Sunday, August 30, 2009

बंडू किंचित अनुवाद करतो...

...आणि बंडूची काव्यप्रतिभा उफाळून आलीच. त्याचं असं झालं की,बंडू जालावर आपल्या जालनिशीवर काहीबाही खरडत असतो. आपण खुप दर्जेदार मराठी लेखन करतो असा बंडूचा एक गोड गैरसमज आहे. असो बापडा. तर आपल्या या दर्जेदार लेखन करणार्‍या बंडूने त्याच्या जालनिशीच्या उजव्या बाजुला एक जालखासुपकरण बसवलं आहे. जालखासुपकरण हा शब्द बंडूचाच बरं. कारण बंडू कटटर मराठी. तसे बंडूचे बरेच मित्र त्याला म्हणतात की त्याला हिंदी आणि इंग्रजी व्यवस्थित येत नाही. आणि ते लोकांना कळू नये म्हणून तो उगाचच मला मराठीचा अभिमान आहे म्हणून मी हिंदी किंवा इंग्रजी टाळतो असं गावभर सांगत सुटतो. असो. विजेट हा शब्द इंग्रजी भाषेतला. मग बंडूने त्या शब्दाचं मराठीकरण केलं, जाल खास उपकरण अर्थात जालखासुपकरण. तर हे जालखासुपकरण बंडूच्या जालनिशीवर कुणी वाचन करायला आलं की त्याची लगेच नोंद करतं आणि तिथल्या तिथं दाखवतं सुदधा. आणि त्या नोंदी पाहील्या की बंडूची छाती अभिमानाने फुलून येते. कधी कधी बंडू त्या नोंदीवरून आपले वाचक कुठल्या कुठल्या संकेतस्थळांवरून येतात हे पाहतो. दोन दिवसांपूर्वी अशाच त्या नोंदी पाहताना बंडूला अगदी आश्चर्याचा धक्का बसला. कारण एक वाचक चक्क एका मराठी संकेतस्थळावरून आला होता...

ते संकेतस्थळ तसं बंडूच्या ओळखीचं. कधी काळी बंडू या संकेतस्थळावर अगदी सक्रियपणे लेखन करायचा. अर्थात बरचसं लेखन "र ला र आणि ट ला ट" या काव्यप्रकारातलं. पण लिहायचा. पुढे बंडूने तिथे लिहिणं बंद केलं. तर या संकेतस्थळावर बंडूची एका काकांशी ओळख झाली होती. या काकांशी निगडीत बंडूची एक आठवण आहे. निगडीत म्हणजे पुण्याच्या निगडीत नाही हो. निगडीत म्हणजे संबंधित किंवा आजच्या मराठीत सांगायचं तर रीलेटेड. ही आठवण सांगत बसलो तर मुळ विषयापासून आपण दूर जाऊ पण आठवण खरंच सांगण्यासारखी आहे. झालं असं की गेल्यावर्षी फ्रीमॉंटला "भैरव ते भैरवी" हा शास्त्रीय संगितावर आधारीत कार्यक्रम झाला. काही वाचकांच्या माहितीसाठी, फ्रीमॉंट हे अमेरिकेच्या बे एरीयातील सॅन होजेसारखंच एक भारतीयांची मोठी वस्ती असणारं शहर. तर या शास्त्रीय संगिताच्या कार्यक्रमाला बंडू गेला. म्हणजे तसं बंडूला शास्त्रीय संगितातलं फार काही कळतं अशातला भाग नाही. खरं तर त्याला शास्त्रीय संगितातलं काहीच कळत नाही. मित्राने फारच आग्रह केला म्हणून गेला. कार्यक्रम तसा चांगला होता. विषेशत: एखादया रागातलं गीत (बंदीश म्हणतात म्हणे त्याला) सादर करण्यापुर्वीचं निवेदन. असो. कार्यक्रमाचं मध्यंतर झालं. बंडू पाय मोकळे करायला म्हणून सभागॄहातून बाहेर पडला. समोरून एक काका येताना दिसले. हे काका त्या संकेतस्थळावरच्या काकांसारखे दिसत होते. कारण बंडूने काकांच्या जालनिशीवर काकांचा फोटो पाहीला होता. फोटोमधला चेहरा समोरून येणार्‍या काकांच्या चेहर्‍याशी मिळताजुळता होता. काका सॅन होजेला राहतात हेही वाचलं होतं. सॅन होजे फ़्रीमॉंटपासून जेमतेम अर्ध्या तासाच्या अंतरावर. त्यामुळे हे तेच काका असणार म्हणून बंडू काकांना भेटायला गेला. पण बंडू काही बोलायच्या आधीच काका चालू झाले.

"काय बाळा कसा वाटला आमचा मराठीतला शास्त्रिय संगिताचा कार्यक्रम"? काकांनी विचारलं.

हे बंडूचं अजून एक दुखणं. बंडू सव्वीस वर्षाचा असूनही नुकताच शाळा सोडून ज्युनियर कॉलेजला जाणार्‍या पोरासारखा दिसतो. त्यामुळे कुणीही काका किंवा आजोबा त्याला "बाळा" म्हणून हाक मारतात.

"छान आहे" बंडूने चेहर्‍यावर खोटं हसू आणत म्हटलं.

आणि त्यानंतर काका जे चालू झाले ते ज्याचं नांव ते. काकांनी जुनं संगित आणि नविन संगित बदलून जुनी पिढी आणि नवी पिढी हा विषय सुरू केला होता. आता मात्र बंडूला सहन होईना. बंडूने "तुम्ही तेच काका का" हे विचारण्याचा आपला बेत रहीत केला. काका चालूच होते. आता मात्र काकांच्या तावडीतून सुटका करून घेणे भाग होते. आणि बंडू अचानक म्हणाला, "काका, मला जोराची लागली आहे. मी जातो". आणि बंडू चक्क तिकडून सटकला, आपल्या "मला जोराची लागली आहे" या वाक्याचा जुन्या पिढीतल्या काकांवर काय परीणाम होईल याची पर्वा न करता.

असो. तर या संकेतस्थळावरच्या काकांना चांगली म्हणा अथवा वाईट म्हणा,एक सवय होती. हिंदी चित्रपट गीतांचं मराठी भाषांतर करण्याची. काका त्याला "किंचित अनुवाद" म्हणायचे. काकांच्या या किंचित अनुवाद शैलीपासून प्रेरणा घेतली आणि बंडूनेही एकदा असा किंचित अनुवाद करण्याचं ठरवलं. कारण र ला र आणि ट ला ट जोडून कविता किंवा चारोळी पाडणे हा बंडूच्या डाव्या हाताचा मळ. एका मित्राने तर एकदा चक्क म्हटलं सुद्धा की तुझ्याकडे काय चारोळी पाडण्याचा एखादा संगणकाचा प्रोग्राम आहे का. टाक शब्द, पाड चारोळी. इतकी बंडूची चारोळीवर पकड. इथे तर अनुवाद करायचा होता म्हणजे मुळ काव्यही तयार मिळणार. आपण काय करायचं तर फक्त शब्दांचं भाषांतर करायचं. झालं बंडूने गाणंही शोधलं. मिथून चक्रवर्ती अभिनीत दलाल या अगदी टुकार चित्रपटातील "ठेहरे हुए पानी में" हे अर्थपुर्ण गीत. बंडूने आपलं सारं कौशल्य पणाला लावून अनुवाद केला. तो अनुवाद त्या संकेतस्थळावर पोस्टसुदधा केला नको मारून खडा रे सख्या या नावाने. एकदा स्वत:च वाचून काढला. बंडूला कळून चुकलं की अनुवाद करणं हे आपलं काम नाही. बंडूला उपरती झाली. एखाद्या दारुडयाला दारू पिऊन ओकल्यानंतर जशी होते आणि मग तो दारू पिणं सोडून देतो तशी. त्यानंतर बंडूने चारोळी आणि कविता पाडणं बंद केलं ते कायमचं...

आता जो वाचक बंडूच्या जालनिशीवर आला होता तो संकेतस्थळाच्या याच बंडूने अनुवाद केलेल्या कवितेच्या पानावरून. बंडूने तिथे टाकलेल्या आपल्या जालनिशीच्या दुव्यावरून. बंडू त्या संकेतस्थळावर गेला. आपलं जुनं लेखन वाचून काढलं. त्या चारोळ्या आणि कविता वाचून बंडू हळवा झाला. आणि पुन्हा एकदा अनुवाद करायचाच हे बंडूच्या मनाने घेतलं. अशातच दोन दिवसांपुर्वीच बंडूच्या एका अमेरिकन सहकारीणीने बंडूला डीडो नावाच्या एका इंग्रजी गायिकेचं पांढरं निशाण हे गाणं ऐकवलं. तो शब्द सहकारीणी आहे बरं. चुकून तुम्ही तो सहचारीणी असा वाचलात आणि बंडूला ते कळलं तर तो सॅन फ़्रान्सिस्कोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एखादया विमानाखाली जीव देईल. कारण एक गोरी मड्डम आपली सहचारीणी ही कल्पनासुदधा बंडूला सहन होणार नाही. असो. बंडूला ते गाणं चांगलं वाटलं. म्हणजे ते गाणं बंडूला कळलं अशातला भाग नाही, गाण्याचं संगित त्याला चांगलं वाटलं. संगित चांगलं वाटलं म्हणून गाण्याचे बोल जालावर शोधून काढले. आपल्याला इंग्रजी उपशिर्षकांशिवाय इंग्रजी चित्रपट आणि गाण्याचे बोल वाचल्याशिवाय इंग्रजी गाणी कळत नाहीत हे बंडू चारचौघात जरी कधी म्हणत नसला तरी खाजगीत कबूल करतो. तर झालं बंडूने हे पांढरं निशाण मराठीत अनुवादीत करण्याचं ठरवलं. सुरुवातही केली.

मला माहिती आहे की तुला वाटतंय
की मी आता तुझ्यावर प्रेम करायला नको
किंवा तुला तसं सांगायलाही नको
पण मी तुला जरी तसं सांगितलं नाही
तरी मला तसं वाटल्याशिवाय राहणार नाही.
यात काहीतरी तथ्य असायला नको?


एकच कडवं, आणि बंडूला कळून चुकलं. पुढे लिहिण्यात काहीच अर्थ नव्हता. बंडूने पांढरं निशाण फडकावलं.

...आज बंडूने कुमार सानूने गायलेलं यशवंत चित्रपटातील तुम सामने बैठो हे गाणं ऐकलं आणि पुन्हा एकदा बंडूच्या अनुवादाच्या विचारांनी उचल खाल्ली. आता काही झालं तरी माघार घ्यायची नाही. या मराठी साहीत्यामध्ये एका अजरामर अनुवादीत गीताची भर टाकायचीच अशी खुणगाठ बंडूने मनाशी बांधली. झालं व्हीएल्सी मध्ये गाणं चालू झालं.

तूम सामने बैठो,
मुझे प्यार करने दो
बेचैन हैं धडकन
इजहार करने दो


बंडूने मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव केली. बर्‍यापैकी जमत होती. प्रश्न फक्त त्या इजहारचा होता. म्हणजे "मला तुझ्यावरील प्रेमाची कबुली देऊ दे" हे खुपच निरस वाटत होतं. बंडूने मग इजहार शब्दाला बगल दिली. थोडी वेगळी शब्दरचना केली आणि पहिलं कडवं तर झकास जमलं.

अशीच समोर बसून राहा तू माझ्या
अन सखे तुझ्यावर प्रेम करु दे मला
थोडी हुरहूर आहे या मनात माझ्या
भावनांचे हे बंध आज सैलावू दे मला


आता दुसरं कडवं.

मौसम हें वादोंका
यूं ना करो बहाना
लिखने दो इस दिलपें
दिलका नया फसाना


हेही जमण्यासारखं होतं. पण इथेही शेवटच्या ओळीत घोळ होता. अगदी तो शब्द फसाना आहे की अफसाना इथपासून सुरुवात होती. आणि तो शब्द यापैकी काहीही असला तरी बंडूला फसाना आणि अफसाना या दोन्ही शब्दांचे अर्थ माहिती नव्हते. कदाचित फसाना म्हणजे फसवणं असं असावं. कारण मग त्या ओळीचा "माझ्या हृदयाने तुझ्या प्रेमात पडून मला फसवलं" असा काहीसा अर्थ होईल. पण जर तो शब्द अफसाना असा असेल तर पंचाईत आहे की. नाही म्हणायला बंडूला हिमेश रेशमियाचं "अफसाना बनाके भूल न जाना" हे गाणं माहिती होतं. पण तिथंही अफसानाची बोंब होती. त्यामुळे बंडू त्या ओळीचा "काहीतरी बनवून विसरून जाऊ नको" असा घ्यायचा. आणि हे काहीतरी काहीही असू शकतं. इथेही बंडूने मग ते फसाना किंवा अफसाना जे काही होतं त्याला फाटयावर मारलं आणि जमेल तसं कडवं पुर्ण केलं.

ऋतू आहे हा दिल्या घेतल्या शपथांचा
तू शोधू नको सखे उगी आता बहाणा
लिहू दे गं मला तू या हृदयावर आता
या हॄदयाचा हा नवा खेळ मला पुन्हा


चला दोन कडवी तर बर्‍यापैकी जमली. आता तिसरं कडवं.

यादोंकी पन्नोंपें
मनकी किताबोंमें
मैने तुम्हे देखा
मेहबूब ख्वाबोंमें


हे कडव तसं खुपच सोपं होतं. आठवणींच्या पानावर, मनाच्या पुस्तकामध्ये, मी पाहीलं तुला, जिवलगा स्वप्नांमध्ये. कित्ती सोप्पं. पण मग हे असंच लिहलं तर ते भारदस्त वाटत नाही. गाण्याला कसं वजन पाहीजे. काय करावं या विचारात बंडू गढला असताना त्याच्या डोक्यात मेणबत्ती पेटली. जर पुस्तकाची पानं आणि स्वप्न यासाठी काही रोमांचक विशेषणं वापरली तर अनुवादाला नक्कीच वजन येईल. पण आता पुस्तकाच्या पानांना काय विशेषण लावणार? नव्या कोर्‍या पानांवर म्हणायचं का? पण नको. नवी कोरी म्हणायला ती काय चौथीच्या बालभारतीच्या पुस्तकाची पाने आहेत? ही तर मनाच्या पुस्तकामधील आठवणींची पाने आहेत. विचार करून करून डोक्याचा भुसा व्हायची वेळ आली तरी बंडूला पुस्तकाच्या पानांसाठी रोमांचक विशेषण सापडेना. मग बंडूने जरा वेगळा विचार करायला सुरूवात केली. अंगावर रोमांच फुलतात म्हणजे काय होतं तर अंगावर कुणीतरी मोरपिस फिरवल्यासारखं वाटतं. मोरपीशी पानं. हो हो,मोरपीशी पानं. सापडला. सापडला. बंडू अगदी आईनस्टाईनप्रमाणे नाचू लागला. एव्हढा आनंद तर त्याला इंजिनीयरींगला असताना झेनर डायोड रीव्हर्स बायसमध्ये व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून कसं काम करतो हे जेव्हा महत्प्रयासाने कळलं होतं तेव्हाही झाला नव्हता. आता "मोरपीशी पानांवर" साठी "स्वप्नांच्या हिंदोळ्यावर" हे यमक सुचणं हे बंडूसारख्या रटरट (र ला र ट ला ट) कवीसाठी काही विशेष नव्हतं.

माझ्या मनाच्या या पुस्तकामधल्या
आठवणींच्या त्या मोरपीशी पानांवर
पाहत असतो सखे नेहमी मी तुला
उंच जाणार्‍या स्वप्नांच्या ‍हिंदोळ्यावर


सोपं सोपं म्हणताना या आधीच्या कडव्याने बंडूच्या नाकी नऊ आणले होते. पण जमलं होतं एकदाचं. बंडू पुढच्या ओळींकडे वळला.

चाहत का अब दिलबर
ईकरार करने दो
बेचैन हैं धडकन
इजहार करने दो


मागच्या कडव्याचा मोरपीशी अनुभव लक्षात घेऊन या वेळी बंडू काही काव्याला वजन देण्याच्या भानगडीत पडला नाही. मुकाटयाने जे आहे ते मराठीत अनुवादित केलं.

तुझ्याबद्दलच्या या ओढीची जिवलगा
आता मनमोकळी कबुली देऊ दे मला
थोडी हुरहूर आहे या मनात माझ्या
भावनांचे हे बंध आज सैलावू दे मला


पुढच्या ओळी सुंदर आहेत हे बंडूला जाणवलं होतं.

अब तो निगाहोंसें,हटती नही निगाहें
पेहलूमें आनेको, बेताबसी हैं बाहें
पलकोंकी गलीयोंमें मैं घर बसाऊंगा
नयनोंकी सागरमें मैं डुब जाऊंगा


ओळी खुपच अर्थपुर्ण आणि हळूवार होत्या. क्षणभर बंडू आपण गाण्याचा अनुवाद करत आहोत हेच विसरुन गेला. कुणीतरी "ती" नजरेत उभी राहीली आणि बंडू स्वप्नांच्या हिंदोळ्यावर तिला पाहू लागला. मंत्रावल्यासारखा बंडू पुन्हा लिहू लागला. जणू काही सारी "कायनात" त्या रोमांचक ओळी लिहिण्यासाठी बंडूच्या पाठी आपलं सारं तेज घेऊन उभी राहीली. पण हा आवेग फार काळ टीकला नाही. तो पेहलू शब्द गोडधोड खात असताना मिठाचा खडा लागावा असा लागला होता. बंडूला पल्लू शब्द माहिती होता. पल्लू म्हणजे ओढणी या अर्थाची खात्री होती. कारण "दिवानोंने सब लुटा दिया, तुने जो पल्लू गिरा दिया" हे त्याचं आवडतं गाणं होतं. पण हे पेहलू प्रकरण बंडूच्या पल्ले पडत नव्हतं. पुन्हा एकदा बंडूने पेहलू या मुळ शब्दाला बगल दिली आणि दंड, मिठी यासारखे थोडेसे रुक्ष शब्द वापरुन काम चालवून घेतलं.

ढळे ना नजर माझी तुझ्या नजरेतून आता
तुझ्या मिठीसाठी झाले दंड अनावर आता
पापण्यांच्या गल्लीत मी घर बांधेन आता
नयनांच्या सागरात बुडून जाईन मी आता


आता शेवटचं कडवं. नाही म्हटलं तरी बंडू आता जरा वैतागला होता. कारण वरचं कडवं म्हणावं असं जमलं नव्हतं. तो पुढचं कडवं ऐकू लागला.

दो चार पल यूंही
दिदार करने दो
बेचैन हैं धडकन
इजहार करने दो


इथेही बंडूने फारसा त्रास घेतला नाही. शब्दांचा त्याला माहिती असलेला सरळ साधा अर्थ घेऊन अनुवाद पुर्ण केला.

क्षण, दोन क्षण इथे असेच सखे
आता तुझ्याकडे एकटक पाहू दे मला
थोडी हुरहूर आहे या मनात माझ्या
भावनांचे हे बंध आज सैलावू दे मला


आता बंडू हा अनुवाद कुठे पोस्ट करायचा याचा विचार करतोय...

Tuesday, August 18, 2009

बोमरीलू हिंदीत येतोय...

बोमरीलू.
२००६ साली आलेला एक नितांत सुंदर तेलुगू चित्रपट.
चित्रपट तसा भाषेच्या पलिकडचा आहे. चित्रपटाचे संवाद तेलुगू भाषेत आहेत म्हणून तेलुगू चित्रपट म्हणायचं.

बाळ जन्माला येतं अन बाळाच्या आईबाबांचा आनंद गगनात मावेनासा होतो. जे जे उत्तम ते ते आपल्या बाळाला मिळावं बाबा धडपडू लागतात. दिवसरात्र मेहनत करुन बाळाला सगळ्या सुखसोयी कशा मिळतील हे पाहतात. बाळाची आई बाळाच्या पित्याची धडपड पाहते. आपल्या परीने बाळावर संस्कार करुन हातभार लावते. पण कधी कधी हे सगळं करत असताना ज्या बाळासाठी हे केलं जातंय त्या बाळाला हे सगळं आवडतंय का याचा विचार बाबा करत नाहीत. मी जे करतोय ते माझ्या बाळाच्या भल्यासाठीच आहे. आणि त्यालाही ते आवडतं असं बाबा गृहीत धरतात. बाळ मोठं होऊ लागतं. त्याला बाबा त्यांचे विचार, त्यांच्या आवडीनिवडी आपल्यावर लादतात असं वाटायला लागतं. पण बाबांना दुखवायचं नाही म्हणून तो काहीच बोलत नाही. बाप लेकात संवाद असा कधी घडतच नाही. एक अदृष्य भिंत निर्माण होते बाप लेकामध्ये. आईला हे सारं जाणवत असतं पण तीही अगतिक असते. घरासाठी राब राब राबणार्‍या नवर्‍याला दुखवायचं कसं हा प्रश्न त्या माउलीला पडलेला असतो. मुलगा लग्नाच्या वयाचा होतो तरीही बाबा त्याला लहानच समजतात आणि एक दिवस मुलाच्या भावनांचा उद्रेक होतो...

हीच बोमरीलूची मध्यवर्ती संकल्पना. त्याला जोड एका हळूवार प्रेमकहाणीची. कर्णमधूर संगीत. संपुर्ण चित्रपटात एकच मारधाडीचा प्रसंग. कॉलेजच्या मुलांमधली मारधाड. तीही खर्‍या अर्थाने कथेची गरज म्हणून. भडक नृत्ये, पाणचट संवाद आणि अश्लिल दृष्ये या चित्रपटात नावालासुदधा नाहीत.

प्रत्येक बापाने आपल्या पोराबाळांसोबत पाहावा असा चित्रपट. बाप असलेल्या किंवा बाप होऊ पाहणार्‍या प्रत्येकाने बाळाला कसं वाढवावं किंवा कसं वाढवू नये हे समजून घेण्यासाठी पाहावा असा चित्रपट.
मोरपिशी दिवसांमध्ये, तो जर "तीची" स्वप्नं पाहत असेल किंवा ती जर "त्याची" स्वप्नं पाहत असेल तर त्याने किंवा तिने आवर्जून पाहावा असा चित्रपट. जेव्हा तुम्ही त्याला "मी तुझ्यावर प्रेम करते" असं म्हणता, तेव्हा त्याला "तुझ्यावर" मध्ये त्याचं सारं घर अपेक्षित असतं. जेव्हा तुम्ही तिला "मी तुझ्यावर प्रेम करतो" असं म्हणता, तेव्हा तिची अपेक्षा असते की तुम्ही तिला तिच्या घरासहीत समजून घ्यावं, आपलं मानावं. ज्या घरामध्ये ती लहानाची मोठी झाली, ज्या घराने तिला तळहातावरच्या फोडासारखं जपलं, तिला तिच्या पायावर उभं केलं, त्या घराला केवळ तो तिच्या आयुष्यात आला म्हणून ती दुय्यम प्राधान्य नाही देऊ शकत. या गोष्टींची जाणिव व्हावी म्हणून पाहावा असा चित्रपट.

बोमरीलू, बोमर ईलू म्हणजे चांगलं घर.

एका सुंदर प्रसंगाने चित्रपट सुरु होतो. समुद्र किनार्‍यावर एक अगदी छोटं बाळ पावलं टाकत असतं आणि त्याचे बाबा त्याला सावरत असतात. याच वेळी कथेचा निवेदक आपल्या धीरगंभीर आवाजात सांगत असतो की वडीलांनी मुलाला त्याच्या बालपणामध्ये आधार देणे आवश्यकच आहे पण मुलगा मोठा झाल्यानंतरही त्याच्या आयुष्यात दखल देणं कितपत योग्य आहे... मुलं लहान असतात तोपर्यंत त्यांना आई बाबांचा आधार हवा असतो पण जस जशी ती मोठी होत जातात तसतसं त्यांना आई बाबांपासून स्वातंत्र्य हवं असतं. तसं नाही झालं तर त्यांची प्रचंड घुसमट होते. प्रसंगी मुलं घराबाहेर आई वडीलांबद्दल अपशब्द काढायलाही मागे पुढे पाहत नाहीत. कधीतरी ही घुसमट असह्य होते आणि मग मुलं सगळी बंधनं झुगारुन देतात.

सिद्धार्थ (सिद्धार्थ नारायण - रंग दे बसंती मधला करण) एका सुखवस्तू घरामधला घरामधला मुलगा. दोन वर्षांपुर्वी इंजिनियर झालेला. आणि तरीही त्याच्या प्रत्येक गोष्टीवर वडीलांचा वरचश्मा असणारा. त्याने कुठले कपडे घालावेत इथपासुन ते त्याची "हेअर स्टाईल" कशी असावी इथपर्यंत सारं काही वडील ठरवणार. या सगळ्याला सिद्धु खुप वैतागलेला. घरात असताना एकदम सुसंस्कृत मुलासारखा वागायचा. पण बाहेर मात्र या सगळ्याची कसर भरून काढायचा. अगदी मित्रांसोबत असताना पिणं झाल्यानंतर आपल्या बाबांना खुप शिव्या द्यायचा तो. मित्रांसोबत असताना तो नेहमी म्हणायचा, की त्याच्या बाबांनी त्याच्या आयुष्यात कितीही ढवळाढवळ केली तरीही दोन गोष्टी तो त्याच्या मनाप्रमाणेच करणार होता. एक म्हणजे त्याच करीयर आणि त्याचं लग्न. त्याला आवडणा‍र्‍या मुलीसोबतच तो सात फेरे घालणार होता.

आणि अशातच सिद्धुचे घरवाले त्याच्या मनाविरुद्ध त्याचं लग्न ठरवतात आणि त्याच्या मनाची घुसमट अधिकच वाढत जाते.पण एक दिवस त्याला एका मंदीरात "ती" दिसते आणि त्याच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळते. लग्न ठरलेलं असतानाही सिद्धू त्या मुलीच्या, हासिनीच्या (जेनेलिया) प्रेमात पडतो. हासिनी सिद्धुच्याच कॉलेजला इंजिनियरींगला असते. आपल्याच कॉलेजचा पासआऊट म्हणून हासिनी सिद्धुशी मैत्री करते आणि तिच्याही नकळत त्याच्या प्रेमात पडते.

चित्रपटामध्ये हा इथवरचा प्रवास इतक्या हळूवारपणे दाखवला आहे की आपल्या हिंदी चित्रपटांनी बनवणार्‍यांनी त्याचे धडे घ्यावेत. गोंधळलेला सिद्धू, अल्लड आणि अवखळ कॉलेजकन्यका हासिनी, त्या दोघांचं साध्या साध्या प्रसंगांमधून फ़ुलणारं प्रेम, सिद्धू आणि त्याच्या आई बाबांमधील प्रसंग. सारंच सुंदर. एरव्ही घरामध्ये एक अवाक्षरही न बोलणार्‍या सिद्धूचं हासिनीवरचं अधिकार गाजवताना सिद्धार्थ नारायणने केलेला अभिनय तर लाजबाब...

आपलं लग्न ठरलं आहे हे सिद्धूला हासिनीला सांगायचं असतं. तसं ते तो तिला सांगतोही. ते ऐकताच हासिनीला धक्का बसतो. ती सिद्धूपासुन दुरावते. पण ती फ़ार काळ स्वत:ला त्याच्यापासून दुर ठेवू शकत नाही आणि ती परत येते. सिद्धू आणि हासिनीचं पुन्हा एकदा भेटतात. एका रस्त्यावर, सिद्धूच्या बाबांसमोर त्यांच्या नकळत. सिद्धूचं लग्न ठरलेलं असुनही तो दुसर्‍या एका मुलीच्या प्रेमात पडला आहे, ही गोष्ट समजताच घरात वादळ येतं. बाबा सिद्धूला हासिनीला विसरून जायला सांगतात. सिद्धू सगळ्यांना एकदा तुम्ही हासिनीला भेटा, तिला समजून घ्या आणि मग हव तर जर तिचा स्वभाव पटला नाही तर मला तिला विसरायला सांगा अशी विनंती करतो. नव्हे, तो घरच्यांना हासिनीला एक आठवडयासाठी घरी आणण्याचं कबूल करतो. आणि सहलीची युक्ती करून हासिनीला तिच्या घरुन आठवडयासाठी आपल्या घरी घेऊन येतोही.

हासिनी सिद्धूच्या घरी येते. सुरुवातीला सारे तिच्याकडे दुर्लक्ष करतात पण हासिनी आपल्या अल्लड, अवखळ वागण्याने सा‌र्‍यांची मने जिंकून घेते. एके दिवशी हासिनी सार्‍या कुटूंबासोबत एका लग्न समारंभात जाते. आपल्या अल्लड स्वभावाने त्या लग्न समारंभामध्ये रंग भरते. योगायोगाने याच लग्नाला हासिनीचे बाबाही येतात. तिच्या बाबांनी एकदा सिद्धूला मित्रांसोबत दारू पिऊन रस्त्यावर आपल्या बाबांना शिव्या देताना पाहीलेलं असतं. ते सिद्धूला ओळखतात. हासिनी प्रसंगावधान राखून पुढचा प्रसंग टाळण्यासाठी समारंभातून तिच्या बाबांच्या नकळत निघून जाते. असं असुनही घरी आल्यावर सिद्धू हासिनीला तिच्या लग्नामधल्या बालिश वर्तनाबद्दल ओरडतो. या सगळ्याने हासिनी व्यथीत होते. सिद्धू पुर्वीचा जसा होता तसा आता राहीला नाही, तसंच या घरात राहण्यासाठी तिला खुप तडजोड करावी लागेल आणि ते तिच्याने होणार नाही असं सांगून ती सिद्धूच्या घरुन निघून जाते. हासिनी तिच्या घरी गेल्यावर तिच्या बाबांचा ओरडा खाते. पण ती पुन्हा असं काही ती करणार नाही असं आपल्या बाबांना वचन देते.

इकडे सिद्धू मात्र हासिनीच्या विरहात स्वत:ला हरवून जातो. सिद्धूची आई पुढाकार घेऊन त्याच्या बाबांना समजावते. चोवीस वर्षात कधीही बाबांपुढे तोंड न उघडलेला सिद्धूही आपल्या मनातील घुसमट बाबांसमोर व्यक्त करतो. गेले चोवीस वर्ष ते कसे चुकत गेले हे सांगतो. सिद्धु आपल्या नियोजित वधूच्या घरी जाऊन लग्न त्याचं त्यांच्या मुलीशी ठरलेलं लग्न मोडण्यास राजी करतो. सिद्धूचे बाबाही आपल्या मुलासाठी हासिनीच्या घरी जातात. तिच्या बाबांना हासिनी आणि सिद्धूच्या लग्नासाठी विनंती करतात. आता हासिनीचे बाबा सिद्धूला समजून घेण्य़ासाठी त्याला एक आठवडाभर आपल्या घरी राहायला बोलावतात. आणि त्यानंतर हासिनी आणि सिद्धू लग्न करुन सुखी होतात असं मानायला लावून चित्रपट संपतो...

म्हटलं तर हा चित्रपट तसा एक चाकोरीबद्ध चित्रपट आहे. प्रेमकथा, घरातील ताण-तणाव हे विषय तसे नेहमीचेच आहेत.पण चित्रपटाचं सादरीकरण निव्वळ अप्रतिम आहे. सिद्धार्थ नारायण (सिद्धू), जेनेलिया (हासिनी), प्रकाश राज (सिद्धूचे बाबा) या तीन कलावंताचा तसेच इतर सह कलाकारांचा कसदार अभिनय, कानांना गोड वाटणारं संगीत या सगळ्यामुळे चित्रपट खुप सुंदर बनला आहे. सिद्धार्थ नारायणनेच गायलेलं "आपुडो ईपुडो" हे गीत आणि "बोम्मनी गिस्ते" हे प्रेम गीत ही दोन्ही गाणी सुंदर आहेत. चित्रपट २००६ साली प्रदर्शीत झाला होता. त्यावेळचा तो सुपरहीट तेलुगु सिनेमा होता. चित्रपटाला फ़िल्मफेअर पारितोषिकही मिळालं होतं. याच चित्रपटाने जेनेलियाला अभिनेत्री म्हणून ओळख दिली.

पुढे वर्षभरातच हा चित्रपट तमिळमध्ये पुन्हा बनवला गेला, संतोष सुब्रमण्यम या नावाने. मुख्य अभिनेत्री जेनेलिया आणि मुलाच्या वडीलांची भुमिका करणार्‍या प्रकाश राजनी याही चित्रपटात त्याच भुमिका केल्या. पण तमिळ आवृत्तीचा मुख्य अभिनेता होता जयम रवी हा तमिळ अभिनेता. हाही चित्रपट बोमरीलूप्रमाणे सुपरहीट झाला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तमिळ प्रेक्षकांना जास्त आवडला तो मुळचा तेलुगू बोमरीलूच. ईतकंच नव्हे तर सिदधार्थचा बोमरीलूमधला अभिनय जयम रवीच्या संतोष सुब्रमण्यममधील अभिनयापेक्षा कित्येक पटींनी उजवा ठरला. आणि या सर्वांवर कळस म्हणजे बोमरीलूमध्ये सिदधार्थची भुमिका करणारा सिदधार्थ नारायण हा प्रामुख्याने तेलुगू चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता जन्माने तमिळ आहे.

बोमरीलू प्रदर्शित होऊन जवळजवळ दोन वर्ष होऊन गेली होती. तरीही तरूणाई बोमरीलू आवर्जून पाहत होती. आपल्या मित्रमैत्रिणींना दाखवत होती. ओरकूटवर शंभरपैकी दहा प्रोफाईल असे सापडतील की त्यांच्या चित्रपटाच्या यादीत बोमरीलू हे नाव आहे. बर्‍याच मराठी तसेच उत्तर भारतीय कॉलेजवयीन मुलामुलींनी हा चित्रपट आपल्या दाक्षिणात्य दोस्त मंडळींनी दाखवल्यामुळे पाहीलेला आहे. कदाचित त्यामुळेच हा चित्रपट हिंदीत बनवण्याचा एक असफल प्रयत्न झाला. मुलाच्या भुमिकेत असणार होता अभिषेक बच्चन आणि वडीलांच्या भुमिकेत अमिताभ बच्चन. आईच्या भुमिकेत असणार होती बोमरीलू मधील आई, जया सुधा. पण काही कारणाने हा चित्रपट नाही बनू शकला.

आणि आश्चर्य... आता मात्र खरंच हा चित्रपट आता हिंदीत येतोय, ईट्स माय लाईफ या नावाने. अभिनेत्री पुन्हा तीच, जेनेलिया. हासिनी साकारण्याची ही तीची तिसरी वेळ आहे. मुलाच्या भुमिकेत असणार आहे हरमन बावेजा. आणि वडीलांच्या भुमिकेत असेल आपला मराठमोळा नाना पाटेकर. हासिनीच्या भुमिका करण्याची ही तिसरी वेळ असल्यामुळे जेनेलियाचा तर प्रश्नच नाही. नाना पाटेकरही प्रकाश राज यांच्या तोडीचा अभिनय पित्याच्या भुमिकेत करतील यात वाद नाही. प्रश्न आहे तो मुख्य अभिनेत्याचा, मुलाची भुमिका करणार्‍या अभिनेत्याचा. सिदधार्थ सारख्या अष्टपैलू अभिनेत्याने मुलाच्या भुमिकेला दिलेलं ग्लॅमर तसेच जीव ओतून केलेला अभिनय यांचं आव्हान जयम रवीसारखा सशक्त तमिळ अभिनेतासुदधा तमिळ आवृतीच्या वेळी पेलू शकला नाही. तर हरमन बावेजा या भुमिकेला कितपत न्याय देईल हा प्रश्नच आहे. असो. चित्रपट प्रदर्शित व्हायला अजून वेळ आहे त्यामुळे आताच काही भाष्य करणं योग्य ठरणार नाही.

एक मात्र नक्की, बोमरीलू कुठल्याही भारतीय भाषेत पुन्हा बनवला जावो, त्याला मुळ तेलुगू बोमरीलूची सर येणार नाही.

जाता जाता...
बोमरीलू यु टयुबवर पाहता येईल. यु टयुबवर हा चित्रपट ईंग्रजी उपशिर्षकांसहीत आहे त्यामुळे चित्रपट समजायला भाषेची फारशी अडचण येणार नाही. मी इथे पहीली चित्रफीत डकवतोय. जर तुम्ही चित्रपट पाहणार असाल तर ईथे न पाहता यु टयुबवर जाऊन पाहा. पुढच्या चित्रफीती क्रमाने मिळतील.

Saturday, August 15, 2009

आरं गोयिंदा रं गोपाला...

थोडंसं हरवल्यासारखं वाटतंय कालपासून. मित्रांचे "गोविंदा आला रे..." ईथपासून ते "श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे.." पर्यंतचे जीटॉकचे स्टेटस मनाला हुरहूर लावत आहेत. एरव्ही "हॅप्पी जन्माष्टमी" सारख्या विनाकारण आंग्ळाललेल्या ओळी ओरकुटच्या खरडवहीत पाहुन डोकं सणकलं असतं. पण आता तसं काहीच वाटत नाहीये. जे काही लिहिलं आहे त्यामागची भावना महत्त्वाची एव्हढंच जाणवत आहे. मनात कुठेतरी खोलवर आवाज येतोय...

आरं गोयिंदा रं गोपाला
येस्वदेच्या तान्या बाला

आज उपास. उदया धयांडी. लय मजा येईल. मी तं बाबा आगदी मदल्या सुट्टीतच पलुन आलो शालेतना. मं त्यात काय झाला. सगली पोरा आली. पन च्यायला घरची मानसा पन आशी हायेत ना. आदी शालेतना पलुन आलो म्हनून शिया दिलं आनी आता म्हनतात काय उपास काय संदयाकाली हाय. आता आलाच हायेस तं वाईच ढॉराना फीरवून आन. मया आनी दिन्याला कदीच सांगत नाय. कदीपन मनाच सांगतात. का तं मी म्हॉटा पॉरगा हाय म्हनुन. मी म्हॉटा आनी त्ये काय बारीक हायेत काय. मया फकस्त येक वर्शानी बारीक आनि दिन्या दोन वर्शानी. आनी परत काय झाला का मनाच वराडतात. त्या दॉगाना कायीच बोलत नाय. जावदे. न्हेतो ढॉराना. लय लांब नाय न्हेनार. वाईच बोडनीवरना पानी दाकवुन आनीन. मंग संदयाकाली नविन बॉडया आनी चडडया. आनि मग गोयंदो...


आज मी जर कुणाशी या भाषेत बोललो तर लोक मला वेडयात काढतील . पण अगदी दहावी होईपर्यंत मी याच भाषेत सार्‍यांशी बोलत असे. पुढे अकरावीला आल्यानंतर मात्र ठरवून शुदध (?) मराठी बोलायला सुरुवात केली. नाही म्हणायला मी आईशी आजही याच भाषेत बोलतो, अगदी "आये कशी हायेस" अशी सुरुवात करुन...

आनली येगदाची ढॉरा फीरवून. आता जरा टायमान बाबा गोरेगावशी येतील. मंग नविन बॉडी आनी चडडी घतली का दयावलात जायाचा...

"आरं जरा धीर दम हाय का नाय. जरा खा प्या आनी मंग जा दयावलात"
"मी तं मंगाशीच खल्ला ढॉरांकडना आल्यावर"
"जा पन कालोकात फीरु नुकॉ. इचूकाटा हाजार हाय. उगंच सनासुदीचं याप लावाल आमच्या मांगं."

मी बाबा व्हो म्हनायची पन वाट बगत नाय. त्याज्याआदीच संत्याकडं जातो. संत्या माज्या म्हॉटया आकाचा पोरगा. माज्यापेक्शा वायीच म्हॉटा हाय. वायीच म्हंजे फकस्त चार पाच म्हयन्यांनी.
संत्या आनी मी दयावलात जातो. मस्त लायटींग बियटींग केलेली आस्ते. लाउसपिक्चर लावलेला आसतो. बारकी पॉरा दयावलाच्या आंगनात लंगडी बिंगडी खेलत आस्तात. आमीपन त्यांच्यात जातो आनी ज्याम मजा करतो. जरा नव सादे व वाजलं का म्होटी मान्सा यायाला सुरवात व्हते. धा वाजलं का भजन चालू व्हतो. आमी पॉरा तरीपन खेलतच आस्तो. मंग कुनीतरी याकादा म्हॉटा मानूस भजनातना उटून येतो आनी पॉरांवर वराडतो.

"काय रे कार्टयानो तुमाना कलत नाय काय. दयावाधर्माचा भजेन चालू हाय जरा गप बसावा त्या काय नाय. नुसती आपली खिदाललेत."

आसा कुनी वराडला का पॉरा आजुन खिदालतात. आता भजेन पन रंगात आलेला आसतो. ते आबंग बिबंग खतम व्हऊन आता जरा संगीत भजन चालू झालेला आस्तो. तुकाराम बुवा येगदम रंगात येवून गायीत आस्तात. संगीत भजनाला वानी ढोलकी आनी तब्ला आसा वाजवतात ना. काय सांगू. तुकाराम बुवा मग तो किश्नाचा गाना चालू करतात. आम्ही सगली पॉरा ख्यालना बंद करुन भजनात येवून बसतो.

सुर्ये उगवला, प्रकास पडला, आडवा डोंगर...आडवा डोंगर तयाला माजा नमस्कार
सुर्ये उगवला, प्रकास पडला, आडवा डोंगर...आनि गोकुलमदयी किश्न जनमला आठवा आव्तार...

वान्यांचा तबला टीन टीन टीन टीन वाजायला लागतो. सगलं भजनी येग्दम रंगात येवून टाली वाजवीत आस्तात. आमी पॉरा तं काय यिचारुच नुका...

बारा साडेबारा वाजायला आलं का भजन बंद करतात. कारन आता किश्नजन्माचा टाईम झालेला आस्तो. तुकाराम बुवा मग जन्माची पोती वाचायला सुरवात करतात. आतापरत भजनाच्या आवाजान येग्दम भिनकून ग्येलेला देउल चिडीच्याप व्हतो. जन्माची पोती म्हन्जे आमचं बाबा जो हारीईजय वाचतात ना त्याजाच येक आदयाय ज्याच्यामदी किश्न जन्माला येतो. पोती आशा ब्येतान चालु केलेली आसतात का किश्नजन्माचा म्हुर्ताला वाचन संपल. म्हुर्त जवल येतो. वाचन संपतो. तुकाराम बुवा "गोपालकिश्न म्हाराज की जय" आसा बोल्तात आनि किश्नजन्म होतो...

"गोयंदो" कुनी लाव्ह्या फेकतो.

"गोयंदो" कुनी गुलाल फेकतो.

कुनी जोराजोरान देवलातली घंटी वाजवतो. सगली लोका आनंदान उडया मारतात. मंग देवाला पालन्यात घालतात. आनी मग एकेकजन देवाचा दर्शन घ्यायाला रांगत फुडं सराकतात.

"दयेव घ्या कुनी, दयेव घ्या कुनी" तुकाराम बुवा बोलत आसतात.

"दयेव घ्या कुनी, दयेव घ्या कुनी" बाकीची सगली लोका म्होटयानी बोलतात.

"आयता आला घरच्या घरी" परत तुकाराम बुवा बोलतात.

"आयता आला घरच्या घरी" लोक परत त्यांच्या पाटीवर बोलतात.

आमीपन सगली देवाचा दर्शन घेवून बाबांसोबत घरी येतो. आये केलीच्या पानावर सगल्याना ज्येवायला वाडते. मस्त पाच सा भाज्या, भजी बिजी केलेली आसतात उपासासाटी...

दुसर्‍या दिवशी धयांडी. आमी सगली पॉरा सकाली ढॉरांकड जातो. बारा वाजता ढॉरा घरी आनतो. हिकडं दयेवलात धयांडीची तयारी चालू आसते. मंग आस्ती आस्ती खेल चालू व्हतात. आग्दी त्या हारीयीजयात किश्न आनी गोपाल जसं खेलतात ना तसंच. मना बाकी काय खेलता येत नाय पन फुय फुय खेलायला जाम मजा येते. वानी आगदी जोराजोरात ढोलकी वाजवतात. दोन दोन पॉरांच्या जॉडया फुय फुय ख्येलतात. आदी आर्दी लोका म्हनतात, "फुय फुय फुय फुय फुगडी गं तुमी आमी दॉगा ख्येलू गं" मग परत आर्दी लॉका तसाच म्हनतात, "फुय फुय फुय फुय फुगडी गं तुमी आमी दॉगा ख्येलू गं". मना आजुन येक खेल आवडतो. सगली लोका आसा घोल रींगान करुन उबी र्‍हातात. आनी मग एक मानुस बय बनतो. बय म्हनजे आये. जुनी लोका आयेला बय म्हनतात. आनी दुसरा कुनीतरी त्या बयची लेक म्हंजे पोर्गी व्हतो. बय रींगनातल्या येकेकाच्या हाताखलना चालत जाते. पोर्गी तिज्या पाटोपाट.

"बय मी यतो" पोर्गी म्हन्ते.

"नुको गं लेकी" बय म्हन्ते.

"बय मी यतो" परत पोर्गी म्हन्ते.

"लुगडं देतो" बय पोरीने आपल्या पाटीवर येव नाय म्हनून लुगडा दयायचा कबुल लुगडं दयायचा कबुल करते. पन पोर्गी काय आयकत नाय. तिजा आपला चालूच.

"बय मी यतो." आसा मग पोल्का, नत, पाटल्या, चंद्रहार म्हनत म्हनत बय आनी लेक लोकांच्या रींगनात फीरत र्‍हातात. शेवटी बय जवा लेकीला न्हवरा देतो म्हनते तवा खेल संपतो...

आता खेल संपतात. लोका धयांडीच्या तयारीला लागतात. जास्त उंच नाय बांदत. दोन तीन थरच आसतात. धयांडी बांदतात. थर रचतात. धयांडी फुटते आनी परत येगदा गोयंदो गोयंदो चालू व्हतो...

तो सगला झाला का सगली लोका हातात हात गुतवून रांगत पानी घ्यायला जायाला लागतात... सगली म्हॉटया म्हॉटयान म्हनत आसतात...

आरं गोयिंदा रं गोपाला
येस्वदेच्या तान्या बाला


मी चटकन भानावर आलो. मानवी मन किती अजब आहे ना. मी आता या क्षणी जरी कॅलिफोर्नियामध्ये एका बलाढय अमेरिकन पेट्रोल कंपनीच्या वातानुकुलीत कार्यालयात बसलो असलो तरी काही क्षणांपुर्वी मी माझ्या मातीत, माझ्या बालपणात हरवून गेलो होतो. मी अर्धवट राहीली ईमेल पुर्ण करण्यासाठी कीबोर्ड बडवायला सुरुवात केली, Please let us know if you need further assistance असं सवयीनुसार टंकलं आणि आउटलुकचं सेंड बटन दाबलं...