...आणि बंडूची काव्यप्रतिभा उफाळून आलीच. त्याचं असं झालं की,बंडू जालावर आपल्या जालनिशीवर काहीबाही खरडत असतो. आपण खुप दर्जेदार मराठी लेखन करतो असा बंडूचा एक गोड गैरसमज आहे. असो बापडा. तर आपल्या या दर्जेदार लेखन करणार्या बंडूने त्याच्या जालनिशीच्या उजव्या बाजुला एक जालखासुपकरण बसवलं आहे. जालखासुपकरण हा शब्द बंडूचाच बरं. कारण बंडू कटटर मराठी. तसे बंडूचे बरेच मित्र त्याला म्हणतात की त्याला हिंदी आणि इंग्रजी व्यवस्थित येत नाही. आणि ते लोकांना कळू नये म्हणून तो उगाचच मला मराठीचा अभिमान आहे म्हणून मी हिंदी किंवा इंग्रजी टाळतो असं गावभर सांगत सुटतो. असो. विजेट हा शब्द इंग्रजी भाषेतला. मग बंडूने त्या शब्दाचं मराठीकरण केलं, जाल खास उपकरण अर्थात जालखासुपकरण. तर हे जालखासुपकरण बंडूच्या जालनिशीवर कुणी वाचन करायला आलं की त्याची लगेच नोंद करतं आणि तिथल्या तिथं दाखवतं सुदधा. आणि त्या नोंदी पाहील्या की बंडूची छाती अभिमानाने फुलून येते. कधी कधी बंडू त्या नोंदीवरून आपले वाचक कुठल्या कुठल्या संकेतस्थळांवरून येतात हे पाहतो. दोन दिवसांपूर्वी अशाच त्या नोंदी पाहताना बंडूला अगदी आश्चर्याचा धक्का बसला. कारण एक वाचक चक्क एका मराठी संकेतस्थळावरून आला होता...
ते संकेतस्थळ तसं बंडूच्या ओळखीचं. कधी काळी बंडू या संकेतस्थळावर अगदी सक्रियपणे लेखन करायचा. अर्थात बरचसं लेखन "र ला र आणि ट ला ट" या काव्यप्रकारातलं. पण लिहायचा. पुढे बंडूने तिथे लिहिणं बंद केलं. तर या संकेतस्थळावर बंडूची एका काकांशी ओळख झाली होती. या काकांशी निगडीत बंडूची एक आठवण आहे. निगडीत म्हणजे पुण्याच्या निगडीत नाही हो. निगडीत म्हणजे संबंधित किंवा आजच्या मराठीत सांगायचं तर रीलेटेड. ही आठवण सांगत बसलो तर मुळ विषयापासून आपण दूर जाऊ पण आठवण खरंच सांगण्यासारखी आहे. झालं असं की गेल्यावर्षी फ्रीमॉंटला "भैरव ते भैरवी" हा शास्त्रीय संगितावर आधारीत कार्यक्रम झाला. काही वाचकांच्या माहितीसाठी, फ्रीमॉंट हे अमेरिकेच्या बे एरीयातील सॅन होजेसारखंच एक भारतीयांची मोठी वस्ती असणारं शहर. तर या शास्त्रीय संगिताच्या कार्यक्रमाला बंडू गेला. म्हणजे तसं बंडूला शास्त्रीय संगितातलं फार काही कळतं अशातला भाग नाही. खरं तर त्याला शास्त्रीय संगितातलं काहीच कळत नाही. मित्राने फारच आग्रह केला म्हणून गेला. कार्यक्रम तसा चांगला होता. विषेशत: एखादया रागातलं गीत (बंदीश म्हणतात म्हणे त्याला) सादर करण्यापुर्वीचं निवेदन. असो. कार्यक्रमाचं मध्यंतर झालं. बंडू पाय मोकळे करायला म्हणून सभागॄहातून बाहेर पडला. समोरून एक काका येताना दिसले. हे काका त्या संकेतस्थळावरच्या काकांसारखे दिसत होते. कारण बंडूने काकांच्या जालनिशीवर काकांचा फोटो पाहीला होता. फोटोमधला चेहरा समोरून येणार्या काकांच्या चेहर्याशी मिळताजुळता होता. काका सॅन होजेला राहतात हेही वाचलं होतं. सॅन होजे फ़्रीमॉंटपासून जेमतेम अर्ध्या तासाच्या अंतरावर. त्यामुळे हे तेच काका असणार म्हणून बंडू काकांना भेटायला गेला. पण बंडू काही बोलायच्या आधीच काका चालू झाले.
"काय बाळा कसा वाटला आमचा मराठीतला शास्त्रिय संगिताचा कार्यक्रम"? काकांनी विचारलं.
हे बंडूचं अजून एक दुखणं. बंडू सव्वीस वर्षाचा असूनही नुकताच शाळा सोडून ज्युनियर कॉलेजला जाणार्या पोरासारखा दिसतो. त्यामुळे कुणीही काका किंवा आजोबा त्याला "बाळा" म्हणून हाक मारतात.
"छान आहे" बंडूने चेहर्यावर खोटं हसू आणत म्हटलं.
आणि त्यानंतर काका जे चालू झाले ते ज्याचं नांव ते. काकांनी जुनं संगित आणि नविन संगित बदलून जुनी पिढी आणि नवी पिढी हा विषय सुरू केला होता. आता मात्र बंडूला सहन होईना. बंडूने "तुम्ही तेच काका का" हे विचारण्याचा आपला बेत रहीत केला. काका चालूच होते. आता मात्र काकांच्या तावडीतून सुटका करून घेणे भाग होते. आणि बंडू अचानक म्हणाला, "काका, मला जोराची लागली आहे. मी जातो". आणि बंडू चक्क तिकडून सटकला, आपल्या "मला जोराची लागली आहे" या वाक्याचा जुन्या पिढीतल्या काकांवर काय परीणाम होईल याची पर्वा न करता.
असो. तर या संकेतस्थळावरच्या काकांना चांगली म्हणा अथवा वाईट म्हणा,एक सवय होती. हिंदी चित्रपट गीतांचं मराठी भाषांतर करण्याची. काका त्याला "किंचित अनुवाद" म्हणायचे. काकांच्या या किंचित अनुवाद शैलीपासून प्रेरणा घेतली आणि बंडूनेही एकदा असा किंचित अनुवाद करण्याचं ठरवलं. कारण र ला र आणि ट ला ट जोडून कविता किंवा चारोळी पाडणे हा बंडूच्या डाव्या हाताचा मळ. एका मित्राने तर एकदा चक्क म्हटलं सुद्धा की तुझ्याकडे काय चारोळी पाडण्याचा एखादा संगणकाचा प्रोग्राम आहे का. टाक शब्द, पाड चारोळी. इतकी बंडूची चारोळीवर पकड. इथे तर अनुवाद करायचा होता म्हणजे मुळ काव्यही तयार मिळणार. आपण काय करायचं तर फक्त शब्दांचं भाषांतर करायचं. झालं बंडूने गाणंही शोधलं. मिथून चक्रवर्ती अभिनीत दलाल या अगदी टुकार चित्रपटातील "ठेहरे हुए पानी में" हे अर्थपुर्ण गीत. बंडूने आपलं सारं कौशल्य पणाला लावून अनुवाद केला. तो अनुवाद त्या संकेतस्थळावर पोस्टसुदधा केला नको मारून खडा रे सख्या या नावाने. एकदा स्वत:च वाचून काढला. बंडूला कळून चुकलं की अनुवाद करणं हे आपलं काम नाही. बंडूला उपरती झाली. एखाद्या दारुडयाला दारू पिऊन ओकल्यानंतर जशी होते आणि मग तो दारू पिणं सोडून देतो तशी. त्यानंतर बंडूने चारोळी आणि कविता पाडणं बंद केलं ते कायमचं...
आता जो वाचक बंडूच्या जालनिशीवर आला होता तो संकेतस्थळाच्या याच बंडूने अनुवाद केलेल्या कवितेच्या पानावरून. बंडूने तिथे टाकलेल्या आपल्या जालनिशीच्या दुव्यावरून. बंडू त्या संकेतस्थळावर गेला. आपलं जुनं लेखन वाचून काढलं. त्या चारोळ्या आणि कविता वाचून बंडू हळवा झाला. आणि पुन्हा एकदा अनुवाद करायचाच हे बंडूच्या मनाने घेतलं. अशातच दोन दिवसांपुर्वीच बंडूच्या एका अमेरिकन सहकारीणीने बंडूला डीडो नावाच्या एका इंग्रजी गायिकेचं पांढरं निशाण हे गाणं ऐकवलं. तो शब्द सहकारीणी आहे बरं. चुकून तुम्ही तो सहचारीणी असा वाचलात आणि बंडूला ते कळलं तर तो सॅन फ़्रान्सिस्कोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एखादया विमानाखाली जीव देईल. कारण एक गोरी मड्डम आपली सहचारीणी ही कल्पनासुदधा बंडूला सहन होणार नाही. असो. बंडूला ते गाणं चांगलं वाटलं. म्हणजे ते गाणं बंडूला कळलं अशातला भाग नाही, गाण्याचं संगित त्याला चांगलं वाटलं. संगित चांगलं वाटलं म्हणून गाण्याचे बोल जालावर शोधून काढले. आपल्याला इंग्रजी उपशिर्षकांशिवाय इंग्रजी चित्रपट आणि गाण्याचे बोल वाचल्याशिवाय इंग्रजी गाणी कळत नाहीत हे बंडू चारचौघात जरी कधी म्हणत नसला तरी खाजगीत कबूल करतो. तर झालं बंडूने हे पांढरं निशाण मराठीत अनुवादीत करण्याचं ठरवलं. सुरुवातही केली.
मला माहिती आहे की तुला वाटतंय
की मी आता तुझ्यावर प्रेम करायला नको
किंवा तुला तसं सांगायलाही नको
पण मी तुला जरी तसं सांगितलं नाही
तरी मला तसं वाटल्याशिवाय राहणार नाही.
यात काहीतरी तथ्य असायला नको?
एकच कडवं, आणि बंडूला कळून चुकलं. पुढे लिहिण्यात काहीच अर्थ नव्हता. बंडूने पांढरं निशाण फडकावलं.
...आज बंडूने कुमार सानूने गायलेलं यशवंत चित्रपटातील तुम सामने बैठो हे गाणं ऐकलं आणि पुन्हा एकदा बंडूच्या अनुवादाच्या विचारांनी उचल खाल्ली. आता काही झालं तरी माघार घ्यायची नाही. या मराठी साहीत्यामध्ये एका अजरामर अनुवादीत गीताची भर टाकायचीच अशी खुणगाठ बंडूने मनाशी बांधली. झालं व्हीएल्सी मध्ये गाणं चालू झालं.
तूम सामने बैठो,
मुझे प्यार करने दो
बेचैन हैं धडकन
इजहार करने दो
बंडूने मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव केली. बर्यापैकी जमत होती. प्रश्न फक्त त्या इजहारचा होता. म्हणजे "मला तुझ्यावरील प्रेमाची कबुली देऊ दे" हे खुपच निरस वाटत होतं. बंडूने मग इजहार शब्दाला बगल दिली. थोडी वेगळी शब्दरचना केली आणि पहिलं कडवं तर झकास जमलं.
अशीच समोर बसून राहा तू माझ्या
अन सखे तुझ्यावर प्रेम करु दे मला
थोडी हुरहूर आहे या मनात माझ्या
भावनांचे हे बंध आज सैलावू दे मला
आता दुसरं कडवं.
मौसम हें वादोंका
यूं ना करो बहाना
लिखने दो इस दिलपें
दिलका नया फसाना
हेही जमण्यासारखं होतं. पण इथेही शेवटच्या ओळीत घोळ होता. अगदी तो शब्द फसाना आहे की अफसाना इथपासून सुरुवात होती. आणि तो शब्द यापैकी काहीही असला तरी बंडूला फसाना आणि अफसाना या दोन्ही शब्दांचे अर्थ माहिती नव्हते. कदाचित फसाना म्हणजे फसवणं असं असावं. कारण मग त्या ओळीचा "माझ्या हृदयाने तुझ्या प्रेमात पडून मला फसवलं" असा काहीसा अर्थ होईल. पण जर तो शब्द अफसाना असा असेल तर पंचाईत आहे की. नाही म्हणायला बंडूला हिमेश रेशमियाचं "अफसाना बनाके भूल न जाना" हे गाणं माहिती होतं. पण तिथंही अफसानाची बोंब होती. त्यामुळे बंडू त्या ओळीचा "काहीतरी बनवून विसरून जाऊ नको" असा घ्यायचा. आणि हे काहीतरी काहीही असू शकतं. इथेही बंडूने मग ते फसाना किंवा अफसाना जे काही होतं त्याला फाटयावर मारलं आणि जमेल तसं कडवं पुर्ण केलं.
ऋतू आहे हा दिल्या घेतल्या शपथांचा
तू शोधू नको सखे उगी आता बहाणा
लिहू दे गं मला तू या हृदयावर आता
या हॄदयाचा हा नवा खेळ मला पुन्हा
चला दोन कडवी तर बर्यापैकी जमली. आता तिसरं कडवं.
यादोंकी पन्नोंपें
मनकी किताबोंमें
मैने तुम्हे देखा
मेहबूब ख्वाबोंमें
हे कडव तसं खुपच सोपं होतं. आठवणींच्या पानावर, मनाच्या पुस्तकामध्ये, मी पाहीलं तुला, जिवलगा स्वप्नांमध्ये. कित्ती सोप्पं. पण मग हे असंच लिहलं तर ते भारदस्त वाटत नाही. गाण्याला कसं वजन पाहीजे. काय करावं या विचारात बंडू गढला असताना त्याच्या डोक्यात मेणबत्ती पेटली. जर पुस्तकाची पानं आणि स्वप्न यासाठी काही रोमांचक विशेषणं वापरली तर अनुवादाला नक्कीच वजन येईल. पण आता पुस्तकाच्या पानांना काय विशेषण लावणार? नव्या कोर्या पानांवर म्हणायचं का? पण नको. नवी कोरी म्हणायला ती काय चौथीच्या बालभारतीच्या पुस्तकाची पाने आहेत? ही तर मनाच्या पुस्तकामधील आठवणींची पाने आहेत. विचार करून करून डोक्याचा भुसा व्हायची वेळ आली तरी बंडूला पुस्तकाच्या पानांसाठी रोमांचक विशेषण सापडेना. मग बंडूने जरा वेगळा विचार करायला सुरूवात केली. अंगावर रोमांच फुलतात म्हणजे काय होतं तर अंगावर कुणीतरी मोरपिस फिरवल्यासारखं वाटतं. मोरपीशी पानं. हो हो,मोरपीशी पानं. सापडला. सापडला. बंडू अगदी आईनस्टाईनप्रमाणे नाचू लागला. एव्हढा आनंद तर त्याला इंजिनीयरींगला असताना झेनर डायोड रीव्हर्स बायसमध्ये व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून कसं काम करतो हे जेव्हा महत्प्रयासाने कळलं होतं तेव्हाही झाला नव्हता. आता "मोरपीशी पानांवर" साठी "स्वप्नांच्या हिंदोळ्यावर" हे यमक सुचणं हे बंडूसारख्या रटरट (र ला र ट ला ट) कवीसाठी काही विशेष नव्हतं.
माझ्या मनाच्या या पुस्तकामधल्या
आठवणींच्या त्या मोरपीशी पानांवर
पाहत असतो सखे नेहमी मी तुला
उंच जाणार्या स्वप्नांच्या हिंदोळ्यावर
सोपं सोपं म्हणताना या आधीच्या कडव्याने बंडूच्या नाकी नऊ आणले होते. पण जमलं होतं एकदाचं. बंडू पुढच्या ओळींकडे वळला.
चाहत का अब दिलबर
ईकरार करने दो
बेचैन हैं धडकन
इजहार करने दो
मागच्या कडव्याचा मोरपीशी अनुभव लक्षात घेऊन या वेळी बंडू काही काव्याला वजन देण्याच्या भानगडीत पडला नाही. मुकाटयाने जे आहे ते मराठीत अनुवादित केलं.
तुझ्याबद्दलच्या या ओढीची जिवलगा
आता मनमोकळी कबुली देऊ दे मला
थोडी हुरहूर आहे या मनात माझ्या
भावनांचे हे बंध आज सैलावू दे मला
पुढच्या ओळी सुंदर आहेत हे बंडूला जाणवलं होतं.
अब तो निगाहोंसें,हटती नही निगाहें
पेहलूमें आनेको, बेताबसी हैं बाहें
पलकोंकी गलीयोंमें मैं घर बसाऊंगा
नयनोंकी सागरमें मैं डुब जाऊंगा
ओळी खुपच अर्थपुर्ण आणि हळूवार होत्या. क्षणभर बंडू आपण गाण्याचा अनुवाद करत आहोत हेच विसरुन गेला. कुणीतरी "ती" नजरेत उभी राहीली आणि बंडू स्वप्नांच्या हिंदोळ्यावर तिला पाहू लागला. मंत्रावल्यासारखा बंडू पुन्हा लिहू लागला. जणू काही सारी "कायनात" त्या रोमांचक ओळी लिहिण्यासाठी बंडूच्या पाठी आपलं सारं तेज घेऊन उभी राहीली. पण हा आवेग फार काळ टीकला नाही. तो पेहलू शब्द गोडधोड खात असताना मिठाचा खडा लागावा असा लागला होता. बंडूला पल्लू शब्द माहिती होता. पल्लू म्हणजे ओढणी या अर्थाची खात्री होती. कारण "दिवानोंने सब लुटा दिया, तुने जो पल्लू गिरा दिया" हे त्याचं आवडतं गाणं होतं. पण हे पेहलू प्रकरण बंडूच्या पल्ले पडत नव्हतं. पुन्हा एकदा बंडूने पेहलू या मुळ शब्दाला बगल दिली आणि दंड, मिठी यासारखे थोडेसे रुक्ष शब्द वापरुन काम चालवून घेतलं.
ढळे ना नजर माझी तुझ्या नजरेतून आता
तुझ्या मिठीसाठी झाले दंड अनावर आता
पापण्यांच्या गल्लीत मी घर बांधेन आता
नयनांच्या सागरात बुडून जाईन मी आता
आता शेवटचं कडवं. नाही म्हटलं तरी बंडू आता जरा वैतागला होता. कारण वरचं कडवं म्हणावं असं जमलं नव्हतं. तो पुढचं कडवं ऐकू लागला.
दो चार पल यूंही
दिदार करने दो
बेचैन हैं धडकन
इजहार करने दो
इथेही बंडूने फारसा त्रास घेतला नाही. शब्दांचा त्याला माहिती असलेला सरळ साधा अर्थ घेऊन अनुवाद पुर्ण केला.
क्षण, दोन क्षण इथे असेच सखे
आता तुझ्याकडे एकटक पाहू दे मला
थोडी हुरहूर आहे या मनात माझ्या
भावनांचे हे बंध आज सैलावू दे मला
आता बंडू हा अनुवाद कुठे पोस्ट करायचा याचा विचार करतोय...
7 अभिप्राय:
सुंदर झालाय लेख. भाषांतर खुपच सुंदर झालंय..आवडलं.. दुसरा भाग पण येउ द्या..
मस्त पोस्ट..!
पांढर निशाण एकदम मजेशीर. :)
धन्यवाद महेंद्र काका आणि मिनलजी !!!
Ase bhayankar anuwad karNare lok astat kadheekadhee.. !!
Mast lihile aahes..
सतीश माझ्या मित्रा, भावा, राजा,
लय्य्य्य्य्यय्य्य्य्य्यय्य्य्य भारी... म्हणजे अगदी भारी......
तुला अजून काही गाणी सुचवतो अनुवादासाठी -
१. लम्हा लम्हा दूरी(गॅंगस्टर)
२. मौला मेरे लेले मेरी जान (चक दे इंडिया)
३. खुदा जाने (बचना ए हसिनॊ)
४. तेरे दर पर सनम (फिर तेरी कहानी याद आयी)
५. बस मेरे यार है (सागर)
बंडूचा अनुवाद आणि त्याआधीचे स्वगत खुपच आवडले.
थोडी हुरहूर आहे या मनात माझ्या
भावनांचे हे बंध आज सैलावू दे मला
हे मस्तच त्यातल्या त्यात भावनांचे बंध व सैलावणे परस्पर पूरक उपमा खासच.
तुझ्या मिठीसाठी झाले दंड अनावर आता....दंड-हेहे.:)
akadam bhareeeeeee
जर तुम्हाला अभिप्राय द्यायचा असेल तर...
ही अनुदिनी तारीख आणि वेळ वगळता पूर्णपणे मराठीत आहे. परंतू जर आपण अभिप्राय देण्यासाठी वरील दुव्यावर टिचकी मारलीत तर तुम्ही अशा पानावर जाल जिथे अभिप्राय देण्यासंबंधीच्या सूचना राष्ट्रभाषा हिंदी मध्ये आहेत...