Saturday, September 26, 2009

गती एक आहे जाण...

"मी येईपर्यंत राहतील ना. मला त्यांना त्यांच्या शेवटच्या क्षणांमध्ये भेटायचं आहे. त्यांच्याशी बोलायचं आहे."
"नाही सांगता येत रे. तुला परत यायला जरी फक्त पंधरा दिवस असले तरी बाबा तोपर्यंत राहतील असं सांगता येत नाही. कारण त्यांनी खाणं बिलकुल बंद केलं आहे. पातळ गोष्टी सुदधा खुपच कमी घेतात."

आजोबांबद्दल बोलताना बाबांना भरून आलं होतं.
मी "त्यांचं आता वय झालं आहे. त्यामुळे आज ना उद्या हे होणारच. मात्र त्यांना काही हवं नको याची काळजी घ्या" असं बाबांना समजावत होतो. पण मलाही हुंदके आवरणे कठीण झालं होतं.

साधारण आठवडयाभरापुर्वीची ही गोष्ट. आणि आज मित्राने "आजोबा आपल्यामध्ये नाहीत" अशी मेल टाकली होती. पुढच्या शुक्रवारी मी ईथून निघणार आहे. फक्त एका आठवडयाने माझी आणि आजोबांची चुकामुक झाली आहे. कायमची. मी त्यांना आता कधीच भेटू शकणार नाही...

फेब्रुवारी मध्ये मी सुटटीला आलो होतो तेव्हा मी आजोबांना भेटलो. मुंबईला आत्याकडे राहायला गेले होते काही दिवसांसाठी. विक्रोळीच्या कन्नमवार नगरातल्या झोपडपट्टीत आत्याची रुम. नाक मुठीत धरून गेलो रूमवर. दहा बाय दहाची सुद्धा खोली नसावी. मध्यभागी आत्याच्या छोटीचा पाळणा. बाजुलाच एक छोटीशी कॉट. कॉटवर आजोबा बसलेले. डोक्याला टॉवेल गुंडाळलेला. अंगावर बहुतेक घोंगडी असावी.

"मी म्हनलो व्हतो ना तुला माजा पॉरगा भायरगावावरना आला का उडया टाकीत मना भेटायला येल म्हनून. मना लोका म्हन्तात रामचंदर कमाल हाय तुजी. तुज्या ल्याकान पॉरांना शिकवलान, पॉरा पन डाक्टर ईंजिनेर झाली. आजपरत लोका डूबय (दूबई) आनी कोईटला (कुवेतला) जाईत व्हती. पन आक्क्या जिनगानीत (जिंदगानीत - जिंदगीत) कुनी आम्येरिकेला गेलाय आसा आयिकला न्हवता. पन तुजा नातू आम्येरिकेला ग्याला. जितलास रं जितलास." आजोबा आत्याला सांगत होते. मी त्यांचा सर्वात मोठा नातू. त्यांच्या मोठया मुलाइतकाच म्हणजे माझ्या बाबांइतकाच जवळचा. मला भावनांचा बांध आवरणं कठीण झालं. आणि आजोबांना कडकडून मिठी मारली. मी गदगदून रडत होतो. त्यांचे थरथरणारे हात माझ्या पाठीवरून फीरत होते...

मी परत निघायच्या आधी मला भेटता यावं म्हणून ते गावी आले होते. निघायच्या दिवशी मी त्यांना आमच्या जुन्या घरी भेटायला गेलो. चार गोष्टी केल्या. का कोण जाणे पण मला राहून राहून वाटत होतं की ही त्यांची आणि माझी शेवटची भेट आहे. मी स्वताला आवरुन बोलत होतो. "येतो मी बाबांनो" असं म्हणून मी बाहेर पडलो. निघताना मागे वळून पाहण्याची हिंमत होत नव्हती. डोळे भरून आले होते. ओवरीत आलो. आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली...

आताच्या गणपती पुजनाच्या दिवसाची गोष्ट. मी छोटया भावाला फोन केला. तो आमच्या जुन्या घरी, जिथे आमचा गणपती बसवला होता तिथे होता. दोन्ही चुलते, आत्या सगळ्यांशी बोलून घेतलं. बाजुला खुप गजबज चालू आहे हे कळत होतं. सार्‍यांशी बोलून झाल्यावर आजोबांना फोन दयायला सांगितलं. काही वेळ काहीच आवाज आला नाही. फक्त श्वास सोडल्याचा आणि घेतल्याचा आवाज येत होता. म्हणजे फोन आजोबांच्या हातात होता. थोडया वेळाने त्यांचा कापर्‍या स्वरातील आवाज कानावर पडला, "बाला ब्येस (ठीक) हायेस ना" आणि त्यांनी ढसाढसा रडायला सुरुवात केली. त्या भरल्या गोकुळातही त्यांना साता समुद्रापार असलेल्या थोरल्या नातवाची अनुपस्थिती जाणवत होती...

हा त्यांचा फोटो, गणपतीची पुजा करताना काढलेला. किती शांत भावमुद्रा आहे चेहर्‍यावर...काल संध्याकाळी सहा साडे सहाला आजोबांचं देहावसान झालं. आता भारतात रात्र असल्यामुळे त्यांचा देह घरीच आहे. उदया सकाळी अग्नी दिला जाईल. आत्मा केव्हाच निघून गेला आहे. अग्नी दिल्यानंतर पंचतत्वांनी बनलेला त्यांचा देहसुदधा पंचतत्वात विलीन होईल...

ज्ञानी असो की अज्ञान, गती एक आहे जाण
मृत्यूला न चुकवी कोणी, थोर असो अथवा सान


या सत्याप्रमाणे आजोबा आमच्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या आठवणी कायम आमच्या सोबत असतील...

4 अभिप्राय:

Photographer Pappu!!! said...

मित्रा, अशा प्रसंगी सान्त्वन करण्यासाठी शब्दही अपुरेच पडतात. काळजी घे स्वत:ची.

Vikrant said...

May his soul rest in peace....

रविंद्र "रवी" said...

सुंदर
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Pravin P Mohite said...

i do not know you...but some how...i feel you are close to me... your writing comes from heart.... god bless you....