Saturday, September 26, 2009

गती एक आहे जाण...

"मी येईपर्यंत राहतील ना. मला त्यांना त्यांच्या शेवटच्या क्षणांमध्ये भेटायचं आहे. त्यांच्याशी बोलायचं आहे."
"नाही सांगता येत रे. तुला परत यायला जरी फक्त पंधरा दिवस असले तरी बाबा तोपर्यंत राहतील असं सांगता येत नाही. कारण त्यांनी खाणं बिलकुल बंद केलं आहे. पातळ गोष्टी सुदधा खुपच कमी घेतात."

आजोबांबद्दल बोलताना बाबांना भरून आलं होतं.
मी "त्यांचं आता वय झालं आहे. त्यामुळे आज ना उद्या हे होणारच. मात्र त्यांना काही हवं नको याची काळजी घ्या" असं बाबांना समजावत होतो. पण मलाही हुंदके आवरणे कठीण झालं होतं.

साधारण आठवडयाभरापुर्वीची ही गोष्ट. आणि आज मित्राने "आजोबा आपल्यामध्ये नाहीत" अशी मेल टाकली होती. पुढच्या शुक्रवारी मी ईथून निघणार आहे. फक्त एका आठवडयाने माझी आणि आजोबांची चुकामुक झाली आहे. कायमची. मी त्यांना आता कधीच भेटू शकणार नाही...

फेब्रुवारी मध्ये मी सुटटीला आलो होतो तेव्हा मी आजोबांना भेटलो. मुंबईला आत्याकडे राहायला गेले होते काही दिवसांसाठी. विक्रोळीच्या कन्नमवार नगरातल्या झोपडपट्टीत आत्याची रुम. नाक मुठीत धरून गेलो रूमवर. दहा बाय दहाची सुद्धा खोली नसावी. मध्यभागी आत्याच्या छोटीचा पाळणा. बाजुलाच एक छोटीशी कॉट. कॉटवर आजोबा बसलेले. डोक्याला टॉवेल गुंडाळलेला. अंगावर बहुतेक घोंगडी असावी.

"मी म्हनलो व्हतो ना तुला माजा पॉरगा भायरगावावरना आला का उडया टाकीत मना भेटायला येल म्हनून. मना लोका म्हन्तात रामचंदर कमाल हाय तुजी. तुज्या ल्याकान पॉरांना शिकवलान, पॉरा पन डाक्टर ईंजिनेर झाली. आजपरत लोका डूबय (दूबई) आनी कोईटला (कुवेतला) जाईत व्हती. पन आक्क्या जिनगानीत (जिंदगानीत - जिंदगीत) कुनी आम्येरिकेला गेलाय आसा आयिकला न्हवता. पन तुजा नातू आम्येरिकेला ग्याला. जितलास रं जितलास." आजोबा आत्याला सांगत होते. मी त्यांचा सर्वात मोठा नातू. त्यांच्या मोठया मुलाइतकाच म्हणजे माझ्या बाबांइतकाच जवळचा. मला भावनांचा बांध आवरणं कठीण झालं. आणि आजोबांना कडकडून मिठी मारली. मी गदगदून रडत होतो. त्यांचे थरथरणारे हात माझ्या पाठीवरून फीरत होते...

मी परत निघायच्या आधी मला भेटता यावं म्हणून ते गावी आले होते. निघायच्या दिवशी मी त्यांना आमच्या जुन्या घरी भेटायला गेलो. चार गोष्टी केल्या. का कोण जाणे पण मला राहून राहून वाटत होतं की ही त्यांची आणि माझी शेवटची भेट आहे. मी स्वताला आवरुन बोलत होतो. "येतो मी बाबांनो" असं म्हणून मी बाहेर पडलो. निघताना मागे वळून पाहण्याची हिंमत होत नव्हती. डोळे भरून आले होते. ओवरीत आलो. आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली...

आताच्या गणपती पुजनाच्या दिवसाची गोष्ट. मी छोटया भावाला फोन केला. तो आमच्या जुन्या घरी, जिथे आमचा गणपती बसवला होता तिथे होता. दोन्ही चुलते, आत्या सगळ्यांशी बोलून घेतलं. बाजुला खुप गजबज चालू आहे हे कळत होतं. सार्‍यांशी बोलून झाल्यावर आजोबांना फोन दयायला सांगितलं. काही वेळ काहीच आवाज आला नाही. फक्त श्वास सोडल्याचा आणि घेतल्याचा आवाज येत होता. म्हणजे फोन आजोबांच्या हातात होता. थोडया वेळाने त्यांचा कापर्‍या स्वरातील आवाज कानावर पडला, "बाला ब्येस (ठीक) हायेस ना" आणि त्यांनी ढसाढसा रडायला सुरुवात केली. त्या भरल्या गोकुळातही त्यांना साता समुद्रापार असलेल्या थोरल्या नातवाची अनुपस्थिती जाणवत होती...

हा त्यांचा फोटो, गणपतीची पुजा करताना काढलेला. किती शांत भावमुद्रा आहे चेहर्‍यावर...



काल संध्याकाळी सहा साडे सहाला आजोबांचं देहावसान झालं. आता भारतात रात्र असल्यामुळे त्यांचा देह घरीच आहे. उदया सकाळी अग्नी दिला जाईल. आत्मा केव्हाच निघून गेला आहे. अग्नी दिल्यानंतर पंचतत्वांनी बनलेला त्यांचा देहसुदधा पंचतत्वात विलीन होईल...

ज्ञानी असो की अज्ञान, गती एक आहे जाण
मृत्यूला न चुकवी कोणी, थोर असो अथवा सान


या सत्याप्रमाणे आजोबा आमच्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या आठवणी कायम आमच्या सोबत असतील...

Tuesday, September 22, 2009

कधी सांज ढळत असताना...

तो अगदी तन्मयतेने बोलत होता. मीही त्याचं बोलणं एखादया शहाण्या श्रोत्यासारखं ऐकत होतो.

"ते गाणं म्हणजे केवळ प्रेयसीने प्रियकराला घातलेली आर्त साद नाही. तो एका आईने आपल्या गर्भातल्या बाळाशी साधलेला संवाद आहे. भक्ताने शांत अशा गाभार्‍यामध्ये बसून केलेली देवाची आर्त विनवणी आहे. आता या सुरुवातीच्या ओळीच घे ना.

कभी शाम ढले तो मेरे दिलमें आजा ना
कभी चांद खिले तो मेरे दिलमें आजा ना
मगर आना ईस तरहसे के यहासे फीर ना जाना


संध्याकाळची कातरवेळ असो वा अगदी चतुर्थीची रात्र असो, इवलीशी चंद्रकोर हळूहळू आकाशात वर येत असो, माझं मन अगदी व्याकुळ झालेलं असतं. तुझ्याशी एकरुप व्हावं, माझं मीपण तुझ्यात विरून जावं. ईतकं की मला माझ्या अस्तित्वाची जाणिव राहू नये.

गर्भातल्या बाळाचे हुंकार किंवा त्याच्या हालचाली मातेला अगदी असेच आपलं अस्तित्व विसरायला लावतात. तू कधी श्रीधर कवीने लिहिलेलं हरीविजय किंवा या ओवीबद्ध हरीविजयाचं हरीविजय कथासार हे सुलभ मराठी रुपांतर वाचलं आहेस? देवकीच्या आठव्या बाळाच्या जन्माची वेळ जवळ आलेली असते. तो मथुरेतला तुरूंग, ज्यानं याधी सात बाळांचे मृत्यू पाहीलेले आहेत, तो हताश वसूदेव, ज्याला निदान हा आठवा तरी वाचावा या चिंतेने ग्रासलेलं आहे. आणि देवकी? ती मात्र या सार्‍यापासून अलिप्त आहे. ती त्या आठव्याशी एकरूप झालेली आहे. बाहेरच्या जगाचा, वास्तवाचा तिला विसर पडलेला आहे. पोटातल्या विधात्याच्या गर्भाचं तेज तिच्या चेहर्‍यावर पसरलेलं आहे. जणू "परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे" म्हणणारा योगीश्वर कृष्ण आपल्या जन्माआधीच आपल्या जन्मदात्रीच्या नजरेसमोर उभा राहीला आहे...

आणि भक्ताचं देवाशी असलेलं नातं याहून वेगळं असतं का? त्याला तर संध्याकाळच काय पण तिन्ही काळ भगवंतच दिसत असतो. नव्हे, भगवंताहून वेगळे असे अस्तित्व त्याला नसतेच. आता ही नामदेवांच्या अभंगाचीच ओळ पाहा

तुझे ठायी माझे मन, माझे ठायी तुझा प्राण
नामा म्हणे अवघे, विठ्ठलची झाले


भक्त परमेश्वराला सांगत असतो की मी तुझ्यापासून वेगळा नाहीच. मी म्हणजे तू आणि तू म्हणजे मी. माझं मीपण आता उरलेलंच नाही...

तू नही हैं मगर फीरभी तू साथ हैं,
बात हों कोईभी, तेरीही बात हैं
तूही मेरे अंदर हैं, तूही मेरे बाहर हैं
जबसे तुझको जाना हैं, मैने अपना माना हैं


तसा तू रुढार्थाने ईथे नाहीस. पण तरीही तू माझ्या सोबत आहेस असंच मला वाटतं. माझ्या मनात काही विचार चालू असेल तर तुझाच आहे. मी जर कुणाशी काही बोलत असेल तर त्या बोलण्यामध्येही तूच डोकावत असतोस. माझ्या देहात, माझ्या देहाच्या बाहेर, सगळीकडे तूच आहेस.

बाळाच्या जन्माची वेळ तशी लांब असते. पण बाळाच्या आईची नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी केव्ह्ढी लगबग चालू असते. जणू काही बाळ ईथे आहे असंच समजून ती त्याच्यासाठी अंगडी टोपडी शिवते. त्याच्यासाठी पाळण्याची शोधाशोध सुरू करते. भिंतीवर टांगलेल्या कॅलेंडरमधलं गोंडस बाळ जणू आपलंच बाळ आहे असं समजून त्याच्याशी हितगुज करते. ते चित्रातलं बाळ ही केवळ एक प्रतिमा असूनही आई त्याच्यामध्ये आपल्या बाळाला पाहते. येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक नातलगाला कितवा महिना चालू आहे हे लाजून सांगते. "पोटात खुप त्रास देतो का गं" असं कुणी विचारताच मनोमनी सुखावते. तिच्या देहाच्या आतमध्ये तर तो असतोच पण तिच्या बाह्यशरीरावर सुद्धा त्याच्या अस्तित्वाच्या खुणा दिसत असतात. तो येणार आहे हे तिला ज्या पहिल्या ओकारीमुळे कळतं अगदी त्या क्षणापासून तिच्या जगण्याला एक वेगळाच अर्थ मिळालेला असतो. कधी तिला कळतं की तिचं बाळ ही तिची लेक असणार आहे. आपल्या या लेकीच्या पोटात असण्याने ती मोहरून जाते. आपल्या लेकीच्या स्वप्नांमध्ये हरवून जाते. ती रुसली आहे अशी कल्पना करून तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करते.

सोनुले तानुले सानुले माझे, रुसशी किती गं बाई
का गं धरला ईतका अबोला, आहे मी तुझी आई


भक्ताला भगवंत आपल्यापासून दूर आहे असं कधी वाटतंच नाही. त्याच्या दृष्टीने सार्‍या चराचराला तो व्यापून उरला आहे. पाना फुलांत, नदी नाल्यात सगळीकडे तोच आहे.

कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी
लसण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरि


सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी, कर कटावरी ठेऊनिया. पण ते सावळं सगुण रुप पाहण्यासाठी त्याला पंढरपूरला जावं असं वाटत नाही...

रात दिन की मेरी दिलकशी तुमसे हैं
जिंदगी की कसम, जिंदगी तुमसे हैं
तुमही मेरी ऑंखे हो सुनी तनहा राहोंमें
चाहे जितनी दुरी हों, तुम हों मेरी बाहोंमें


माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण तुझा आहे, नव्हे माझं आयुष्यच तुझं आहे. आयुष्याच्या या खडतर प्रवासात तुझी मला साथ आहे. तू माझ्यापासून कितीही दुर असलास तरी माझ्या कुशीत, मिठीत आहेस असंच वाटतं.

बाळाच्या चाहूलीने आईची दुनियाच बदलून जाते. तिचा दिवस, तिची रात्र केवळ त्या चिमुकल्याच्या जाणिवेने उल्हासित होऊन जाते. आता तिचं आयुष्य हे त्याच्या आयुष्यापासून वेगळं नसतंच. कारण तिच्या जगण्याला आता एक नवं कारण मिळणार असतं. तो तिच्यापासून अजून जरी रुढार्थाने दुर असला तरी तो जणू तिच्या कुशीत खेळत असतो.

आणि भक्ताला काय बरे वाटते? ते तुकोबांच्या शब्दातच बघ ना,

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
चालविसी हात धरुनिया
चालो वाटे आम्ही तुझाचि आधार
चालविसी भार सवे माझा


... शब्दांकडे पाहू नको, त्यांच्या अर्थाकडे पाहा. ते शब्द कुठून आले हे पाहू नको, त्यांनी तुला काय दिलं हे पाहा. आयुष्य कसं जगावं हे सांगण्यासाठी तुकारामांचे अभंग किंवा ज्ञानदेवांच्या ओव्या वाचायलाच हव्यात असं काही नाही. ते काम एखादं चित्रपटाचं गीतही करू शकतं. फक्त त्या गीताच्या शब्दांमध्ये तेव्हढी ताकद हवी.

तो बोलत होता. मी त्याच्या चेहर्‍याकडे एकटक पाहत होतो. आज एका संगणक अभियंत्यामध्ये मी प्रवचनकार पाहीला होता...

(लेखामध्ये उल्लेख केलेलं गाणं २००२ सालच्या लकी अली अभिनीत "सुर" या चित्रपटातील आहे.)

Friday, September 18, 2009

हिंदी (आणि इंग्रजी...)

"अरे मी तुला मघाशी फोन केला होता", फोन उचलताच बाबांनी सांगून टाकलं.
"नाही हो. मला काही रींग वगैरे नाही मिळाली. अगदी माझ्या मिस्ड कॉल्समध्येही नाही."
"अरे असं कसं होईल? मी फोन केला तेव्हा कुणी तरी बाई ईंग्रजीत बोलू लागली. नंतर तू सतिश गावडे असं म्हणालास. त्यानंतर टूउंउं असा आवाज आला. पुढे काहीच झालं नाही. म्हणून मी फोन ठेऊन दिला. आणि नंतर बघतोय तर काय बॅलंसमधून सहा रुपये कमी झाले होते."

काय झालं असेल याचा मला अंदाज आला. हलकसंच हसून मी बाबांना सांगू लागलो.
"तुम्ही जे इंग्रजी बोलणं ऐकलंत तो रेकॉर्ड केलेला निरोप होता. त्याचा थोडक्यात अर्थ असा की मी काही कारणास्तव तुमचा फोन उचलू शकत नाही. म्हणून तुमचा निरोप ठेऊन दया. ते जे टूउंउं वाजलं ना त्यानंतर तुम्हाला निरोप बोलायचा असतो. या सगळ्या प्रकाराला व्हॉईसमेल म्हणतात. आणि त्याचे फोन करणाराला पैसे पडतात. तुम्ही निरोप ठेवण्यासाठीचा टूउंउं वाजल्यानंतरही बराच वेळ फोन चालू ठेवला असेल. म्हणून सहा रुपये कमी झाले तुमच्या बॅलंसमधून. खरं तर असा कुणी निरोप ठेवला की ज्याच्यासाठी निरोप ठेवला त्याला ते मिस्ड कॉलप्रमाणेच कळतं. पण माझ्या फोनमध्ये काहीतरी गडबड आहे त्यामुळे नाही कळलं मला."
"असं आहे होय. आता ते आम्हाला कुणी सांगितल्याशिवाय कसं कळणार. आणि त्यात पुन्हा ती सगळी बडबड इंग्रजीत", ईति बाबा.

कधी कधी वाटतं की ही भाषेची समस्या आमच्या संपुर्ण खानदानात असावी.

माझा छोटा डॉक्टर भाऊ शिक्षण संपवून मुंबईला हॉस्पिटलमध्ये जॉब करायला गेला. शिकाऊ डॉक्टर असल्यामुळे त्याला रात्रपाळीत काम करावं लागायचं. या प्रकाराला त्यांच्या भाषेत रेसिडेंशियल मेडिकल ऑफीसर किंवा थोडक्यात आर एम ओ म्हणतात. रात्री अनुभवी डॉक्टरांच्या अनुपस्थितीत हे आर एम ओ रोग्यांना सेवा देतात. असो. तर एकदा सहज म्हणून हॉस्पिटलमध्ये त्याला भेटायला गेलो. बंधूराज एका उत्तर भारतीय रुग्णाशी हिंदीत बोलत होते. हिंदी इतकं उच्च प्रतिचं की त्या रुग्णाला वाटावं आजार परवडला पण या डॉक्टरचं हिंदी बोलणं नको. आता हे उदाहरणच पाहा ना, "ये औशध कितनाबी कडू आसनेदो, तुमको घेना पडेगा. नही तो तुम बरे कैसे होवोगे" !!!

माझं इंग्रजी तर विचारूच नका. अतिशय दिव्य प्रकार आहे तो. नाही म्हणजे शिक्षणाने इंजिनीयर असल्यामुळे, चार वर्ष आयटीत काढल्यामुळे तांत्रिक इंग्रजी त्यातल्या त्यात बरं आहे. पण कुणी इंग्रजीतून हवापाण्याच्या गोष्टी करू लागलं की मी मनातल्या मनात "गणा धाव रे, गणा पाव रे" असा बाल्या नाचाचा फेर धरू लागतो.

साधारण दोन वर्षापूर्वी भारतात असतानाची गोष्ट. अमेरिकन वकिलातीत गेलो होतो व्हिसा इंटरव्ह्यूला. तो गोरा विचारत होता. मी कानात्त प्राण आणून तो काय म्हणतोय हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. कुठे चालला आहेस, कशाला चालला आहेस असे प्रश्न विचारून झाल्यावर पठठयाने पुढचा प्रश्न विचारला, तिकडे किती दिवस राहणार आहेस. मी आपलं ठोकून दिलं की ते कंपनी ठरवेल. त्याचा पुढचा प्रश्न तयार. "व्हॉट ईज युअर गेस?" त्याचा "गेस" हा शब्द मला "गेस्ट" असा ऐकायला आला. आता माझा अमेरिकेत कामानिमित्त जाण्याचा आणि पाहुण्यांचा काय संबंध. मुळात "व्हॉट ईज युअर गेस्ट" या प्रश्नालाच काही अर्थ नव्हता. तेव्हढं ईंग्रजी मला नक्की येत होतं. पण तरीही मी त्या गेस्ट शब्दाभोवतीच घुटमळु लागलो. मी त्या प्रश्नकर्त्याला समजावण्याचा प्रयत्न करू लागलो की बाबा रे मी पाहुणा म्हणून नाही जात आहे. मी कामानिमित्त चाललो आहे. हाच प्रकार अजून दोनवेळा झाला. त्या साहेबाच्या चेहर्‍यावर आता त्रासिक भाव दिसायला लागले होते. वेळ तर सांभाळायला हवी होती. मी सरळ त्याला सांगून टाकलं, ""आय ऍम नॉट गेटींग व्हॉट यू आर सेयिंग. कॅन यू प्लिज फ़्रेम युअर क्वेश्चन सम अदर वे?".

अगदी खळाळून हसला तो. आणि आमची प्रश्नोत्तरांची गाडी पुढे सरकली.

Thursday, September 3, 2009

चंपूची जिंदगी

महेंद्र काकांनी अनिकेतच्या या पोस्टला टाकलेली कॉमेंट वाचली आणि माझ्याही डोक्यात त्या कॉमेंटच्या अनुवादाचा मराठी भुंगा भुणभुण करू लागला. मीही एक आय टी मधला चंपू असल्यामुळे त्यातल्या त्यात हा प्रकार बर्‍यापैकी जमला आहे असं वाटतंय. पण तरीही जर अनुवाद भंगार वाटला तर ते कर्तृत्व आमचं, चांगला झाला असेल तर त्याचे श्रेय त्या अनामिक कवीला...


चंपूची बायको खुपच हैराण झाली होती
नॉट हॅपनिंग जिंदगी वैराण झाली होती
चंपूच्या जीवाला कधी आराम नसायचा
ऑफीसात नुसता काम करत बसायचा

चंपूचा बॉस होता अगदी पक्का शहाणा
दर प्रमोशनला तो शोधी नविन बहाणा
डेडलाईन पठठया कधी विसरला नाही
नऊपूर्वी चंपू घरी कधी अवतरला नाही

चंपूलाही व्हायचंच होतं अगदी बेस्ट
त्यानंही मग कधी घेतली नाही रेस्ट
रात्रंदिन गुलामासारखा राबत राहीला
बढतीसाठी बॉसचे पाय दाबत राहीला

असे दिवसामागून दिवस गेले वर्षे गेली
आणि चंपूची अवस्था फार वाईट झाली
चंपूला ना हल्ली काही आठवतच नाही
कधीकधी चुकून बायकोलाच म्हणतो ताई

शेवटी एक दिवस चंपूला अक्कल आली
प्रमोशनची सारी मोहमाया सोडून दिली
बॉसला म्हणाला तू का रे सतावतो मला
बढतीचा लाडू दाखवून येडा बनवतो मला?

प्रमोशन दे नाही तर ईथून निघून जाईन
इन्क्रीमेंट जरी दिलंस तरी तिथेच राहीन
बॉसही उस्ताद म्हणे तू कुणी मोठा नाही
तुझ्यासारख्या चंपूंना इथे काही तोटा नाही

तुझ्यासारखे चंपू इथे पैशाला दहा मिळतात
करीयरच्या शर्यतीत ते उंदरासारखे पळतात
तू नाही दुसरा कुणीतरी इथे भेटेलंच रे मला
तुझ्यासारखाच दुसरा चंपू बनवेन मी त्याला