Saturday, July 11, 2009

हौस आली आणि मुंबई पाहिली...

खरं सांगायचं तर अगदी बेक्कार घाबरलो होतो मी ते सारं पाहून. ३०० फुट उंचावर १५०० फुट लांबीच्या दोन तारा एकमेकींना समांतर अशा ताणलेल्या. काय तर म्हणे झिप लाईन. आणि या दोन तारांपैकी कुठल्यातरी एका तारेवरून एका टोकापासून
दुस-या टोकापर्यंत लटकत जायचं. सुरुवातीच्या टोकाचा आधार सोडला की दुसरं टोक थोडं कमी उंचावर असल्यामुळे आपण आपोआप ३०० फुट उंचावरून दुस-या टोकाकडे तारेला लोंबकळत सरकू लागतो. काय गरज आहे...

"सर नाही हो. मला खुप भीती वाटते. मी कधी जत्रेतल्या पाळण्यातही बसलो नाहिये. इथे तर चक्क तिनशे फुट उंचावरून पंधराशे फूट लटकत जायचंय"
मी रडवेला चेहरा करून माझ्या भारतातून बिझनेस व्हिजिटवर आलेल्या बॉसला समजावण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो.
"अरे ऐक माझं. काहीही होत नाही. कर तू ते. नंतर तूच मला म्हणशील की मजा आली"
"नाही हो सर, खरंच तुम्ही मला आग्रह करू नका"
"ए बाबा, समजाव रे याला", माझ्या बॉसने चक्क तिथल्या तिथे माझ्या एका मित्राला माझं समुपदेशन करायला सांगितलं. आणि तो माझा मित्रही अगदी पोहचलेला निघाला. अगदी "तू काय पोरगी आहे का च्यायला" असं काही बाही बरळत त्याने चक्क माझ्या मर्दानगीलाच आव्हान दिलं. आता माझ्यासमोर हो म्हणण्याशिवाय पर्याय राहीला नाही. झालं. सुरक्षिततेसाठी लागणारे सगळे पटटे, हेल्मेट, आणि तारेवर लटकताना बुडाला आधार मिळावा म्हणून लागणारं हार्नेस अश्या सगळ्या आयुधांनी सज्ज होउन आमची पाच मित्रांची फौज त्या पहिल्या टोकांकडे निघाली. का कोण जाणे पण मला मात्र आपण गावच्या भैरीच्या जत्रेला बळी देण्यासाठी हार घालून, गुलाल लावून नेला जाणारा बोकड आहोत असं वाटू लागलं.

आलो एकदाचा त्या स्टार्टींग एंड कडे. नावातच शेवट. तिथे दोघेजण दोन तारांच्या बाजुला उभे. लोकांना तारांवर लटकवण्यासाठी. त्यांनी हाय हेलो करून आम्हाला सुचना दयायला सुरुवात केली.

"ए, हे काय बडबडतायत दोघं?" त्या दोघांचे अमेरिकन इंग्रजी उच्चार न कळल्यामुळे अस्मादिकांचा समुपदेशकाला प्रश्न.
"धन्य आहे तुमची राजे. तुमच्यासारख्यांमुळे तर आयटी मधल्या भरतीला खोगीरभरती म्हणतात"

समुपदेशकाचं म्हणणं पटल्यामुळे माझ्या चेह-यावर अगदी ३६० अंशातलं हसू् फुललं. खरं होतं त्याचं. नाही म्हटलं तरी मला अमेरिकेत येऊन आता जवळ जवळ दिड वर्ष व्हायला आलंय. तसं माझं इंग्रजीचं ज्ञान खुप आधीपासुनच उच्च प्रतिचं आहे. चार वर्षे इंजिनियरींगला घोकंपटटी केल्यामुळे तांत्रिक इंग्रजी तसं बरं आहे पण कूणी हवापाण्याच्या गोष्टी करायला लागलं की मी दिवेआगरच्या गणपतीचा धावा करुनच तोंड उघडतो. आणि मग बोलताना डू, डीड, डन अशी सगळी रुपं एकाच वाक्यात वापरुन काळाचा असा काही सावळा गोंधळ घालतो की ज्याचं नाव ते. असे धिंडवडे मी जर एखादया भारतीय भाषेचे काढले असते तर एव्हाना व्याकरणकर्त्या पाणिनीचा अवकाशस्थ आत्मा माझ्या मानगुटीवर येऊन बसला असता. हे माझ्या बोलण्याच्या बाबतीत. समोर जर कुणी अमेरिकन बोलत असेल तर मग अजुनच आनंदी आनंद असतो."कॅन यू प्लिज कम अगेन’ हा जर कुठल्या देवाचा मंत्र असता तर एव्हाना मी त्या देवाकडून वर मागून घेऊन एखादया सी एम एम फाय आयटी कंपनीचा सिईओ झालो असतो. आयटीमध्ये खोगीरभरती चालली नसती तर मला कुणी अमेरिकेत सिनियर सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून ठेवणं सोडाच, पण पुण्याच्या पाषाण किंवा बाणेरच्या एखादया रामभरोसे क्न्सल्टन्सी सर्विसेसने ज्युनियर प्रोग्रामर म्हणूनसुदधा ठेवलं नसतं.

असो. त्यांच्या सुचना समुपदेशकामार्फत माझ्यापर्यंत पोहचल्या. माझा नंबर येताच त्यातल्या एकाने एका हाताने माझ्या पाठीचा हुक पकडून मला तारेवर लटकवलं. त्याने रेडी म्हणताच मी डोळे गच्च मिटून घेतलं. आणि पुढच्या क्षणाला मी तिनशे फुट उंचावरून तारेवर लटकत सरकू लागलो. काही क्षण भितीचे गेले. नाही असं नाही. पण त्यानंतर मात्र भीती कुठल्याकुठे पळाली. मी अगदी नवा कोरा आनंद छातीत भरून घेत तारेवरून सरकू लागलो...


आता वेळ होती रॅपलिंग करायची. अर्थात दोराचा आधार घेत डोंगरावर खाली उतरायचं. रुढार्थाने डोंगर नव्हता तो. ती चक्क एक गुहा होती जमिनीच्या खाली. १६५ फुट खोलीची एक पोकळी. त्या १६५ फ़ुटांनंतर समतल जमिन आणि मग पुन्हा त्याच्याखाली एक भुयारी वाट. एका टोकाने या भुयारी वाटेत शिरायचं आणि दुस-या टोकाने निघायचं. त्या भुयाराची उंची इतकी कमी की उभं राहून चालणं तर सोडाच, पण ओणवं चालणंही शक्य नाही. ती वाट पार करण्याचा एकच मार्ग, पाठीवर किंवा पोटावर सरपटत जाणे. नाही म्हणायला पुन्हा भीती वाटायला लागली होती. पण झिप लाईन केल्यामुळे थोडा धीर चेपला होता. काय वाटेल ते होवो. पण हे करायचंच असं ठरवलं.

माझा नंबर येताच पुन्हा एकदा सेफ्टी बेल्ट, हेल्मेट आणि हार्नेसने सज्ज होत मी दोराला पकडत, गुहेच्या कडांवर पाय टेकत गुहेत उतरायला सुरुवात केली. जोपर्यंत गुहेची पोकळी दिसली नव्हती तोपर्यंत काही वाटलं नाही. पण थोडंसं खाली उतरल्यावर ती १६५ फुट खोल गुहा दिसायला लागली. आणि मुर्तीमंत भिती नजरेसमोर उभी राहीली. पुन्हा खाली पाहण्याची छातीच होईना. गुहेत गारवा असताना मी मात्र घामाघूम झालो होतो. आणि अशातच फ़्री फ़ॉल चालू झाला. फ़्री फॉल म्हणजे, गुहेची कडा सोडून फक्त दोरावर खाली सरकत राहायचं. आता अवस्था अजुनच वाईट झाली. देवाचा धावा करत दोरावरून खाली सरकणं एव्हढंच हाती होतं आता. हौस आली आणि मूंबई पाहिली असं राहून राहून वाटू लागलं होतं.

... आलो एकदाचा दोरावरून खाली. सुटलो बाबा. नजर पुन्हा पुन्हा वर जात होती. १६५ फुट खोल जमिनीवरून वर पाहताना स्वत:लाच विचारत होतो, काय गरज होती "ये बैला, मला मार" करायची?

आता गुहेतुन सरपटणं. बिलकुल इच्छा नव्हती त्या भगदाडात शिरुन ढोपर कोपर फोडून घ्यायची. पण पुन्हा एकदा माझ्या समुपदेशकाने मला बिथरवायला सुरुवात केली. आणि मी पुन्हा एकदा बैलाकडून शिंग मारून घ्यायला तयार झालो...

आठवडा झाला आता हे सगळं केलं त्याला. ते दोरावरून लटकणं, ते गुहेतून सरपटणं आठवलं की अजुनही अंगावर शहारे येतात. जर मित्राने जबरदस्ती केली नसती, माझ्या तथाकथित अहंकाराला डीवचलं नसतं तर मी सगळं करण्याच्या भानगडीत चुकूनसुदधा पडलो नसतो. तेव्हा तर नाहीच, पण यापुढेही कधी केलं नसतं. मनातल्या भितीवर दुस-या एका भावनेनं मात केली आणि मी तारेवर, दोरावर लटकायला तयार झालो. आणि मग मिळाला एक थरारक अनुभव, जो आयुष्यभर माझ्यासोबत राहील. अर्थात हे झालं सो कॉल्ड धाडसाबददल. पण हे सगळं आपल्या दैनंदिन उर्मींनाही लागू होतं ना. आपल्याला काहीतरी वेगळं करायचं असतं. आपल्यामध्ये ते करण्याची कुवतही असते. पण मनामधली भिती ते आपल्याला करु देत नाही. केवळ धोका पत्करायचा नाही म्हणून आपण आपल्यात कुवत असतानाही रुळलेली चाकोरी सोडायला मागत नाही. यातुनच एक भिंत उभी राहते आपली कुवत आणि आपलं उज्वल भवितव्य यामध्ये. पण जर खरंच आपल्यात क्षमता असेल तर भितीला पळवून लावून आपल्या ध्येयासाठी स्वत:ला झोकून दिलं पाहिजे. येणा-या प्रसंगांना सामोरं जात यश मिळवून आयुष्याला एक नवा अर्थ मिळवून दयायला हवा.

...सागरावरच्या तुफानांच्या भितीने जर कोलंबसाने भारताचा जलमार्ग शोधायचा नाद सोडला असता तर कदाचित आज जगाला अमेरिका माहितीच पडली नसती.

0 अभिप्राय: