Sunday, September 14, 2008

कुणी बेभान म्हणतं मला...

कुणी बेभान म्हणतं मला, कुणी वेडं समजतं मला
धरतीच्या उमाळ्याला आकाशीचा नभच समजलेला
कसा तुझ्यापासून दूर मी, अन माझ्यापासून दूर तू
दुराव्यातील हा जिव्हाळा फक्त आपल्याला कळलेला

प्रेम तुझ्या माझ्या विश्वासाची एक पवित्र गाथा आहे
कधी कबीर तर कधी मीरेचीही तशीही हीच कथा आहे
सगळेच म्हणतात इथे, माझे डोळे आसवांनी भरलेले
कळलं तुला तर मोती, नाही तर पाण्याचा साठा आहे

आहे वेदनांचा सागर ह्र्दयात, पण मला रडायचं नाही
माझे अश्रु तुझ्या प्रेमाची निशाणी, जी हरवायची नाही
माझी ओढ तुला कळो किंवा नाही, पण थोडं ऐक तू
जी गोष्ट माझी झाली नाही, ती तुझीही व्हायची नाही

भुंगा जर कधी कमळ फुलावर बसला तर पाप घडलं
आम्ही एखादं स्वप्न जिवापाड जपलं तर पाप घडलं
कालपर्यंत तल्लिन होऊन ते ऐकत होते प्रेमाचे किस्से
आणि आम्ही खरंच कुणावर प्रेम केलं तर पाप घडलं

(डॉ. कुमार विश्वास यांच्या "कोई दिवाना कहता हैं" या प्रसिद्ध हिंदी कवितेचं स्वैर मराठी भाषांतर)

0 अभिप्राय: