Saturday, August 15, 2009

आरं गोयिंदा रं गोपाला...

थोडंसं हरवल्यासारखं वाटतंय कालपासून. मित्रांचे "गोविंदा आला रे..." ईथपासून ते "श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे.." पर्यंतचे जीटॉकचे स्टेटस मनाला हुरहूर लावत आहेत. एरव्ही "हॅप्पी जन्माष्टमी" सारख्या विनाकारण आंग्ळाललेल्या ओळी ओरकुटच्या खरडवहीत पाहुन डोकं सणकलं असतं. पण आता तसं काहीच वाटत नाहीये. जे काही लिहिलं आहे त्यामागची भावना महत्त्वाची एव्हढंच जाणवत आहे. मनात कुठेतरी खोलवर आवाज येतोय...

आरं गोयिंदा रं गोपाला
येस्वदेच्या तान्या बाला

आज उपास. उदया धयांडी. लय मजा येईल. मी तं बाबा आगदी मदल्या सुट्टीतच पलुन आलो शालेतना. मं त्यात काय झाला. सगली पोरा आली. पन च्यायला घरची मानसा पन आशी हायेत ना. आदी शालेतना पलुन आलो म्हनून शिया दिलं आनी आता म्हनतात काय उपास काय संदयाकाली हाय. आता आलाच हायेस तं वाईच ढॉराना फीरवून आन. मया आनी दिन्याला कदीच सांगत नाय. कदीपन मनाच सांगतात. का तं मी म्हॉटा पॉरगा हाय म्हनुन. मी म्हॉटा आनी त्ये काय बारीक हायेत काय. मया फकस्त येक वर्शानी बारीक आनि दिन्या दोन वर्शानी. आनी परत काय झाला का मनाच वराडतात. त्या दॉगाना कायीच बोलत नाय. जावदे. न्हेतो ढॉराना. लय लांब नाय न्हेनार. वाईच बोडनीवरना पानी दाकवुन आनीन. मंग संदयाकाली नविन बॉडया आनी चडडया. आनि मग गोयंदो...


आज मी जर कुणाशी या भाषेत बोललो तर लोक मला वेडयात काढतील . पण अगदी दहावी होईपर्यंत मी याच भाषेत सार्‍यांशी बोलत असे. पुढे अकरावीला आल्यानंतर मात्र ठरवून शुदध (?) मराठी बोलायला सुरुवात केली. नाही म्हणायला मी आईशी आजही याच भाषेत बोलतो, अगदी "आये कशी हायेस" अशी सुरुवात करुन...

आनली येगदाची ढॉरा फीरवून. आता जरा टायमान बाबा गोरेगावशी येतील. मंग नविन बॉडी आनी चडडी घतली का दयावलात जायाचा...

"आरं जरा धीर दम हाय का नाय. जरा खा प्या आनी मंग जा दयावलात"
"मी तं मंगाशीच खल्ला ढॉरांकडना आल्यावर"
"जा पन कालोकात फीरु नुकॉ. इचूकाटा हाजार हाय. उगंच सनासुदीचं याप लावाल आमच्या मांगं."

मी बाबा व्हो म्हनायची पन वाट बगत नाय. त्याज्याआदीच संत्याकडं जातो. संत्या माज्या म्हॉटया आकाचा पोरगा. माज्यापेक्शा वायीच म्हॉटा हाय. वायीच म्हंजे फकस्त चार पाच म्हयन्यांनी.
संत्या आनी मी दयावलात जातो. मस्त लायटींग बियटींग केलेली आस्ते. लाउसपिक्चर लावलेला आसतो. बारकी पॉरा दयावलाच्या आंगनात लंगडी बिंगडी खेलत आस्तात. आमीपन त्यांच्यात जातो आनी ज्याम मजा करतो. जरा नव सादे व वाजलं का म्होटी मान्सा यायाला सुरवात व्हते. धा वाजलं का भजन चालू व्हतो. आमी पॉरा तरीपन खेलतच आस्तो. मंग कुनीतरी याकादा म्हॉटा मानूस भजनातना उटून येतो आनी पॉरांवर वराडतो.

"काय रे कार्टयानो तुमाना कलत नाय काय. दयावाधर्माचा भजेन चालू हाय जरा गप बसावा त्या काय नाय. नुसती आपली खिदाललेत."

आसा कुनी वराडला का पॉरा आजुन खिदालतात. आता भजेन पन रंगात आलेला आसतो. ते आबंग बिबंग खतम व्हऊन आता जरा संगीत भजन चालू झालेला आस्तो. तुकाराम बुवा येगदम रंगात येवून गायीत आस्तात. संगीत भजनाला वानी ढोलकी आनी तब्ला आसा वाजवतात ना. काय सांगू. तुकाराम बुवा मग तो किश्नाचा गाना चालू करतात. आम्ही सगली पॉरा ख्यालना बंद करुन भजनात येवून बसतो.

सुर्ये उगवला, प्रकास पडला, आडवा डोंगर...आडवा डोंगर तयाला माजा नमस्कार
सुर्ये उगवला, प्रकास पडला, आडवा डोंगर...आनि गोकुलमदयी किश्न जनमला आठवा आव्तार...

वान्यांचा तबला टीन टीन टीन टीन वाजायला लागतो. सगलं भजनी येग्दम रंगात येवून टाली वाजवीत आस्तात. आमी पॉरा तं काय यिचारुच नुका...

बारा साडेबारा वाजायला आलं का भजन बंद करतात. कारन आता किश्नजन्माचा टाईम झालेला आस्तो. तुकाराम बुवा मग जन्माची पोती वाचायला सुरवात करतात. आतापरत भजनाच्या आवाजान येग्दम भिनकून ग्येलेला देउल चिडीच्याप व्हतो. जन्माची पोती म्हन्जे आमचं बाबा जो हारीईजय वाचतात ना त्याजाच येक आदयाय ज्याच्यामदी किश्न जन्माला येतो. पोती आशा ब्येतान चालु केलेली आसतात का किश्नजन्माचा म्हुर्ताला वाचन संपल. म्हुर्त जवल येतो. वाचन संपतो. तुकाराम बुवा "गोपालकिश्न म्हाराज की जय" आसा बोल्तात आनि किश्नजन्म होतो...

"गोयंदो" कुनी लाव्ह्या फेकतो.

"गोयंदो" कुनी गुलाल फेकतो.

कुनी जोराजोरान देवलातली घंटी वाजवतो. सगली लोका आनंदान उडया मारतात. मंग देवाला पालन्यात घालतात. आनी मग एकेकजन देवाचा दर्शन घ्यायाला रांगत फुडं सराकतात.

"दयेव घ्या कुनी, दयेव घ्या कुनी" तुकाराम बुवा बोलत आसतात.

"दयेव घ्या कुनी, दयेव घ्या कुनी" बाकीची सगली लोका म्होटयानी बोलतात.

"आयता आला घरच्या घरी" परत तुकाराम बुवा बोलतात.

"आयता आला घरच्या घरी" लोक परत त्यांच्या पाटीवर बोलतात.

आमीपन सगली देवाचा दर्शन घेवून बाबांसोबत घरी येतो. आये केलीच्या पानावर सगल्याना ज्येवायला वाडते. मस्त पाच सा भाज्या, भजी बिजी केलेली आसतात उपासासाटी...

दुसर्‍या दिवशी धयांडी. आमी सगली पॉरा सकाली ढॉरांकड जातो. बारा वाजता ढॉरा घरी आनतो. हिकडं दयेवलात धयांडीची तयारी चालू आसते. मंग आस्ती आस्ती खेल चालू व्हतात. आग्दी त्या हारीयीजयात किश्न आनी गोपाल जसं खेलतात ना तसंच. मना बाकी काय खेलता येत नाय पन फुय फुय खेलायला जाम मजा येते. वानी आगदी जोराजोरात ढोलकी वाजवतात. दोन दोन पॉरांच्या जॉडया फुय फुय ख्येलतात. आदी आर्दी लोका म्हनतात, "फुय फुय फुय फुय फुगडी गं तुमी आमी दॉगा ख्येलू गं" मग परत आर्दी लॉका तसाच म्हनतात, "फुय फुय फुय फुय फुगडी गं तुमी आमी दॉगा ख्येलू गं". मना आजुन येक खेल आवडतो. सगली लोका आसा घोल रींगान करुन उबी र्‍हातात. आनी मग एक मानुस बय बनतो. बय म्हनजे आये. जुनी लोका आयेला बय म्हनतात. आनी दुसरा कुनीतरी त्या बयची लेक म्हंजे पोर्गी व्हतो. बय रींगनातल्या येकेकाच्या हाताखलना चालत जाते. पोर्गी तिज्या पाटोपाट.

"बय मी यतो" पोर्गी म्हन्ते.

"नुको गं लेकी" बय म्हन्ते.

"बय मी यतो" परत पोर्गी म्हन्ते.

"लुगडं देतो" बय पोरीने आपल्या पाटीवर येव नाय म्हनून लुगडा दयायचा कबुल लुगडं दयायचा कबुल करते. पन पोर्गी काय आयकत नाय. तिजा आपला चालूच.

"बय मी यतो." आसा मग पोल्का, नत, पाटल्या, चंद्रहार म्हनत म्हनत बय आनी लेक लोकांच्या रींगनात फीरत र्‍हातात. शेवटी बय जवा लेकीला न्हवरा देतो म्हनते तवा खेल संपतो...

आता खेल संपतात. लोका धयांडीच्या तयारीला लागतात. जास्त उंच नाय बांदत. दोन तीन थरच आसतात. धयांडी बांदतात. थर रचतात. धयांडी फुटते आनी परत येगदा गोयंदो गोयंदो चालू व्हतो...

तो सगला झाला का सगली लोका हातात हात गुतवून रांगत पानी घ्यायला जायाला लागतात... सगली म्हॉटया म्हॉटयान म्हनत आसतात...

आरं गोयिंदा रं गोपाला
येस्वदेच्या तान्या बाला


मी चटकन भानावर आलो. मानवी मन किती अजब आहे ना. मी आता या क्षणी जरी कॅलिफोर्नियामध्ये एका बलाढय अमेरिकन पेट्रोल कंपनीच्या वातानुकुलीत कार्यालयात बसलो असलो तरी काही क्षणांपुर्वी मी माझ्या मातीत, माझ्या बालपणात हरवून गेलो होतो. मी अर्धवट राहीली ईमेल पुर्ण करण्यासाठी कीबोर्ड बडवायला सुरुवात केली, Please let us know if you need further assistance असं सवयीनुसार टंकलं आणि आउटलुकचं सेंड बटन दाबलं...

8 अभिप्राय:

Photographer Pappu!!! said...

स्वत:च्या मायबोलीची गोडिच काही और असते ना :) मी सुद्धा आईबरोबर मालवणीतच बोलतो. आणि आम्ही पण बनियानला बॉडी च म्हणतो :)माझी बायको जेव्हा नवीन लग्न होऊन आली होती तेव्हा कुणीतरी कुणाला तरी विचारात होते की आमच्या अमक्या अमक्याची बॉडी बघलास खयसर (म्हणजे आमच्या अमक्या अमक्याची बनियान पाहिलित का कुठे?) माझ्या बायकोला वाटले की कोणीतरी कुणाची तरी डेड बॉडी शोधतय :) बाकी लेख नेहमीप्रमाणेच मस्त झालाय :) मी कॅलिफॉर्निया च्या फ्रिमॉंट शहरात आहे. तू कुठे असतोस?

Anonymous said...

मालवणी खुप गोड वाटते ऐकायला. आता मुंबईला आल्यापासुन सारखी कानावर पडते त्यामुळे बरिच समजते पण..लेख खुपच सुंदर जमलाय. अगदी प्रोफेशनली लिहिला गेलाय..

Vikrant said...

मित्रा,
तुझ्याबरोबर आम्हाला पण नेलंसं बर का त्या कोकणातल्या मातीत परत........... लय्य्य्य्य्य्य भारी........

अपर्णा said...

छान वाटतंय मालवणीत लिहिलेलं वाचायला. लेख छान झालाय. मला मालवणी भाषा तशीही खूप आवडते आणि नाटकांमधुन वगैरे पाहुन थोडी फ़ार कळतेही.
पावना ता लिवलाय बाकी झ्याक हा!!

Satish Gawde said...

@ फोटोग्राफर पप्पू, महेंद्र काका, विक्रांत आणि अपर्णाजी...

धन्यवाद. खुप बरं वाटलं तुम्हाला बोली भाषेत लिहिलेला लेख आवडला हे वाचून.

या लेखातील बोलीभाषा मालवणीची "डायलेक्ट" असून रायगड जिल्ह्याच्या ग्रामिण भागात बोलली जाते.

a Sane man said...

masta!!!

chhan lihitos tu! tuze maagachehi barech lekh vachale mee...aawaDale...

bhasha raigad kadachi aahe asach vaTat hota mala...paN comments pahun mee jara gaDbaDalo...tuzi comment vachun ulagaDa zala :) chhan lihilayes...kokaNat gelyasarkha vaTla...

goregaon cha ullekh aahe...goregaon-mangaon kadcha aahes ka tu?

a Sane man said...

मी तिकडचा नाहीये, पण तिकडे आलो आहे बर्‍याचदा. वडघरला साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक आहे तिकडे. मी अधुनमधून, बाबा नेहमीच. म्हणून माहितेय तो भाग.

नि प्लीज, अहो जाहो कशासाठी? आपण एकाच वयाचे आहोत.

कोहम said...

mitra.

chaan vachala vachun. dahi handichya nahi pan diwalichya divashi vachala. shevati sentiment same ahe, bhasha ani saN niraLa evadhach. thanks for sharing and keep it up!