Friday, July 24, 2009

दुनियेचं काय जातंय बोलायला...

सकाळचे साडे नऊ वाजले होते. नाही म्हटलं तरी ऑफीसला येऊन आता अर्धा तास झाला होता. वैयक्तिक ईमेल्स चेक केल्यावर मी हेल्पडेस्कच्या ईमेल्स चेक करायला सुरुवात केली. करावं लागतं. "टेक्निकल सप्पोर्ट पर्सन" आहे म्हटल्यावर ईलाज नाही. अचानक ऑफीसमधल्याच एका मित्राने मेसेंजरवर पिंग केलं.
"प्रोजेक्टर कधी घेतला?" इति मित्रवर्य.
"मागच्या आठवडयात" अस्मादिकांनी तत्परतेने टाईप केलं.

थोडा वेळ असाच गेला. मी पुन्हा एकदा हेल्पडेस्कमध्ये मग्न झालो. इतक्यात फोन वाजला. त्याच मित्राचा फोन होता. आश्चर्य वाटलं थोडं. तो नेहमी फोन करण्याच्या आधी फोन करू का असं विचारतो आणि मगच फोन करतो. आज असं घडलं नव्हतं.
"बोला साहेब. काय म्हणताय?" तसा तो माझा साहेबच. मी डेव्हलपर ग्रेडमधला. तो मॅनेजमेंट ग्रेडमधला. पण तरीही आम्ही चांगले मित्र आहोत.
"केव्ह्ढयाला घेतला प्रोजेक्टर?"
"अरे जास्त नाही. फक्त शंभर डॉलर" मी हसत हसत उत्तरलो.
"काय करणार त्याचं? गावी गेल्यावर तिकिट लावून सिनेमा दाखवणार का लोकांना?"
"म्हणजे काय. अर्थातच. पुढे मागे समजा आयटीतलं दुकान चालेनासं झालं तर काहीतरी पोटापाण्याचा धंदा हवा ना." माझ्याच उत्तरावर मी खळखळून हसलो.
"उडवा उडवा. आज तुम्हाला पैशाची किंमत नाही कळणार. शंभर डॉलर म्हणजे पाच हजार रुपये मित्रा"
"माहिती आहे मला. मी सुदधा अमेरिकेतच आहे" पुन्हा एकदा मी हसत हसत उत्तर दिले.
""आणि तरीही तू तो प्रोजेक्टर घेतला ना. तुला जर पाच हजाराची किंमत जर कळली असती ना तर नसता घेतलास तू. पण आता तुम्ही लाखात कमवताय ना. कालपर्वापर्यंत हे असलं काही करणं तुम्हाला शक्य नव्हतं. कारण तेव्हा तुमच्याकडे पैसा नव्हता. आज पैसा आहे तर वाटेल तसा उधळताय. उदया लग्न झाल्यावर बायकोला काय प्रोजेक्टर दाखवणार का? अरे एलसीडी एलईडी टीव्हीचा जमाना चालू आहे आणि तू कुठे प्रोजेक्टर वगैरे घेत बसतोय. काळाबरोबर बदला. बायको जेव्हा शेजा-याच्या घरी जेव्हा एलईडी टीव्ही पाहील तेव्हा तुला तुझा प्रोजेक्टर फेकून तुलाही तसाच टीव्ही घ्यावा लागेल. कबुल आहे तुम्हाला तुमच्या पदधतीने जगायचं आहे पण समाजात राहताना समाजाचा सुदधा विचार करावा लागतो. तुम्ही पत्र्यांच्या खुर्च्यांवर समाधानी राहाल रे पण चार लोक घरी यावे असं वाटत असेल तर घरी सोफा घ्यावा लागतो. कार्पेट टाकावं लागतं."

पुढची दहा मिनिटे तो असंच काही बाही बडबडत राहीला. खरं तर भयानक राग आला होता मला. पण तो मित्र असल्यामुळे मी फक्त हो हो म्हणत राहिलो. थोडया वेळाने फोन ठेवून दिला त्याने. आणि दुस-या क्षणी त्याने पुन्हा मेसेंजरवर पिंग केलं.
"आय ऍम सॉरी. जरा जास्तच बोललो मी. पण तुझी खुप काळजी वाटते. राहवलं नाही म्हणून बोललो." चला. कमित कमी तो जरा जास्तच बोलला हे त्याचं त्यालाच कळलं होतं. मी त्याला उलट बोलण्याचा प्रश्नच नव्ह्ता. आम्ही चांगले मित्र आहोत आणि तो माझ्यापेक्षा वयाने मोठा असल्यामुळे मला त्याच्याबददल आदर आहे. तसंही तोसुदधा त्याचं मॅनेजरपण विसरुन एका डेव्हलपरला आपला समजतोच की.
"हे बघ मला तुझं बोलणं बिलकुल आवडलेलं नाही. तुझं म्हणणं मला पटतंय रे. पण ही काही ईमर्जन्सी नव्हती. तुला हे सगळं दुपारीही बोलता आलं असतं." नाही म्हटलं तरी मीही कुठेतरी दुखावलो होतो.

ते बोलणं तिथंच संपलं. मी पुन्हा एकदा हेल्पडेस्कच्या ईमेल्स पाहू लागलो. पण आता मात्र त्या ईमेल्समधला मजकूर डोक्यात शिरायला तयार होईना. मशीन लॉक केलं. कॅफेटेरीयात उगाचच मशिनच्या चहाचा एक कप घेतला आणि बाहेर पडलो.

खरंच आपण पैसा उधळतो का? नाही. आतल्या मनाने आवाज दिला. आणि त्या उत्तराचे तरंग मनावर उमटले नाहीत तोच डोळ्यात अश्रू जमा झाले. नकळत नजरेत बालपण उभं राहीलं.

आम्ही चार भावंडं. प्रत्येकामध्ये फक्त एका वर्षाचं अंतर. त्यामुळे लहान मोठा असा फारसा फरक नसायचा आमच्यात. बाबा जवळच्याच एका मोठया गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये कारकून म्हणून नोकरीला. मी सातवी आठवीला असताना बाबांना जेमतेम दोन अडीच हजार रुपये महिना पगार असावा. घरी थोडी शेती होती. सहा महिने आरामात जातील एव्हढा तांदूळ घरी पिकायचा. गाई म्हशी होत्या. आई रोज सकाळी बाजुच्या गावात दूध घेऊन जायची. त्यामुळे घरी अगदी काही गरिबी होती अशातला भाग नव्हता. खाऊन पिऊन सुखी होतो आम्ही. बालपणच ते. मस्त हुंदडायचो. सकाळी सात वाजता गुरे चरायला न्यायची. दहा साडे दहाला त्यांना पाणी वगैरे दाखवून आणून बांधायची. आणि मग गावापासून तीन किलोमिटर अंतरावर असणा-या एका छोटया शहरातल्या शाळेत चालत जायचं. घरातला मोठा मुलगा या नात्याने हे गुरं राखण्याचं काम मी अगदी अकरावीपर्यंत न चुकता केलं. अगदी माझी दहावी सुदधा यातून सुटली नाही.माझे शहरी शाळकरी मित्र जेव्हा कुठेतरी चाटे आणि काय काय क्लासेस करत असायचे तेव्हा मी अगदी मनसोक्त म्हशींच्या शेपटया पकडत नदीत डुंबत असायचो.

शाळेच्या दिवसांमध्ये मला बरेच छंद लागले. एक होतं वाचन. अगदी भलं बुरं जे काही हाताला लागेल ते मी काळ वेळ न पाहता वाचून काढत असे. मग ते शाळेच्या एखादया शहरी मित्राकडून अगदी विनवणी करुन आणलेलं चांदोबा असो किंवा वाण्याकडून वाटाण्याच्या पुडीसाठी आलेला वर्षभरापुर्वीचा वृत्तपत्राचा तुकडा असो. (पुढे पुढे हे वाचनाचं खुळ इतकं बेफाम झालं होतं की बारावीच्या मराठीच्या पेपरच्या फक्त एक दिवस आधी मी पु लं चं व्यक्ती आणि वल्ली एकहाती वाचून काढलं होतं). दुसरं वेड होतं चित्रपट आणि गाण्यांचं. गावामध्ये कुणाकुणाकडे रेकॉर्ड प्लेयर असायचे. मग शनीवार रविवार दोन दिवसांच्या दुपार मी त्याच घरी काढायचो. कशासाठी तर गाणी ऐकण्यासाठी.त्याकाळी आमच्या बाजुच्या गावामध्ये चित्रपटांच्या व्हीएचस कॅसेटस आणि त्या चालवणारे वीसीआर भाडयाने मिळायचे. गावात कुणाच्या पोराचं बारसं असो, कुणाच्या लग्नाची सत्यनारायणाची पुजा असो, हे सगळं भाडयानं आणलं जायचं. एका रात्रीत तीन चित्रपट पाहीले जायचे. आणि हे चित्रपट पाहण्यासाठी आम्ही अगदी पहिल्या रांगेत त्या टीव्ही पासून जेमतेम दोन फुट अंतरावर बसायचो.

बारावी झाली. ईंजिनीयरींगला ऍडमिशन घेतलं. ज्यावर्षी मी ईंजिनीयरींगला ऍडमिशन घेतलं त्याच वर्षी ईंजिनीयरींगच्या फ्री सिटची फी चार हजारांवरून दहा हजारावर गेली. बाबांना धक्काच बसला. कारण बाबांनी वर्षाला चार हजार रुपये फी गृहीत धरून माझ्या ईंजिनीयरींगच्या खर्चाचा हिशोब केला होता. माझ्या सुदैवाने एक गोष्ट चांगली होती. ईंजिनीयरींग कॉलेज माझ्या घरापासून आठ किलोमीटर अंतरावर होतं त्यामुळे मी घरुन रोज येऊन जाऊन कॉलेज करू शकणार होतो. माझा बाहेर राह्यचा खायचा खर्च वाचणार होता. झालं. हो नाही करता माझं ईंजिनीयरींग सुरु झालं. पाठच्या भावांमध्ये फक्त एकेक वर्षाचं अंतर असल्यामुळे आता एक बारावीला होता तर छोटा अकरावीला. खर्चाची थोडीफार ओढाताण सुरू झाली होती.कॉलेज थोडंसं आडवाटेला होतं त्यामुळे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याईतक्या कमी एस टी बसेस कॉलेजला जायच्या. घरी बाबांची एक जुनी सायकल होती. मी सोयीचे पडेल म्हणून सायकलने कॉलेजला ये जा करण्याचा निर्णय घेतला. जायचे आठ किलोमीटर आणि यायचे आठ किलोमीटर. सोळा किलोमीटर तर होतं. आणि तसं त्या सायकल वर मी एक वर्ष काढलं सुदधा.

दुसरं वर्ष सुरु झालं. भावाची बारावी संपली होती. पठठयाने मेडिकलची एंट्रन्स एग्झाम सुदधा क्लियर केली.
"बाबा त्याच्या मेडिकलच्या फीचं काय करणार आहात तुम्ही?"
"बघूया. त्याची या वर्षीची फी भरण्याइतके पैसे आहेत माझ्याकडे जमा. या वर्षीची फी भरुया आपण त्याची. पुढच्या वर्षीपासूनची फी भरण्यासाठी आपण बॅंकेकडून शैक्षणिक कर्ज घेउया"
"बाबा, त्याने फीचं भागेल. मेडीकल कॉलेज दापोलीला आहे. त्याला हॉस्टेलला राहावं लागेल. त्याच्या खर्चाचं काय?"
"होईल काहीतरी. तू काळजी करू नकोस." बाबा माझ्या खांदयावर थोपटत मला धीर देत होते.मी मान वर करुन बाबांच्या चेह-याकडे पाहीलं. बाबांचे डोळे अश्रूने डबडबले होते.

माझं सेकंड ईयर चालू होतं. भावाचं मेडीकल कॉलेज चालू झालं होतं. सर्वात छोटा भाऊ आता बारावीला होता. खर्चाचा ताण वाढला होता. गरीबी काय असते हे आता जाणवायला लागलं होतं. अशातच माझी सायकल आता रोज काहीबाही दुखणं काढू लागली होती. जुनीच सायकल ती. त्यात जवळ जवळ दिड वर्ष मी तिला रोज सोळा किलोमिटर दामटलेली. आज काय तर चेन तुटली. उदया काय तर पेडल तुटलं. असं रोज काहीतरी होऊ लागलं. राहून राहून वाटत होतं की नवी सायकल मिळाली तर. पण ते तितकं सोपं नव्हतं. नवी सायकल आणण्यासाठी पैसे कुठून येणार होते. नाही म्हणायला मी सायकलींच्या वेगवेगळ्या दुकांनांमध्ये मी मला हव्या तशा सायकलच्या किंमती काढल्या होत्या. साधारण सतराशे अठराशे पर्यंत चांगली सायकल मिळू शकत होती. पण एव्हढे पैसे आणणार कुठून. खुप विचित्र दिवस होते ते. माझे क्लासमेट ज्या दिवसांमध्ये चाळीस पन्नास हजारांच्या मोटार सायकल घेऊन कॉलेजला यायचे त्या दिवसांमध्ये मला सायकल घेण्यासाठी अठाराशे रुपये कुठून आणायचे किंवा तेव्हढे पैसे बाबांकडे कसे मागायचे हा प्रश्न मला पडला होता.

शेवटी एक दिवस थोडं घाबरत घाबरतच मी बाबांसमोर विषय काढला.
"बाबा, हल्ली सायकल खुप काम काढते"
"चालवून घे ना राजा"
"नाही हो बाबा. मला खुप त्रास होतो. आठ किलोमीटरच्या अंतरामध्ये तिची चेन इतक्या पडते की विचारू नका. जरा टाईट करून घेतली सायकलवाल्याकडून की मग सायकल चालवताना खुप जोर लावावा लागतो. आणि मग दम लागतो मला"
"अरे पण नवी सायकल दोन हजाराच्या आत येणार नाही. तेव्हढी महाग सायकल नाही परवडणार आपल्याला"
"बाबा, बघा ना थोडं"
बाबांचा नाईलाज आहे हे मलाही कळत होतं पण त्या जुन्या सायकलमुळे रोजचं सोळा किलोमीटरचं सायकलिंग करताना मलाही खुप त्रास व्हायचा. शेवटी बाबांनी पाचशे पाचशे रुपये जमेल तसे देईन असं एका ओळखीच्या सायकलवाल्याला सांगितलं आणि मला नवी सायकल मिळाली.

ईंजिनीयरिंग चालू राहीलं. माझं गुरं राखण्याचं काम मी बारावीला येताच बंद झालं होतं. पण आता एक नविन काम मला करावं लागायचं. शेतीची काही कामं असतील तर मला सुटटीच्या दिवशी अगदी बारा बार तास काम करावं लागायचं. पण त्याचं काही विषेश नव्हतं. शेतक-याच्या मुलाने शेतात काम केलं तर बिघडलं कुठं. भले मग तो अगदी ईंजिनीयरींगला का असेना. एव्हढा सरळ साधा हिशोब होता माझा. ईंजिनीयरींग संपलं. दोन वर्ष जॉबसाठी स्ट्रगल केला. ब-यापैकी स्थिरावलो. अमेरिकेला आलो. बघता बघता अमेरिकेतही आता दिड वर्ष व्हायला आलंय. पण एव्हढं सगळं झालं तरी मी माझे कालचे दिवस विसरलो नाहीये. आणि विसरुही शकणार नाही.

कधी कधी मित्र मस्करीने तर कधी सिरियसली म्हणतात. विसर आता ते सगळं. काळाबरोबर बदल. आज एकटा आहेस त्यामुळे तुला काही वाटत नाहीये. उदया परवा बायको येईल. ती सुदधा तुझ्यासारखीच डॉक्टर किंवा ईंजिनीयर असेल. आणि त्या मुलीला खुप अवघड जाईल हे तुझ्या या विचारसरणीबरोबर ऍडजस्ट होताना. जुन्या आठवणींमध्ये, जुन्या गोष्टींमध्ये नको अडकून पडू नकोस.

मी हे सगळं शांतपणे ऐकून घेतो. हलकेच हसतो. आणि त्यांना उत्तर देतो.

"सल्ला असा देताय की मी कुणी आउटडेटेड आजोबा आहे. मी ही तुमच्यासारखाच सव्वीस सत्तावीस वर्षांचा सॉफ्टवेअर ईंजिनीयर आहे. मलाही तुमच्यासारखंच आयुष्य जगायचं आहे. फरक असलाच तर तो तुम्ही कसे लहानाचे मोठे झालात आणि मी कसा लहानाचा मोठा झालो यामध्ये आहे. जे पाहत, अनुभवत मी लहानाचा मोठा झालो ते मी आज केवळ डॉलरमध्ये कमवतो आहे म्हणून मी कसा विसरू शकेन? राहीला प्रश्न माझ्या होणा-या बायकोचा. जी कुणी असेल तिला लग्नाच्या गोष्टी पुढे जाण्याआधीच स्पष्ट सांगेन. बाई गं, मी आज अमेरिकन सॉफ्टवेअर ईंजिनीयर आहे. लाथ मारेन तिथे पाणी काढेन असं कॉंप्युटर प्रोग्रामिंगचं नॉलेज माझ्याकडे आहे. पण तरीही अगदी आजही माझ्या पायांना शेताची माती चिकटलेली आहे. आणि त्या मातीचा मला अभिमान आहे. चालेल का तुला असा मुलगा नवरा म्हणून. आता तुम्ही म्हणाल की मी जर असं बडबडत राहीलो तर मला कुणी मुलगी हो म्हणणार नाही. पण असं होणार नाही. मला समजून घेणारी मुलगी कुठेतरी असेलच की.

आज माझ्या घरामध्ये कार्पेट आणि सोफा टाकता यावा म्हणून दुनिया मला घरातल्या पत्र्याच्या खुर्च्या बाहेर फेकायला सांगते आहे. कशावरून ही दुनिया उदया माझ्या खेडवळ आई बाबांकडे बोट दाखवणार नाहे? बाबांचं ठीक आहे त्यांनी थोडं फार बाहेरचं जग तरी पाहीलं आहे. आईचं काय? ती तर अशिक्षित आहे. शाळेचं तोंडही पाहिलें नाहीये तिनं. साहेबाच्या देशात ईंजिनीयर म्हणून काम करणा-या या लेकराच्या मायेची मराठीतल्या अ आ ई शीही तोंड ओळख नाही. उदया डॉक्टर किंवा ईजिनीयर बायको घरी येणार म्हणून अशिक्षित, नऊवारी लुगडं नेसणा-या आईला घरातून बाहेर काढ असं म्हणायलाही ही दुनिया कमी करणार नाही.

दुनियेचं काय जातंय बोलायला..."

8 अभिप्राय:

Vikrant said...

मित्रा सतिश,
(तू माझापेक्षा वयाने थोडासा लहान असल्याने ’अरे’ ’तुरे’ म्हणण्याचे धाडस केले...पण तुझ्या मार्च २००८ पासूनच्या चारोळ्या वाचल्यानंतर तुझे पाय धरायचीही आपली लायकी नाही असे वाटले !!!)
सर्वप्रथम इतका सुंदर व मनाला जाउन भिडणारे लिखाण करत असल्याबद्दल अभिनंदन. मी कसा काय आलो या ब्लॉगवर माहित नाही पण खुप बरे झाले. तुझा हा पहिलाच लेख वाचला आणी डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले. काय लिहिलेस मित्रा तू.....
मग काम वगैरे सगळे बाजूला ठेवले.. अधाश्यासारखे तुझे एकूण एक ब्लॉग वाचून काढले. काय बोलू सुचत नाही. अप्रतिम. निव्वळ अप्रतिम. मला तर वेड लागयची पाळी आली.
तुझं मराठी अत्यंत दर्जेदार आहेच पण त्यात ओतलेल्या भावना काय वर्णाव्यात? Hats Off.
तुझ्या ब्लॉगने वर्णन केलेलं कोकणातलं तुझं टुमदार छोटस गाव....तु ऐकवलेल्या गमती जमती... तु कातर शब्दात व्यक्त केलेल्या विरह भावना
काय काय appreciate करू?
फार फार दिवसांनी असं अस्वथ व्हायला झालं. मला सर्वच आवडंलं खरं तर पण तरी ही काही विशेष उल्लेख -
१) About Me हा लेख अतिशय भावगर्भ
२) जाने तू वरचा ब्लॉग सहीचं (याच विषयावर तेंव्हा मीही लिहिला होता blog, but in English:-()
३) तुझ्या गावचं वर्णन उत्कंठावर्धक, मोहक.. काळ नदी, साविती नदी मनःचक्षुंसमोर उभी राहिली...मला जाता येइल का तिकडे कधी?
४) "भूल न जाना" ही कथा (?) अगदी आत आत हलवून गेली मित्रा.... ही कथा आणी तुझी "माझ्या छोट्या मैत्रीणीस" ही कविता वाचल्यावर का कोण जाणे मला सारखं वाटतयं की तो अरमान म्हणजे तूच. हा कधीकाळचा तुझाच भूतकाळ आहे. Sorry for that. पण मी स्वतः ते वाचल्यावर बर्‍याच काळपर्यंत काम करू शकलो नाही. असो.

मित्रा, एकंदरीत अतिशय छान लिखाण आहे. चालू ठेव. मी तुझा ब्लॉग माझ्या लिस्ट्मध्ये ऍड करतोय.
धन्यवाद.

Changdeo Patil said...

ata duniyechya naka var tichchun aai-baba na US la gheun ye ani manasokta firav.

Vikrant said...

मित्रा, तुझा मेल आयडी काय आहे? तुझ्याशी बरेच बोलायचे आहे. मला मेल टाक ना vikrant.deshmukh888@gmail.com वर

Girija said...

"अ प्र ती म" - :)

Photographer Pappu!!! said...

खरच दुनियेच काही जात नाही बोलायला. तुमच्याबद्दल हे पोस्ट वाचून मनात एक आदाराची भावना निर्माण झालीय. अत्यंत हृदयाला भिडणारा असा हा लेख आहे. 5 वर्षे तुझ्यपेक्षा मोठा असल्याने मी सांगू इच्छितो असल्या की असल्या दुनियच तू मनावर घेऊ नकोस. आज असलेले ऐश्वर्य उपभोगणे म्हणजे भूतकाळाला विसरणे नाही. मला नक्की खात्री आहे के भूतकाळात काढलेल्या दिवसांमुळे तुझ्या हातून कधीही चुकीचा निर्णय घेतला जाणार नाही. बाय द वे मी ही प्रोजेक्टर घ्यायचा विचार करतोय :) एल सी डी टीवी पेक्षा मला नाकीच प्रोजेक्टर वर सिनेमे पाहायला आवडेल.

Anonymous said...

Good one! Great!

Aparna said...

छान लिहिलेस. मनातले भाव खूप छान मांडलेस.

Pravin Kulkarni said...

apratim lihilay ...