Thursday, July 9, 2009

बटन आणि त्याचं तुटणं...

थोडासा गडबडीतच टॉयलेटमध्ये शिरलो. ऑफ़ीसचं टॉयलेट असल्यामुळे मध्ये पार्टीशन घालून रांगेनं चार पाच टॉयलेट बनवलेली. हे पार्टीशन थोडं उंचावर असतं त्यामुळे पलिकडच्या टॉयलेटमध्ये कुणी असेल तर त्याचे पाय आपल्याला दिसतात. असो. पटटा काढला. पँटच्या बटनाकडे लक्ष जाताच जाणवलं, की हे लेकाचं लवकरच तुटणार. म्हणजे ते तुटायला आलं आहे हे यापुर्वी दोनदा जेव्हा ती पँट घातली होती तेव्हाच कळलं होतं. पण दुर्लक्ष केलं. म्हणून आता ते बटन तुटू नये म्हणून अगदी काळजीपुर्वक मी ते काढायला सुरुवात केली. आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं. तुटलंच लेकाचं. आणि नुसतं तुटून खाली पडलं नाही तर पलिकडच्या टॉयलेटमध्ये गेलं. त्या टॉयलेटमध्ये मला पाय दिसत होते. म्हणजे पलिकडे कुणीतरी होतं. त्यामुळे मला ते बटन घ्यायलाही जाता येईना. मी अगदी केविलवाणे भाव चेह-यावर आणून माझ्या नियोजिलेल्या कामाला सुरुवात केली...

म्हटलं तर एकदम बकवास प्रसंग. किंवा विनोदी म्हणा हवं तर. अगदी टॉम अँड जेरी चा एपिसोड. नाही म्हणजे असं समजा की माझ्या जागी ते आतरंगी मांजर आहे. अगदी संगीताच्या तालावर ते मांजर आपला कार्यभाग उरकायला टॉयलेटमध्ये जातं आणि... किंवा मग जॉनी लिवरवर चित्रित केलेला एखादा विनोदी प्रसंग. आपल्या कजाग मालकापासुन सुटका करुन घेण्यासाठी तो पळतोय. पळता पळता त्याला जोराची लागते. त्याच्या नशिबाने त्याला समोरच एक टॉयलेट दिसतं. तो मागचा पुढचा विचार न करता त्या टॉयलेट मध्ये घुसतो आणि...

तर असा हा एकदम फ़ालतू प्रसंग. पण काही केल्या मनातुन जायला तयार नाही. नाही म्हणजे ते टॉयलेट वगैरे गेलं मनातून. पण बटन आणि त्याचं तुटणं काही नजरेसमोरुन जाईना. थोडा विचार केला. मग त्या बटनाच्या तुटण्याचा आयुष्याशी असलेला संबंध जाणवला. म्हणजे असं की, काही नाती खुप घटट असतात. अगदी बटन जितक्या घटटपणे पॅटला शिवलेलं असतं तशी. कधी कधी ध्यानी मनी नसताना ही नाती ताणली जातात. जसं नकळतपणे आपण पॅंटचं बटन जोराने काढतो. नको इतकं ताणल्यामुळे थोडा सैलसरपणा येतो. आपण दुर्लक्ष करतो. वेळीच लक्ष घातलं नाही तर हा सैलसरपणा दुराव्यात बदलतो. अजुनही वेळ गेलेली नसते. पण आपण हलगर्जीपणा करतो. आणि शेवटी ते नातं तुटतंच. जसं बटन तुटावं तसं. आपली चूक आपल्या लक्षात येते. कधी कधी नातं पुन्हा सांधायला संधी मिळते नाही असं नाही. पण जर अशी संधी नाही मिळाली तर मात्र त्या तुटलेल्या नात्याच्या आठवणीं जपण्यापलिकडे आपल्या हाती काहीच राह्त नाही...

1 अभिप्राय:

भानस said...

मानवी मन जितके अनाकलनीय आहे तितकेच जोडलेले वा जन्मत:च जुडलेले संबंध. बटण आणि नात्यांचा प्रवास.... छान. पण जसं तुटलेले बटण आपण पुन्हा शिवतो/टाचतो तसेच दुरावलेले, काळाच्या ओघात हरवलेले नाते पुन्हा एकदा जुळवण्याचा प्रयत्न, पहीला हात पुढे करू शकतो. ते जुळेल न जुळेल किमान आपल्या मनातील कटूता, धग, विषाद, गील्ट तरी कमी होईल.
आवडले.