Saturday, September 26, 2009

गती एक आहे जाण...

"मी येईपर्यंत राहतील ना. मला त्यांना त्यांच्या शेवटच्या क्षणांमध्ये भेटायचं आहे. त्यांच्याशी बोलायचं आहे."
"नाही सांगता येत रे. तुला परत यायला जरी फक्त पंधरा दिवस असले तरी बाबा तोपर्यंत राहतील असं सांगता येत नाही. कारण त्यांनी खाणं बिलकुल बंद केलं आहे. पातळ गोष्टी सुदधा खुपच कमी घेतात."

आजोबांबद्दल बोलताना बाबांना भरून आलं होतं.
मी "त्यांचं आता वय झालं आहे. त्यामुळे आज ना उद्या हे होणारच. मात्र त्यांना काही हवं नको याची काळजी घ्या" असं बाबांना समजावत होतो. पण मलाही हुंदके आवरणे कठीण झालं होतं.

साधारण आठवडयाभरापुर्वीची ही गोष्ट. आणि आज मित्राने "आजोबा आपल्यामध्ये नाहीत" अशी मेल टाकली होती. पुढच्या शुक्रवारी मी ईथून निघणार आहे. फक्त एका आठवडयाने माझी आणि आजोबांची चुकामुक झाली आहे. कायमची. मी त्यांना आता कधीच भेटू शकणार नाही...

फेब्रुवारी मध्ये मी सुटटीला आलो होतो तेव्हा मी आजोबांना भेटलो. मुंबईला आत्याकडे राहायला गेले होते काही दिवसांसाठी. विक्रोळीच्या कन्नमवार नगरातल्या झोपडपट्टीत आत्याची रुम. नाक मुठीत धरून गेलो रूमवर. दहा बाय दहाची सुद्धा खोली नसावी. मध्यभागी आत्याच्या छोटीचा पाळणा. बाजुलाच एक छोटीशी कॉट. कॉटवर आजोबा बसलेले. डोक्याला टॉवेल गुंडाळलेला. अंगावर बहुतेक घोंगडी असावी.

"मी म्हनलो व्हतो ना तुला माजा पॉरगा भायरगावावरना आला का उडया टाकीत मना भेटायला येल म्हनून. मना लोका म्हन्तात रामचंदर कमाल हाय तुजी. तुज्या ल्याकान पॉरांना शिकवलान, पॉरा पन डाक्टर ईंजिनेर झाली. आजपरत लोका डूबय (दूबई) आनी कोईटला (कुवेतला) जाईत व्हती. पन आक्क्या जिनगानीत (जिंदगानीत - जिंदगीत) कुनी आम्येरिकेला गेलाय आसा आयिकला न्हवता. पन तुजा नातू आम्येरिकेला ग्याला. जितलास रं जितलास." आजोबा आत्याला सांगत होते. मी त्यांचा सर्वात मोठा नातू. त्यांच्या मोठया मुलाइतकाच म्हणजे माझ्या बाबांइतकाच जवळचा. मला भावनांचा बांध आवरणं कठीण झालं. आणि आजोबांना कडकडून मिठी मारली. मी गदगदून रडत होतो. त्यांचे थरथरणारे हात माझ्या पाठीवरून फीरत होते...

मी परत निघायच्या आधी मला भेटता यावं म्हणून ते गावी आले होते. निघायच्या दिवशी मी त्यांना आमच्या जुन्या घरी भेटायला गेलो. चार गोष्टी केल्या. का कोण जाणे पण मला राहून राहून वाटत होतं की ही त्यांची आणि माझी शेवटची भेट आहे. मी स्वताला आवरुन बोलत होतो. "येतो मी बाबांनो" असं म्हणून मी बाहेर पडलो. निघताना मागे वळून पाहण्याची हिंमत होत नव्हती. डोळे भरून आले होते. ओवरीत आलो. आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली...

आताच्या गणपती पुजनाच्या दिवसाची गोष्ट. मी छोटया भावाला फोन केला. तो आमच्या जुन्या घरी, जिथे आमचा गणपती बसवला होता तिथे होता. दोन्ही चुलते, आत्या सगळ्यांशी बोलून घेतलं. बाजुला खुप गजबज चालू आहे हे कळत होतं. सार्‍यांशी बोलून झाल्यावर आजोबांना फोन दयायला सांगितलं. काही वेळ काहीच आवाज आला नाही. फक्त श्वास सोडल्याचा आणि घेतल्याचा आवाज येत होता. म्हणजे फोन आजोबांच्या हातात होता. थोडया वेळाने त्यांचा कापर्‍या स्वरातील आवाज कानावर पडला, "बाला ब्येस (ठीक) हायेस ना" आणि त्यांनी ढसाढसा रडायला सुरुवात केली. त्या भरल्या गोकुळातही त्यांना साता समुद्रापार असलेल्या थोरल्या नातवाची अनुपस्थिती जाणवत होती...

हा त्यांचा फोटो, गणपतीची पुजा करताना काढलेला. किती शांत भावमुद्रा आहे चेहर्‍यावर...



काल संध्याकाळी सहा साडे सहाला आजोबांचं देहावसान झालं. आता भारतात रात्र असल्यामुळे त्यांचा देह घरीच आहे. उदया सकाळी अग्नी दिला जाईल. आत्मा केव्हाच निघून गेला आहे. अग्नी दिल्यानंतर पंचतत्वांनी बनलेला त्यांचा देहसुदधा पंचतत्वात विलीन होईल...

ज्ञानी असो की अज्ञान, गती एक आहे जाण
मृत्यूला न चुकवी कोणी, थोर असो अथवा सान


या सत्याप्रमाणे आजोबा आमच्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या आठवणी कायम आमच्या सोबत असतील...

Tuesday, September 22, 2009

कधी सांज ढळत असताना...

तो अगदी तन्मयतेने बोलत होता. मीही त्याचं बोलणं एखादया शहाण्या श्रोत्यासारखं ऐकत होतो.

"ते गाणं म्हणजे केवळ प्रेयसीने प्रियकराला घातलेली आर्त साद नाही. तो एका आईने आपल्या गर्भातल्या बाळाशी साधलेला संवाद आहे. भक्ताने शांत अशा गाभार्‍यामध्ये बसून केलेली देवाची आर्त विनवणी आहे. आता या सुरुवातीच्या ओळीच घे ना.

कभी शाम ढले तो मेरे दिलमें आजा ना
कभी चांद खिले तो मेरे दिलमें आजा ना
मगर आना ईस तरहसे के यहासे फीर ना जाना


संध्याकाळची कातरवेळ असो वा अगदी चतुर्थीची रात्र असो, इवलीशी चंद्रकोर हळूहळू आकाशात वर येत असो, माझं मन अगदी व्याकुळ झालेलं असतं. तुझ्याशी एकरुप व्हावं, माझं मीपण तुझ्यात विरून जावं. ईतकं की मला माझ्या अस्तित्वाची जाणिव राहू नये.

गर्भातल्या बाळाचे हुंकार किंवा त्याच्या हालचाली मातेला अगदी असेच आपलं अस्तित्व विसरायला लावतात. तू कधी श्रीधर कवीने लिहिलेलं हरीविजय किंवा या ओवीबद्ध हरीविजयाचं हरीविजय कथासार हे सुलभ मराठी रुपांतर वाचलं आहेस? देवकीच्या आठव्या बाळाच्या जन्माची वेळ जवळ आलेली असते. तो मथुरेतला तुरूंग, ज्यानं याधी सात बाळांचे मृत्यू पाहीलेले आहेत, तो हताश वसूदेव, ज्याला निदान हा आठवा तरी वाचावा या चिंतेने ग्रासलेलं आहे. आणि देवकी? ती मात्र या सार्‍यापासून अलिप्त आहे. ती त्या आठव्याशी एकरूप झालेली आहे. बाहेरच्या जगाचा, वास्तवाचा तिला विसर पडलेला आहे. पोटातल्या विधात्याच्या गर्भाचं तेज तिच्या चेहर्‍यावर पसरलेलं आहे. जणू "परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे" म्हणणारा योगीश्वर कृष्ण आपल्या जन्माआधीच आपल्या जन्मदात्रीच्या नजरेसमोर उभा राहीला आहे...

आणि भक्ताचं देवाशी असलेलं नातं याहून वेगळं असतं का? त्याला तर संध्याकाळच काय पण तिन्ही काळ भगवंतच दिसत असतो. नव्हे, भगवंताहून वेगळे असे अस्तित्व त्याला नसतेच. आता ही नामदेवांच्या अभंगाचीच ओळ पाहा

तुझे ठायी माझे मन, माझे ठायी तुझा प्राण
नामा म्हणे अवघे, विठ्ठलची झाले


भक्त परमेश्वराला सांगत असतो की मी तुझ्यापासून वेगळा नाहीच. मी म्हणजे तू आणि तू म्हणजे मी. माझं मीपण आता उरलेलंच नाही...

तू नही हैं मगर फीरभी तू साथ हैं,
बात हों कोईभी, तेरीही बात हैं
तूही मेरे अंदर हैं, तूही मेरे बाहर हैं
जबसे तुझको जाना हैं, मैने अपना माना हैं


तसा तू रुढार्थाने ईथे नाहीस. पण तरीही तू माझ्या सोबत आहेस असंच मला वाटतं. माझ्या मनात काही विचार चालू असेल तर तुझाच आहे. मी जर कुणाशी काही बोलत असेल तर त्या बोलण्यामध्येही तूच डोकावत असतोस. माझ्या देहात, माझ्या देहाच्या बाहेर, सगळीकडे तूच आहेस.

बाळाच्या जन्माची वेळ तशी लांब असते. पण बाळाच्या आईची नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी केव्ह्ढी लगबग चालू असते. जणू काही बाळ ईथे आहे असंच समजून ती त्याच्यासाठी अंगडी टोपडी शिवते. त्याच्यासाठी पाळण्याची शोधाशोध सुरू करते. भिंतीवर टांगलेल्या कॅलेंडरमधलं गोंडस बाळ जणू आपलंच बाळ आहे असं समजून त्याच्याशी हितगुज करते. ते चित्रातलं बाळ ही केवळ एक प्रतिमा असूनही आई त्याच्यामध्ये आपल्या बाळाला पाहते. येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक नातलगाला कितवा महिना चालू आहे हे लाजून सांगते. "पोटात खुप त्रास देतो का गं" असं कुणी विचारताच मनोमनी सुखावते. तिच्या देहाच्या आतमध्ये तर तो असतोच पण तिच्या बाह्यशरीरावर सुद्धा त्याच्या अस्तित्वाच्या खुणा दिसत असतात. तो येणार आहे हे तिला ज्या पहिल्या ओकारीमुळे कळतं अगदी त्या क्षणापासून तिच्या जगण्याला एक वेगळाच अर्थ मिळालेला असतो. कधी तिला कळतं की तिचं बाळ ही तिची लेक असणार आहे. आपल्या या लेकीच्या पोटात असण्याने ती मोहरून जाते. आपल्या लेकीच्या स्वप्नांमध्ये हरवून जाते. ती रुसली आहे अशी कल्पना करून तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करते.

सोनुले तानुले सानुले माझे, रुसशी किती गं बाई
का गं धरला ईतका अबोला, आहे मी तुझी आई


भक्ताला भगवंत आपल्यापासून दूर आहे असं कधी वाटतंच नाही. त्याच्या दृष्टीने सार्‍या चराचराला तो व्यापून उरला आहे. पाना फुलांत, नदी नाल्यात सगळीकडे तोच आहे.

कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी
लसण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरि


सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी, कर कटावरी ठेऊनिया. पण ते सावळं सगुण रुप पाहण्यासाठी त्याला पंढरपूरला जावं असं वाटत नाही...

रात दिन की मेरी दिलकशी तुमसे हैं
जिंदगी की कसम, जिंदगी तुमसे हैं
तुमही मेरी ऑंखे हो सुनी तनहा राहोंमें
चाहे जितनी दुरी हों, तुम हों मेरी बाहोंमें


माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण तुझा आहे, नव्हे माझं आयुष्यच तुझं आहे. आयुष्याच्या या खडतर प्रवासात तुझी मला साथ आहे. तू माझ्यापासून कितीही दुर असलास तरी माझ्या कुशीत, मिठीत आहेस असंच वाटतं.

बाळाच्या चाहूलीने आईची दुनियाच बदलून जाते. तिचा दिवस, तिची रात्र केवळ त्या चिमुकल्याच्या जाणिवेने उल्हासित होऊन जाते. आता तिचं आयुष्य हे त्याच्या आयुष्यापासून वेगळं नसतंच. कारण तिच्या जगण्याला आता एक नवं कारण मिळणार असतं. तो तिच्यापासून अजून जरी रुढार्थाने दुर असला तरी तो जणू तिच्या कुशीत खेळत असतो.

आणि भक्ताला काय बरे वाटते? ते तुकोबांच्या शब्दातच बघ ना,

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
चालविसी हात धरुनिया
चालो वाटे आम्ही तुझाचि आधार
चालविसी भार सवे माझा


... शब्दांकडे पाहू नको, त्यांच्या अर्थाकडे पाहा. ते शब्द कुठून आले हे पाहू नको, त्यांनी तुला काय दिलं हे पाहा. आयुष्य कसं जगावं हे सांगण्यासाठी तुकारामांचे अभंग किंवा ज्ञानदेवांच्या ओव्या वाचायलाच हव्यात असं काही नाही. ते काम एखादं चित्रपटाचं गीतही करू शकतं. फक्त त्या गीताच्या शब्दांमध्ये तेव्हढी ताकद हवी.

तो बोलत होता. मी त्याच्या चेहर्‍याकडे एकटक पाहत होतो. आज एका संगणक अभियंत्यामध्ये मी प्रवचनकार पाहीला होता...

(लेखामध्ये उल्लेख केलेलं गाणं २००२ सालच्या लकी अली अभिनीत "सुर" या चित्रपटातील आहे.)

Friday, September 18, 2009

हिंदी (आणि इंग्रजी...)

"अरे मी तुला मघाशी फोन केला होता", फोन उचलताच बाबांनी सांगून टाकलं.
"नाही हो. मला काही रींग वगैरे नाही मिळाली. अगदी माझ्या मिस्ड कॉल्समध्येही नाही."
"अरे असं कसं होईल? मी फोन केला तेव्हा कुणी तरी बाई ईंग्रजीत बोलू लागली. नंतर तू सतिश गावडे असं म्हणालास. त्यानंतर टूउंउं असा आवाज आला. पुढे काहीच झालं नाही. म्हणून मी फोन ठेऊन दिला. आणि नंतर बघतोय तर काय बॅलंसमधून सहा रुपये कमी झाले होते."

काय झालं असेल याचा मला अंदाज आला. हलकसंच हसून मी बाबांना सांगू लागलो.
"तुम्ही जे इंग्रजी बोलणं ऐकलंत तो रेकॉर्ड केलेला निरोप होता. त्याचा थोडक्यात अर्थ असा की मी काही कारणास्तव तुमचा फोन उचलू शकत नाही. म्हणून तुमचा निरोप ठेऊन दया. ते जे टूउंउं वाजलं ना त्यानंतर तुम्हाला निरोप बोलायचा असतो. या सगळ्या प्रकाराला व्हॉईसमेल म्हणतात. आणि त्याचे फोन करणाराला पैसे पडतात. तुम्ही निरोप ठेवण्यासाठीचा टूउंउं वाजल्यानंतरही बराच वेळ फोन चालू ठेवला असेल. म्हणून सहा रुपये कमी झाले तुमच्या बॅलंसमधून. खरं तर असा कुणी निरोप ठेवला की ज्याच्यासाठी निरोप ठेवला त्याला ते मिस्ड कॉलप्रमाणेच कळतं. पण माझ्या फोनमध्ये काहीतरी गडबड आहे त्यामुळे नाही कळलं मला."
"असं आहे होय. आता ते आम्हाला कुणी सांगितल्याशिवाय कसं कळणार. आणि त्यात पुन्हा ती सगळी बडबड इंग्रजीत", ईति बाबा.

कधी कधी वाटतं की ही भाषेची समस्या आमच्या संपुर्ण खानदानात असावी.

माझा छोटा डॉक्टर भाऊ शिक्षण संपवून मुंबईला हॉस्पिटलमध्ये जॉब करायला गेला. शिकाऊ डॉक्टर असल्यामुळे त्याला रात्रपाळीत काम करावं लागायचं. या प्रकाराला त्यांच्या भाषेत रेसिडेंशियल मेडिकल ऑफीसर किंवा थोडक्यात आर एम ओ म्हणतात. रात्री अनुभवी डॉक्टरांच्या अनुपस्थितीत हे आर एम ओ रोग्यांना सेवा देतात. असो. तर एकदा सहज म्हणून हॉस्पिटलमध्ये त्याला भेटायला गेलो. बंधूराज एका उत्तर भारतीय रुग्णाशी हिंदीत बोलत होते. हिंदी इतकं उच्च प्रतिचं की त्या रुग्णाला वाटावं आजार परवडला पण या डॉक्टरचं हिंदी बोलणं नको. आता हे उदाहरणच पाहा ना, "ये औशध कितनाबी कडू आसनेदो, तुमको घेना पडेगा. नही तो तुम बरे कैसे होवोगे" !!!

माझं इंग्रजी तर विचारूच नका. अतिशय दिव्य प्रकार आहे तो. नाही म्हणजे शिक्षणाने इंजिनीयर असल्यामुळे, चार वर्ष आयटीत काढल्यामुळे तांत्रिक इंग्रजी त्यातल्या त्यात बरं आहे. पण कुणी इंग्रजीतून हवापाण्याच्या गोष्टी करू लागलं की मी मनातल्या मनात "गणा धाव रे, गणा पाव रे" असा बाल्या नाचाचा फेर धरू लागतो.

साधारण दोन वर्षापूर्वी भारतात असतानाची गोष्ट. अमेरिकन वकिलातीत गेलो होतो व्हिसा इंटरव्ह्यूला. तो गोरा विचारत होता. मी कानात्त प्राण आणून तो काय म्हणतोय हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. कुठे चालला आहेस, कशाला चालला आहेस असे प्रश्न विचारून झाल्यावर पठठयाने पुढचा प्रश्न विचारला, तिकडे किती दिवस राहणार आहेस. मी आपलं ठोकून दिलं की ते कंपनी ठरवेल. त्याचा पुढचा प्रश्न तयार. "व्हॉट ईज युअर गेस?" त्याचा "गेस" हा शब्द मला "गेस्ट" असा ऐकायला आला. आता माझा अमेरिकेत कामानिमित्त जाण्याचा आणि पाहुण्यांचा काय संबंध. मुळात "व्हॉट ईज युअर गेस्ट" या प्रश्नालाच काही अर्थ नव्हता. तेव्हढं ईंग्रजी मला नक्की येत होतं. पण तरीही मी त्या गेस्ट शब्दाभोवतीच घुटमळु लागलो. मी त्या प्रश्नकर्त्याला समजावण्याचा प्रयत्न करू लागलो की बाबा रे मी पाहुणा म्हणून नाही जात आहे. मी कामानिमित्त चाललो आहे. हाच प्रकार अजून दोनवेळा झाला. त्या साहेबाच्या चेहर्‍यावर आता त्रासिक भाव दिसायला लागले होते. वेळ तर सांभाळायला हवी होती. मी सरळ त्याला सांगून टाकलं, ""आय ऍम नॉट गेटींग व्हॉट यू आर सेयिंग. कॅन यू प्लिज फ़्रेम युअर क्वेश्चन सम अदर वे?".

अगदी खळाळून हसला तो. आणि आमची प्रश्नोत्तरांची गाडी पुढे सरकली.

Thursday, September 3, 2009

चंपूची जिंदगी

महेंद्र काकांनी अनिकेतच्या या पोस्टला टाकलेली कॉमेंट वाचली आणि माझ्याही डोक्यात त्या कॉमेंटच्या अनुवादाचा मराठी भुंगा भुणभुण करू लागला. मीही एक आय टी मधला चंपू असल्यामुळे त्यातल्या त्यात हा प्रकार बर्‍यापैकी जमला आहे असं वाटतंय. पण तरीही जर अनुवाद भंगार वाटला तर ते कर्तृत्व आमचं, चांगला झाला असेल तर त्याचे श्रेय त्या अनामिक कवीला...


चंपूची बायको खुपच हैराण झाली होती
नॉट हॅपनिंग जिंदगी वैराण झाली होती
चंपूच्या जीवाला कधी आराम नसायचा
ऑफीसात नुसता काम करत बसायचा

चंपूचा बॉस होता अगदी पक्का शहाणा
दर प्रमोशनला तो शोधी नविन बहाणा
डेडलाईन पठठया कधी विसरला नाही
नऊपूर्वी चंपू घरी कधी अवतरला नाही

चंपूलाही व्हायचंच होतं अगदी बेस्ट
त्यानंही मग कधी घेतली नाही रेस्ट
रात्रंदिन गुलामासारखा राबत राहीला
बढतीसाठी बॉसचे पाय दाबत राहीला

असे दिवसामागून दिवस गेले वर्षे गेली
आणि चंपूची अवस्था फार वाईट झाली
चंपूला ना हल्ली काही आठवतच नाही
कधीकधी चुकून बायकोलाच म्हणतो ताई

शेवटी एक दिवस चंपूला अक्कल आली
प्रमोशनची सारी मोहमाया सोडून दिली
बॉसला म्हणाला तू का रे सतावतो मला
बढतीचा लाडू दाखवून येडा बनवतो मला?

प्रमोशन दे नाही तर ईथून निघून जाईन
इन्क्रीमेंट जरी दिलंस तरी तिथेच राहीन
बॉसही उस्ताद म्हणे तू कुणी मोठा नाही
तुझ्यासारख्या चंपूंना इथे काही तोटा नाही

तुझ्यासारखे चंपू इथे पैशाला दहा मिळतात
करीयरच्या शर्यतीत ते उंदरासारखे पळतात
तू नाही दुसरा कुणीतरी इथे भेटेलंच रे मला
तुझ्यासारखाच दुसरा चंपू बनवेन मी त्याला

Sunday, August 30, 2009

बंडू किंचित अनुवाद करतो...

...आणि बंडूची काव्यप्रतिभा उफाळून आलीच. त्याचं असं झालं की,बंडू जालावर आपल्या जालनिशीवर काहीबाही खरडत असतो. आपण खुप दर्जेदार मराठी लेखन करतो असा बंडूचा एक गोड गैरसमज आहे. असो बापडा. तर आपल्या या दर्जेदार लेखन करणार्‍या बंडूने त्याच्या जालनिशीच्या उजव्या बाजुला एक जालखासुपकरण बसवलं आहे. जालखासुपकरण हा शब्द बंडूचाच बरं. कारण बंडू कटटर मराठी. तसे बंडूचे बरेच मित्र त्याला म्हणतात की त्याला हिंदी आणि इंग्रजी व्यवस्थित येत नाही. आणि ते लोकांना कळू नये म्हणून तो उगाचच मला मराठीचा अभिमान आहे म्हणून मी हिंदी किंवा इंग्रजी टाळतो असं गावभर सांगत सुटतो. असो. विजेट हा शब्द इंग्रजी भाषेतला. मग बंडूने त्या शब्दाचं मराठीकरण केलं, जाल खास उपकरण अर्थात जालखासुपकरण. तर हे जालखासुपकरण बंडूच्या जालनिशीवर कुणी वाचन करायला आलं की त्याची लगेच नोंद करतं आणि तिथल्या तिथं दाखवतं सुदधा. आणि त्या नोंदी पाहील्या की बंडूची छाती अभिमानाने फुलून येते. कधी कधी बंडू त्या नोंदीवरून आपले वाचक कुठल्या कुठल्या संकेतस्थळांवरून येतात हे पाहतो. दोन दिवसांपूर्वी अशाच त्या नोंदी पाहताना बंडूला अगदी आश्चर्याचा धक्का बसला. कारण एक वाचक चक्क एका मराठी संकेतस्थळावरून आला होता...

ते संकेतस्थळ तसं बंडूच्या ओळखीचं. कधी काळी बंडू या संकेतस्थळावर अगदी सक्रियपणे लेखन करायचा. अर्थात बरचसं लेखन "र ला र आणि ट ला ट" या काव्यप्रकारातलं. पण लिहायचा. पुढे बंडूने तिथे लिहिणं बंद केलं. तर या संकेतस्थळावर बंडूची एका काकांशी ओळख झाली होती. या काकांशी निगडीत बंडूची एक आठवण आहे. निगडीत म्हणजे पुण्याच्या निगडीत नाही हो. निगडीत म्हणजे संबंधित किंवा आजच्या मराठीत सांगायचं तर रीलेटेड. ही आठवण सांगत बसलो तर मुळ विषयापासून आपण दूर जाऊ पण आठवण खरंच सांगण्यासारखी आहे. झालं असं की गेल्यावर्षी फ्रीमॉंटला "भैरव ते भैरवी" हा शास्त्रीय संगितावर आधारीत कार्यक्रम झाला. काही वाचकांच्या माहितीसाठी, फ्रीमॉंट हे अमेरिकेच्या बे एरीयातील सॅन होजेसारखंच एक भारतीयांची मोठी वस्ती असणारं शहर. तर या शास्त्रीय संगिताच्या कार्यक्रमाला बंडू गेला. म्हणजे तसं बंडूला शास्त्रीय संगितातलं फार काही कळतं अशातला भाग नाही. खरं तर त्याला शास्त्रीय संगितातलं काहीच कळत नाही. मित्राने फारच आग्रह केला म्हणून गेला. कार्यक्रम तसा चांगला होता. विषेशत: एखादया रागातलं गीत (बंदीश म्हणतात म्हणे त्याला) सादर करण्यापुर्वीचं निवेदन. असो. कार्यक्रमाचं मध्यंतर झालं. बंडू पाय मोकळे करायला म्हणून सभागॄहातून बाहेर पडला. समोरून एक काका येताना दिसले. हे काका त्या संकेतस्थळावरच्या काकांसारखे दिसत होते. कारण बंडूने काकांच्या जालनिशीवर काकांचा फोटो पाहीला होता. फोटोमधला चेहरा समोरून येणार्‍या काकांच्या चेहर्‍याशी मिळताजुळता होता. काका सॅन होजेला राहतात हेही वाचलं होतं. सॅन होजे फ़्रीमॉंटपासून जेमतेम अर्ध्या तासाच्या अंतरावर. त्यामुळे हे तेच काका असणार म्हणून बंडू काकांना भेटायला गेला. पण बंडू काही बोलायच्या आधीच काका चालू झाले.

"काय बाळा कसा वाटला आमचा मराठीतला शास्त्रिय संगिताचा कार्यक्रम"? काकांनी विचारलं.

हे बंडूचं अजून एक दुखणं. बंडू सव्वीस वर्षाचा असूनही नुकताच शाळा सोडून ज्युनियर कॉलेजला जाणार्‍या पोरासारखा दिसतो. त्यामुळे कुणीही काका किंवा आजोबा त्याला "बाळा" म्हणून हाक मारतात.

"छान आहे" बंडूने चेहर्‍यावर खोटं हसू आणत म्हटलं.

आणि त्यानंतर काका जे चालू झाले ते ज्याचं नांव ते. काकांनी जुनं संगित आणि नविन संगित बदलून जुनी पिढी आणि नवी पिढी हा विषय सुरू केला होता. आता मात्र बंडूला सहन होईना. बंडूने "तुम्ही तेच काका का" हे विचारण्याचा आपला बेत रहीत केला. काका चालूच होते. आता मात्र काकांच्या तावडीतून सुटका करून घेणे भाग होते. आणि बंडू अचानक म्हणाला, "काका, मला जोराची लागली आहे. मी जातो". आणि बंडू चक्क तिकडून सटकला, आपल्या "मला जोराची लागली आहे" या वाक्याचा जुन्या पिढीतल्या काकांवर काय परीणाम होईल याची पर्वा न करता.

असो. तर या संकेतस्थळावरच्या काकांना चांगली म्हणा अथवा वाईट म्हणा,एक सवय होती. हिंदी चित्रपट गीतांचं मराठी भाषांतर करण्याची. काका त्याला "किंचित अनुवाद" म्हणायचे. काकांच्या या किंचित अनुवाद शैलीपासून प्रेरणा घेतली आणि बंडूनेही एकदा असा किंचित अनुवाद करण्याचं ठरवलं. कारण र ला र आणि ट ला ट जोडून कविता किंवा चारोळी पाडणे हा बंडूच्या डाव्या हाताचा मळ. एका मित्राने तर एकदा चक्क म्हटलं सुद्धा की तुझ्याकडे काय चारोळी पाडण्याचा एखादा संगणकाचा प्रोग्राम आहे का. टाक शब्द, पाड चारोळी. इतकी बंडूची चारोळीवर पकड. इथे तर अनुवाद करायचा होता म्हणजे मुळ काव्यही तयार मिळणार. आपण काय करायचं तर फक्त शब्दांचं भाषांतर करायचं. झालं बंडूने गाणंही शोधलं. मिथून चक्रवर्ती अभिनीत दलाल या अगदी टुकार चित्रपटातील "ठेहरे हुए पानी में" हे अर्थपुर्ण गीत. बंडूने आपलं सारं कौशल्य पणाला लावून अनुवाद केला. तो अनुवाद त्या संकेतस्थळावर पोस्टसुदधा केला नको मारून खडा रे सख्या या नावाने. एकदा स्वत:च वाचून काढला. बंडूला कळून चुकलं की अनुवाद करणं हे आपलं काम नाही. बंडूला उपरती झाली. एखाद्या दारुडयाला दारू पिऊन ओकल्यानंतर जशी होते आणि मग तो दारू पिणं सोडून देतो तशी. त्यानंतर बंडूने चारोळी आणि कविता पाडणं बंद केलं ते कायमचं...

आता जो वाचक बंडूच्या जालनिशीवर आला होता तो संकेतस्थळाच्या याच बंडूने अनुवाद केलेल्या कवितेच्या पानावरून. बंडूने तिथे टाकलेल्या आपल्या जालनिशीच्या दुव्यावरून. बंडू त्या संकेतस्थळावर गेला. आपलं जुनं लेखन वाचून काढलं. त्या चारोळ्या आणि कविता वाचून बंडू हळवा झाला. आणि पुन्हा एकदा अनुवाद करायचाच हे बंडूच्या मनाने घेतलं. अशातच दोन दिवसांपुर्वीच बंडूच्या एका अमेरिकन सहकारीणीने बंडूला डीडो नावाच्या एका इंग्रजी गायिकेचं पांढरं निशाण हे गाणं ऐकवलं. तो शब्द सहकारीणी आहे बरं. चुकून तुम्ही तो सहचारीणी असा वाचलात आणि बंडूला ते कळलं तर तो सॅन फ़्रान्सिस्कोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एखादया विमानाखाली जीव देईल. कारण एक गोरी मड्डम आपली सहचारीणी ही कल्पनासुदधा बंडूला सहन होणार नाही. असो. बंडूला ते गाणं चांगलं वाटलं. म्हणजे ते गाणं बंडूला कळलं अशातला भाग नाही, गाण्याचं संगित त्याला चांगलं वाटलं. संगित चांगलं वाटलं म्हणून गाण्याचे बोल जालावर शोधून काढले. आपल्याला इंग्रजी उपशिर्षकांशिवाय इंग्रजी चित्रपट आणि गाण्याचे बोल वाचल्याशिवाय इंग्रजी गाणी कळत नाहीत हे बंडू चारचौघात जरी कधी म्हणत नसला तरी खाजगीत कबूल करतो. तर झालं बंडूने हे पांढरं निशाण मराठीत अनुवादीत करण्याचं ठरवलं. सुरुवातही केली.

मला माहिती आहे की तुला वाटतंय
की मी आता तुझ्यावर प्रेम करायला नको
किंवा तुला तसं सांगायलाही नको
पण मी तुला जरी तसं सांगितलं नाही
तरी मला तसं वाटल्याशिवाय राहणार नाही.
यात काहीतरी तथ्य असायला नको?


एकच कडवं, आणि बंडूला कळून चुकलं. पुढे लिहिण्यात काहीच अर्थ नव्हता. बंडूने पांढरं निशाण फडकावलं.

...आज बंडूने कुमार सानूने गायलेलं यशवंत चित्रपटातील तुम सामने बैठो हे गाणं ऐकलं आणि पुन्हा एकदा बंडूच्या अनुवादाच्या विचारांनी उचल खाल्ली. आता काही झालं तरी माघार घ्यायची नाही. या मराठी साहीत्यामध्ये एका अजरामर अनुवादीत गीताची भर टाकायचीच अशी खुणगाठ बंडूने मनाशी बांधली. झालं व्हीएल्सी मध्ये गाणं चालू झालं.

तूम सामने बैठो,
मुझे प्यार करने दो
बेचैन हैं धडकन
इजहार करने दो


बंडूने मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव केली. बर्‍यापैकी जमत होती. प्रश्न फक्त त्या इजहारचा होता. म्हणजे "मला तुझ्यावरील प्रेमाची कबुली देऊ दे" हे खुपच निरस वाटत होतं. बंडूने मग इजहार शब्दाला बगल दिली. थोडी वेगळी शब्दरचना केली आणि पहिलं कडवं तर झकास जमलं.

अशीच समोर बसून राहा तू माझ्या
अन सखे तुझ्यावर प्रेम करु दे मला
थोडी हुरहूर आहे या मनात माझ्या
भावनांचे हे बंध आज सैलावू दे मला


आता दुसरं कडवं.

मौसम हें वादोंका
यूं ना करो बहाना
लिखने दो इस दिलपें
दिलका नया फसाना


हेही जमण्यासारखं होतं. पण इथेही शेवटच्या ओळीत घोळ होता. अगदी तो शब्द फसाना आहे की अफसाना इथपासून सुरुवात होती. आणि तो शब्द यापैकी काहीही असला तरी बंडूला फसाना आणि अफसाना या दोन्ही शब्दांचे अर्थ माहिती नव्हते. कदाचित फसाना म्हणजे फसवणं असं असावं. कारण मग त्या ओळीचा "माझ्या हृदयाने तुझ्या प्रेमात पडून मला फसवलं" असा काहीसा अर्थ होईल. पण जर तो शब्द अफसाना असा असेल तर पंचाईत आहे की. नाही म्हणायला बंडूला हिमेश रेशमियाचं "अफसाना बनाके भूल न जाना" हे गाणं माहिती होतं. पण तिथंही अफसानाची बोंब होती. त्यामुळे बंडू त्या ओळीचा "काहीतरी बनवून विसरून जाऊ नको" असा घ्यायचा. आणि हे काहीतरी काहीही असू शकतं. इथेही बंडूने मग ते फसाना किंवा अफसाना जे काही होतं त्याला फाटयावर मारलं आणि जमेल तसं कडवं पुर्ण केलं.

ऋतू आहे हा दिल्या घेतल्या शपथांचा
तू शोधू नको सखे उगी आता बहाणा
लिहू दे गं मला तू या हृदयावर आता
या हॄदयाचा हा नवा खेळ मला पुन्हा


चला दोन कडवी तर बर्‍यापैकी जमली. आता तिसरं कडवं.

यादोंकी पन्नोंपें
मनकी किताबोंमें
मैने तुम्हे देखा
मेहबूब ख्वाबोंमें


हे कडव तसं खुपच सोपं होतं. आठवणींच्या पानावर, मनाच्या पुस्तकामध्ये, मी पाहीलं तुला, जिवलगा स्वप्नांमध्ये. कित्ती सोप्पं. पण मग हे असंच लिहलं तर ते भारदस्त वाटत नाही. गाण्याला कसं वजन पाहीजे. काय करावं या विचारात बंडू गढला असताना त्याच्या डोक्यात मेणबत्ती पेटली. जर पुस्तकाची पानं आणि स्वप्न यासाठी काही रोमांचक विशेषणं वापरली तर अनुवादाला नक्कीच वजन येईल. पण आता पुस्तकाच्या पानांना काय विशेषण लावणार? नव्या कोर्‍या पानांवर म्हणायचं का? पण नको. नवी कोरी म्हणायला ती काय चौथीच्या बालभारतीच्या पुस्तकाची पाने आहेत? ही तर मनाच्या पुस्तकामधील आठवणींची पाने आहेत. विचार करून करून डोक्याचा भुसा व्हायची वेळ आली तरी बंडूला पुस्तकाच्या पानांसाठी रोमांचक विशेषण सापडेना. मग बंडूने जरा वेगळा विचार करायला सुरूवात केली. अंगावर रोमांच फुलतात म्हणजे काय होतं तर अंगावर कुणीतरी मोरपिस फिरवल्यासारखं वाटतं. मोरपीशी पानं. हो हो,मोरपीशी पानं. सापडला. सापडला. बंडू अगदी आईनस्टाईनप्रमाणे नाचू लागला. एव्हढा आनंद तर त्याला इंजिनीयरींगला असताना झेनर डायोड रीव्हर्स बायसमध्ये व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून कसं काम करतो हे जेव्हा महत्प्रयासाने कळलं होतं तेव्हाही झाला नव्हता. आता "मोरपीशी पानांवर" साठी "स्वप्नांच्या हिंदोळ्यावर" हे यमक सुचणं हे बंडूसारख्या रटरट (र ला र ट ला ट) कवीसाठी काही विशेष नव्हतं.

माझ्या मनाच्या या पुस्तकामधल्या
आठवणींच्या त्या मोरपीशी पानांवर
पाहत असतो सखे नेहमी मी तुला
उंच जाणार्‍या स्वप्नांच्या ‍हिंदोळ्यावर


सोपं सोपं म्हणताना या आधीच्या कडव्याने बंडूच्या नाकी नऊ आणले होते. पण जमलं होतं एकदाचं. बंडू पुढच्या ओळींकडे वळला.

चाहत का अब दिलबर
ईकरार करने दो
बेचैन हैं धडकन
इजहार करने दो


मागच्या कडव्याचा मोरपीशी अनुभव लक्षात घेऊन या वेळी बंडू काही काव्याला वजन देण्याच्या भानगडीत पडला नाही. मुकाटयाने जे आहे ते मराठीत अनुवादित केलं.

तुझ्याबद्दलच्या या ओढीची जिवलगा
आता मनमोकळी कबुली देऊ दे मला
थोडी हुरहूर आहे या मनात माझ्या
भावनांचे हे बंध आज सैलावू दे मला


पुढच्या ओळी सुंदर आहेत हे बंडूला जाणवलं होतं.

अब तो निगाहोंसें,हटती नही निगाहें
पेहलूमें आनेको, बेताबसी हैं बाहें
पलकोंकी गलीयोंमें मैं घर बसाऊंगा
नयनोंकी सागरमें मैं डुब जाऊंगा


ओळी खुपच अर्थपुर्ण आणि हळूवार होत्या. क्षणभर बंडू आपण गाण्याचा अनुवाद करत आहोत हेच विसरुन गेला. कुणीतरी "ती" नजरेत उभी राहीली आणि बंडू स्वप्नांच्या हिंदोळ्यावर तिला पाहू लागला. मंत्रावल्यासारखा बंडू पुन्हा लिहू लागला. जणू काही सारी "कायनात" त्या रोमांचक ओळी लिहिण्यासाठी बंडूच्या पाठी आपलं सारं तेज घेऊन उभी राहीली. पण हा आवेग फार काळ टीकला नाही. तो पेहलू शब्द गोडधोड खात असताना मिठाचा खडा लागावा असा लागला होता. बंडूला पल्लू शब्द माहिती होता. पल्लू म्हणजे ओढणी या अर्थाची खात्री होती. कारण "दिवानोंने सब लुटा दिया, तुने जो पल्लू गिरा दिया" हे त्याचं आवडतं गाणं होतं. पण हे पेहलू प्रकरण बंडूच्या पल्ले पडत नव्हतं. पुन्हा एकदा बंडूने पेहलू या मुळ शब्दाला बगल दिली आणि दंड, मिठी यासारखे थोडेसे रुक्ष शब्द वापरुन काम चालवून घेतलं.

ढळे ना नजर माझी तुझ्या नजरेतून आता
तुझ्या मिठीसाठी झाले दंड अनावर आता
पापण्यांच्या गल्लीत मी घर बांधेन आता
नयनांच्या सागरात बुडून जाईन मी आता


आता शेवटचं कडवं. नाही म्हटलं तरी बंडू आता जरा वैतागला होता. कारण वरचं कडवं म्हणावं असं जमलं नव्हतं. तो पुढचं कडवं ऐकू लागला.

दो चार पल यूंही
दिदार करने दो
बेचैन हैं धडकन
इजहार करने दो


इथेही बंडूने फारसा त्रास घेतला नाही. शब्दांचा त्याला माहिती असलेला सरळ साधा अर्थ घेऊन अनुवाद पुर्ण केला.

क्षण, दोन क्षण इथे असेच सखे
आता तुझ्याकडे एकटक पाहू दे मला
थोडी हुरहूर आहे या मनात माझ्या
भावनांचे हे बंध आज सैलावू दे मला


आता बंडू हा अनुवाद कुठे पोस्ट करायचा याचा विचार करतोय...

Tuesday, August 18, 2009

बोमरीलू हिंदीत येतोय...

बोमरीलू.
२००६ साली आलेला एक नितांत सुंदर तेलुगू चित्रपट.
चित्रपट तसा भाषेच्या पलिकडचा आहे. चित्रपटाचे संवाद तेलुगू भाषेत आहेत म्हणून तेलुगू चित्रपट म्हणायचं.

बाळ जन्माला येतं अन बाळाच्या आईबाबांचा आनंद गगनात मावेनासा होतो. जे जे उत्तम ते ते आपल्या बाळाला मिळावं बाबा धडपडू लागतात. दिवसरात्र मेहनत करुन बाळाला सगळ्या सुखसोयी कशा मिळतील हे पाहतात. बाळाची आई बाळाच्या पित्याची धडपड पाहते. आपल्या परीने बाळावर संस्कार करुन हातभार लावते. पण कधी कधी हे सगळं करत असताना ज्या बाळासाठी हे केलं जातंय त्या बाळाला हे सगळं आवडतंय का याचा विचार बाबा करत नाहीत. मी जे करतोय ते माझ्या बाळाच्या भल्यासाठीच आहे. आणि त्यालाही ते आवडतं असं बाबा गृहीत धरतात. बाळ मोठं होऊ लागतं. त्याला बाबा त्यांचे विचार, त्यांच्या आवडीनिवडी आपल्यावर लादतात असं वाटायला लागतं. पण बाबांना दुखवायचं नाही म्हणून तो काहीच बोलत नाही. बाप लेकात संवाद असा कधी घडतच नाही. एक अदृष्य भिंत निर्माण होते बाप लेकामध्ये. आईला हे सारं जाणवत असतं पण तीही अगतिक असते. घरासाठी राब राब राबणार्‍या नवर्‍याला दुखवायचं कसं हा प्रश्न त्या माउलीला पडलेला असतो. मुलगा लग्नाच्या वयाचा होतो तरीही बाबा त्याला लहानच समजतात आणि एक दिवस मुलाच्या भावनांचा उद्रेक होतो...

हीच बोमरीलूची मध्यवर्ती संकल्पना. त्याला जोड एका हळूवार प्रेमकहाणीची. कर्णमधूर संगीत. संपुर्ण चित्रपटात एकच मारधाडीचा प्रसंग. कॉलेजच्या मुलांमधली मारधाड. तीही खर्‍या अर्थाने कथेची गरज म्हणून. भडक नृत्ये, पाणचट संवाद आणि अश्लिल दृष्ये या चित्रपटात नावालासुदधा नाहीत.

प्रत्येक बापाने आपल्या पोराबाळांसोबत पाहावा असा चित्रपट. बाप असलेल्या किंवा बाप होऊ पाहणार्‍या प्रत्येकाने बाळाला कसं वाढवावं किंवा कसं वाढवू नये हे समजून घेण्यासाठी पाहावा असा चित्रपट.
मोरपिशी दिवसांमध्ये, तो जर "तीची" स्वप्नं पाहत असेल किंवा ती जर "त्याची" स्वप्नं पाहत असेल तर त्याने किंवा तिने आवर्जून पाहावा असा चित्रपट. जेव्हा तुम्ही त्याला "मी तुझ्यावर प्रेम करते" असं म्हणता, तेव्हा त्याला "तुझ्यावर" मध्ये त्याचं सारं घर अपेक्षित असतं. जेव्हा तुम्ही तिला "मी तुझ्यावर प्रेम करतो" असं म्हणता, तेव्हा तिची अपेक्षा असते की तुम्ही तिला तिच्या घरासहीत समजून घ्यावं, आपलं मानावं. ज्या घरामध्ये ती लहानाची मोठी झाली, ज्या घराने तिला तळहातावरच्या फोडासारखं जपलं, तिला तिच्या पायावर उभं केलं, त्या घराला केवळ तो तिच्या आयुष्यात आला म्हणून ती दुय्यम प्राधान्य नाही देऊ शकत. या गोष्टींची जाणिव व्हावी म्हणून पाहावा असा चित्रपट.

बोमरीलू, बोमर ईलू म्हणजे चांगलं घर.

एका सुंदर प्रसंगाने चित्रपट सुरु होतो. समुद्र किनार्‍यावर एक अगदी छोटं बाळ पावलं टाकत असतं आणि त्याचे बाबा त्याला सावरत असतात. याच वेळी कथेचा निवेदक आपल्या धीरगंभीर आवाजात सांगत असतो की वडीलांनी मुलाला त्याच्या बालपणामध्ये आधार देणे आवश्यकच आहे पण मुलगा मोठा झाल्यानंतरही त्याच्या आयुष्यात दखल देणं कितपत योग्य आहे... मुलं लहान असतात तोपर्यंत त्यांना आई बाबांचा आधार हवा असतो पण जस जशी ती मोठी होत जातात तसतसं त्यांना आई बाबांपासून स्वातंत्र्य हवं असतं. तसं नाही झालं तर त्यांची प्रचंड घुसमट होते. प्रसंगी मुलं घराबाहेर आई वडीलांबद्दल अपशब्द काढायलाही मागे पुढे पाहत नाहीत. कधीतरी ही घुसमट असह्य होते आणि मग मुलं सगळी बंधनं झुगारुन देतात.

सिद्धार्थ (सिद्धार्थ नारायण - रंग दे बसंती मधला करण) एका सुखवस्तू घरामधला घरामधला मुलगा. दोन वर्षांपुर्वी इंजिनियर झालेला. आणि तरीही त्याच्या प्रत्येक गोष्टीवर वडीलांचा वरचश्मा असणारा. त्याने कुठले कपडे घालावेत इथपासुन ते त्याची "हेअर स्टाईल" कशी असावी इथपर्यंत सारं काही वडील ठरवणार. या सगळ्याला सिद्धु खुप वैतागलेला. घरात असताना एकदम सुसंस्कृत मुलासारखा वागायचा. पण बाहेर मात्र या सगळ्याची कसर भरून काढायचा. अगदी मित्रांसोबत असताना पिणं झाल्यानंतर आपल्या बाबांना खुप शिव्या द्यायचा तो. मित्रांसोबत असताना तो नेहमी म्हणायचा, की त्याच्या बाबांनी त्याच्या आयुष्यात कितीही ढवळाढवळ केली तरीही दोन गोष्टी तो त्याच्या मनाप्रमाणेच करणार होता. एक म्हणजे त्याच करीयर आणि त्याचं लग्न. त्याला आवडणा‍र्‍या मुलीसोबतच तो सात फेरे घालणार होता.

आणि अशातच सिद्धुचे घरवाले त्याच्या मनाविरुद्ध त्याचं लग्न ठरवतात आणि त्याच्या मनाची घुसमट अधिकच वाढत जाते.पण एक दिवस त्याला एका मंदीरात "ती" दिसते आणि त्याच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळते. लग्न ठरलेलं असतानाही सिद्धू त्या मुलीच्या, हासिनीच्या (जेनेलिया) प्रेमात पडतो. हासिनी सिद्धुच्याच कॉलेजला इंजिनियरींगला असते. आपल्याच कॉलेजचा पासआऊट म्हणून हासिनी सिद्धुशी मैत्री करते आणि तिच्याही नकळत त्याच्या प्रेमात पडते.

चित्रपटामध्ये हा इथवरचा प्रवास इतक्या हळूवारपणे दाखवला आहे की आपल्या हिंदी चित्रपटांनी बनवणार्‍यांनी त्याचे धडे घ्यावेत. गोंधळलेला सिद्धू, अल्लड आणि अवखळ कॉलेजकन्यका हासिनी, त्या दोघांचं साध्या साध्या प्रसंगांमधून फ़ुलणारं प्रेम, सिद्धू आणि त्याच्या आई बाबांमधील प्रसंग. सारंच सुंदर. एरव्ही घरामध्ये एक अवाक्षरही न बोलणार्‍या सिद्धूचं हासिनीवरचं अधिकार गाजवताना सिद्धार्थ नारायणने केलेला अभिनय तर लाजबाब...

आपलं लग्न ठरलं आहे हे सिद्धूला हासिनीला सांगायचं असतं. तसं ते तो तिला सांगतोही. ते ऐकताच हासिनीला धक्का बसतो. ती सिद्धूपासुन दुरावते. पण ती फ़ार काळ स्वत:ला त्याच्यापासून दुर ठेवू शकत नाही आणि ती परत येते. सिद्धू आणि हासिनीचं पुन्हा एकदा भेटतात. एका रस्त्यावर, सिद्धूच्या बाबांसमोर त्यांच्या नकळत. सिद्धूचं लग्न ठरलेलं असुनही तो दुसर्‍या एका मुलीच्या प्रेमात पडला आहे, ही गोष्ट समजताच घरात वादळ येतं. बाबा सिद्धूला हासिनीला विसरून जायला सांगतात. सिद्धू सगळ्यांना एकदा तुम्ही हासिनीला भेटा, तिला समजून घ्या आणि मग हव तर जर तिचा स्वभाव पटला नाही तर मला तिला विसरायला सांगा अशी विनंती करतो. नव्हे, तो घरच्यांना हासिनीला एक आठवडयासाठी घरी आणण्याचं कबूल करतो. आणि सहलीची युक्ती करून हासिनीला तिच्या घरुन आठवडयासाठी आपल्या घरी घेऊन येतोही.

हासिनी सिद्धूच्या घरी येते. सुरुवातीला सारे तिच्याकडे दुर्लक्ष करतात पण हासिनी आपल्या अल्लड, अवखळ वागण्याने सा‌र्‍यांची मने जिंकून घेते. एके दिवशी हासिनी सार्‍या कुटूंबासोबत एका लग्न समारंभात जाते. आपल्या अल्लड स्वभावाने त्या लग्न समारंभामध्ये रंग भरते. योगायोगाने याच लग्नाला हासिनीचे बाबाही येतात. तिच्या बाबांनी एकदा सिद्धूला मित्रांसोबत दारू पिऊन रस्त्यावर आपल्या बाबांना शिव्या देताना पाहीलेलं असतं. ते सिद्धूला ओळखतात. हासिनी प्रसंगावधान राखून पुढचा प्रसंग टाळण्यासाठी समारंभातून तिच्या बाबांच्या नकळत निघून जाते. असं असुनही घरी आल्यावर सिद्धू हासिनीला तिच्या लग्नामधल्या बालिश वर्तनाबद्दल ओरडतो. या सगळ्याने हासिनी व्यथीत होते. सिद्धू पुर्वीचा जसा होता तसा आता राहीला नाही, तसंच या घरात राहण्यासाठी तिला खुप तडजोड करावी लागेल आणि ते तिच्याने होणार नाही असं सांगून ती सिद्धूच्या घरुन निघून जाते. हासिनी तिच्या घरी गेल्यावर तिच्या बाबांचा ओरडा खाते. पण ती पुन्हा असं काही ती करणार नाही असं आपल्या बाबांना वचन देते.

इकडे सिद्धू मात्र हासिनीच्या विरहात स्वत:ला हरवून जातो. सिद्धूची आई पुढाकार घेऊन त्याच्या बाबांना समजावते. चोवीस वर्षात कधीही बाबांपुढे तोंड न उघडलेला सिद्धूही आपल्या मनातील घुसमट बाबांसमोर व्यक्त करतो. गेले चोवीस वर्ष ते कसे चुकत गेले हे सांगतो. सिद्धु आपल्या नियोजित वधूच्या घरी जाऊन लग्न त्याचं त्यांच्या मुलीशी ठरलेलं लग्न मोडण्यास राजी करतो. सिद्धूचे बाबाही आपल्या मुलासाठी हासिनीच्या घरी जातात. तिच्या बाबांना हासिनी आणि सिद्धूच्या लग्नासाठी विनंती करतात. आता हासिनीचे बाबा सिद्धूला समजून घेण्य़ासाठी त्याला एक आठवडाभर आपल्या घरी राहायला बोलावतात. आणि त्यानंतर हासिनी आणि सिद्धू लग्न करुन सुखी होतात असं मानायला लावून चित्रपट संपतो...

म्हटलं तर हा चित्रपट तसा एक चाकोरीबद्ध चित्रपट आहे. प्रेमकथा, घरातील ताण-तणाव हे विषय तसे नेहमीचेच आहेत.पण चित्रपटाचं सादरीकरण निव्वळ अप्रतिम आहे. सिद्धार्थ नारायण (सिद्धू), जेनेलिया (हासिनी), प्रकाश राज (सिद्धूचे बाबा) या तीन कलावंताचा तसेच इतर सह कलाकारांचा कसदार अभिनय, कानांना गोड वाटणारं संगीत या सगळ्यामुळे चित्रपट खुप सुंदर बनला आहे. सिद्धार्थ नारायणनेच गायलेलं "आपुडो ईपुडो" हे गीत आणि "बोम्मनी गिस्ते" हे प्रेम गीत ही दोन्ही गाणी सुंदर आहेत. चित्रपट २००६ साली प्रदर्शीत झाला होता. त्यावेळचा तो सुपरहीट तेलुगु सिनेमा होता. चित्रपटाला फ़िल्मफेअर पारितोषिकही मिळालं होतं. याच चित्रपटाने जेनेलियाला अभिनेत्री म्हणून ओळख दिली.

पुढे वर्षभरातच हा चित्रपट तमिळमध्ये पुन्हा बनवला गेला, संतोष सुब्रमण्यम या नावाने. मुख्य अभिनेत्री जेनेलिया आणि मुलाच्या वडीलांची भुमिका करणार्‍या प्रकाश राजनी याही चित्रपटात त्याच भुमिका केल्या. पण तमिळ आवृत्तीचा मुख्य अभिनेता होता जयम रवी हा तमिळ अभिनेता. हाही चित्रपट बोमरीलूप्रमाणे सुपरहीट झाला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तमिळ प्रेक्षकांना जास्त आवडला तो मुळचा तेलुगू बोमरीलूच. ईतकंच नव्हे तर सिदधार्थचा बोमरीलूमधला अभिनय जयम रवीच्या संतोष सुब्रमण्यममधील अभिनयापेक्षा कित्येक पटींनी उजवा ठरला. आणि या सर्वांवर कळस म्हणजे बोमरीलूमध्ये सिदधार्थची भुमिका करणारा सिदधार्थ नारायण हा प्रामुख्याने तेलुगू चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता जन्माने तमिळ आहे.

बोमरीलू प्रदर्शित होऊन जवळजवळ दोन वर्ष होऊन गेली होती. तरीही तरूणाई बोमरीलू आवर्जून पाहत होती. आपल्या मित्रमैत्रिणींना दाखवत होती. ओरकूटवर शंभरपैकी दहा प्रोफाईल असे सापडतील की त्यांच्या चित्रपटाच्या यादीत बोमरीलू हे नाव आहे. बर्‍याच मराठी तसेच उत्तर भारतीय कॉलेजवयीन मुलामुलींनी हा चित्रपट आपल्या दाक्षिणात्य दोस्त मंडळींनी दाखवल्यामुळे पाहीलेला आहे. कदाचित त्यामुळेच हा चित्रपट हिंदीत बनवण्याचा एक असफल प्रयत्न झाला. मुलाच्या भुमिकेत असणार होता अभिषेक बच्चन आणि वडीलांच्या भुमिकेत अमिताभ बच्चन. आईच्या भुमिकेत असणार होती बोमरीलू मधील आई, जया सुधा. पण काही कारणाने हा चित्रपट नाही बनू शकला.

आणि आश्चर्य... आता मात्र खरंच हा चित्रपट आता हिंदीत येतोय, ईट्स माय लाईफ या नावाने. अभिनेत्री पुन्हा तीच, जेनेलिया. हासिनी साकारण्याची ही तीची तिसरी वेळ आहे. मुलाच्या भुमिकेत असणार आहे हरमन बावेजा. आणि वडीलांच्या भुमिकेत असेल आपला मराठमोळा नाना पाटेकर. हासिनीच्या भुमिका करण्याची ही तिसरी वेळ असल्यामुळे जेनेलियाचा तर प्रश्नच नाही. नाना पाटेकरही प्रकाश राज यांच्या तोडीचा अभिनय पित्याच्या भुमिकेत करतील यात वाद नाही. प्रश्न आहे तो मुख्य अभिनेत्याचा, मुलाची भुमिका करणार्‍या अभिनेत्याचा. सिदधार्थ सारख्या अष्टपैलू अभिनेत्याने मुलाच्या भुमिकेला दिलेलं ग्लॅमर तसेच जीव ओतून केलेला अभिनय यांचं आव्हान जयम रवीसारखा सशक्त तमिळ अभिनेतासुदधा तमिळ आवृतीच्या वेळी पेलू शकला नाही. तर हरमन बावेजा या भुमिकेला कितपत न्याय देईल हा प्रश्नच आहे. असो. चित्रपट प्रदर्शित व्हायला अजून वेळ आहे त्यामुळे आताच काही भाष्य करणं योग्य ठरणार नाही.

एक मात्र नक्की, बोमरीलू कुठल्याही भारतीय भाषेत पुन्हा बनवला जावो, त्याला मुळ तेलुगू बोमरीलूची सर येणार नाही.

जाता जाता...
बोमरीलू यु टयुबवर पाहता येईल. यु टयुबवर हा चित्रपट ईंग्रजी उपशिर्षकांसहीत आहे त्यामुळे चित्रपट समजायला भाषेची फारशी अडचण येणार नाही. मी इथे पहीली चित्रफीत डकवतोय. जर तुम्ही चित्रपट पाहणार असाल तर ईथे न पाहता यु टयुबवर जाऊन पाहा. पुढच्या चित्रफीती क्रमाने मिळतील.

Saturday, August 15, 2009

आरं गोयिंदा रं गोपाला...

थोडंसं हरवल्यासारखं वाटतंय कालपासून. मित्रांचे "गोविंदा आला रे..." ईथपासून ते "श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे.." पर्यंतचे जीटॉकचे स्टेटस मनाला हुरहूर लावत आहेत. एरव्ही "हॅप्पी जन्माष्टमी" सारख्या विनाकारण आंग्ळाललेल्या ओळी ओरकुटच्या खरडवहीत पाहुन डोकं सणकलं असतं. पण आता तसं काहीच वाटत नाहीये. जे काही लिहिलं आहे त्यामागची भावना महत्त्वाची एव्हढंच जाणवत आहे. मनात कुठेतरी खोलवर आवाज येतोय...

आरं गोयिंदा रं गोपाला
येस्वदेच्या तान्या बाला

आज उपास. उदया धयांडी. लय मजा येईल. मी तं बाबा आगदी मदल्या सुट्टीतच पलुन आलो शालेतना. मं त्यात काय झाला. सगली पोरा आली. पन च्यायला घरची मानसा पन आशी हायेत ना. आदी शालेतना पलुन आलो म्हनून शिया दिलं आनी आता म्हनतात काय उपास काय संदयाकाली हाय. आता आलाच हायेस तं वाईच ढॉराना फीरवून आन. मया आनी दिन्याला कदीच सांगत नाय. कदीपन मनाच सांगतात. का तं मी म्हॉटा पॉरगा हाय म्हनुन. मी म्हॉटा आनी त्ये काय बारीक हायेत काय. मया फकस्त येक वर्शानी बारीक आनि दिन्या दोन वर्शानी. आनी परत काय झाला का मनाच वराडतात. त्या दॉगाना कायीच बोलत नाय. जावदे. न्हेतो ढॉराना. लय लांब नाय न्हेनार. वाईच बोडनीवरना पानी दाकवुन आनीन. मंग संदयाकाली नविन बॉडया आनी चडडया. आनि मग गोयंदो...


आज मी जर कुणाशी या भाषेत बोललो तर लोक मला वेडयात काढतील . पण अगदी दहावी होईपर्यंत मी याच भाषेत सार्‍यांशी बोलत असे. पुढे अकरावीला आल्यानंतर मात्र ठरवून शुदध (?) मराठी बोलायला सुरुवात केली. नाही म्हणायला मी आईशी आजही याच भाषेत बोलतो, अगदी "आये कशी हायेस" अशी सुरुवात करुन...

आनली येगदाची ढॉरा फीरवून. आता जरा टायमान बाबा गोरेगावशी येतील. मंग नविन बॉडी आनी चडडी घतली का दयावलात जायाचा...

"आरं जरा धीर दम हाय का नाय. जरा खा प्या आनी मंग जा दयावलात"
"मी तं मंगाशीच खल्ला ढॉरांकडना आल्यावर"
"जा पन कालोकात फीरु नुकॉ. इचूकाटा हाजार हाय. उगंच सनासुदीचं याप लावाल आमच्या मांगं."

मी बाबा व्हो म्हनायची पन वाट बगत नाय. त्याज्याआदीच संत्याकडं जातो. संत्या माज्या म्हॉटया आकाचा पोरगा. माज्यापेक्शा वायीच म्हॉटा हाय. वायीच म्हंजे फकस्त चार पाच म्हयन्यांनी.
संत्या आनी मी दयावलात जातो. मस्त लायटींग बियटींग केलेली आस्ते. लाउसपिक्चर लावलेला आसतो. बारकी पॉरा दयावलाच्या आंगनात लंगडी बिंगडी खेलत आस्तात. आमीपन त्यांच्यात जातो आनी ज्याम मजा करतो. जरा नव सादे व वाजलं का म्होटी मान्सा यायाला सुरवात व्हते. धा वाजलं का भजन चालू व्हतो. आमी पॉरा तरीपन खेलतच आस्तो. मंग कुनीतरी याकादा म्हॉटा मानूस भजनातना उटून येतो आनी पॉरांवर वराडतो.

"काय रे कार्टयानो तुमाना कलत नाय काय. दयावाधर्माचा भजेन चालू हाय जरा गप बसावा त्या काय नाय. नुसती आपली खिदाललेत."

आसा कुनी वराडला का पॉरा आजुन खिदालतात. आता भजेन पन रंगात आलेला आसतो. ते आबंग बिबंग खतम व्हऊन आता जरा संगीत भजन चालू झालेला आस्तो. तुकाराम बुवा येगदम रंगात येवून गायीत आस्तात. संगीत भजनाला वानी ढोलकी आनी तब्ला आसा वाजवतात ना. काय सांगू. तुकाराम बुवा मग तो किश्नाचा गाना चालू करतात. आम्ही सगली पॉरा ख्यालना बंद करुन भजनात येवून बसतो.

सुर्ये उगवला, प्रकास पडला, आडवा डोंगर...आडवा डोंगर तयाला माजा नमस्कार
सुर्ये उगवला, प्रकास पडला, आडवा डोंगर...आनि गोकुलमदयी किश्न जनमला आठवा आव्तार...

वान्यांचा तबला टीन टीन टीन टीन वाजायला लागतो. सगलं भजनी येग्दम रंगात येवून टाली वाजवीत आस्तात. आमी पॉरा तं काय यिचारुच नुका...

बारा साडेबारा वाजायला आलं का भजन बंद करतात. कारन आता किश्नजन्माचा टाईम झालेला आस्तो. तुकाराम बुवा मग जन्माची पोती वाचायला सुरवात करतात. आतापरत भजनाच्या आवाजान येग्दम भिनकून ग्येलेला देउल चिडीच्याप व्हतो. जन्माची पोती म्हन्जे आमचं बाबा जो हारीईजय वाचतात ना त्याजाच येक आदयाय ज्याच्यामदी किश्न जन्माला येतो. पोती आशा ब्येतान चालु केलेली आसतात का किश्नजन्माचा म्हुर्ताला वाचन संपल. म्हुर्त जवल येतो. वाचन संपतो. तुकाराम बुवा "गोपालकिश्न म्हाराज की जय" आसा बोल्तात आनि किश्नजन्म होतो...

"गोयंदो" कुनी लाव्ह्या फेकतो.

"गोयंदो" कुनी गुलाल फेकतो.

कुनी जोराजोरान देवलातली घंटी वाजवतो. सगली लोका आनंदान उडया मारतात. मंग देवाला पालन्यात घालतात. आनी मग एकेकजन देवाचा दर्शन घ्यायाला रांगत फुडं सराकतात.

"दयेव घ्या कुनी, दयेव घ्या कुनी" तुकाराम बुवा बोलत आसतात.

"दयेव घ्या कुनी, दयेव घ्या कुनी" बाकीची सगली लोका म्होटयानी बोलतात.

"आयता आला घरच्या घरी" परत तुकाराम बुवा बोलतात.

"आयता आला घरच्या घरी" लोक परत त्यांच्या पाटीवर बोलतात.

आमीपन सगली देवाचा दर्शन घेवून बाबांसोबत घरी येतो. आये केलीच्या पानावर सगल्याना ज्येवायला वाडते. मस्त पाच सा भाज्या, भजी बिजी केलेली आसतात उपासासाटी...

दुसर्‍या दिवशी धयांडी. आमी सगली पॉरा सकाली ढॉरांकड जातो. बारा वाजता ढॉरा घरी आनतो. हिकडं दयेवलात धयांडीची तयारी चालू आसते. मंग आस्ती आस्ती खेल चालू व्हतात. आग्दी त्या हारीयीजयात किश्न आनी गोपाल जसं खेलतात ना तसंच. मना बाकी काय खेलता येत नाय पन फुय फुय खेलायला जाम मजा येते. वानी आगदी जोराजोरात ढोलकी वाजवतात. दोन दोन पॉरांच्या जॉडया फुय फुय ख्येलतात. आदी आर्दी लोका म्हनतात, "फुय फुय फुय फुय फुगडी गं तुमी आमी दॉगा ख्येलू गं" मग परत आर्दी लॉका तसाच म्हनतात, "फुय फुय फुय फुय फुगडी गं तुमी आमी दॉगा ख्येलू गं". मना आजुन येक खेल आवडतो. सगली लोका आसा घोल रींगान करुन उबी र्‍हातात. आनी मग एक मानुस बय बनतो. बय म्हनजे आये. जुनी लोका आयेला बय म्हनतात. आनी दुसरा कुनीतरी त्या बयची लेक म्हंजे पोर्गी व्हतो. बय रींगनातल्या येकेकाच्या हाताखलना चालत जाते. पोर्गी तिज्या पाटोपाट.

"बय मी यतो" पोर्गी म्हन्ते.

"नुको गं लेकी" बय म्हन्ते.

"बय मी यतो" परत पोर्गी म्हन्ते.

"लुगडं देतो" बय पोरीने आपल्या पाटीवर येव नाय म्हनून लुगडा दयायचा कबुल लुगडं दयायचा कबुल करते. पन पोर्गी काय आयकत नाय. तिजा आपला चालूच.

"बय मी यतो." आसा मग पोल्का, नत, पाटल्या, चंद्रहार म्हनत म्हनत बय आनी लेक लोकांच्या रींगनात फीरत र्‍हातात. शेवटी बय जवा लेकीला न्हवरा देतो म्हनते तवा खेल संपतो...

आता खेल संपतात. लोका धयांडीच्या तयारीला लागतात. जास्त उंच नाय बांदत. दोन तीन थरच आसतात. धयांडी बांदतात. थर रचतात. धयांडी फुटते आनी परत येगदा गोयंदो गोयंदो चालू व्हतो...

तो सगला झाला का सगली लोका हातात हात गुतवून रांगत पानी घ्यायला जायाला लागतात... सगली म्हॉटया म्हॉटयान म्हनत आसतात...

आरं गोयिंदा रं गोपाला
येस्वदेच्या तान्या बाला


मी चटकन भानावर आलो. मानवी मन किती अजब आहे ना. मी आता या क्षणी जरी कॅलिफोर्नियामध्ये एका बलाढय अमेरिकन पेट्रोल कंपनीच्या वातानुकुलीत कार्यालयात बसलो असलो तरी काही क्षणांपुर्वी मी माझ्या मातीत, माझ्या बालपणात हरवून गेलो होतो. मी अर्धवट राहीली ईमेल पुर्ण करण्यासाठी कीबोर्ड बडवायला सुरुवात केली, Please let us know if you need further assistance असं सवयीनुसार टंकलं आणि आउटलुकचं सेंड बटन दाबलं...

Monday, July 27, 2009

जन्म

दवाखान्याचा सारा परिसर औषधांच्या वासाने भरलेला. परिचारिकांची मधूनच लगबग चालू होती. एखादा इंटर्नशिप करणारा शिकाऊ डॉक्टर स्थेटास्कोपशी खेळ्त वार्डमध्ये राउंडला जाताना दिसत होता. अविनाश नुकताच एक सिझेरियनची शस्त्रक्रिया आटपून लेबर रूममधून बाहेर पडला होता. बाहेर येऊन तो आरामशीर खुर्चीत बसला. आणि त्याच्या नजरे समोरून काही मिनिटा पुर्वी त्याने केलेली अवघड शस्त्रक्रिया त्याच्या नजरे समोर पुन्हा एकदा दिसू लागली...

लेबर रूममध्ये जिवाच्या आकांताने प्रसुती वेदना सहन करणारी स्त्री, डॉक्टराना मदत करण्यासाठी आजूबाजूला उभ्या असलेल्या परिचारिका, आपला सीनियर डॉक्टर काय म्हणतोय हे ऐकण्यासाठी त्याच्याकडे पाहणारी नुकतीच रुजू झालेली त्याची सहयोगी डॉक्टर निशा सारेच तणावाखाली होते. नाही म्हणायला क्षण दोन क्षण तोही तेव्हा विचलित झाला. नैसर्गिक प्रसुती शक्य नसल्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागणार होती. कापाकापी करावी लागणार या जाणिवेमुळे त्याच्यातील संवेदनशील, हळवा अवी जागा झाला होता. पण ते तेव्हढयापुरतंच. पुढच्याच क्षणी त्याच्यातला डॉक्टर जागा झाला होता. सारं चित्त समोरच्या स्त्रीवर, तिच्या पोटातील बाळाच्या आगमनावर एकाग्र झालं होतं. त्याने हॅण्ड ग्लॉव्ज चढवले. निशाला, परिचारिकाना आवश्यक त्या सूचना देऊन त्याने चेह-यावर मास्क चढवला आणि शस्त्रक्रिया चालू झाली. सारं काही यंत्रवत, जणू ती माणसं नसून नव्या युगातले यंत्र मानव होते. यथावकाश ती शस्त्रक्रिया पूर्ण झाली. त्या बाळाने या जगातला पहिला श्वास घेतला आणि अविनाशनेही निश्वास सोडला.

"डॉक्टर काय झालं ?" तो बाहेर पडताच त्या स्त्रीच्या नातेवाईकानी त्याच्याभोवती गर्दी करत विचारलं.
"मुलगा" समोरच्या लोकांच्या फुललेल्या चेह-याकडे पाहत त्याने आपल्या केबिनची वाट धरली...

अवी अचानकपणे भानावर आला. नव्या जीवाचं या जगातील आगमन इतकं आनंददायी असतं, मग आपल्याला कसं काहीच वाटत नाही ? तो स्वताशीच हसला. वेडा आहेस तू... तुझ्यासारख्या प्रसुती तज्ञ कसं समजून घेणार हे सारं... रोज पाच सहा बाळं तुझं बोट धरून या जगात येतात. आणि तसंही तो इवलासा जीव, त्याची या जगाशी जमवून घेण्यासाठी चाललेली धडपड पाहून तुझ्या चेह-यावर स्मित उमटतंच की...

सहजच त्याचं लक्ष भिंतीवरच्या हूकला अडकवलेल्या पांढ-या शुभ्र ऍप्रॉनकडे गेलं. तो एकटक गळ्यात लटकणा-या स्टेथास्कोपकडे पाहत राहिला. आपण डॉक्टर व्हावी ही आपली लहानपणापासूनची इच्छा होती. रोगपीडितांची सेवा, डॉक्टर या शब्दाला समाजात असलेला मान, या क्षेत्रात मिळणारा पैसा हे सारं नंतरचं होतं. आपण डॉक्टर व्हावं ही इच्छा मनात घर करून राहण्याचं मुख्य कारण होतं, तेव्हा असलेलं स्टेथास्कोप आणि ऍप्रॉन यांचं आकर्षण. नंतर पुढे समज आल्यावर रोगपीडितांची सेवा हे एकमेव ध्येय समोर ठेऊन त्याने वैदकीय शिक्षण घेतलं. तो बेसीनजवळ आला. ओंजळीत पाणी घेऊन चेहरा आणि हात स्वच्छ धुतले. भिंतीवरील हुकाला अडकावलेल्या टर्किश टॉवेलने पुसले. आता अगदी मोकळं वाटत होतं. त्याने मस्त शिळ घातली अगदी आपण दवाखान्यात आहोत याची पर्वा ना करता. एम बी बी एस, एम डी या सगळ्या पदव्यांपासून आता तो जणू अलिप्त झाला होता. आता तो होता फक्त अविनाश, अवी ...

इतक्यात दारावर हलेकेच टकटक झाली...
"कम इन..."
हातामध्ये चहाचा थर्मास घेऊन निशा आत आली. निशा त्याची सहयोगी डॉक्टर. नुकतीच एम डी होऊन दवाखान्यात रुजू झाली होती. तोही तसा फार वरिष्ठ नव्हता. एम डी होऊन फार तर दीड वर्ष झालं होतं. त्याच्या गुणवत्तेमुळे या नावाजलेल्या दवाखान्याने त्याला संधी दिली होती. डॉक्टर कर्णिकांचा सहाय्यक म्हणून तो काम करत होता. पुढे वर्षभराने डॉक्टर कर्निकांनी जेव्हा दवाखाना सोडला, तेव्हा दवाखान्याच्या व्यवस्थापनाने बाहेरुन कुणी डॉक्टर आणण्याच्या भानगडीत न पडता अविनाशला त्या जागी बसवलं होतं. इतर वरिष्ठ डॉक्टरानी आरडाओरडा केला पण अविनाशची गुणवत्ता, त्याचं कौशल्य वादातीत असल्यामुळे त्याना नमतं घ्यावं लागलं होतं. आणि तो प्रसुती विभागाचा प्रमुख झाला होता.

"निशा, एक विचारू ?’
"परवानगी कशाला हवी आहे ?"
"तू हे सारं का करतेस ?"
"मी समजले नाही डॉक्टर..."
"मला असं म्हणायचं आहे की, माझ्यासाठी चहा आणणं, माझ्या टेबलावरच्या फुलदानीत रोज ताजी फुलं ठेवणं. आणि या बदल्यात मी तुला काय देतो तर, तू चुकलीस की ओरडा..."
'डॉक्टर, तुम्ही माझ्यावर जे ओरडता ते मी शिकावं म्हणूनच ना ? आणि मीही जे करते आहे ते माझ्या वरिष्ठांसाठीच करते आहे, ज्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. डॉक्टर, प्रसुती साठी आलेल्या स्त्रीला जेव्हा तुम्ही धीर देता, तेव्हा वाटतं की, अस धीर देणं एक स्त्री असूनही आपल्याला जमणार नाही."
"निशा चुकतेस तू. मी कधीही तुला कनिष्ठ मानलं नाही. तुही माझ्यासारखीच डॉक्टर आहेस. लेबररूम मध्ये नर्स जेव्हा बाळाला माझ्या हातात देतात, तेव्हा मी त्या बाळाच्या कानात सांगतो, मोठा जरूर हो, नव्हे तू मोठा होशीलच. परंतु कितीही मोठा झालास तरी इतराना कमी लेखू नको"
"हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे डॉक्टर."
अविनाशने झटकन मान वर करुन निशाकडे पाहीलं. ओठ जरी शांत होते तरीही नजर जे बोलायचं ते बोलून गेली होती. त्याने हलकेच स्नित केलं. निशाही गोड हसली आणि बाहेर पडली. अवी तिच्या पाठमो-या आकृतीकडे एकटक पाहत राहीला.

एक दिवस तो असाच आपल्या केबिनमध्ये बसला होता. एक नॉर्मल डीलीव्हरीची केस निशा पाहणार होती. त्यामुळे अगदी निवांत चालू होतं सारं. इतक्यात फोनची रींग वाजली. त्याने फोन उचलला.
’हेलो. मी डॉ. आविनाशशी बोलू शकते का?" आवाज स्त्रीचा होता. त्याने आवाज ओळखण्याचा प्रयत्न केला. जमेना. शेवटी त्यानेच तिची ओळख विचारली.
"मीच डॉ. आविनाश. आपण कोण?"
"वैष्णवी"
अवी स्तब्ध झाला. त्याला काय बोलावे हे सुचेना. रिसीव्हर पकडलेला हात निर्जीव झाला आहे असंच क्षणभर त्याला वाटलं.
त्या फोनवरच्या मुलीने आपलं बोलणं पुढे चालू ठेवलं.
"अवी, मला तुला भेटायचं आहे"
"..."
"अवी, काय झालं? ऐकतोयस ना मी काय म्हणतेय ते? उदया संध्याकाळी पाच वाजता मी तुझी तुझ्या दवाखान्यासमोरच्या रेस्टॉरंटमध्ये वाट पाहीन. चालेल ना?"
"हो" त्याच्याही नकळत तो हो म्हणून गेला होता.
वैष्णवी. तो स्वत:शीच पुटपुटला. अन तो कधी भुतकाळात हरवला हे त्याचं त्यालाच कळलं नाही.

वैष्णवी त्याची शाळेतील मैत्रिण. म्हणजे एकाच वर्गातील म्हणून मैत्रिण म्हणायची नाही तर ती त्याच्याकडे पाहतही नसे. पुढे अकरावी बारावीला असताना त्याला तिच्याबददल कधी आणि कशी ओढ वाटायला लागली हे त्याला कळलंच नाही. त्यानं तिला विचारलंही. पण तिच्या आणि त्याच्या घरच्या परिस्थितीमध्ये फरक असल्यामुळे तीने त्याला नाही म्हटलं. श्रिमंत नायिका आणी गरीब नायक हे फक्त कथा कादंब-यांमधेच शोभून दिसतात. तिचा नकार त्याने फारसा मनावर घेतला नाही. तसा तो जात्याच हुशार होता. बारावीला जीव तोडून अभ्यास केला. फ्रीशीपवर मेडिकलला गेला. पुढे कधीतरी तो एम बी बी एसला असताना वैष्णवी त्याला दिसली होती. पुन्हा एकदा त्याच्या मनातील तिच्याबददलच्या विचारांनी उचल खाल्ली. त्याने पुन्हा एकदा तिला विचारायचं ठरवलं. आपण आता मेडीकलला आहोत. अजुन दोनेक वर्षांनी डॉक्टर होऊ.त्यामुळे आता तरी ती आपल्याला नाही म्हणणार नाही असं त्याला वाटत होतं. आणि पुन्हा एकदा त्याची निराशा झाली होती. तिचं त्याच्याच वर्गातील एका मुलावर प्रेम होतं. हा घाव मात्र त्याच्या जिव्हारी बसला होता. पुरता कोलमडून गेला होता तो. ना त्याचं अभ्यासात मन लागत होतं, ना अन्नपाणी गोड लागत होतं. मित्रांनी कसंबसं सावरलं त्याला. त्यानेही स्वत:ला समजावलं. तिला जर तुझ्याबददल काही वाटत नाही तर तू तरी का एव्हढं वाईट वाटून घ्यावंस? जगात काय तिच एक मुलगी आहे? तुला दुसरी कुणी भेटणारच नाही का? तो पुन्हा अभ्यासात रमला. एम बी बी एस झाला. गायनॅकॉलॉजी घेऊन एम डी सुदधा केलं त्याने. आता तो स्थिरावला होता. रोज पाच सहा बाळं त्याचं बोट धरून या जगात येत होती. त्या बाळांच्या आया त्याला दुवा देत होत्या. निशाच्या रुपाने त्याला सहाय्यकच नव्हे तर एक चांगली मैत्रिणही मिळाली होती. आणि आज अचानक वैष्णवीचा फोन आला होता. जवळजवळ चार वर्षांनी तिचा आवाज त्याच्या कानी पडत होता. काय बोलायचं असेल तिला आपल्याशी? कशी दिसत असेल आता ती? आपण थोडे अस्वस्थ झाले आहोत हे जाणवताच तो स्वत:शीच हसला. विचार करण्याची गरज नव्हती. घोडामैदान जवळच होतं.

ठरल्याप्रमाणे दुस-या दिवशी संध्याकाळी तो तिला भेटायला गेला. तिला पाहताच तो आश्च्रर्यचकित झाला. ती अजुनही तशीच दिसत होती जशी चार वर्षांपूर्वी होती.
"कशी आहेस?"
"ठीक आहे. तू कसा आहेस?"
"भला एक डॉक्टर कसा आहेस या प्रश्नाला काय उत्तर देईल?" ती हसली. त्याने आपलं बोलणं पुढे चालू ठेवलं.
"काय घेणार?"
"म्हणजे...?"
"आपण रेस्टॉरंटमध्ये आहोत"
"सॉरी अवी. माझ्या लक्षातच राहीलं नाही. मला कुठलंही कोल्ड्रींक चालेल"
"बोल. काय बोलणार होतीस?" त्याने थंडा पित पित तिला विचारलं.
"अवी..." तिचे शब्द ओठातच अडखळले.
"वैष्णवी, एकदा बोलायचं म्हटल्यावर अडखळू नये माणसानं. अगदी मोकळेपणानं बोलावं."
"अवी, माझ्या घरचे माझ्यासाठी मुलगा पाहत आहेत."
"पण तुझं तर प्रेम आहे कुठल्यातरी मुलावर?"
"अवी, ते प्रेम नव्हतं. आकर्षण होतं. वेडं वय होतं. वाहवत गेले दिखाव्याबरोबर. पुढे जाणवलं की त्याच्याबरोबर आयुष्य काढणं जमणार नाही. त्यामुळे मी स्वत:हून त्याच्याबरोबरच नातं तोडलं."
"चांगलं झालं. आणि आता तसंही तुझ्या घरचे तुझ्यासाठी मुलगा पाहत आहेतच की"
"अवी तसं नाही रे. एक विचारू मी तुला?"
"हो. विचार ना."
"आर यु एंगेज्ड? आय मीन तुझं लग्न वगैरे ठरलंय का किंवा कुणा मुलीवर प्रेम आहे वगैरे?"
"उत्तर दिलंच पाहिजे का?" तीने ज्या पदधतीने ते विचारलं होतं ते त्याला बिलकुल आवडलं नव्हतं.
"उत्तर दयावं अशी अपेक्षा आहे."
उत्तर दयायला अवी बांधलेला नव्हता. तरीही त्याने मनात चाचपणी सुरु केली. हीने आपल्याला नाकारल्यानंतर आपल्याला कधी कुणाची ओढ वाटली होती का? नाही. असं काही नाही. आणि हे तो स्वताच्या मनाशीच ठसवत असताना नकळत निशाचा चेहरा त्याच्या नजरेसमोर तरळला. आपल्याला निशाबददल "तसं" काही वाटतंय का? आणि पुढच्या क्षणी त्याला कळून चुकलं होतं, या प्रश्नाचं उत्तर ईतकं सहजा सहजी मिळणार नव्हतं.
"वैष्णवी, माझं फक्त तुझ्यावर प्रेम होतं. तू मला नाही म्हटल्यावर मी कधी कुठल्या मुलीचा विचार केला नव्हता. आज मी माझं आयुष्य सुखाने जगतोय. एक डॉक्टर म्हणून मी करीयरच्या बाबतीत समाधानी आहे. जोडीदार, लग्न या गोष्टींचा विचार अजुनतरी माझ्या मनात आलेला नाही. जेव्हा येईल तेव्हा पाहीन मी काय करायचं ते. पण तू हा प्रश्न मला आता विचारायचं कारण काय?"
"अवी, मला तुझी जोडीदार म्हणून स्विकारशील?"
"काय?" अवी तिच्या या प्रश्नाने दचकला होता.
"अवी, मी तुला असं म्हणत नाही की तू माझा स्विकार कर. मला कुणाबरोबर तरी लग्न करावंच लागणार आहे. तू मला दोनदा विचारलं होतंस म्हणून... मला माफ कर अवी जर तुला माझं बोलणं आवडलं नसेल तर"

अवी विचारमग्न झाला. नियती किती अजब गोष्ट आहे. आपण जेव्हा हिच्यासाठी रात्र रात्र रडत होतो तेव्हा हीं आपल्याकडे ढुंकुनही पाहत नव्हती. आणि आज...हिला केवळ दुस-या कुणाबरोबर लग्न करायचं आहे तर ती माझ्याकडे आली आहे. याचाच दुसरा अर्थ असा की ती माझ्याकडे एक पर्याय म्हणून आली आहे. तिला माझ्याबददल काही वाटतंय म्हणून नाही. जर खरंच तिला माझ्याबददल काही वाटत असतं कदाचित तिनं स्वताला सावरलं असतं आणि माझ्यापर्यंत आलीच नसती.हिच्या अगदी उलट निशा आहे. तीचं आपल्यावर प्रेम असेल किंवा नाही हे नाही सांगता येणार. पण तीची आपल्यावर माया आहे एव्हढं मात्र नक्की. आपण दवाखान्यात असताना सतत आपल्या मागे पुढे असते. आपल्याला काय हवं नको ते पाहते. आणि हे सारं करताना तीची आपल्याकडून काहीच अपेक्षा नसते. किती फरक आहे दोघींमध्ये. अवीला वैष्णवीच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं.

"वैष्णवी, का ते मी तुला नाही सांगू शकणार पण... मी तुझ्याबरोबर लग्न नाही करता येणार. तू तुझ्या घरच्यांनी पाहीलेल्या एखादया चांगल्या मुलाबरोबर लग्न कर आणि सुखी हो." त्याने एका दमात बोलून टाकलं. मान वर करुन वैष्णवीकडे पाहीलं. तिचे डोळे पाण्याने ओलावले होते. पण त्याचाही नाईलाज होता.
"चल निघुया आपण. बराच वेळ झाला आहे." आणि दोघेही दोन वेगळ्या वाटेने चालू लागले...


...आज पुन्हा एकदा अवीने सिझेरीयन करून एका बाळाला या दुनियेत आणलं. सिझेरीयन केल्यानंतर तो जसा नेहमी थोडासा उदास होत असा तसा आजही झाला होता. आणि आज का कोण जाणे त्याला त्या दिवशीचा वैष्णवीसोबतचा प्रसंग आठवला. थोडासा अस्वस्थ मनानेच तो आपल्या केबिनमध्ये आला. त्याचं काही तरी बिनसलं आहे हे जाणवून निशाही त्याच्या पाठोपाठ आली.
"डॉक्टर, काय झालं?"
"काही नाही गं. नेहमीचंच. पोस्ट सिझेरीयन उदासीनता." त्याने चेह-यावर हसू आणण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
"अवी काय झालंय? मलाही नाही सांगणार?" कधीतरी निशा त्याला नावाने हाक मारायची. विशेषत: तो जेव्हा नर्व्हस असेल तेव्हा. त्याने तिच्या नजरेला भीडवली. एक वेगळीच आश्वासकता तिच्या नजरेत त्याला दिसली. आणि त्याने तिला सारं काही सांगून टाकलं.

"हम्म... पुढे काय?" त्याचं सांगून होताच तिने खेळकर चेह-याने त्याला विचारलं.
"निशा, मस्करी करतेयस ना माझी?"
"नाही हो डॉक्टर. मला त्या तुमच्या हीरॉईनचं हसायला येतंय. कुणाबरोबर तरी लग्न करायचंच आहे ना म्हणून तू. वा,काय मुलगी आहे. आणि तुम्ही कधी काळी अशा मुलीवर प्रेम केलं होतं."
"निशा. त्या वयात होतं गं असं. चांगलं वाईट असा विचार करण्याचं ते वय नसतं. कुणीतरी आपलं असावं एव्हढी एकच भावना मनात असते."
"कळलं. जाऊ दया. विसरा आता ते. तुमच्या सारख्या गुणी, हुषार डॉक्टरला खुप चांगली मुलगी आयुष्याचा जोडीदार म्हणून मिळेल."
"तशी एक चांगली मुलगी आता माझ्यासमोर उभी आहे."
"डॉक्टर, आता तुम्ही माझी मस्करी करताय."
"नाही निशा. मी अगदी मनापासून बोलतोय. होशील माझ्या आयुष्याचा जोडीदार?"
त्याने ती काय उत्तर देते म्हनून निशाकडे पाहीलं. निशाचा चेहरा लाजेनं लाल झाला होता.

"निशा बोल ना."
"अवी, सारं काही मीच सांगायला हवं का रे. समजून घे की तू थोडंसं"

ती अलगदपणे त्याच्या मिठीत विसावली. दोन प्रसुतीतज्ञांच्या प्रेमाने त्या मिठीत जन्म घेतला होता...

Friday, July 24, 2009

दुनियेचं काय जातंय बोलायला...

सकाळचे साडे नऊ वाजले होते. नाही म्हटलं तरी ऑफीसला येऊन आता अर्धा तास झाला होता. वैयक्तिक ईमेल्स चेक केल्यावर मी हेल्पडेस्कच्या ईमेल्स चेक करायला सुरुवात केली. करावं लागतं. "टेक्निकल सप्पोर्ट पर्सन" आहे म्हटल्यावर ईलाज नाही. अचानक ऑफीसमधल्याच एका मित्राने मेसेंजरवर पिंग केलं.
"प्रोजेक्टर कधी घेतला?" इति मित्रवर्य.
"मागच्या आठवडयात" अस्मादिकांनी तत्परतेने टाईप केलं.

थोडा वेळ असाच गेला. मी पुन्हा एकदा हेल्पडेस्कमध्ये मग्न झालो. इतक्यात फोन वाजला. त्याच मित्राचा फोन होता. आश्चर्य वाटलं थोडं. तो नेहमी फोन करण्याच्या आधी फोन करू का असं विचारतो आणि मगच फोन करतो. आज असं घडलं नव्हतं.
"बोला साहेब. काय म्हणताय?" तसा तो माझा साहेबच. मी डेव्हलपर ग्रेडमधला. तो मॅनेजमेंट ग्रेडमधला. पण तरीही आम्ही चांगले मित्र आहोत.
"केव्ह्ढयाला घेतला प्रोजेक्टर?"
"अरे जास्त नाही. फक्त शंभर डॉलर" मी हसत हसत उत्तरलो.
"काय करणार त्याचं? गावी गेल्यावर तिकिट लावून सिनेमा दाखवणार का लोकांना?"
"म्हणजे काय. अर्थातच. पुढे मागे समजा आयटीतलं दुकान चालेनासं झालं तर काहीतरी पोटापाण्याचा धंदा हवा ना." माझ्याच उत्तरावर मी खळखळून हसलो.
"उडवा उडवा. आज तुम्हाला पैशाची किंमत नाही कळणार. शंभर डॉलर म्हणजे पाच हजार रुपये मित्रा"
"माहिती आहे मला. मी सुदधा अमेरिकेतच आहे" पुन्हा एकदा मी हसत हसत उत्तर दिले.
""आणि तरीही तू तो प्रोजेक्टर घेतला ना. तुला जर पाच हजाराची किंमत जर कळली असती ना तर नसता घेतलास तू. पण आता तुम्ही लाखात कमवताय ना. कालपर्वापर्यंत हे असलं काही करणं तुम्हाला शक्य नव्हतं. कारण तेव्हा तुमच्याकडे पैसा नव्हता. आज पैसा आहे तर वाटेल तसा उधळताय. उदया लग्न झाल्यावर बायकोला काय प्रोजेक्टर दाखवणार का? अरे एलसीडी एलईडी टीव्हीचा जमाना चालू आहे आणि तू कुठे प्रोजेक्टर वगैरे घेत बसतोय. काळाबरोबर बदला. बायको जेव्हा शेजा-याच्या घरी जेव्हा एलईडी टीव्ही पाहील तेव्हा तुला तुझा प्रोजेक्टर फेकून तुलाही तसाच टीव्ही घ्यावा लागेल. कबुल आहे तुम्हाला तुमच्या पदधतीने जगायचं आहे पण समाजात राहताना समाजाचा सुदधा विचार करावा लागतो. तुम्ही पत्र्यांच्या खुर्च्यांवर समाधानी राहाल रे पण चार लोक घरी यावे असं वाटत असेल तर घरी सोफा घ्यावा लागतो. कार्पेट टाकावं लागतं."

पुढची दहा मिनिटे तो असंच काही बाही बडबडत राहीला. खरं तर भयानक राग आला होता मला. पण तो मित्र असल्यामुळे मी फक्त हो हो म्हणत राहिलो. थोडया वेळाने फोन ठेवून दिला त्याने. आणि दुस-या क्षणी त्याने पुन्हा मेसेंजरवर पिंग केलं.
"आय ऍम सॉरी. जरा जास्तच बोललो मी. पण तुझी खुप काळजी वाटते. राहवलं नाही म्हणून बोललो." चला. कमित कमी तो जरा जास्तच बोलला हे त्याचं त्यालाच कळलं होतं. मी त्याला उलट बोलण्याचा प्रश्नच नव्ह्ता. आम्ही चांगले मित्र आहोत आणि तो माझ्यापेक्षा वयाने मोठा असल्यामुळे मला त्याच्याबददल आदर आहे. तसंही तोसुदधा त्याचं मॅनेजरपण विसरुन एका डेव्हलपरला आपला समजतोच की.
"हे बघ मला तुझं बोलणं बिलकुल आवडलेलं नाही. तुझं म्हणणं मला पटतंय रे. पण ही काही ईमर्जन्सी नव्हती. तुला हे सगळं दुपारीही बोलता आलं असतं." नाही म्हटलं तरी मीही कुठेतरी दुखावलो होतो.

ते बोलणं तिथंच संपलं. मी पुन्हा एकदा हेल्पडेस्कच्या ईमेल्स पाहू लागलो. पण आता मात्र त्या ईमेल्समधला मजकूर डोक्यात शिरायला तयार होईना. मशीन लॉक केलं. कॅफेटेरीयात उगाचच मशिनच्या चहाचा एक कप घेतला आणि बाहेर पडलो.

खरंच आपण पैसा उधळतो का? नाही. आतल्या मनाने आवाज दिला. आणि त्या उत्तराचे तरंग मनावर उमटले नाहीत तोच डोळ्यात अश्रू जमा झाले. नकळत नजरेत बालपण उभं राहीलं.

आम्ही चार भावंडं. प्रत्येकामध्ये फक्त एका वर्षाचं अंतर. त्यामुळे लहान मोठा असा फारसा फरक नसायचा आमच्यात. बाबा जवळच्याच एका मोठया गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये कारकून म्हणून नोकरीला. मी सातवी आठवीला असताना बाबांना जेमतेम दोन अडीच हजार रुपये महिना पगार असावा. घरी थोडी शेती होती. सहा महिने आरामात जातील एव्हढा तांदूळ घरी पिकायचा. गाई म्हशी होत्या. आई रोज सकाळी बाजुच्या गावात दूध घेऊन जायची. त्यामुळे घरी अगदी काही गरिबी होती अशातला भाग नव्हता. खाऊन पिऊन सुखी होतो आम्ही. बालपणच ते. मस्त हुंदडायचो. सकाळी सात वाजता गुरे चरायला न्यायची. दहा साडे दहाला त्यांना पाणी वगैरे दाखवून आणून बांधायची. आणि मग गावापासून तीन किलोमिटर अंतरावर असणा-या एका छोटया शहरातल्या शाळेत चालत जायचं. घरातला मोठा मुलगा या नात्याने हे गुरं राखण्याचं काम मी अगदी अकरावीपर्यंत न चुकता केलं. अगदी माझी दहावी सुदधा यातून सुटली नाही.माझे शहरी शाळकरी मित्र जेव्हा कुठेतरी चाटे आणि काय काय क्लासेस करत असायचे तेव्हा मी अगदी मनसोक्त म्हशींच्या शेपटया पकडत नदीत डुंबत असायचो.

शाळेच्या दिवसांमध्ये मला बरेच छंद लागले. एक होतं वाचन. अगदी भलं बुरं जे काही हाताला लागेल ते मी काळ वेळ न पाहता वाचून काढत असे. मग ते शाळेच्या एखादया शहरी मित्राकडून अगदी विनवणी करुन आणलेलं चांदोबा असो किंवा वाण्याकडून वाटाण्याच्या पुडीसाठी आलेला वर्षभरापुर्वीचा वृत्तपत्राचा तुकडा असो. (पुढे पुढे हे वाचनाचं खुळ इतकं बेफाम झालं होतं की बारावीच्या मराठीच्या पेपरच्या फक्त एक दिवस आधी मी पु लं चं व्यक्ती आणि वल्ली एकहाती वाचून काढलं होतं). दुसरं वेड होतं चित्रपट आणि गाण्यांचं. गावामध्ये कुणाकुणाकडे रेकॉर्ड प्लेयर असायचे. मग शनीवार रविवार दोन दिवसांच्या दुपार मी त्याच घरी काढायचो. कशासाठी तर गाणी ऐकण्यासाठी.त्याकाळी आमच्या बाजुच्या गावामध्ये चित्रपटांच्या व्हीएचस कॅसेटस आणि त्या चालवणारे वीसीआर भाडयाने मिळायचे. गावात कुणाच्या पोराचं बारसं असो, कुणाच्या लग्नाची सत्यनारायणाची पुजा असो, हे सगळं भाडयानं आणलं जायचं. एका रात्रीत तीन चित्रपट पाहीले जायचे. आणि हे चित्रपट पाहण्यासाठी आम्ही अगदी पहिल्या रांगेत त्या टीव्ही पासून जेमतेम दोन फुट अंतरावर बसायचो.

बारावी झाली. ईंजिनीयरींगला ऍडमिशन घेतलं. ज्यावर्षी मी ईंजिनीयरींगला ऍडमिशन घेतलं त्याच वर्षी ईंजिनीयरींगच्या फ्री सिटची फी चार हजारांवरून दहा हजारावर गेली. बाबांना धक्काच बसला. कारण बाबांनी वर्षाला चार हजार रुपये फी गृहीत धरून माझ्या ईंजिनीयरींगच्या खर्चाचा हिशोब केला होता. माझ्या सुदैवाने एक गोष्ट चांगली होती. ईंजिनीयरींग कॉलेज माझ्या घरापासून आठ किलोमीटर अंतरावर होतं त्यामुळे मी घरुन रोज येऊन जाऊन कॉलेज करू शकणार होतो. माझा बाहेर राह्यचा खायचा खर्च वाचणार होता. झालं. हो नाही करता माझं ईंजिनीयरींग सुरु झालं. पाठच्या भावांमध्ये फक्त एकेक वर्षाचं अंतर असल्यामुळे आता एक बारावीला होता तर छोटा अकरावीला. खर्चाची थोडीफार ओढाताण सुरू झाली होती.कॉलेज थोडंसं आडवाटेला होतं त्यामुळे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याईतक्या कमी एस टी बसेस कॉलेजला जायच्या. घरी बाबांची एक जुनी सायकल होती. मी सोयीचे पडेल म्हणून सायकलने कॉलेजला ये जा करण्याचा निर्णय घेतला. जायचे आठ किलोमीटर आणि यायचे आठ किलोमीटर. सोळा किलोमीटर तर होतं. आणि तसं त्या सायकल वर मी एक वर्ष काढलं सुदधा.

दुसरं वर्ष सुरु झालं. भावाची बारावी संपली होती. पठठयाने मेडिकलची एंट्रन्स एग्झाम सुदधा क्लियर केली.
"बाबा त्याच्या मेडिकलच्या फीचं काय करणार आहात तुम्ही?"
"बघूया. त्याची या वर्षीची फी भरण्याइतके पैसे आहेत माझ्याकडे जमा. या वर्षीची फी भरुया आपण त्याची. पुढच्या वर्षीपासूनची फी भरण्यासाठी आपण बॅंकेकडून शैक्षणिक कर्ज घेउया"
"बाबा, त्याने फीचं भागेल. मेडीकल कॉलेज दापोलीला आहे. त्याला हॉस्टेलला राहावं लागेल. त्याच्या खर्चाचं काय?"
"होईल काहीतरी. तू काळजी करू नकोस." बाबा माझ्या खांदयावर थोपटत मला धीर देत होते.मी मान वर करुन बाबांच्या चेह-याकडे पाहीलं. बाबांचे डोळे अश्रूने डबडबले होते.

माझं सेकंड ईयर चालू होतं. भावाचं मेडीकल कॉलेज चालू झालं होतं. सर्वात छोटा भाऊ आता बारावीला होता. खर्चाचा ताण वाढला होता. गरीबी काय असते हे आता जाणवायला लागलं होतं. अशातच माझी सायकल आता रोज काहीबाही दुखणं काढू लागली होती. जुनीच सायकल ती. त्यात जवळ जवळ दिड वर्ष मी तिला रोज सोळा किलोमिटर दामटलेली. आज काय तर चेन तुटली. उदया काय तर पेडल तुटलं. असं रोज काहीतरी होऊ लागलं. राहून राहून वाटत होतं की नवी सायकल मिळाली तर. पण ते तितकं सोपं नव्हतं. नवी सायकल आणण्यासाठी पैसे कुठून येणार होते. नाही म्हणायला मी सायकलींच्या वेगवेगळ्या दुकांनांमध्ये मी मला हव्या तशा सायकलच्या किंमती काढल्या होत्या. साधारण सतराशे अठराशे पर्यंत चांगली सायकल मिळू शकत होती. पण एव्हढे पैसे आणणार कुठून. खुप विचित्र दिवस होते ते. माझे क्लासमेट ज्या दिवसांमध्ये चाळीस पन्नास हजारांच्या मोटार सायकल घेऊन कॉलेजला यायचे त्या दिवसांमध्ये मला सायकल घेण्यासाठी अठाराशे रुपये कुठून आणायचे किंवा तेव्हढे पैसे बाबांकडे कसे मागायचे हा प्रश्न मला पडला होता.

शेवटी एक दिवस थोडं घाबरत घाबरतच मी बाबांसमोर विषय काढला.
"बाबा, हल्ली सायकल खुप काम काढते"
"चालवून घे ना राजा"
"नाही हो बाबा. मला खुप त्रास होतो. आठ किलोमीटरच्या अंतरामध्ये तिची चेन इतक्या पडते की विचारू नका. जरा टाईट करून घेतली सायकलवाल्याकडून की मग सायकल चालवताना खुप जोर लावावा लागतो. आणि मग दम लागतो मला"
"अरे पण नवी सायकल दोन हजाराच्या आत येणार नाही. तेव्हढी महाग सायकल नाही परवडणार आपल्याला"
"बाबा, बघा ना थोडं"
बाबांचा नाईलाज आहे हे मलाही कळत होतं पण त्या जुन्या सायकलमुळे रोजचं सोळा किलोमीटरचं सायकलिंग करताना मलाही खुप त्रास व्हायचा. शेवटी बाबांनी पाचशे पाचशे रुपये जमेल तसे देईन असं एका ओळखीच्या सायकलवाल्याला सांगितलं आणि मला नवी सायकल मिळाली.

ईंजिनीयरिंग चालू राहीलं. माझं गुरं राखण्याचं काम मी बारावीला येताच बंद झालं होतं. पण आता एक नविन काम मला करावं लागायचं. शेतीची काही कामं असतील तर मला सुटटीच्या दिवशी अगदी बारा बार तास काम करावं लागायचं. पण त्याचं काही विषेश नव्हतं. शेतक-याच्या मुलाने शेतात काम केलं तर बिघडलं कुठं. भले मग तो अगदी ईंजिनीयरींगला का असेना. एव्हढा सरळ साधा हिशोब होता माझा. ईंजिनीयरींग संपलं. दोन वर्ष जॉबसाठी स्ट्रगल केला. ब-यापैकी स्थिरावलो. अमेरिकेला आलो. बघता बघता अमेरिकेतही आता दिड वर्ष व्हायला आलंय. पण एव्हढं सगळं झालं तरी मी माझे कालचे दिवस विसरलो नाहीये. आणि विसरुही शकणार नाही.

कधी कधी मित्र मस्करीने तर कधी सिरियसली म्हणतात. विसर आता ते सगळं. काळाबरोबर बदल. आज एकटा आहेस त्यामुळे तुला काही वाटत नाहीये. उदया परवा बायको येईल. ती सुदधा तुझ्यासारखीच डॉक्टर किंवा ईंजिनीयर असेल. आणि त्या मुलीला खुप अवघड जाईल हे तुझ्या या विचारसरणीबरोबर ऍडजस्ट होताना. जुन्या आठवणींमध्ये, जुन्या गोष्टींमध्ये नको अडकून पडू नकोस.

मी हे सगळं शांतपणे ऐकून घेतो. हलकेच हसतो. आणि त्यांना उत्तर देतो.

"सल्ला असा देताय की मी कुणी आउटडेटेड आजोबा आहे. मी ही तुमच्यासारखाच सव्वीस सत्तावीस वर्षांचा सॉफ्टवेअर ईंजिनीयर आहे. मलाही तुमच्यासारखंच आयुष्य जगायचं आहे. फरक असलाच तर तो तुम्ही कसे लहानाचे मोठे झालात आणि मी कसा लहानाचा मोठा झालो यामध्ये आहे. जे पाहत, अनुभवत मी लहानाचा मोठा झालो ते मी आज केवळ डॉलरमध्ये कमवतो आहे म्हणून मी कसा विसरू शकेन? राहीला प्रश्न माझ्या होणा-या बायकोचा. जी कुणी असेल तिला लग्नाच्या गोष्टी पुढे जाण्याआधीच स्पष्ट सांगेन. बाई गं, मी आज अमेरिकन सॉफ्टवेअर ईंजिनीयर आहे. लाथ मारेन तिथे पाणी काढेन असं कॉंप्युटर प्रोग्रामिंगचं नॉलेज माझ्याकडे आहे. पण तरीही अगदी आजही माझ्या पायांना शेताची माती चिकटलेली आहे. आणि त्या मातीचा मला अभिमान आहे. चालेल का तुला असा मुलगा नवरा म्हणून. आता तुम्ही म्हणाल की मी जर असं बडबडत राहीलो तर मला कुणी मुलगी हो म्हणणार नाही. पण असं होणार नाही. मला समजून घेणारी मुलगी कुठेतरी असेलच की.

आज माझ्या घरामध्ये कार्पेट आणि सोफा टाकता यावा म्हणून दुनिया मला घरातल्या पत्र्याच्या खुर्च्या बाहेर फेकायला सांगते आहे. कशावरून ही दुनिया उदया माझ्या खेडवळ आई बाबांकडे बोट दाखवणार नाहे? बाबांचं ठीक आहे त्यांनी थोडं फार बाहेरचं जग तरी पाहीलं आहे. आईचं काय? ती तर अशिक्षित आहे. शाळेचं तोंडही पाहिलें नाहीये तिनं. साहेबाच्या देशात ईंजिनीयर म्हणून काम करणा-या या लेकराच्या मायेची मराठीतल्या अ आ ई शीही तोंड ओळख नाही. उदया डॉक्टर किंवा ईजिनीयर बायको घरी येणार म्हणून अशिक्षित, नऊवारी लुगडं नेसणा-या आईला घरातून बाहेर काढ असं म्हणायलाही ही दुनिया कमी करणार नाही.

दुनियेचं काय जातंय बोलायला..."

Monday, July 13, 2009

मुलगी... एक पाहणं

मी फ़ेब्रुवारीमध्ये भारतात एक महिना सुटटीवर आलो होतो तेव्हाची गोष्ट ही. साधारण साडे तीन महिने झाले आता. मी चारेक दिवसात घरी स्थिरावल्यावर बाबांनी आधीच सांगितल्याप्रमाणे माझ्यासाठी मुलींचा अंदाज घेणं सुरु झालं. मुली पाहणं नाही.

कारण होता होईल तो या खेपेला मी मुली पाहणार नाही हे मी बाबांना आधीच सांगितलं होतं. त्यामुळे दुरुन दुरुनच कानावर यायचं, इकडे एक मुलगी आहे, तिकडे एक मुलगी आहे, एव्हढी शिकली आहे, तेव्हढं कमावतं वगैरे वगैरे. मीसुदधा ती माहिती वरवर ऐकायचो आणि सोडून दयायचो.

पण त्या दिवशी मात्र जरा वेगळंच झालं. मी घरातल्या दोन बाय दोनच्या बाथरुममध्ये मोबाईलवर प्रल्हाद शिंदेचं "गातो आवडीने" ऐकत मस्त या खांदयावरून, त्या खांदयावरून पाणी ओतत आंघोळ करत होतो. दोन बाय दोनचं असलं तरी काय झालं, ते "माझ्या" घरातलं बाथरुम होतं. अमेरिकेतल्या शॉवर, बाथटब असलेलं, बाजुलाच कमोड असलेलं आणि बेक्कार म्हणजे गुदमरलेली हवा असलेल्या बाथरुमसारखं नव्हतं ते. त्यामुळे मी अगदी मनसोक्त न्हात होतो. बाबा देव्हा-यासमोर धीरगंभीर आवाजात "शांताकारं भुजंगशयनम" म्हणत होते. इतक्यात बाहेरच्या ओटीवर कुणीतरी हाक मारली. आवाज माझ्याही ओळखीचा होता. आण्णा होते ते. गावातलं एक सुजाण, सुशिक्षित बुजुर्ग. बाबांनी त्यांना बसायला सांगितलं. एव्हाना माझी आंघोळ झाली होती. मी कमरेला टॉवेल गुंडाळून बाहेर आलो.

"काय म्हणते अमेरिका?"
"काही नाही. आहे मजेत", मी हसत हसत उत्तर दिलं.

एव्हाना आईने चहा आणला. चहा पित पित आण्णांनी बोलायला सुरुवात केली. त्यांच्या मेव्हणीची मुलगी पुण्याला बी एच एम एस करत होती. तिच्याबददल सांगायला आले होते.

"नाही म्हणजे आता ती फायनल ईयरला आहे. आमचा विचार आहे ती तुमच्या घरात यावी. म्हणून बोलायला आलो."
असं कुणीतरी इतक्या स्पष्टपणे बोलण्याची ही पहिली वेळ होती. आणि तेही आई बाबांच्या पुढयात. थोडा वेळ काय बोलावं हेच सुचेना. बाबांनी तूच बोल असं नजरेनं सुचवलं. त्यामुळे बोलणं भाग होतं.

"आण्णा, तशी काही हरकत नाही. पण असं बघा, आपल्या गावाकडे एक पदधत आहे. मुलगा रितसर मुलगी पाहायला जातो. मुलगी कांदेपोहे घेऊन येते. चार चौघांदेखत दोघेही एकमेकांना काय करतेस, किती शिकलेस सारखे फालतू प्रश्न विचारतात आणि लगेच किंवा दोन चार दिवसांनी मुलाला होकार किंवा नकार विचारला जातो. मुलीचा तर कुणी विचारच करत नाही. मला असलं काही नकोय. मी तिला चार पाच वेळा भेटेन. तिच्याशी बोलेन. आणि त्यानंतर दोघांनाही मंजुर असेल तर पुढच्या गोष्टी बोलू आपण."
"अरे अर्थातच ना. तू अमेरिकन सॉफ्टवेअर इंजिनीयर. तिही जवळ जवळ डॉक्टर झाल्यातच जमा आहे. मग तुमचं लग्न ठरवायचं असेल, आपण जरी गावातले असलो तरी गावंढळपणा नक्कीच करणार नाही."
"मग हरकत नाही".

त्यानंतर आठवडाभर काहीच झालं नाही. मी तर झाला प्रकार विसरुनच गेलो होतो. पण दुस-या आठवडयातच काकूंचा म्हणजेच आण्णांच्या मिसेसचा फोन आला. त्यांना म्हणे मला मुलीचे फोटो दाखवायचे होते. म्हणजे खास दाखवण्यासाठी असे फोटो काढले नव्हते. नुकतंच मुलीच्या मामाचं लग्न झालं होतं. त्या लग्नाच्या अल्बममधलेच फोटो ते मला दाखवणार होते. मी सुटकेचा निश्वास सोडला. लग्नाचा अल्बम असल्यामुळे मुलीचे नटलेले, सजलेले फोटो असले तरी थोडेफार नॅचरल फोटोही पाहायला मिळणार होते. जेव्हा "दाखवण्यासाठी" फोटो काढले जातात तेव्हा फोटोशॉप नावाचं सॉफटवेअर त्या फोटोंचं कसं जादुई परिवर्तन करु शकतं हे मी स्वत: प्रोफेशनल वेब डेवलपर असल्यामुळे माहिती होतं. आणि हे असलं आता काही होणार नव्हतं. काही फोटो सोलो, मामाबरोबर, काकाबरोबर असे खास पोझ मधले असतीलही पण काही घाईगडबडीतले नक्कीच असतील. त्यामुळे तिचे साधे फोटो पाहायला मिळतील म्हणून मी खुष होतो.

झालं. गेलो एकदाचा आण्णांच्या घरी. चहा वगैरे घेत असताना काकूंचं भाचीपुराण चालू झालं. भाचीचा सांस्कृतिक कार्यक्रमांमधला सहभाग, तिची बक्षिसं, तिचा एम डी करायचा फ्युचर प्लान वगैरे. मी स्मित चेह-यानं मान हलवत होतो. कारण त्यात गैर काहीच नव्हतं. माझेही आई बाबा कुणी घरी आलं की हे करतात की. मी कसा मेहनत घेत आणि परिस्थितीला तोंड देत इंजिनीयरींग केलं, जॉबमध्ये सेटल होण्यासाठी कसा स्ट्रगल केला, अमेरिकेला जायची संधी कशी मिळाली वगैरे. नाही म्हणायला ती नाचते वगैरे हे ऐकून मीही थोडासा इंप्रेस झालो होतो. असो. नंतर आण्णांच्या मुलाने कॉम्प्युटर चालू केला. कारण अल्बम अजून प्रिंट नव्हता केला. सगळे फोटो मशिनवर होते. जसे जसे अल्बममधले पुढचे फोटो येऊ लागले तसतसं मी न्युट्रल व्हायला लागलो. मुलगी दिसायला तितकी खास नव्हती. म्हणजे मला अगदी अप्सरा हवी होती असं काही नाही. पण तीचे फोटो मनाला क्लिक होत नव्हते. मी उगाचच बाबांच्या चेह-याकडे पाहिलं. आणि मी लगेच समजून गेलो. मुलगी मलाच क्लिक होत नव्हती तर ती बाबांनाही आवडली नव्हती. सारे फोटो पाहून होताच काकूंनी पुन्हा एकदा बोलायला सुरुवात केली.

"तिचं आता फायनल ईयर चालू आहे. त्यामुळे आम्ही तिला आताच काही सांगणार नाही. तिची परिक्षा वगैरे झाली की सांगू. म्हटलं तू आता महिन्याभराने अमेरिकेला परत जाशिल तर एकदा तिचे फोटो तुला दाखवावेत म्हणून हे सगळं केलं."

आम्ही फोटो पाहण्याचा कार्यक्रम संपवून घरच्या वाटेला लागलो.
"बाबा कशी वाटली मुलगी?"
"नाक बसकं आहे तिचं. मला मुळीच आवडली नाही."
"बाबा मला एक कळत नाही, जर यांची मुलगी अजून तयार नाही तर हे लोक घाई कशाला करत आहेत? संपू दया की तिचं फायनल ईयर. तिला ठरवू दया की का तिला लग्न करायचं आहे की पुढे शिकायचं आहे ते."
"तुला नाही कळणार ते. अरे तू अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनीयर आहेस. जातीमधला आहेस. त्यामुळे त्यांनी तुझा विचार केला तर त्यात गैर काय आहे?"
"बरं. आपण फोटो पाहिले. आता पुढे काय? त्या काकू तर ठामपणे काहीच म्हणाल्या नाहीत."
"तुला तिच्याशी लग्न करायची घाई आहे का?" बाबा चेह-यावर मिश्किल हसू खेळवत म्हणाले.
"तसं नाही हो बाबा. जाऊदे. आता ते पुढे काही म्हणाले तरच आपण बोलू"
"आता कसं म्हणालास शहाण्यासारखं"
आणि तो विषय तिथेच संपला.

दोन तीन दिवसांनी त्या काकूंचा बाबांना फोन आला. म्हणे तुम्ही काहीच म्हणाला नाहीत. बाबांनी त्यांना समजावलं की त्यांनी संदिग्धपणा ठेवल्यामुळे आम्ही काहीच न बोलता तुमच्या म्हणण्याची वाट पाहत होतो. मुलीच्या आई वडीलांनी विचारलं होतं की मला मुलगी आवडली की नाही. घ्या. हे अगदी चांगलं होतं. नुसते फोटो दाखवायचे त्रयस्थामार्फत आणि वरून विचारायचं की मुलगी आवडली की नाही. खरं सांगायचं तर मला त्या मुलीला सरळ सरळ नाही म्हणावसं वाटत होतं. बाबांनी तर तिचा विचार करणं सोडूनच दिलं होतं. पण माझंच मन मला टोचू लागलं. नुसतं फोटोत पाहिलेल्या बाहय रुपावर जाऊन त्या मुलीला नकार देणं कितपत योग्य आहे? काय हरकत आहे तिला एकदा प्रत्यक्ष पाहायला, बोलायला? बाबांना कन्विन्स केलं आणि माझा पहिला मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरला...

मुलीचं आजोळ माझ्या गावापासून तीन किलोमिटरवर होतं. तिच्या आजोबांच्या घरी ती लोकं आली होती. आमच्याकडून आम्ही तिघंच. मी, बाबा आणि माझा नुकताच कॉलेज पास आऊट झालेला छोटा डॉक्टर भाऊ. मुलीकडून खुप मोठा लवाजमा होता. कार्यक्रम मुलीच्या आजोबांच्या घरी असल्यामुळे तिचे आजी आजोबा, आण्णा आणि काकू म्हणजे तिची मावशी, तिची अजून एक गायनॅकॉलिजिस्ट मावशी, आणि त्या मावशीचा सॉफ्टवेअर इंजिनीयर नवरा. या सगळ्यांपैकी बाकी कुणालाही सॉफ्टवेअर इंजिनीरैंग कशाशी खातात हे माहिती नसल्यामुळे सुत्रे अर्थात गायनॅकॉलिजिस्ट मावशीच्या सॉफटवेअर इंजिनीयर नव-याच्या हाती गेली. आणि त्या भला गृहस्थाने मला असे काही प्रश्न विचारले की ज्याचे नाव ते. अगदी मी कुठल्या टेक्नॉलॉजीवर काम करतो, कुठल्या व्हिसावर अमेरिकेत गेलोय इथपासून ते अगदी पी एम पी सर्टीफिकेशन केलंय का इथपर्यंत सारं विचारलं. तो मला त्यांचा भावी जावई म्हणून हे सारं विचारत होता की त्याच्या कंपनीतल्या एखादया व्हॅकन्सीसाठी माझा इंटरव्ह्यू घेत होता हेच मला कळेना. मी डॉट नेटवर काम करतो की जावावर या गोष्टीने माझ्या संसारी आयुष्यात कसा फरक पडणार होता हेच मला कळेना.

आणि माझा इंटरव्ह्यू होत असताना मुलगी आतमध्ये होती. बहुतेक आतून ऐकत असावी सारं. थोडया वेळाने ती बाहेर आली. तिच्या गोतावळ्यासमोर तिला निरखून पाहणं थोडंसं अवघडच होतं म्हणा पण ईलाज नव्हता. तिला पाहताच मला आश्चर्याचा धक्क्काच बसला. फोटोत ती जितकी बकवास दिसत होती, तितकी ती बकवास दिसत नव्हती. कदाचित मेकअप केल्यामुळे असेल पण खरंच बरी दिसत होती ती फोटोतल्यापेक्षा. मी उगाचच तिला कॉलेज कुठे आहे, कुठल्या ईयरला आहे वगैरे विचारलं. अर्थात या प्रश्नांची उत्तरं मला आधीच माहिती होती. बास, काहितरी विचारायचं म्हणून मी तिला विचारलं. ती मुलगी मात्र स्वत:हून काही विचारेना. न राहवून मीच मग तिला म्हटलं की तुला मला काही विचारायचं असेल तर विचार. आणि मुलीने काही म्हणायच्या आधीच काकूंनी, तिच्या मोठया मावशीने उत्तर दिलं, "तिच्या काकांनी (गायनॅकॉलिजिस्ट मावशीच्या सॉफटवेअर इंजिनीयर नव-याने) सारं विचारलंय. त्यामुळे तिला काही विचारायचं गरज नाही." नाही म्हणायला एक गोष्ट तीने ठामपणाने सांगितली, तिला एम डी करायचं आहे.

मुलीला पाहून तर झालं. पण इथेही पुन्हा संदिग्धता. ते लोकं काहीच ठामपणे सांगेनात. पुन्हा कधीतरी बोलूयात असं सांगून उठलो. का कोण जाणे, पण मला काहितरी खटकत होतं. आणि नेमकं काय ते कळत नव्हतं. माझी एक महिन्याची सुटटी संपत आली होती. अमेरिकेत परत येण्याचे वेध लागले होते. आता कुठेतरी त्या विषयावर निदान आई बाबांशी तरी बोलणं गरजेचं होतं.
"बाबा काय करायचं? मुलगी ठीक वाटते मला. पण तिच्याशी पाच सहा वेळा बोलल्याशिवाय मी काहीच सांगू शकणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे ते लोक ठामपणे काहीच बोलत नाहीत. मला तर काहीच कळत नाहीये."
"तू अमेरिकेला परत जायच्या आधी आपण एकदा आण्णांच्या घरी जाऊ या"

झालं. मला अमेरिकेत परत यायला दोन दिवस असताना आम्ही आण्णांच्या घरी गेलो. काकूंनी बोलायला सुरुवात केली.
"तू आम्हा सर्वांना आवडला आहेस. आम्ही तिला विचारलं. तिने सारं आमच्यावर सोपवलं आहे. पण आता तिचं फायनल ईयर सुरू आहे. तिची तीन चार महिन्यांनी परीक्षा संपली की आम्ही तुला तिचा नंबर देऊ."

आम्ही घरी आलो. पण मला आता मात्र खरंच मला काहीतरी खटकत होतं.
"बाबा, का कोण जाणे पण मला नाही वाटत की हे सगळं पुढे जाणार आहे"
"असं का वाटतंय तुला?"
"ते लोक ठामपणे काहीच बोलत नाहीत. जाऊदया. त्या मुलीशी जेव्हा बोलणं होईल तेव्हा बघू."

मी अमेरिकेला आलो. कामामध्ये सारं विसरून गेलो. बघता बघता तीन महिने निघून गेले. आता मात्र घरी बाबांची चलबिचल सुरू झाली. बाबांचं म्हणणं होतं की त्या लोकांशी बोलून घ्यावं. खरं तर मला अंदाज आला होता. मी तसं बाबांना सांगितलं सुदधा.
"बाबा, मला अगदी ठाम वाटतंय की त लोक माझा ऑप्शन म्हणून विचार करत आहेत. त्या मुलीला खरं तर शिकायचं असावं पण तिच्या घरच्यांनी उगाच घाई केली आहे. बहुतेक मुलगी तयार नसावी."
"जे काही असेल ते. मी बोलतो त्यांच्याशी आणि काय ते क्लियर करून घेतो."
"चालेल."

आणि शेवटी तेच झालं होतं. माझा अंदाज खरा ठरला होतं. मुलीला एम डी करायचं असल्यामुळे मुलीने लग्नाला नाही म्हटलं होतं. पण त्यांनी ते आम्हाला सांगितलं नव्हतं. मला भारतात यायला अजून वेळ आहे आणि त्यामुळे आताच मला नाही
कशाला म्हणा या विचाराने त्यांनी बहुतेक आम्हाला काहीच सांगितलं नसावं. पण आता बाबांनी स्पष्टच विचारल्यामुळे त्यांना नाही म्हणावं लागलं होतं.

विचित्र होतं ते सगळं. मला एक कळत नव्हतं, जर मुलीला पुढे शिकायचं होतं तर तिच्या घरचे उगाच तिला दाखवण्याची घाई का करत होते देव जाणे. आणि जी मुलगी मला एम डी करायचं आहे म्हणत होती, ती घरच्यांना का ठामपणे सांगू शकत नव्हती की मला एव्हढयात लगन करायचं नाहीये म्हणून. जर डॉकटर मुलीची ही अवस्था तर बीए, बिकॉम झालेल्या मुलींचं काय होत असेल. या मुली एव्हढया शिकतात, सवरतात, पण जेव्हा लग्नासाठी जेव्हा कुणा मुलाला दाखवण्याची वेळ येते तेव्हा घरच्यांना सांभाळण्यासाठी मनाविरुदध हो म्हणतात. आणि मग पुढच्या सगळ्या समस्या निर्माण होतात. मला तर अशी उदाहरणे माहिती आहेत की मुली अगदी साखरपुडा होईपर्यंत तोंड उघडत नाहीत आणि साखरपुडा झाला की सगळ्यांना अंधारात ठेऊन प्रियकरासोबत पळून जातात. अर्थात सगळ्याच मुली अशा असतात, किंवा सर्रासपणे असं होतं असं नाही. पण काही मुली असं करतात एव्हढं मात्र नक्की. एखादी गोष्ट जर तुमच्या मनाविरुदध होत असेल तर काय हरकत आहे त्याबददल बोलायला.

त्या मुलीने दिलेलं कारण जेन्युईन असेलही पण मला मात्र उगाचच साउथ इंडीयन चित्रपटातले सीन आठवत होते. त्यांच्या ब-याच सिनेमात असतं असं की, मुलीला पाहायला एक एन आर आय येतो. पण मुलीचं तिच्या कॉलेजमधल्या कुठल्यातरी मुलावर प्रेम असतं. आणि त्या बिचा-या एन आर आय मुलाचं मात्र त्याची काहीच चूक नसताना हसं होतं.

मी तसा तनाने, मनाने मराठी आहे. पण करीयर गरज म्हणून का होईना, मी आजच्या घडीला एन आर आय आहे...

Saturday, July 11, 2009

हौस आली आणि मुंबई पाहिली...

खरं सांगायचं तर अगदी बेक्कार घाबरलो होतो मी ते सारं पाहून. ३०० फुट उंचावर १५०० फुट लांबीच्या दोन तारा एकमेकींना समांतर अशा ताणलेल्या. काय तर म्हणे झिप लाईन. आणि या दोन तारांपैकी कुठल्यातरी एका तारेवरून एका टोकापासून
दुस-या टोकापर्यंत लटकत जायचं. सुरुवातीच्या टोकाचा आधार सोडला की दुसरं टोक थोडं कमी उंचावर असल्यामुळे आपण आपोआप ३०० फुट उंचावरून दुस-या टोकाकडे तारेला लोंबकळत सरकू लागतो. काय गरज आहे...

"सर नाही हो. मला खुप भीती वाटते. मी कधी जत्रेतल्या पाळण्यातही बसलो नाहिये. इथे तर चक्क तिनशे फुट उंचावरून पंधराशे फूट लटकत जायचंय"
मी रडवेला चेहरा करून माझ्या भारतातून बिझनेस व्हिजिटवर आलेल्या बॉसला समजावण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो.
"अरे ऐक माझं. काहीही होत नाही. कर तू ते. नंतर तूच मला म्हणशील की मजा आली"
"नाही हो सर, खरंच तुम्ही मला आग्रह करू नका"
"ए बाबा, समजाव रे याला", माझ्या बॉसने चक्क तिथल्या तिथे माझ्या एका मित्राला माझं समुपदेशन करायला सांगितलं. आणि तो माझा मित्रही अगदी पोहचलेला निघाला. अगदी "तू काय पोरगी आहे का च्यायला" असं काही बाही बरळत त्याने चक्क माझ्या मर्दानगीलाच आव्हान दिलं. आता माझ्यासमोर हो म्हणण्याशिवाय पर्याय राहीला नाही. झालं. सुरक्षिततेसाठी लागणारे सगळे पटटे, हेल्मेट, आणि तारेवर लटकताना बुडाला आधार मिळावा म्हणून लागणारं हार्नेस अश्या सगळ्या आयुधांनी सज्ज होउन आमची पाच मित्रांची फौज त्या पहिल्या टोकांकडे निघाली. का कोण जाणे पण मला मात्र आपण गावच्या भैरीच्या जत्रेला बळी देण्यासाठी हार घालून, गुलाल लावून नेला जाणारा बोकड आहोत असं वाटू लागलं.

आलो एकदाचा त्या स्टार्टींग एंड कडे. नावातच शेवट. तिथे दोघेजण दोन तारांच्या बाजुला उभे. लोकांना तारांवर लटकवण्यासाठी. त्यांनी हाय हेलो करून आम्हाला सुचना दयायला सुरुवात केली.

"ए, हे काय बडबडतायत दोघं?" त्या दोघांचे अमेरिकन इंग्रजी उच्चार न कळल्यामुळे अस्मादिकांचा समुपदेशकाला प्रश्न.
"धन्य आहे तुमची राजे. तुमच्यासारख्यांमुळे तर आयटी मधल्या भरतीला खोगीरभरती म्हणतात"

समुपदेशकाचं म्हणणं पटल्यामुळे माझ्या चेह-यावर अगदी ३६० अंशातलं हसू् फुललं. खरं होतं त्याचं. नाही म्हटलं तरी मला अमेरिकेत येऊन आता जवळ जवळ दिड वर्ष व्हायला आलंय. तसं माझं इंग्रजीचं ज्ञान खुप आधीपासुनच उच्च प्रतिचं आहे. चार वर्षे इंजिनियरींगला घोकंपटटी केल्यामुळे तांत्रिक इंग्रजी तसं बरं आहे पण कूणी हवापाण्याच्या गोष्टी करायला लागलं की मी दिवेआगरच्या गणपतीचा धावा करुनच तोंड उघडतो. आणि मग बोलताना डू, डीड, डन अशी सगळी रुपं एकाच वाक्यात वापरुन काळाचा असा काही सावळा गोंधळ घालतो की ज्याचं नाव ते. असे धिंडवडे मी जर एखादया भारतीय भाषेचे काढले असते तर एव्हाना व्याकरणकर्त्या पाणिनीचा अवकाशस्थ आत्मा माझ्या मानगुटीवर येऊन बसला असता. हे माझ्या बोलण्याच्या बाबतीत. समोर जर कुणी अमेरिकन बोलत असेल तर मग अजुनच आनंदी आनंद असतो."कॅन यू प्लिज कम अगेन’ हा जर कुठल्या देवाचा मंत्र असता तर एव्हाना मी त्या देवाकडून वर मागून घेऊन एखादया सी एम एम फाय आयटी कंपनीचा सिईओ झालो असतो. आयटीमध्ये खोगीरभरती चालली नसती तर मला कुणी अमेरिकेत सिनियर सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून ठेवणं सोडाच, पण पुण्याच्या पाषाण किंवा बाणेरच्या एखादया रामभरोसे क्न्सल्टन्सी सर्विसेसने ज्युनियर प्रोग्रामर म्हणूनसुदधा ठेवलं नसतं.

असो. त्यांच्या सुचना समुपदेशकामार्फत माझ्यापर्यंत पोहचल्या. माझा नंबर येताच त्यातल्या एकाने एका हाताने माझ्या पाठीचा हुक पकडून मला तारेवर लटकवलं. त्याने रेडी म्हणताच मी डोळे गच्च मिटून घेतलं. आणि पुढच्या क्षणाला मी तिनशे फुट उंचावरून तारेवर लटकत सरकू लागलो. काही क्षण भितीचे गेले. नाही असं नाही. पण त्यानंतर मात्र भीती कुठल्याकुठे पळाली. मी अगदी नवा कोरा आनंद छातीत भरून घेत तारेवरून सरकू लागलो...


आता वेळ होती रॅपलिंग करायची. अर्थात दोराचा आधार घेत डोंगरावर खाली उतरायचं. रुढार्थाने डोंगर नव्हता तो. ती चक्क एक गुहा होती जमिनीच्या खाली. १६५ फुट खोलीची एक पोकळी. त्या १६५ फ़ुटांनंतर समतल जमिन आणि मग पुन्हा त्याच्याखाली एक भुयारी वाट. एका टोकाने या भुयारी वाटेत शिरायचं आणि दुस-या टोकाने निघायचं. त्या भुयाराची उंची इतकी कमी की उभं राहून चालणं तर सोडाच, पण ओणवं चालणंही शक्य नाही. ती वाट पार करण्याचा एकच मार्ग, पाठीवर किंवा पोटावर सरपटत जाणे. नाही म्हणायला पुन्हा भीती वाटायला लागली होती. पण झिप लाईन केल्यामुळे थोडा धीर चेपला होता. काय वाटेल ते होवो. पण हे करायचंच असं ठरवलं.

माझा नंबर येताच पुन्हा एकदा सेफ्टी बेल्ट, हेल्मेट आणि हार्नेसने सज्ज होत मी दोराला पकडत, गुहेच्या कडांवर पाय टेकत गुहेत उतरायला सुरुवात केली. जोपर्यंत गुहेची पोकळी दिसली नव्हती तोपर्यंत काही वाटलं नाही. पण थोडंसं खाली उतरल्यावर ती १६५ फुट खोल गुहा दिसायला लागली. आणि मुर्तीमंत भिती नजरेसमोर उभी राहीली. पुन्हा खाली पाहण्याची छातीच होईना. गुहेत गारवा असताना मी मात्र घामाघूम झालो होतो. आणि अशातच फ़्री फ़ॉल चालू झाला. फ़्री फॉल म्हणजे, गुहेची कडा सोडून फक्त दोरावर खाली सरकत राहायचं. आता अवस्था अजुनच वाईट झाली. देवाचा धावा करत दोरावरून खाली सरकणं एव्हढंच हाती होतं आता. हौस आली आणि मूंबई पाहिली असं राहून राहून वाटू लागलं होतं.

... आलो एकदाचा दोरावरून खाली. सुटलो बाबा. नजर पुन्हा पुन्हा वर जात होती. १६५ फुट खोल जमिनीवरून वर पाहताना स्वत:लाच विचारत होतो, काय गरज होती "ये बैला, मला मार" करायची?

आता गुहेतुन सरपटणं. बिलकुल इच्छा नव्हती त्या भगदाडात शिरुन ढोपर कोपर फोडून घ्यायची. पण पुन्हा एकदा माझ्या समुपदेशकाने मला बिथरवायला सुरुवात केली. आणि मी पुन्हा एकदा बैलाकडून शिंग मारून घ्यायला तयार झालो...

आठवडा झाला आता हे सगळं केलं त्याला. ते दोरावरून लटकणं, ते गुहेतून सरपटणं आठवलं की अजुनही अंगावर शहारे येतात. जर मित्राने जबरदस्ती केली नसती, माझ्या तथाकथित अहंकाराला डीवचलं नसतं तर मी सगळं करण्याच्या भानगडीत चुकूनसुदधा पडलो नसतो. तेव्हा तर नाहीच, पण यापुढेही कधी केलं नसतं. मनातल्या भितीवर दुस-या एका भावनेनं मात केली आणि मी तारेवर, दोरावर लटकायला तयार झालो. आणि मग मिळाला एक थरारक अनुभव, जो आयुष्यभर माझ्यासोबत राहील. अर्थात हे झालं सो कॉल्ड धाडसाबददल. पण हे सगळं आपल्या दैनंदिन उर्मींनाही लागू होतं ना. आपल्याला काहीतरी वेगळं करायचं असतं. आपल्यामध्ये ते करण्याची कुवतही असते. पण मनामधली भिती ते आपल्याला करु देत नाही. केवळ धोका पत्करायचा नाही म्हणून आपण आपल्यात कुवत असतानाही रुळलेली चाकोरी सोडायला मागत नाही. यातुनच एक भिंत उभी राहते आपली कुवत आणि आपलं उज्वल भवितव्य यामध्ये. पण जर खरंच आपल्यात क्षमता असेल तर भितीला पळवून लावून आपल्या ध्येयासाठी स्वत:ला झोकून दिलं पाहिजे. येणा-या प्रसंगांना सामोरं जात यश मिळवून आयुष्याला एक नवा अर्थ मिळवून दयायला हवा.

...सागरावरच्या तुफानांच्या भितीने जर कोलंबसाने भारताचा जलमार्ग शोधायचा नाद सोडला असता तर कदाचित आज जगाला अमेरिका माहितीच पडली नसती.

Thursday, July 9, 2009

बटन आणि त्याचं तुटणं...

थोडासा गडबडीतच टॉयलेटमध्ये शिरलो. ऑफ़ीसचं टॉयलेट असल्यामुळे मध्ये पार्टीशन घालून रांगेनं चार पाच टॉयलेट बनवलेली. हे पार्टीशन थोडं उंचावर असतं त्यामुळे पलिकडच्या टॉयलेटमध्ये कुणी असेल तर त्याचे पाय आपल्याला दिसतात. असो. पटटा काढला. पँटच्या बटनाकडे लक्ष जाताच जाणवलं, की हे लेकाचं लवकरच तुटणार. म्हणजे ते तुटायला आलं आहे हे यापुर्वी दोनदा जेव्हा ती पँट घातली होती तेव्हाच कळलं होतं. पण दुर्लक्ष केलं. म्हणून आता ते बटन तुटू नये म्हणून अगदी काळजीपुर्वक मी ते काढायला सुरुवात केली. आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं. तुटलंच लेकाचं. आणि नुसतं तुटून खाली पडलं नाही तर पलिकडच्या टॉयलेटमध्ये गेलं. त्या टॉयलेटमध्ये मला पाय दिसत होते. म्हणजे पलिकडे कुणीतरी होतं. त्यामुळे मला ते बटन घ्यायलाही जाता येईना. मी अगदी केविलवाणे भाव चेह-यावर आणून माझ्या नियोजिलेल्या कामाला सुरुवात केली...

म्हटलं तर एकदम बकवास प्रसंग. किंवा विनोदी म्हणा हवं तर. अगदी टॉम अँड जेरी चा एपिसोड. नाही म्हणजे असं समजा की माझ्या जागी ते आतरंगी मांजर आहे. अगदी संगीताच्या तालावर ते मांजर आपला कार्यभाग उरकायला टॉयलेटमध्ये जातं आणि... किंवा मग जॉनी लिवरवर चित्रित केलेला एखादा विनोदी प्रसंग. आपल्या कजाग मालकापासुन सुटका करुन घेण्यासाठी तो पळतोय. पळता पळता त्याला जोराची लागते. त्याच्या नशिबाने त्याला समोरच एक टॉयलेट दिसतं. तो मागचा पुढचा विचार न करता त्या टॉयलेट मध्ये घुसतो आणि...

तर असा हा एकदम फ़ालतू प्रसंग. पण काही केल्या मनातुन जायला तयार नाही. नाही म्हणजे ते टॉयलेट वगैरे गेलं मनातून. पण बटन आणि त्याचं तुटणं काही नजरेसमोरुन जाईना. थोडा विचार केला. मग त्या बटनाच्या तुटण्याचा आयुष्याशी असलेला संबंध जाणवला. म्हणजे असं की, काही नाती खुप घटट असतात. अगदी बटन जितक्या घटटपणे पॅटला शिवलेलं असतं तशी. कधी कधी ध्यानी मनी नसताना ही नाती ताणली जातात. जसं नकळतपणे आपण पॅंटचं बटन जोराने काढतो. नको इतकं ताणल्यामुळे थोडा सैलसरपणा येतो. आपण दुर्लक्ष करतो. वेळीच लक्ष घातलं नाही तर हा सैलसरपणा दुराव्यात बदलतो. अजुनही वेळ गेलेली नसते. पण आपण हलगर्जीपणा करतो. आणि शेवटी ते नातं तुटतंच. जसं बटन तुटावं तसं. आपली चूक आपल्या लक्षात येते. कधी कधी नातं पुन्हा सांधायला संधी मिळते नाही असं नाही. पण जर अशी संधी नाही मिळाली तर मात्र त्या तुटलेल्या नात्याच्या आठवणीं जपण्यापलिकडे आपल्या हाती काहीच राह्त नाही...