Tuesday, May 27, 2008

मी मराठी (अर्थात माझं इंग्रजी आणि मी )

साधारण १९८७ - १९८८ काळ असावा. आम्ही तेव्हा चड्डीत होतो. ('चड्डीत्त र्‍हा ना भौ' मधलं चड्डीत नाही. आम्ही तेव्हा चार पाच वर्षांचे होतो. म्हणजे चड्डीतच होतो. ) तेव्हा रामानंद सागरांची रामायण ही मालिका दूरदर्शन वर लागत असे. तो काळ दूरदर्शन चा सुवर्णकाळ होता असे म्हणतात (आता दुरदर्शनची पार दुर्दशा झाली आहे .) असो. तर ही रामायण मालिका पाहायला मी माझ्या काकान्च्या घरी जात असे. आमचं गाव कोकणातलं खेडेगाव. आख्ख्या गावामध्ये फक्त एकच दूरदर्शन संच होता. ( आणि तोही कृष्ण धवल. बहुतेक क्रावून कंपनीचा असावा.) त्यामुळे आख्खं गाव काकान्च्या घरी त्या वेळेला जमा व्हायचं. मालिका सुरू होण्यापूर्वी त्या मालिकेच्या प्रायोजकांची जाहीरात यायची. या जाहीरातींना गोरेगावच्या शाळेत जाणारी मुलं 'आडुटाइज' म्हणायची. हाच माझ्या आयुष्यात मी ऐकलेला ख~या अर्थाने पहीला इंग्रजी शब्द. तर त्या 'आडुटाइज' मधली ती निरमाची 'इसके झागने जादू कर दी' ही जिंगल (?) संपली की कानावर सूर पडायचे 'सीता राम चरित अती पावन...' आणि मग सुरू व्हायची पूर्ण भारतवर्षाला वन्दनीय असणा~या मर्यादा पुरुषोत्तमाची कहाणी.

आम्ही चौथी 'पास' झाल्यावर गोरेगावच्या शाळेत जाऊ लागलो. (यथावकाश या गोरेगावच्या शाळेला 'हास्कुल' म्हणतात आसं कळलं ) पण आम्ही आमच्या गावातल्या शाळेत असताना ऐकलं होतं की गोरेगावच्या शाळेत 'बेंजो' वर बसतात. पण हे 'बेंजो' कुठे दिसेनात. (आम्ही ज्याला बेंजो म्हणायचो ते बेंजो नसून बेंच, बसायची बाकडी आहेत हे कळायला आम्हाला सहा महीने लागले.) आम्ही पाचवीत असताना ब तुकडीत होतो. परंतु सहावी सुरू झाल्यावर आमची हुशारी (?) पाहून आमच्या आदरणीय शेख सरांनी आम्हाला सहावी अ मध्ये बसवलं. अकरा वाजता शाळेत जाण्यापुर्वी सात ते दहा या वेळात गुरं चारायला नेणारा एक खेड्यातला मुलगा आपल्या हुशारीच्या जोरावर पांढरपेशांच्या (म्हणजे नेमकं काय, हे मला आजही कळलेलं नाही ) पोरांसोबत अ वर्गात शिकू लागला. आणि अ वर्गात बसण्याचे दुश्परिणामही दिसू लागले.

... झालं अस की आमच्या एका खडूस बाईंचा (माफ करा, मॅडम चा) तास चालू होता. तास चालू असतानाच आमच्या बाकावरील मित्राची मागच्या बाकावरील पोराशी काहीतरी विचारांची देवाणघेवाण चालू होती. त्या दोघांच्या बोलण्यात तिस~याने तोंड घातलं. 'मला डिस्टर्ब करू नका रे' अस काहीतरी तो म्हणाला. तो 'डिस्टर्ब' शब्द काही मला कळला नाही. (आम्हीही ते संभाषण ऐकत होतो हे सांगणे न लगे ). आमची जिज्ञासा अर्थात जाणुन घेण्याची इच्छा काही आम्हाला स्वस्थ बसू देईना. लगेचच मित्राला विचारलं 'डिस्टर्ब' म्हणजे काय रे. आणि आमचं दुर्दैव अस की नेमकं त्याच वेळी आमच्या मॅडम नी आमच्याकडे पाहीलं. त्यानंतर काय झालं असेल हे सांगण्याची गरज नाही. त्या प्रसंगाने आम्ही इतके 'डिस्टर्ब' झालो की आजही कधी आमची जिज्ञासा (किंवा जाणून घेण्याची इच्छा ) कितीही अनावर झाली तरी कुणाला काही विचारण्याच्या भानगडीत पडत नाही. मुकाट्याने घरी येऊन शब्दकोश पाहतो किंवा गूगलवर धाव घेतो...

बहुतेक मी तेव्हा आठवीत होतो. मधली सुट्टी झाली होती. डबे वगैरे खाऊन सारे गप्पा मारत होते. बोलता बोलता एक जण म्हणाला की, 'तिने त्याला प्रपोज केले' (आम्हाला 'वन पीस' राहायचं असल्यामुळे नामां ऐवजी सर्वनामांचा वापर केला आहे ) वाक्य खूप लहान होतं. दोन नामे आणि एक क्रियापद. पण क्रियापद इंग्रजी असल्यामुळे आणि आम्हाला त्याचा अर्थ माहिती नसल्यामुळे 'तिने' 'त्याला' नेमकं काय केलं हे कळेना. 'डिस्टर्ब' चा अनुभव पाठीशी असल्यामुळे कुणाला विचारलं वगैरे नाही. सन्ध्याकाळी घरी आलो. शब्दकोश उघडला. 'प्रपोज' चा अर्थ पाहीला. आणी आम्ही चक्क हादरलो. 'टु प्रपोज' म्हणजे लग्नाची मागणी घालणे अस होतं. आठवीतल्या मुलीने आठवीतल्या मुलाला लग्नाची मागणी घातली हे काही मला झेपेना. आणी मी तो विषय तिथेच सोडून दिला.

दहावीची परिक्षा संपली. निकाल लागला. मला ७६% गुण मिळाले होते. बोलता बोलता एक मित्र म्हणाला की मला 'डिस्टिन्क्शन' मिळाली आहे. आई शप्पथ, 'डिस्टिन्क्शन' हा शब्द मी तेव्हा पहिल्यांदा ऐकला. पुन्हा अर्थ माहीती नसल्यामुळे मला 'डिस्टिन्क्शन' मिळाली आहे म्हणजे नेमकं काय झालं आहे हे कळेना. शब्दकोशात पाहिल्यानंतर कळलं की मी 'विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत' उत्तीर्ण झालो होतो.

पुढे अकरावीला विज्ञान शाखा घेतली. अभ्यासक्रम इंग्रजीत होता. पण इथे मात्र फारसं अडलं नाही. सगळे विषय इंग्रजीतून असल्यामुळे मी 'अभ्यासाच्या' इंग्रजीला चांगलाच सरावलो. पुढे अभियांत्रिकीला गेलो. इथेही इंग्रजीची अडचण जाणवली नाही. 'तांत्रीक' इंग्रजी भाषा मला अगदी व्यवस्थित जमायची. गोची व्हायची ती अतांत्रीक इंग्रजी बोलताना. यथावकाश चार वर्षानी आम्ही 'अणुविद्युत आणि दूरसंचार अभियंता' झालो. संगणक अभियंता म्हणून काम करू लागलो.

एक दिवस आम्हाला कळल की अमेरिकन ग्राहकाच्या प्रकल्पावर काम करण्यासाठी आमची निवड झाली आहे. एका सुदिनी (किंवा दुर्दिनी ) आमची ग्राहकाशी दूरध्वणीय मुलाखत 'शेज्यूल' झाली आहे. आणी आमचे धाबे दणाणले. आम्हास अमेरिकन उच्चार कळत नाही हे आम्ही चांगलेच ओळखून होतो. (ए एक्स एन, एच बी ओ, झी मुव्हीज हे चॅनेल आम्ही फक्त 'पाहायचो' ) परंतु यावरही आमच्या सुपीक मेंदूने तोडगा काढला. ती मुलाखत आम्ही स्पिकर फोन वरुन दिली. आमच्या सोबत आमची एक अमेरिकन इंग्रजी उच्चार कळणारी मैत्रीण होती. ग्राहकाने काही विचारलं की ती ते फळ्यावर लिहायची. आणी आम्ही तो फळ्यावरचा प्रश्न वाचून उत्तर द्यायचो. (ती मुलाखत व्यवस्थीत पार पडून पुढे आम्ही त्या प्रकल्पावर काम करू लागलो, हे सांगणे न लगे)

पुढे अमेरिकेत आलो. ग्राहकाच्या कार्यालायातून काम करू लागलो.आमची ग्राहक इतकी सुसाट वेगाने बोलायची की काहीच कळायचं नाही. अशा वेळी आम्ही फक्त 'ओके', 'येस', 'नो' यातलं काहीतरी एक म्हणायचो. (आणि झालेलं संभाषण नंतर लिखीत स्वरुपात ई पत्राद्वारे तिच्याकडून मागवून घ्यायचो. त्यामुळे ती तेव्हा काय म्हणाली होती हे कळायचं आणि बोलताना झालेल्या चुका नन्तर ई पत्राद्वारे सुधारून घ्यायचो)

आता मात्र 'ईंग्लिश' शिकण्याशिवाय पर्याय नाही हे आम्हाला कळून चुकले. आणि आम्ही इंग्रजीवर मेहनत घ्यायला सुरूवात केली... आणि चक्क महिन्याभरात जाणवलं की आपण खूप व्यवस्थित इंग्रजी समजू आणी बोलू शकतो.

तर अशी ही माझी इंग्रजी भाषा शिकण्याची कहाणी...

आज इंग्रजी भाषेची बिलकुल अडचण जाणवत नाही. पण जेव्हा शक्य असेल तेव्हा मी मराठीच वापरतो. माझं ओर्कूट वरील प्रोफाइल बर्‍यापैकी मराठीत आहे. माझा ब्लॉग पूर्णपणे मराठीत आहे. अगदी काल जेव्हा मी फिरायला सिक्स फ्लॅग डिस्कवरी किन्गडमला फिरायला गेलो तेव्हा तिथे शर्टवर तिथले कलाकार चित्र काढून देताना पाहिले. मी त्यातल्या एका कलाकाराकडून माझ्या शर्टवर मराठीतून नाव लिहून घेतलं. सुरुवातीला त्या अमेरिकन चित्रकाराला माझं मराठी नाव कागदावर लिहून दाखवूनही जमेना. पण मी चिकाटी सोडली नाही... आणि त्याला ते जमलं... (...शेवटी मी त्याला मराठी लिहायला लावलं)

मी जगाच्या पाठीवर ज्या भूमीत असेल, तिथल्या संस्कृतीबद्दल, लोकांबद्दल आणि त्यांच्या जीवनशैलीबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर असेल... पण त्याचबरोबर मला अभिमान असेल माझ्या मराठी भाषेचा, माझ्या मराठी पणाचा...

असशील जरी तू भाषा सार्‍या जगाची
नसेल कुणात हिंमत तुला बोलण्याची
तरी जेव्हा आईची आठवण येईल कधी
आठवेल तेव्हा मला माझी माय मराठी

Thursday, May 15, 2008

सावरणारे आहेत म्हणून...




Wednesday, May 14, 2008

मन्झील उन्हींको मिलती हैं...


Friday, May 9, 2008

प्रत्येक क्षण इथे तू जगून घे...

अशाश्वतात नसतं तसं काही
शाश्वताचं सौंदर्य तू बघून घे
क्षणा क्षणांनी बनते आयुष्य
प्रत्येक क्षण इथे तू जगून घे