Friday, September 18, 2009

हिंदी (आणि इंग्रजी...)

"अरे मी तुला मघाशी फोन केला होता", फोन उचलताच बाबांनी सांगून टाकलं.
"नाही हो. मला काही रींग वगैरे नाही मिळाली. अगदी माझ्या मिस्ड कॉल्समध्येही नाही."
"अरे असं कसं होईल? मी फोन केला तेव्हा कुणी तरी बाई ईंग्रजीत बोलू लागली. नंतर तू सतिश गावडे असं म्हणालास. त्यानंतर टूउंउं असा आवाज आला. पुढे काहीच झालं नाही. म्हणून मी फोन ठेऊन दिला. आणि नंतर बघतोय तर काय बॅलंसमधून सहा रुपये कमी झाले होते."

काय झालं असेल याचा मला अंदाज आला. हलकसंच हसून मी बाबांना सांगू लागलो.
"तुम्ही जे इंग्रजी बोलणं ऐकलंत तो रेकॉर्ड केलेला निरोप होता. त्याचा थोडक्यात अर्थ असा की मी काही कारणास्तव तुमचा फोन उचलू शकत नाही. म्हणून तुमचा निरोप ठेऊन दया. ते जे टूउंउं वाजलं ना त्यानंतर तुम्हाला निरोप बोलायचा असतो. या सगळ्या प्रकाराला व्हॉईसमेल म्हणतात. आणि त्याचे फोन करणाराला पैसे पडतात. तुम्ही निरोप ठेवण्यासाठीचा टूउंउं वाजल्यानंतरही बराच वेळ फोन चालू ठेवला असेल. म्हणून सहा रुपये कमी झाले तुमच्या बॅलंसमधून. खरं तर असा कुणी निरोप ठेवला की ज्याच्यासाठी निरोप ठेवला त्याला ते मिस्ड कॉलप्रमाणेच कळतं. पण माझ्या फोनमध्ये काहीतरी गडबड आहे त्यामुळे नाही कळलं मला."
"असं आहे होय. आता ते आम्हाला कुणी सांगितल्याशिवाय कसं कळणार. आणि त्यात पुन्हा ती सगळी बडबड इंग्रजीत", ईति बाबा.

कधी कधी वाटतं की ही भाषेची समस्या आमच्या संपुर्ण खानदानात असावी.

माझा छोटा डॉक्टर भाऊ शिक्षण संपवून मुंबईला हॉस्पिटलमध्ये जॉब करायला गेला. शिकाऊ डॉक्टर असल्यामुळे त्याला रात्रपाळीत काम करावं लागायचं. या प्रकाराला त्यांच्या भाषेत रेसिडेंशियल मेडिकल ऑफीसर किंवा थोडक्यात आर एम ओ म्हणतात. रात्री अनुभवी डॉक्टरांच्या अनुपस्थितीत हे आर एम ओ रोग्यांना सेवा देतात. असो. तर एकदा सहज म्हणून हॉस्पिटलमध्ये त्याला भेटायला गेलो. बंधूराज एका उत्तर भारतीय रुग्णाशी हिंदीत बोलत होते. हिंदी इतकं उच्च प्रतिचं की त्या रुग्णाला वाटावं आजार परवडला पण या डॉक्टरचं हिंदी बोलणं नको. आता हे उदाहरणच पाहा ना, "ये औशध कितनाबी कडू आसनेदो, तुमको घेना पडेगा. नही तो तुम बरे कैसे होवोगे" !!!

माझं इंग्रजी तर विचारूच नका. अतिशय दिव्य प्रकार आहे तो. नाही म्हणजे शिक्षणाने इंजिनीयर असल्यामुळे, चार वर्ष आयटीत काढल्यामुळे तांत्रिक इंग्रजी त्यातल्या त्यात बरं आहे. पण कुणी इंग्रजीतून हवापाण्याच्या गोष्टी करू लागलं की मी मनातल्या मनात "गणा धाव रे, गणा पाव रे" असा बाल्या नाचाचा फेर धरू लागतो.

साधारण दोन वर्षापूर्वी भारतात असतानाची गोष्ट. अमेरिकन वकिलातीत गेलो होतो व्हिसा इंटरव्ह्यूला. तो गोरा विचारत होता. मी कानात्त प्राण आणून तो काय म्हणतोय हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. कुठे चालला आहेस, कशाला चालला आहेस असे प्रश्न विचारून झाल्यावर पठठयाने पुढचा प्रश्न विचारला, तिकडे किती दिवस राहणार आहेस. मी आपलं ठोकून दिलं की ते कंपनी ठरवेल. त्याचा पुढचा प्रश्न तयार. "व्हॉट ईज युअर गेस?" त्याचा "गेस" हा शब्द मला "गेस्ट" असा ऐकायला आला. आता माझा अमेरिकेत कामानिमित्त जाण्याचा आणि पाहुण्यांचा काय संबंध. मुळात "व्हॉट ईज युअर गेस्ट" या प्रश्नालाच काही अर्थ नव्हता. तेव्हढं ईंग्रजी मला नक्की येत होतं. पण तरीही मी त्या गेस्ट शब्दाभोवतीच घुटमळु लागलो. मी त्या प्रश्नकर्त्याला समजावण्याचा प्रयत्न करू लागलो की बाबा रे मी पाहुणा म्हणून नाही जात आहे. मी कामानिमित्त चाललो आहे. हाच प्रकार अजून दोनवेळा झाला. त्या साहेबाच्या चेहर्‍यावर आता त्रासिक भाव दिसायला लागले होते. वेळ तर सांभाळायला हवी होती. मी सरळ त्याला सांगून टाकलं, ""आय ऍम नॉट गेटींग व्हॉट यू आर सेयिंग. कॅन यू प्लिज फ़्रेम युअर क्वेश्चन सम अदर वे?".

अगदी खळाळून हसला तो. आणि आमची प्रश्नोत्तरांची गाडी पुढे सरकली.

5 अभिप्राय:

सिद्धार्थ said...

>>> "ये औशध कितनाबी कडू आसनेदो, तुमको घेना पडेगा. नही तो तुम बरे कैसे होवोगे" - जबरा...

आणि हो अमेरिकेचा वीसा इंटरव्यू म्हणजे अग्निदिव्य असते बाबा. गोरी चामडी तिकडे काचेपलीकडे बसून हळू आवाजात काही गहन प्रश्न विचारत बसते आणि आपली इकडे तंतरलेली असते...

Photographer Pappu!!! said...

हा हा . मज़ा आली. ते डॉक्टर संभाषण पुढे कसे झाल असेल???? औषध कडू रहा तो भी मोरी मे नही ओतने का, और ये गोली लोग चोख चोख के खाने का...

Satish Gawde said...

धन्यवाद सिदधार्थ, प्रविण !
माझ्या डॉक्टर भावाचे हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. असे हिंदीची काशी घालणारे आपले मराठी बांधव जागोजागी दिसतील :)

Unknown said...

Hi Satish,

My name is Kashmira Naik. I am reading the MisalPAv site from last 7-8 months. I have applied for the membership on the site 2 months before & I have recd the password also. But it is still not allowing me to login. It says Account not created. Can u ask Tatya about this? On the site I have searched, but there is no option where u can write any comment without logging in, like Mayboli.

Thanx n Regds,
Kashmira Naik.

Satish Gawde said...

कश्मिराजी,

तुम्ही मिसळपावच्या वापराबाबतची चौकशी तुम्ही माझ्याकडे का करताय हे मला कळलं नाही. पाच सहा महिन्यांपूर्वी मी मिसळपाववर लिहित असे. हल्ली नाही लिहित. त्यामुळे मी तुम्हाला काही मदत करू शकेन असं वाटत नाही.

माझ्या माहितीप्रमाणे मिसळपाववर "संपर्क करा" (कॉंटॅक्ट अस) चा दुवा नाही. त्यामुळे तुम्ही मिसळपावशी व्यवस्थापनाशी (किंवा तात्यांशी) प्रत्यक्ष संपर्क करू शकणार नाही. तुम्ही असं करा. मिसळपाववरच्या कुठल्याही "सक्रिय" सदस्याची सही (सिग्नेचर) विचारात घ्या. त्या सहीमध्ये त्या सदस्याच्या जालनिशीचा (ब्लॉगचा) दुवा असेल. त्या जालनिशीवर जाऊन तुम्ही तुमची समस्या त्या सदस्याच्या कानावर घाला. तो तुमची समस्या मिसळपावपर्यंत पोहोचवेल.

टीप: तुम्ही गेले ७ - ८ महिने मिसळपावच्या वाचक आहेत. त्यामुळे "सक्रिय" सदस्य ची व्याख्या सांगायची गरज नसावी. :-)

मी तुम्हाला मदत करू शकणार नाही, याबद्द्ल मला वाईट वाटतं :-(