंदिराची
गरजच नाही तशी त्याची
तू तर सर्वव्यापी सर्वसाक्षी

मी आकाशी झेप घेतली तेव्हा…

मी आकाशी झेप घेतली तेव्हा
तुझे डोळे पाण्याने भरून आले
नतमस्तक झालो तुझ्यासमोर
अन् पंखात माझ्या बळ आले

खूप काही हवं आहे पण…

खूप काही हवं आहे पण
काहीच लागत नाही हाताला
गजबजलेल्या या दुनियेत
मी शोधत बसतो स्वता:ला

मी हाक मारली होती…

मी हाक मारली होती
तुला येता आलं नाही
दान तुझ्या पदरात टाकलं
तुला ते घेता आलं नाही

जे कधीच देता येणार नाही…

अनपेक्षित होतं तसं मित्रा
तुझं अस तरहेवाईक वागणं
जे कधीच देता येणार नाही
ते दान तू माझ्याकडे मागणं

शब्द तसे भारावलेले…

शब्द तसे भारावलेले
पाठी स्वार्थ दडलेला
गाढवांचीच मीजास इथे
हरी बिचारा अडलेला

मावळत्याला अर्घ्य देणं…

उगवत्याला नमस्कार करणं
हा तर जगाचा नियम आहे
मावळत्याला अर्घ्य देणं मात्र
तसं थोडं त्रासाचं काम आहे

गरजांतून जन्मतात काही नाती…

इथे प्रत्येकाच्या संधिसाधूपणाला
तसा आपुलकीचा मूलामा असतो
गरजांतून जन्मतात काही नाती
त्यात भावनेचा ओलावा नसतो

नसतं आपल्या हातात काही…

नसतं आपल्या हातात काही
फक्त नियतीचे इशारे पाळणं
मार्ग आपला आधीच आखलेला
आपण फक्त त्यावरून चालणं

आतून मात्र मी एकला…

अस्वस्थता ही मनाची मी
सांगू कशी अन् कुणाला
असून गजबज भोवताली
आतून मात्र मी एकला

कुठल्याही नात्याची खोली…

कुठल्याही नात्याची खोली
प्रसंग आल्यावरच कळते
नेहमीची पायाखालची वाटही
कधी आडवाटेला वळते

विसरायचं आता सारं…

विसरायचं आता सारं अस
मी पुन्हा पुन्हा ठरवतो
क्षण दोन क्षण जातात अन्
मी पुन्हा स्वत:ला हरवतो

साथ आपलीच आपल्याला

जाणिवेनेनीवेच्या पलीकडे
एक अस्वस्थ जग असतं
साथ आपलीच आपल्याला
तिथेही कुणी आपलं नसतं

भावनेचा ओलावा शोधताना…

भावनेचा ओलावा शोधताना
मी मलाच हरवून गेलो
शिकलो मात्र बरंच काही
अन् वृत्तीने नीर्विकार झालो

इथे कुणीच कुणाचं नसतं…

आपला परका आभास सारे
इथे कुणीच कुणाचं नसतं
प्रत्येक क्षण सापेक्ष इथला
तरीही मन जाळ्यात फसतं

चांगलं वाईट तसं…

चांगलं वाईट तसं काहीच नसतं
हा सारा खेळ आपल्या मनाचा
दुखात हसत असे कुणी येथे अन्
कुणी सुखात आसरा घेई वनाचा

काळ वेळ कधी तशी नसतेच…

काळ वेळ कधी तशी नसतेच तशी
गुलमोहर फुलांनी बहरून यायला
मनाचंही थोडंसं असंच असतं
पुरते एक जाणीव, मोहरून जायला

मन तसं भिजून आलं होतं…

तुझ्या त्या आश्वासक शब्दांमुळे
मी स्वत:ला खूप सावरलं होतं
मन तसं भिजून आलं होतं पण
माझ्या अश्रूना मात्र मी आवरलं होतं

डोळे पाण्याने भरून आलेले…

डोळे पाण्याने भरून आलेले आणि
मनात आठवणींचे आभाळ दाटलेले
झाकोळून गेल्या चेहृयावर माझ्या
थर होते टोकणार्‍या वेदनांचे साचलेले

किती ऋतू असे…

किती ऋतू असे उन्हाळ्यात गेले
किती ऋतू तसे पावसात चिंब झाले
कळले नाही मला कधीही ते सारं
माझ्या मनात आसवांचे मेघ दाटलेले

मी शोधतो आहे किनारा….

धीर गंभीर गाज सागराची
सोबतीला आहे बोचरा वारा
हरवून गेल्या दिशा सार्‍या
अन मी शोधतो आहे किनारा