जर तुझ्या जगात उलथापालथ होताना
कुणी तुझ्या हाकेला ओ दिलीच नाही,
तुला आधाराची नितांत गरज असताना
निसटत्या क्षणी मदत मिळालीच नाही,
कातरवेळी दूर जाणार्या वाटेकडे पाहूनही
मायेचा स्पर्श करणारं कुणी आलंच नाही,
नजरेमध्ये गगनभरारीचं स्वप्न असताना
तुझ्या पंखांना कुणी जर बळ दिलंच नाही,
जर कधी झाकोळून गेलं निळं आभाळ सारं
तू भर दर्यात अन कधी बेईमान झालं वारं,
निरव एकाकी वाटेत तू अडखळत असताना
कुणीच नसेल बाजुला तुला आधार देणारं,
माझ्या खांद्यावर विश्वासाने डोकं ठेव अन
तुझ्या आसवांना तू वाट मोकळी करुन दे
विसरुन जा जिवलगा सार्या जगाला अन
मनामध्ये नवी उमेद पुन्हा एकदा भरून घे
Wednesday, August 4, 2010
मनामध्ये नवी उमेद पुन्हा एकदा भरून घे
Monday, May 24, 2010
इंद्रायणीकाठी
गुढीपाडव्याचा दिवस होता. गुरुवार. नेमका आठवडयाच्या मध्ये आलेला. एक दिवसाच्या सुटटीचं काय करावं हा प्रश्नच होता. आता तुम्ही म्हणाल पुण्यातले थियेटर काय ओस पडलेत? घ्यायचं कुठल्या तरी पोरीला घ्यायचं आणि मस्त ई स्क्वेअरला जायचं. निदान सिटीप्राईडला तरी जायला काहीच हरकत नाही. हाय काय ना नाय काय. पण प्रॉब्लेम असा हाये की ना आपण पोरीबाळींच्या वाटेला जातो ना आपल्याला पिच्चर बगन्यात यिंटरेष्ट हाये. असो. गावी घरी जावं तर जायचे दिडशे आणि यायचे दिडशे असा तीनशे किलोमीटरचा प्रवास एका दिवसात करायला जीवावर येतं. दुसर्या दिवशी यायचं ठरवावं तर सकाळी लवकर उठायचा कंटाळा येतो. आळंदीला जाऊया असाही एक विचार मनात आला. ज्याअर्थी ऑफीसच्या दारावरुन पीएमपीएलच्या आळंदी बसेस जातात त्याअर्थी इथेच कुठेतरी पुण्याच्या आसपास असणार आळंदी. पण लगेच जाणवलं की आता भयानक ऊन लागेल दुपारच्या वेळी. ऊनाच्या भितीने लगेच झटकून टाकला तो विचार. मग शेवटी पुण्यातच भटकायचं ठरवलं. तसाही पुण्यात नविनच असल्यामुळे फ़क्त जे एम रोड, एफ़ सी रोड आणि सिंहगड रोड आणि कर्वे रोड असे तीन चारच रस्ते ओळखीचे. काय म्हणताय, जे एम आणि एफ़ सी बरे माहिती आहेत? नाही हो, तुम्हाला वाटतंय तसं काही नाही. हे दोन्ही रस्ते एकेरी वाहतूकवाले असल्यामुळे ऑफीस ते घर हा प्रवास या दोन रस्त्यांवरून त्यातल्या त्यात सुखाचा होतो. बास, ठरवलं. एफ़ सी रोडवरून संचेतीपर्यंत आपल्या पायाखालच्या वाटेने जायचं आणि तिथून मात्र समोर दिसेल त्या रस्त्यावर गाडी टाकायची.
संचेतीवर आलो. डाव्या हाताचा रस्ता ऑफीसकडे जाणारा. ओळखीचा. म्हणून तो बाद. उजव्या दिशेला जात राहीलो. उजव्या हाताला रेल्वेची धडधड ऐकू येऊ लागली. म्हणजे पुणे स्टेशन आलं होतं तर. स्टेशन मागे टाकून पुढे जात राहीलो. एक तिठा आला. तिठा म्हणजे काय विचारताय? अहो जिथे तीन रस्ते एकमेकांना मिळतात त्या जागेला तिठा म्हणतात. तुमचं मराठीचं शब्दांचं ज्ञान खुपच तोकडं आहे बुवा. असो असो. "आज क्लासेस हा एक बिझनेस झाला आहे.परंतू बिझनेस करताना काही इथिक्स पाळायचे असतात" अशी वाक्यं असणारे "टॉपच्या" लेखकांचे लेख वाचले की होतं असं. तर आपण कुठे होतो. अहो असं काय करताय राव? तिठयावर होतो नाही का? तर माझ्या डाव्या हाताला जो रस्ता जात होता त्याच्यावर जे फलक होते त्यावर आळंदी, मुंबई असं लिहिलेलं होतं. मला ना आळंदीला जायचं होतं, ना मुंबईला. त्यामुळे तो रस्ता बाद. आता राहीला उजव्या हाताचा रस्ता. फलक वाचले. ती उडडाणपुलाची सुरुवात होती. सोलापूरला जाणार्या कुठल्यातरी महामार्गावर तो उडडाणपुल निघत असावा बहुतेक. किंवा आधी पुण्याच्याच कुठल्यातरी भागात जाऊन नंतर सोलापुरच्या दिशेने जाणारा रस्ता असावा तो. मी आपला उगाच नसते उपद्व्याप नकोत म्हणून उडडाण्पुलावर न जाता पुलाखालून जो छोटा रस्ता जात होता त्याच्यावरून मार्गक्रमणा करु लागलो. तो छोटा रस्ता ओकवूड की अशाच काहीशा नावाच्या एका झ्याकपाक सोसायटीच्या बाजुने घेऊन जाऊ लागला. थोडया वेळाने जरा मोठया रस्त्याला लागलो. फारसा विचार न करता गाडी उजवीकडे टाकली. आणि आश्चर्य. मी चक्क तिथेच आलो होतो. जिथे मी आळंदीला जायचं नाही म्हणून डावीकडे न जाता उजवीकडे वळलो होतो.
गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. थोडा वेळ विचार करू लागलो. बास का राव? विचार काय तुम्हालाच करता येतो. काय योगायोग पाहा. आळंदीला जायचं नसताना मी पुन्हा आळंदीला जाणार्या वाटेवर आलो होतो. ही माऊलींचीच ईच्छा तर नाही. नव्हे माऊलींनीच तर मला रस्ता चुकवून पुन्हा आळंदीच्या वाटेवर तर आणलं नाही ना? अन स्वत:चंच हसायला आलं. हा एक निव्वळ योगायोग. या असल्या चमत्कारावर तर माझे माळकरी बाबाही विश्वास ठेवणार नाहीत. तर मी असा विचार करणे हा मुर्खपणाच. आता मात्र मी फारसा विचार न करता आळंदीच्या वाटेला लागलो. अकरा साडे अकराचा सुमार होता. उन लागायला सुरुवात झाली होती. आणि त्यात मी टी शर्ट घातला होता. म्हणजे तसं उनाचं काही वाटत नाही. ईंजिनीयरींगला असताना अगदी बारा बारा तास शेतात भातकापणी केलीय. पण हल्ली वेगळंच टेन्शन येतं. लोक खुप चौकस झालेत हल्ली. मुलाने प्रोफाईलमध्ये तर वर्ण गोरा असं लिहिलंय. पण हा तर चक्क सावळा आहे. आमच्या पिंकीला की नाही गोरा मुलगा हवा आहे. हे असले प्रकार होतात. म्हणून मी कातडी उन्हाने रापू नये खुप काळजी घेतो. मागे सिंहगडावर गेलो तेव्हा आख्खी ८० मिलीची सन क्रीमची टयुब एकदाच तोंडाला आणि हाताला फासली होती.
आळंदीला आलो. पार्किंगमध्ये गाडी घातली. समोरुन एक माणूस पावतीपुस्तक नाचवत समोर आला. पाच रुपयांची पावती फाडली. गाडीची जबाबदारी आमच्यावर नाही असं त्या पावतीच्या खाली ठळक अक्षरात लिहिलं होतं. मग हे लेकाचे पाच रुपये कसले घेतात? जागा एक तर सरकारची असावी किंवा देवस्थानाची. पार्किंगची झाडलोट करायला पैसे लागतात म्हणावं तर जिकडे तिकडे कचरा अगदी भरभरून पडलेला. चालायचंच. मी इंद्रायणीच्या घाटावर आलो. हो. देवस्थानाच्या नदीला जर पायर्या बांधल्या असतिल तर त्याला घाट म्हणतात. नदीचं पाणी बर्यापैकी आटलेलं. काही ठीकाणी तर चक्क शेवाळ आलेलं. बाजुला कसलंसं कुंड. त्याची अवस्था तर अगदी भयानक. बेकार वास येत होता त्याच्या पाण्याचा. मी पटकन तिथून बाजुला झालो. बाया-बापे, पोरंसोरं त्या पाण्याने आंघोळ करत होते. काही गावाकडचे लोक तर काही शहरातले त्यातल्यात्यात सुशिक्षित वाटत होते. काही जण तर चक्क डिजिटल कॅमेर्याने फोटो काढत होते. हे फोटो ते नक्की ओरकुटवर टाकण्यासाठी काढत होते. हल्ली खुप फॅड आलंय या गोष्टींचं मध्यम वर्गामध्ये. विशेषत: आय टी वाल्यांमध्ये. देवस्थानाला पिकनिकसाठी जायचं आणि परत आल्यावर आख्ख्या हापिसाला मेल टाकायची अमुक तमुक प्रसाद ऍट माय डेस्क. दोन तीन दिवसांत ओरकुटवर फोटोही अपलोड करायचे. हेही चालायचंच.
मला काही स्नान वगैरे करायचं नव्हतं. इंद्रायणीचं असलं म्हणून काय झालं, त्या तसल्या पाण्यानं आंघोळ करायची मी कल्पनासुद्धा करु शकत नव्हतो. उगाच आपले पाय पाण्यात बुचकाळले. आणि मंदिराच्या दिशेने चालू लागलो. (इथे खरं तर एक पाणचट कोटी करावीशी वाटतेय. पण नको. उगाच देवाधर्माच्या लेखामध्ये तसले उल्लेख नकोत.) एक आजोबा हातात गंधाचा डबा घेऊन माझ्या दिशेने आले. थांब बाळा असं म्हणून हातातल्या तारेचा आकडा त्या डब्यात बुडवून माझ्या कपाळाला गंध लावला. मीही त्या आजोबांना नमस्कार केला. खिशातून दोन चार रुपये काढून त्यांच्या हातावर टेकवेले. उगाचच लहानपणी भजनांमध्ये तारस्वरात म्हटलेल्या "विठोबा तुझा मला छंद, कपाळी केशरी गंध" या गजराची आठवण झाली. मंदिर जवळ आले होते. हार फुले, प्रसाद आणि धार्मिक पुस्तकांची दुकाने दोन्ही बाजुला दिसू लागली होती. प्रत्येक दुकानदार अक्षरश: खेकसत म्हणत होता, "या साहेब. इथे चपला काढा. पुढे मंदिर आहे." च्यायला. काय कटकट आहे. माझ्या चपलांचं काय करायचं ते माझं मी बघेन ना. आणि मंदिरात चपला नेऊ नयेत एव्हढी अक्कल मलाही आहे. ठेविन की कुठेतरी बाजुला, मंदिरात शिरण्याआधी. एकजण खुपच मागे लागला. शेवटी काढल्या चपला आणि ठेवल्या त्याच्या स्टॉलच्या खाली तर भाऊसाहेबांनी माझ्यासमोर हार-फुले, पेढे असं बरंच काही धरलं. लोकांनी देवाला वाहिलेल्या या गोष्टी मागच्या दाराने दुकानात येतात हे माहिती असल्यामुळे मी देवाला फुलं वगैरे वाहायच्या कधी भानगडीत पडत नाही. पण तो दुकानदार फारच मागे लागला. मग मीही फार नखरे न करता पहिलीच वेळ आहे म्हणून फक्त फुलं घेतली आणि चालू पडलो.
देवळाच्या आवाराच्या मुख्य दरवाजातून प्रवेश केला आणि हादरलो. भली मोठी रांग होती दर्शनासाठी. अगदी क्षणभर ईथूनच नमस्कार करून माघारी फिरावं असा विचारही मनात चमकून गेला. पण तो विचार मनातून झटकून टाकला. रांगेच्या शेवटी जाऊन उभा राहीलो. पुढच्या एका आजोबांना विचारलं की दर्शन होण्यासाठी अंदाजे किती वेळ लागेल. "कमीत कमी अडीच तास" आजोबांनी अगदी निर्विकारपणे सांगितलं. "देवाचिये दारी, उभा क्षणभरी" म्हणणार्या ज्ञानदेवांच्या दाराशी अडीच तास उभं राहायचं या कल्पनेनेच मला कसंतरी होऊ लागलं. आता माझ्या मागे रांग वाढू लागली. मग मीही मनातले सगळे विचार झटकून ते वातावरण एंजॉय करू लागलो. नदीच्या घाटावर जसे सर्व प्रकारचे लोक म्हणजे गावातले, शहरातले लोक दिसले होते, तसेच इथेही होते. माझ्या थोडा पुढे एक माळकरी काका आणि आजोबा लोकांचा ग्रुप होता. ते हरीपाठाचे अभंग म्हणत होते. हरीपाठाचे अभंग माझ्याही आवडीचे. नामस्मरणाचे महत्व साध्यासोप्या शब्दांत सांगण्यासाठी ज्ञानदेवांनी हरीपाठाचे अभंग या नावाने एकुण अठठाविस अभंग लिहिले. लहानपणी शाळेतून आल्यावर गावच्या मारूतीच्या देवळात होणार्या हरीपाठाला मीही न चुकता जात असे. वारकरी लोकांमध्ये हरीपाठाचे अभंग म्हणण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. जमलेल्या लोकांचे दोन ग्रुप करायचे. एका ग्रुपने एक ओळ म्हणायची. दुसर्याने त्याच्यापुढची. मग पहिल्या ग्रुपने त्याच्यापुढची. आताही तसंच होत होतं. मी त्या ग्रुपच्याही पुढे पाहीलं तर एक बायकांचा ग्रुप होता. काकू कॅटेगरीतल्या बायका हिरव्यागार सहावारी नेसलेल्या तर आजी कॅटेगरीतल्या बायका नऊवारी. कपाळावर भलामोठा गंधाचा टीळा ही काकू आणि आजींमधली कॉमन गोष्ट. त्याही काहीतरी म्हणत होत्या. माझ्या पुढयातले काका लोक अंमळ जोरातच हरीपाठ म्हणत असल्यामुळे मला त्या काकू ग्रुपचं बोलणं निटसं ऐकायला येत नव्हतं. जरा कान देऊन ऐकल्यावर कळलं की त्या "ज्ञानोबा माउली तुकाराम" असा गजर म्हणत आहेत.
रांग आता बारीत शिरली होती. वरती सीसी टीव्ही कॅमेरे लावलेले दिसत होते. बरीच जळमटं साचली होती त्या कॅमेर्यांवर. बहूतेक कॅमेरे लावल्यानंतर पुन्हा काही त्यांच्याकडे कूणी पाहीलं नसावं. त्यामूळे ते कॅमेरे कुणी मॉनिटर करत असेल किंवा त्यांचं रेकॉर्डींग कुणी पाहत असेल याची किंचितही शक्यता नव्हती. या बारीचं वैशिष्ट्य म्हणजे लोकांना रांगेमध्ये अक्षरश: जखडून टाकलं जातं. जर कुणाला एकीला, दोनाला जायचं झालं तरी बारीतून बाहेर पडणं अवघड असतं. (आणि समजा बाहेर पडता आलं तरी जाणार कुठे हा प्रश्न आहेच. आपल्याकडे सार्वजनिक ठीकाणी स्वच्छतागृहांची बोंब असते.) पण मला खटकलं ते वेगळंच. या लोकांनी मारे जिकडे तिकडे लिहून ठेवलंय की शिस्त पाळा, रांग तोडू नका वगैरे वगैरे. देवाच्या दारी काही होऊ नये पण समजा दुर्दैवाने काही झालंच तर बारीतल्या लोकांना बाहेर कसं पडता येईल याबद्दल कुठेच काही सुचना नाहीत. किंबहूना बारीची रचनाच अशी असते की लोक बाहेर पडू शकत नाहीत. आळंदी काय किंवा ईतर कुठलेही देवस्थान, आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने खरंच काही करत असेल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.
खुप मोठं प्रश्नचिन्ह मनात ठेऊन मी बारीतून पुढे सरकू लागलो. गाभार्याच्या दरवाजाशी पोहचलो. भयानक गर्दी होती. जेमतेम एक माणूस आत जाऊ शकेल एव्हढया छोट्या दरवाजातून एका वेळी तीन चार माणसं आत जाण्याचा प्रयत्न करत होती. कसाबसा आत घुसलो. समाधीवर माथा टेकवला. जेमतेम दोन सेकंद झाले असतील ईतक्यात बडव्याने अक्षरश: पुढे ढकललं मला. संताप झाला जीवाचा. *डव्या समाधी काय तुझ्या बापाच्या मालकीची आहे अशी सणसणीत शिवी मनातल्या मनात त्या बडव्याला घातली. कबुल आहे, खुप मोठी रांग असते, लोक समाधीवर माथा टेकवल्यानंतर माथा बराच वेळ उचलत नसतील. पण म्हणून काय ढकलायचं माणसाला? एखाद्याला दरवाजा वगैरे लागला म्हणजे? मंदिरातून बाहेर पडलो. समाधीकडे तोंड करून माफी मागितली. आणि अश्वत्थ पाराच्या बाजुला येऊन बसलो.
थोरामोठयांनी गोष्ट म्हणून सांगितलेला, पुस्तकांमधून वाचलेला तो आठशे वर्षांपुर्वीचा ईतिहास नजरेसमोरून सरकू लागला. संसार सोडून संन्याशी झालेले विठ्ठलपंत. त्यांचं गुरुच्या आज्ञेवरून पुन्हा ग्रुहस्थाश्रम स्विकारणं. निवृती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता या चार मुलांचा जन्म. आळंदीच्या ब्रम्हवृंदानं विठठलपंताना समाज बहिष्कृत करणं. आणि शेवटी पापाचं प्रायश्चित्त म्हणुन ही चार लेकरं झोपेत असताना मात्यापित्यांचं इंद्रायणीच्या डोहात उडया घेणं. सारं विलक्षण. त्यानंतर स्वत:ला ज्ञानी म्हणवून घेणार्या ब्रम्हवॄंदानं या चार चिमुकल्यांचे केलेले हाल यांचं वर्णन तर अंगावर काटा आणणारं. नंतरचे त्यांचे चमत्कार तर आश्चर्याने तोंडात बोटं घालावीत असे. खरेच का निवृतींला अंधार्या रात्री ब्रम्हगिरीच्या निबिड रानात गहीनीनाथांनी गुरुपदेश केला असेल? खरेच का ज्ञानदेवाने रेडयामुखी वेद बोलविले असतिल, खरंच का त्याने वाघावर बसून आपल्या भेटीला येणार्या चांगदेवाच्या भेटीला जाण्यासाठी जड भिंत चालविली असेल? खरंच का त्याने प्रेतयात्रेमधील प्रेताला जिवंत करून आपल्या भावार्थदिपिकेचा लेखक बनवला असेल? ज्ञानदेव योगी होता. जिवंत समाधी घेऊ शकणारा योगी. आपल्या योगसामर्थ्याच्या जोरावर त्याने हे केलंही असेल. त्यामुळे कदाचित हे सारं खरं असेलही. कदाचित खरं नसेलही. कुठल्याही देवाच्या, संताच्या चरित्रात दंतकथा असतात, तशा कदाचित या गोष्टीही दंतकथा असतील. कदाचित या गोष्टी रुपकात्मक असतील.पण तरीही हे सारं खरं असो किंवा खोटं असो, त्यामूळे ज्ञानदेवाच्या संतपणाला कमीपणा येत नाही.
ज्या वयात आजची विज्ञान युगातील मुलं बारावीच्या सीइटीला सत्त्याण्णव अठठयाण्णव टक्के मार्क आणण्यासाठी रात्रंदिवस घोकंपटटी करतात त्या वयात ज्ञानदेवाने भगवदगीतेवर भावार्थदिपिका नावाचा टीकात्मक ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ जनसामान्यांमध्ये ज्ञानेश्वरी म्हणून प्रसिद्ध झाला. असे म्हणतात की ज्ञानेश्वरीच्या एकेका ओवीवर पिएचडी होऊ शकते. भावार्थदिपिकेच्या जोडीनेच अम्रूतानुभव, चांगदेव पासष्टी, हरीपाठाचे अभंग, आज वारकर्यांचं भजन ज्या अभंगाने सुरु होतं त्या "रुप पाहता लोचनी" या अभंगापासून "पैल तो गे काऊ कोकताहे" या बैरागी रागातल्या गीतापर्यंत सार्या साहित्यरचनेने अमृताते पैजा जिंकणार्या मराठीला समृद्ध करणारी ही कामगिरी त्याने वयाच्या अठराव्या वर्षाच्या आधीच केली. हा मात्र नक्कीच चमत्कार आहे. पुरावा असणारा चमत्कार. या वारकरी पंथाच्या संस्थापक असणार्या ज्ञानियांच्या राजाला आज आठशे वर्षानंतरही उभा महाराष्ट्र माउली म्हणून साद घालतो. हाही चमत्कार नाही काय?
पारावर बसून बराच वेळ झाला होता. पोटात कावळे ओरडू लागले होते. समाधीकडे तोंड करून मी पुन्हा एकदा नमस्कार केला आणि देवळाच्या आवाराच्या बाहेर पडलो. आजुबाजुला त्यातल्या त्यात बरं हॉटेल पाहीलं आणि आत शिरलो. साधी थाळी मागवली. घशाला कोरड पडली होती म्हणून थंडाही मागवला. ईतक्यात एक आजोबा बाजूला येऊन उभे राहीले. पांढरं मळकं धोतर, पांढरा शर्ट. कपाळावर टीळा. "बाला बसू काय रं हितं" आजोबांच्या बोलण्यात केविलवाणेपणा होता. बहुतेक त्यांना पांढरपेशांचा हाडूत हुडूत करण्याचा अनुभव असावा. मी बसा म्हणताच आजोबा बसले. वेटर थंडा घेऊन आला. मी एक रिकामा ग्लास मागवला. आजोबांना थंडा देता यावा म्हणून. ईतक्यात एक आजीबाई माझ्या पुढयात येऊन बसल्या. अगदी पार म्हातार्या. साठीच्याही पुढे असाव्यात. बहुधा इथेच मागून खात असाव्यात असं कपडयांवरुन वाटत होतं. समोर त्या आजी बसलेल्या असताना केवळ त्या आजोबांना थंडा देणं प्रशस्त वाटेना. म्हणून अजून एक रिकामा ग्लास मागवला. तिन्ही ग्लास समसमान भरले. आजोबांनी हसर्या चेहर्याने माझ्याकडे पाहीलं आणि मी देऊ केलेला थंडयाचा ग्लास लगेच घेतला. आजी मात्र थंडा घ्यायला तयार होईनात. शेवटी हो नाही करत घेतला त्यांनी तो ग्लास घेतला. थंडा पिताना एक अनोखं समाधान आजींच्या चेहर्यावर दिसत होतं. थंडा पिऊन होताच आजींनी ग्लास खाली ठेवला आणि चक्क मला हात जोडले. त्या सुरकुतलेल्या चेहर्यावर समाधानाची, कृतज्ञतेची भावना दिसत होती. घोटभर थंडयाने समाधान पावणार्या त्या साठ पासष्ट वर्षांच्या आजींकडे पाहून मला आम्हा आय़टीवाल्या काल परवाच्या शाळकरी पोरांची कीव वाटली. वर्षाला काही लाखांमध्ये कमवणारे आम्ही आयटीवाले "सालं माझंच पॅकेज कसं बकवास आहे" हे गावभर सांगत फिरतो. एखाद्या छोटया वाडीचं पुर्ण महिन्याचं वाण सामान येईल ईतका पगार महिन्याकाठी घेउनही आम्ही समाधानी असे नसतोच. मग त्याची कारणे घराचे हप्ते, गाडय़ांचे हप्ते अशी काहीही असोत.
जवळपास साडे तीन-चार वाजले होते. उन्हे खाली झाली होती. मंदिराच्या शिखराकडे पाहून मी पुन्हा एकदा ज्ञानियांच्या राजाला नमस्कार केला आणि परतीच्या वाटेला लागलो...
Tuesday, March 2, 2010
मायमराठीच्या नावानं...
दिनांक २६ फ़ेब्रुवारी.
जागतिक मराठी भाषा दिन.
एक "मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा" असा विषय असलेला विरोप उघडण्याची वाट पाहत मेलबॉक्समध्ये पडून होता.
पाठवणारा ओळखीचा होता. म्हणजे तशी ओळख नाही. तोही माझ्यासारखाच एक पुणेस्थित हौशी ब्लॉगर. कधीतरी त्याचं लेखन वाचतो. नेहमीच चांगलं असतं असं नाही, पण प्रामाणिकपणे लिहितो, त्यामुळे बरेच वेळा मनाला भावतं.
विरोप उघडला. विरोपातही तेच. "मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा" ही एव्हढी एकच ओळ. विरोपाला कचर्याची पेटी दाखवण्याआधी उत्सुकता म्हणून "टु" मध्ये कोण कोण आहेत पाहीलं. मोजायला सुरुवात केली. दहा, वीस, तीस... बापरे, यादी संपायलाच तयार नाही. पठ्ठयाने एव्हढे सारे ईमेल आय डी कुठून मिळवले असतील हा प्रश्न डोकं खाऊ लागला.
का कोण जाणे, पण हे असे एका ओळीचे शुभेच्छावाले विरोप किंवा चार ओळींचे ते र ला र आणि ट ला ट जोडलेले सणासुदीला पुढे ढकलले जाणारे लघूसंदेश (यसेमेस :प) डोक्यात जातात. अरे जर शुभेच्छाच दयायच्या आहेत तर करा फोन आणि बोला चार शब्द त्या व्यक्तीशी. ते नाही होणार. मी मला कुणाकडून तरी आलेला संदेश माझ्या नात्यातल्या, ओळखीतल्या, ऑफीसातल्या लोकांना पाठवला. माझ्या जबाबदारीतून सुटलो, अशी एकंदरीत भावना...
असो. दुसर्या दिवशी त्याच विरोपाला "रीप्लाय टु ऑल" उत्तर. उत्तर देणारा बहुतेक "पहील्या" विरोपाच्या "टु" मधला असावा. विषय होता "मराठी खरोखरच डाऊनमार्केट आहे काय?". विरोपामध्ये फक्त दोन ओळी खरडलेल्या होत्या. त्या दोन ओळींच्या खाली एक वेबदुनियावरील मुळ लेखाकडे घेऊन जाणारा दुवा. आपल्या वेबदुनियावरील लेखाचं मार्केटींग करण्यासाठी साहेबांनी किती कल्पक मार्ग शोधला...
"पहिल्या" विरोपाला अजून एक "रीप्लाय टु ऑल" उत्तर:
मित्रानो, मराठी दिनानिमित्त हार्दीक शुभेच्छा. प्रेषक: अ ब क. माझ्या ब्लॉगला भेट दया, अबक.ब्लॉगस्पॉट.कॉम
या शुभेच्छा आहेत की अ. ब. क. यांच्या ब्लॉगची जाहीरात? कहर म्हणजे या महाशयांनी चक्क होळीच्याही जाहीरातवजा शुभेच्छा देऊन टाकल्या. ते करण्यासाठी अ. ब. क. यांनी "पहील्या" विरोपाला "रीप्लाय टु ऑल" केले हे सुज्ञ वाचकांनी ओळखले असेलच.
अशा सहा सात जणांनी या वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले...
अर्थात हे सगळं मी लिहिलं म्हणजे मी मराठीद्वेष्टा आहे असं नाही. मलाही मराठी असल्याचा, मराठी भाषेचा अभिमान आहे. पण हा सगळा प्रकार खटकला.कुणी एक अतिउत्साही ब्लॉगर ८० - ९० ईमेल आय डी कुठूनतरी मिळवतो काय, एका ओळीचा विरोप त्या सगळ्याना पाठवतो काय, आणि त्या विरोपाला सात आठ "रीप्लाय टु ऑल" उत्तर देतात काय. सारंच विचित्र. शेवटी एकाने बिचार्याने "रीप्लाय ऑल" थांबवा अशी विनंती केली. आशा होती की त्यानंतर तरी हा प्रकार थांबेल. पण काही फरक पडला नाही. अजून एका गरीब बापडयाने विनंती केली. पण हे माय मराठीचे सरदार काही आपले घोडे मागे फीरवायचे नाव घेईनात.
आज मुळ विरोपास सात दिवस झाले. पण हा धागा काही शांत व्हायचं नाव घ्यायला तयार नाही. आज तर चक्क कहर झाला आहे. मराठीचा तथाकथित कैवार घेत सुरु झालेल्या या धाग्याला चक्क इंग्रजी उत्तर मिळालं आहे. "Dare to win" हा विरोपाचा विषय, आणि मुद्दाही तोच. जोडीला इंग्रजी लिखाण असलेली चार पाच चित्रे. विरोप पाठवणारा विरोपाच्या शेवटी आपल्या ब्लॉगचा दुवा द्यायला विसरलेला नाही हे सांगायची काही गरजच नाही.
आणि पुन्हा आपल्या विरोपाचा पत्ता या धाग्यामध्ये असल्यामुळे हताश झालेल्या ब्लॉगर आणि वाचकांची पत्रे...
माझी या धाग्याला उत्तर देणार्यांना कळकळीची विनंती आहे की, बाबांनो आपण सगळी माय मराठीची लेकरे आहोत. आपण सगळेच आपापल्या परीने जालावर मराठीत लेखन करून मराठीला "डाऊनमार्केट भाषा" म्हणणार्यांना सडेतोड उत्तर देत आहोत. पण तरीही, आपल्या ब्लॉगची माहीती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तुम्ही जी पद्धत निवडली आहे ती चूकीची आहे. अनोळखी व्यक्तीस त्याच्या वैयक्तिक विरोप पत्त्यावर विरोप पाठवणे हे जाल शिष्टाचारातच (नेटीकेट्स) नव्हे तर कुठल्याच शिष्टाचारात बसत नाही. यातले बरेचसे विरोपाचे पत्ते हे त्या त्या व्यक्तीसाठी अतिमहत्वाचे असतील. नव्हे त्यांचे दैनंदीन व्यवहार ते या विरोप खात्यांमधून करत असतील. असं असताना, जर कामाच्या गडबडीत असताना त्यांना यासारख्या धाग्यांमधून विरोप येत राहील्यावर त्यांची काय अवस्था होत असेल याचा विचार करा आणि हा प्रकार थांबवा... निदान मायमराठीसाठी तरी...
Friday, February 26, 2010
आनंद या जीवनाचा...
आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा, ओठातूनी ओघळावा
काही आठवतंय का?
साधारण ९४ - ९५ च्या आसपास (किंवा त्याच्या थोडं आधी किंवा नंतर) डॉ. श्रीराम लागूंची "प्रतिकार" नावाची एक मराठी मालिका लागत असे, त्या मालिकेचं हे शिर्षकगीत. एक नितांत सुंदर आणि अर्थपुर्ण गीत. गीतात इतका गोडवा होता की इतक्या वर्षांनंतरही ते मनात घर करून राहीलं. संगणक अभियंता म्हणून काम करू लागल्यानंतर जेव्हा जेव्हा या गीताची आठवण झाली तेव्हा तेव्हा गुगलवर त्याच्या एमपी थ्री चा शोध घेतला, आणि प्रत्येक वेळी निराश होऊन गप्प बसलो. कारण... हे गीत जालावर कुठेच उपलब्ध नव्हतं.
आज सहज म्हणून पुन्हा एकदा शोध घेतला. गुगलने दिलेल्या प्रत्येक दुव्यावर जाऊन पाहीलं. आणि एका दुव्यावर ही युटयूबवरील चित्रफीत सापडली. विक्रांत वाडे नावाच्या गायकाने एका मराठी वादयवृंदामध्ये गायलंय. अगदी मुळ गीताच्या तोडीचं नसलं तरीही खुप छान झालंय गाणं. विक्रांत, धन्यवाद मित्रा. इतक्या वर्षांचा शोध, गाणं मिळत नाही म्हणून मनात असलेली हुरहूर आज संपली...
Friday, February 5, 2010
Monday, February 1, 2010
माय बॉस... वैशाली
गेले दोन अडीच वर्षे वैशालीबद्दल आज लिहू, उदया लिहू असं चाललं होतं. पण लिहिणं मात्र राहून गेलं होतं. परवा वैशालीसाठी फेअरवेल दिल्यानंतर प्रत्येकाला काहीतरी बोलण्याचा आग्रह केला गेला. मलाही कुणीतरी विचारलं, तूही बोल. मी सुरुवातीला हो नाही करत फक्त दोन वाक्ये बोललो. म्हणजे बोलण्यासारखे काही नव्हतं असं नाही, पण का कोण जाणे आपली प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून आज वैशालीचा शेवटचा दिवस या भावनेनं मन थोडं उदास झालं होतं. इतरांबरोबर तसं हसणं खिदळणं चालू होतं, पण "वैशाली आहे ना, ती सांभाळून घेईल" असा विश्वास असणारी वैशाली सोमवारपासून आमची प्रोजेक्ट मॅनेजर असणार नाही ही भावना मनात नकळत डोकावत होती.
तीन वर्षांपुर्वी मी जेव्हा सध्याची कंपनी जॉईन केली तेव्हा मनाची अवस्था थोडीशी विचित्र होती. सोबत ईंजिनीयरींगची डीग्री आणि आय टी मधला जवळपास दिड वर्षाचा अनुभव असतानाही स्वत:बद्दल विश्वास असा वाटत नव्हता. त्याला कारणही तसंच होतं. या आधीच्या दिड वर्षात मी एकुण तीन नोकर्या केल्या होत्या. चार महिने, सात महिने आणि नऊ महिने असा त्या तीन नोकर्यांचा आणि "जवळपास" दिड वर्ष अनुभवाचा ताळेबंद होता. तिनही नोकर्यांमध्ये क्षमता, अपेक्षा आणि वास्तव यांची गल्लत झाली होती. अशा काहीशा विमनस्क मनस्थितीत मी सध्याची कंपनी जॉईन केली.
कंपनीच्या मुंबई ऑफ़ीसमध्ये मी रुजू झालो. मला ज्या टीममध्ये टाकण्यात आलं, वैशाली त्या टीमची प्रोजेक्ट मॅनेजर. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे टीममधले सारे डेव्हलपर्स मुंबई आणि चेन्नई ऑफीसला आणि एकटी वैशाली फक्त पुणे ऑफीसला. अजबच वाटला तो प्रकार तेव्हा. पण फक्त दोनच दिवस टीमसोबत घालवले आणि कळून चुकलं की वैशालीच्या नावाचा टीममध्ये खुप दरारा आहे. त्यामुळे ती प्रत्यक्ष ऑफीसमध्ये नसतानाही कामं बर्यापैकी व्यवस्थित होत असत. पुढे थोडया दिवसांनी सत्याने, टीममधल्या एका सिनियर डेव्हलपरने तिला फोन केला आणि मला आणि माझ्याच सोबत जॉईन झालेल्या केलेल्या दुसर्या एका मुलाला, विक्रमला बोलायला सांगितले. जेमेतेम चार पाच मिनिटं बोलणं झालं तिच्याशी. प्रश्नही अगदी टीपिकल होते, एच आर इंटरव्ह्यू मध्ये विचारले जातात तसे. कुठल्या टेक्नॉलॉजीवर काम केलंय, एक्स्पीरीयन्स किती वगैरे. पण त्या चार पाच मिनिटात अक्षरश: घाम फुटला होता, काहीच कारण नसताना.
थोडयाच दिवसांत विक्रमला प्रोजेक्ट मिळाला. मला मात्र रखडावं लागलं प्रोजेक्ट मिळण्यासाठी. (पुढे कंपनीत रुळल्यानंतर कळलं, मला प्रोजेक्ट मिळायला उशीर होण्यामागे माझा "दिड वर्षात तीन जॉब" हा पराक्रम कारणीभूत होता. कंपनीला भिती वाटत होती की न जाणो, हा मुलगा इथूनही लवकर गेला तर. तेव्हा वैशालीने रिस्क घेऊन मला प्रोजेक्ट दिला.) प्रोजेक्ट मिळाला खरा, पण सगळा आनंदी आनंद होता. दहा जणांची प्रोजेक्ट टीम. त्यातले नऊ जण अमेरिकेत, ऑनसाइटला. फक्त एक मुलगी मुंबई ऑफीसला. तिच्याकडून एखादी गोष्ट माहिती करून घेणं म्हणजे एखादया देवाला प्रसन्न करून घेण्याईतकंच कठीण काम. अगदी स्पष्टच बोलायचं तर त्या पोरीला काहीही विचारा, बिलकूल भीक घालायची नाही ती. एखादी गोष्ट तिला विचारायची म्हटलं तर अगदी "माय, दोन दिस झालं उपाशी हाय. काय भाकर तुकडा खायला दयाल तर देव तुमचं भलं करील" अशा स्टाईलमध्ये विनवण्या कराव्या लागत. आणि कहर म्हणजे ही मुलगीही ऑनसाईटला जाणार होती. त्यामुळे सगळाच फाल्गुन मास होता. हा सगळा प्रकार वैशालीच्या कानावर घातला. तिनंही हे सगळं टॅक्टफ़ुली कसं मॅनेज करायचं हे शिकवलं. वैशालीच्या युक्त्या अगदी बरोबर लागू व्हायच्या आणि मग मनातल्या मनात मी तिला सलामी देत असे.
यथावकाश ती मुलगी ऑनसाईटला गेली. तिच्या जागी मी ऑफशोअर डेव्हलपर म्हणून काम करू लागलो. आणि दहा ऑनसाईटवाले आणि एक ऑफशोअरवाला असा नवा प्रकार सुरू झाला. काही दिवसांनी माझ्या हाताखाली एक ट्रेनी ईंजिनीयर मिळाला. पोरगा अगदी गुणी. त्यामुळे ऑनसाईटवाल्या दहा जणांपासून त्याला "हाईड" करण्याची नवी जबाबदारी अंगावर पडली. मोठी कंपनी, मोठा प्रोजेक्ट. कधी कधी चुका व्हायच्या. वैशालीचा ओरडा खावा लागायचा. कधी कधी तीच चुक पुन्हा व्हायची. "सतिश, एखादी चुक एकदा केली तर समजू शकते. तू त्याच त्याच चुका करतोस. कसं चालेल असं?" अशा स्पष्ट शब्दांत ऐकावं लागायचं. कधी कधी वाईट वाटायचं. पण तिचं बोलणं आपल्या, टीमच्या आणि प्रोजेक्टच्या भल्यासाठी आहे ही जाणिव मनात असायची. त्यामुळे तिच्या ओरडण्याचा राग असा कधी आला नाही. तो प्रोजेक्ट संपेपर्यंत सात आठ महिने निघून गेले. कामासंदर्भात बोलत असतानाच कधी कधी होणार्या अवांतर गप्पांमधून तिची "वैशाली" म्हणून ओळख होत गेली आणि तिच्याबद्दल वाटणार्या भीतीची जागा आदराने घेतली...
कधी कधी एखादया शुक्रवारी वगैरे ती मुंबई ऑफीसला यायची, टीमला भेटायला. इतर दिवशी चौखुर उधळलेल्या घोडयासारखी वागणारी टीम त्या दिवशी मात्र अक्षरश: डोळ्याला झापडं लावून काम करायची. या गोष्टीचं हसू यायचं पण त्याबरोबरच वाईटही वाटायचं. एका चांगल्या व्यक्तीला ही मुलं चुकीचं समजतात हे कळायचं पण आपण त्यांचा गैरसमज दूर करू शकणार नाही याचीही जाणिव व्हायची. शक्य होईल तेव्हा मी टीममेट्सना सांगण्याचा प्रयत्न करत असे पण त्याचा फारसा उपयोग होत नसे. कधी कधी वैशाली मला टीमबद्दल फोनवरून विचारत असे. कधी कधी मी स्वत:हून सांगत असे. मग मुंबई ऑफीसची गोष्ट पुण्याला वैशालीला कशी कळली म्हणून आरडाओरडा होत असे. बरेच वेळा संशयाची सुई माझ्याकडे वळत असे. अर्थात मला काही फरक पडत नसे त्याने. एखादा टीम मेंबर काही चुक करत असेल किंवा गैर वागत असेल तर ते वैशालीला सांगण्यात मला कधीच वावगं वाटलं नाही. अगदी काही टीम मेंबर्सनी "वैशालीचा चमचा" असं विशेषण लावलं तरीही.
मी आधीच्या प्रोजेक्टवर मन लाऊन केलेल्या कामाचा चांगला फायदा झाला. अगदी थोडयाच दिवसांत मला दुसरा प्रोजेक्ट मिळाला. "क्लायंट खडूस आहे. सांभाळून काम करा" अशी आगाऊ सुचनाही मिळाली. काम सुरु झालं. क्लायंट खरंच खडूस निघाला. "हे असंच का किंवा हे मी दाखवतोय असंच करा" असा प्रकार तो वरचेवर करू लागला. याला आपला हिसका दाखवायचाच असं मनाने ठरवलं आणि मग मीही त्याचं म्हणणं अगदी पद्धतशीर खोडून काढायला सुरुवात केली. एकदा तर साहेबांना असा जोरात धक्का दिला की "मला तुझी काम करण्याची पद्धत आवडली. तुला जे करायचं ते करत जा. फक्त ते काम पक्क करण्याच्या अगोदर मला एकदा दाखवत जा" अशी साहेबांनी सपशेल शरणागती पत्करली. हाही प्रोजेक्ट आता संपत आला. मी आता कंपनीत बर्यापैकी स्थिरावलो होतो. घर विकत घेण्याचा विचार करू लागलो होतो. पण मुंबईत राहायचं नव्हतं. त्यामुळे पुणे हा पर्याय निघाला. मागच्या वर्षभरात पुण्याला टीम झाली होती. त्यामुळे मला पुण्याला बदली मिळायला काहीच हरकत नव्हती. मी वैशालीशी विषय काढताच तिने "हा प्रोजेक्ट संपला की ये" असं सांगून टाकलं. पुण्याला बदली आणि घर घेण्याचा विचारांनी आयुष्यात एका नव्या वळणाला सुरुवात झाली होती...
डीसेंबर २०००८ चा शेवटचा आठवडा. निखिल, माझा टीम मधला जिवलग मित्र ऑनसाईटला चालला होता. त्याच्या घरच्यांसोबत मीही गेलो विमानतळावर. साहेब मेन गेटमधून आत गेले अणि आतून कॉईन बॉक्सवरून फोन केला.
"अरे सतिश, थोडा प्रॉब्लेम आहे."
"काय झालं बाबा आता?"
"अरे मला एक फॉर्म भरायचा आहे. त्याच्यात एक पॉईंट आहे, "टाईप ऑफ व्हिजिट". बिझिनेस, टूर, एजुकेशनल, पर्सनल वगैरे ऑप्शन आहेत. पण कळत नाही काय उत्तर द्यायचं. तू वैशालीला फोन करून विचार ना जरा"
"निखिल वेडा झाला का तू? आता रात्रीचे दहा वाजलेत. एव्हढया उशिरा कसा फोन करणार तिला?"
"अरे विचार ना यार, प्लिज"
आता मात्र वैशालीला फोन करणं भाग होतं. मी घाबरतच तिला फोन केला. तिनेही लगेच उत्तर दिलं आणि पुढच्याच वाक्यात माझी विकेट काढली, "तू कशाला गेला आहे रे तिकडे? विमाने पाहायला का?" हे ऐकताच मी अगदी खळाळून हसलो. फोन करण्याआधी मनावर आलेलं दडपण गायब झालं होतं...
यथावकाश मीही माझ्या पुढच्या प्रोजेक्टसाठी अमेरिकेला गेलो. तिथे रुळलो. काही दिवसांनी ऑफशोअरला माझ्या प्रोजेक्टमध्ये मला पाच सहा वर्षांनी सिनियर असणारी एक बंदी जॉईन झाली. कामाच्या गडबडीत मला तिच्या बरोबर कामासंदर्भात व्यवस्थित इंटरॅक्ट होता आलं नाही. तिचा गैरसमज झाला. आणि मला बरीच सिनियर असल्यामुळे तिने माझी खरडपट्टी काढणारा ईमेल वैशालीला सीसी मध्ये ठेऊन टाकला. चुक त्या नव्या बंदीची नव्हती आणि माझीही नव्हती. पण तरीही मी थोडासा दुखावला गेलो. वैशालीला मेल टाकला वस्तूस्थिती सांगणारा. तिने रीप्लाय केला, "आय हॅव फुल फेथ ईन यू. मी समजावते तिला". तिचं ते "आय हॅव फुल फेथ ईन यू" वाचलं आणि डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या.
बघता बघता अमेरिकेत येऊन मला दिड वर्ष झालं होतं. परतीच्या वाटा आता खुणावू लागल्या होत्या. त्याचवेळी अमेरिकेत रीसेशन हा प्रकार जोरात होता. मी ज्यावेळी भारतात परत येण्याचा विषय काढला त्याचवेळी माझी पोझीशन ऑफशोअर होत आहे हे कळलं. देव पावला. मी अमेरिकेतूनच पुण्याच्या बदलीची रिक्वेस्ट टाकली. आणि भारतात आल्यानंतर अगदी आठवडयातच मी पुणे ऑफीसमधून काम करू लागलो...
पुणे टीम सोबत वैशाली खुपच मोकळेपणाने वागते. ती बॉस आहे असं चुकूनसुद्धा जाणवत नाही. मग मुंबईवाले तिला का एव्हढे वचकून असतात हा विचार मनात यायला लागला. थोडा फार अंदाज येऊ लागला होता. वैशालीचं पुणे ऑफ़ीसमधून काम करणं हेच मुंबईवाल्यांच्या वचकून असण्यामागचं कारण होतं. रीमोट ऑफ़ीसमधून काम करत असल्यामुळे बरेचवेळा फक्त कामानिमित्त बोलणं होत असे. आणि मग कामानिमित्त ती जर कुणावर रागावली तर "वैशाली रागावते" असं सरसकट विधान केलं जात असे.
पुणे ऑफीसमध्ये आल्यापासून बरेच वेळा तिच्यासोबत कॅंटीनला संध्याकाळी नाश्त्यासाठी जाणं होतं. खुप विषयांवर ती भरभरून बोलते. ती जेव्हा सानिकाच्या, तिच्या तीन वर्षांच्या मुलीच्या गमती जमती जेव्हा सांगायला सुरुवात करते तेव्हा ती तिच्यातील प्रोजेक्ट मॅनेजरला विसरून जाते. लाडक्या लेकीबद्दल किती बोलू अन किती नको असं तिला होऊन जातं. त्या "आईचं" बोलणं मग मीही कौतुकाने ऐकत राहतो...
पंधरा एक दिवसांपूर्वी कळलं की वैशाली आमच्या टीम मधून मुव्ह होणार आहे, कुठली तरी दुसरी टीम तिला मिळाली आहे. तसा हा बदल चांगलाच आहे. गेले चार साडेचार वर्ष ती या टीमची ती प्रोजेक्ट मॅनेजर आहे. ऑफशोअरला सहा सात जणांसहीत सुरु झालेली टीम आज चाळीसवर गेली आहे. याचं बरंचसं श्रेय वैशालीचं. तिनं टीम सांभाळली, वाढवली. जणू काही या बदलाने तिला आता दुसरी छोटी टीम सांभाळायला मिळाली आहे...
...सहज म्हणून कधी मागे वळून पाहतो. उलटून गेलेल्या भुतकाळाच्या पानांवर खुप काही दिसतं. तीन वर्षांपूर्वी जेव्हा ही कंपनी जॉईन केली तेव्हा मी एक गोंधळलेला, आत्मविश्वास नसलेला मुलगा होतो. आज कंपनीचा यू एस रीटर्न्ड सिनियर सॉफ्टवेअर ईंजिनीयर आहे. तेव्हा डोळ्यांत स्वप्नं होती पण त्या स्वप्नांना दिशा नव्हती. कारण दिशा देऊ शकेल असं आजूबाजूला कुणीच नव्हतं. ती पोकळी वैशालीने भरून काढली. कधी रागावत तर कधी समजावून सांगत तिने मनामध्ये आत्मविश्वास भरला, स्वप्नांना दिशा दिली. तिचं हे देणं मी कधीच चुकतं करू शकणार नाही...
Saturday, January 16, 2010
जावे त्यांच्या देशा...
गेल्या वर्षीच्या ख्रिसमसची गोष्ट. आमच्या क्लायंटच्या ऑफीसमध्ये खिसमसच्या दिवसांमध्ये "पॉटलक" साजरा केला जातो. हा पॉटलक म्हणजे आपल्या कृष्णाच्या गोपालकाल्याचं अमेरिकन रुप. प्रत्येकाने आपापल्या घरून शिदोरी आणायची आणि सगळ्यांनी मिळून खायची. तसाच काहिसा हा पॉटलक असतो. आमचे अमेरिकन सहाध्यायी तसेच घरदार वाल्या आमच्या भारतीय सहकार्यांनी आपापल्या घरून काही न काही बनवून आणलं होतं. अगदी आमच्यातल्याच हौशी "बॅचलर" स्वयंपाक्यांनीही चांगलं चुंगलं बनवून आणलं होतं. परंतू माझ्यासारखे जे आळशी नमूने होते त्यांनी बिलकूल तसदी न घेता शहाजोगपणे जवळच्याच एका भारतीय रेस्टॉरंटमधून खाणं उचललं होतं (आणि वर हे सगळं आम्ही घरी बनवलं असं बिनधास्त सांगून टाकलं होतं) खाणं सुरू झालं. आम्ही तीन चार "पोरकट" मित्र एका कोपर्यात उभे राहून खात होतो. कुणी अमेरिकन सहाध्यायी बाजुने हाय, हेलो करत गेला तर आम्हीही त्याला "हाऊ आर यू" असं वरचढ उत्तर देत होतो.
खाणं झालं. एक खेळ सुरु झाला. प्रत्येकाने आपल्या घरच्या जेवणाबरोबरच काहीतरी भेटवस्तू आणायची असं ठरलेलं. त्या सगळ्या वस्तू एका कोपर्यात जमा केल्या होत्या. खेळ असा होता की प्रत्येकाला एक चिठ्ठी दिली होती. त्यावर एक नंबर होता. आपला नंबर आला की कोपर्यात जायचं, एक भेटवस्तू उचलायची. किंवा, आधी जर कुणाला काही चांगली भेटवस्तू मिळाली असेल तर ती त्याच्याकडे जाऊन मागायची. अशी एकदा उचललेली वस्तू दोनवेळा मागता येत होती. माझा नंबर आला. कोपर्यात काही चांगलं दिसेना म्हणून मी लोकांच्या हातातल्या वस्तूंवर नजर टाकायला सुरुवात केली. एका अमेरिकन सहकारीणीच्या हातात एक छान छोटंसं कॅलेंडर मला दिसलं. मी ते मागितलं. "नो. यु कान्ट गेट इट. इट्स ऑलरेडी टेकन ट्वाईस." समोरुन हसत हसत उत्तर आलं. मला मग एका मेणबत्ती स्टॅंडवर समाधान मानावं लागलं...
दुसर्या दिवशी ऑफ़ीसला आलो. काम सुरू झालं. एक तासाभराने ती कालची अमेरिकन सहकारीणी माझ्या क्युबमध्ये आली. तसा वयाचा अंदाज लावता येत नव्हता. पण ती माझ्या आईच्या वयाची नक्कीच होती. (अमेरिकेत रीटायरमेंटचं असं ठराविक वय नसतं. जोपर्यंत हातपाय चालतायत तोपर्यंत लोकं काम करतात.) तिच्या हातात ते मी काल मागितलेलं कॅलेंडर होतं.
"हाय. आय ऍम बेटी. यू वॉंटेड धिस कॅलेंडर. राईट?"
मी हो म्हणायच्या आधीच तिने ते कॅलेंडर माझ्या हातात ठेवलं...
आम्ही ऑफ़ीसमध्ये एकाच फ़्लोअरवर बसत असल्यामुळे आमच्या वरचेवर गप्पा होऊ लागल्या. ती तिच्या घराबद्दल, नवर्याबद्दल, बालपणाबद्दल अगदी भरभरून बोलायची. मीही अगदी आईशी गप्पा मारतोय इतक्या सहजतेने "इन अवर ईंडीया..." अशी सुरुवात करून अगदी रामायण महाभारतापासून आताची शिक्षण व्यवस्था अशा कुठल्याही विषयावर तिच्यासमोर बडबडत असे. गणपतीचे दिवस होते. मी तिला गणेशोत्सवाबद्दल बरंच काही सांगितलं. अगदी गणपतीला हत्तीचं तोंड कसं लागलं हेही सांगितलं आणि चांगलाच फसलो. माझं गणेश जन्माख्यान सांगून झाल्यानंतर तिने अगदी सहज प्रश्न विचारला.
"हाऊ लॉर्ड शिवा कॅन बी सो रुड? हाऊ ही कॅन किल अ किड?"
क्षण, दोन क्षण माझ्या नजरेसमोर काजवे चमकले. अक्षरश: बोलती बंद झाली. आता या प्रश्नाचं उत्तर काय देणार. मी आपलं उगाचच, "लॉर्ड शिवा इज गॉड ऑफ डीस्ट्रक्शन. सो ही कॅन डू दॅट" असं म्हणून वेळ मारून नेली.
बेटीने यापूर्वी आमच्याच ऑफीसमध्ये भारतीय लोकांबरोबर काम केलं होतं. ते लोक अगदी तिला हिंदी चित्रपट पाहायला घेऊन जायचे. अमेरिकेतल्या चित्रपटगृहांमध्ये जेव्हा हिंदी चित्रपट दाखवला जातो, तेव्हा तो इंग्रजी उपशिर्षकासहीत दाखवला जातो. त्यामुळे अमेरिकनांनाही तो चित्रपट कळायला फारशी अडचण येत नाही. कुठल्यातरी दिड शहाण्याने तिला दोस्ताना हा चित्रपट दाखवला होता. त्यातल्या अभिषेक बच्चनचं वर्णन जेव्हा तिने "बिग स्टार्स सन" असं केलं तेव्हा मला हसू आवरेना. त्यानंतर तिने एकदा मला आऊटसोर्स्ड या चित्रपटाची डीव्हीडी पाहायला दिली. चित्रपटाच्या शेवटी दिला जाणारा संदेश सोडला तर बाकी चित्रपट निव्वळ अप्रतिम आहे. एका अमेरिकन कस्टमर केअर कंपनीचं काम एका भारतीय कंपनीला आउटसोर्स केलं जातं आणि भारतीय कंपनीच्या कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्या अमेरिकन कंपनीचा एक नोकर भारतात येतो आणि त्याला ज्या अडचणींना सामोरं जावं लागतं त्या अडचणींचं गमतीदार चित्रण म्हणजे हा चित्रपट. तिने स्लम डॉग मिलेनियर पाहील्यानंतर पहीला प्रश्न हा विचारला की, भारतात सगळीकडे असंच असतं का. मी तिला मग व्यवस्थित समजावलं. म्हटलं, आहे, जरुर आहे. अगदी चित्रपटात जे दाखवलं आहे त्यापैकी काही गोष्टी तशाच आहेत. पण म्हणून काही संपुर्ण भारतात हेच घडत असतं किंवा असंच आहे असं नाही.
एकदा बेटीने तिच्या घरी बनवलेला निळसर रंगाचा केक आणला आम्हा मित्रांसाठी. आम्हाला तो खुप आवडला. आम्ही कुतुहल म्हणून हा केक निळा का असं सहज विचारलं. तर तिने ते सांगताना तो केक ब्ल्यू बेरीचा आहे एव्ह्ढ्यावरच न थांबता चक्क पुर्ण रेसिपी सांगून टाकली. त्यानंतर जेव्हा कधी ती केक बनवत असे तेव्हा तेव्हा ती आमच्यासाठी न विसरता केक आणत असे ऑफीसला. एकदा तर चक्क तिने आमच्यासाठी केक बनवला होता. हे सगळं ती अगदी आईच्या मायेने करायची त्यामुळे आम्हाला ती आमची क्लायंट आहे वगैरे कधीच वाटलं नाही. मायेला जातीपातीची, धर्माची आणि देशाची बंधनं नसतात हेच खरं.
मला ईलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं खुप वेड आहे (आणि या गोष्टीशी माझ्या ईलेक्ट्रॉनिक्स ईंजिनीयरींगच्या डीग्रीचा काहीही संबंध नाही.) त्यामुळे मी कधीही कुठल्याही मॉलमध्ये गेलो की अगदी काही ना काही ईलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन येत असे. बरेच वेळा तर मी एकच वस्तू दोन दोन वेळा विकत घेत असे, स्पेअर असावी म्हणून. माझी ही अनावश्यक खरेदी बेटीच्या कानावर गेली. मग ती मला समजावू लागली. म्हणे मला पैसे जपून वापरायला हवेत. पुढे लग्न झाल्यावर संसार करताना मला पैशाची खुप गरज भासेल. मग मी तिला माझं लॉजिक समजावून सांगत असे. एखादी वस्तू मी जेव्हा इथे डॉलरमध्ये घेतो तेव्हा खुप कमी डॉलर मोजावे लागतात. पण हीच वस्तू मी जर भारतात घेतली तर खुप रुपये मोजावे लागतात. मी तरी असं समजतो की कमी डॉलर म्हणजे स्वस्त आणि जास्त रुपये म्हणजे महाग. आय जस्ट थिंक अबाउट फ़िगर ऑफ़ करंसी नॉट व्हॅल्यू ऑफ करंसी. मग ती अगदी खळखळून हसे आणि म्हणे, माय डीयर फ्रेंड यू आर जस्ट मॅड...
बेटीला भारतीय संस्कृतीचं खुप आकर्षण, विशेषत: लग्नपद्धती. तिला जेव्हा कळलं की माझे आई बाबा माझ्यासाठी मुलगी पाहत आहेत, तेव्हा ती खुप खुश झाली. मला खुप काही विचारू लागली तर कधी समजावू लागली. अगदी मला कशी मुलगी हवी ईथपासून ते मला काही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागेल ईथपर्यंत. मी भारतात सुट्टीवर आलो होतो तेव्हा कोल्हापूरला गेलो होतो. तिथला महालक्ष्मीचा एक फोटो सोबत नेला होता अमेरिकेला. तो मी तिला दिला होता, धिस इज गॉडेस ऑफ वेल्थ असं म्हणत. माझ्या वधू संशोधनाबद्दल माहिती झाल्यानंतर ती मला अधुनमधून सांगत राही, आय प्रे टू युवर गॉड टू गिव्ह यू अ नाईस गर्ल...
... माझा भारतात परत येण्याचा दिवस जवळ येऊ लागला. आणि परत यायला आठवडा असताना आजारपणामुळे माझ्या आजोबांचे निधन झाले. त्यांचं बरं वाईट व्हायच्या आधी त्यांना एकदातरी भेटण्याची माझी ईच्छा अपूरी राहीली. बेटीला हे कळताच तिलाही वाईट वाटलं. कुणा जवळच्या नातेवाईकानं सांत्वन करावं असं तिनं समजावलं. मी कायमचा भारतात येणार म्हणून चक्क तीने मला व माझ्या मित्रांना तिच्या घरी नेलं. तिचं ऐसपैस घर लहान मुलाच्या उत्साहाने दाखवलं. जिम, तिचा नवरा पुर्वी स्वत:चं गॅरेज चालवत असे. पण आता वयोमानामुळे तो घरीच असतो. तो किती उत्कृष्ट स्वयंपाकी आहे हे सांगताना तिचा चेहरा अभिमानाने फुलून आला होता तेव्हा. आणि ते पाहून आम्हीही थक्क झालो होतो...
आता भारतात येऊनही तीन महीने झाले मला. अगदी काल परवापर्यंत सेकंड शिफ्टमध्ये काम करताना तिच्याशी मेसेंजरवर बोलणं होत असे. सोमवार पासून जनरल शिफ्ट. त्यामुळे मेसेंजरवरचं का होईना प्रत्यक्ष बोलणं बंद होईल. ईमेलच्या माधमातून संपर्क चालू राहील पण त्यात तितकसं तथ्य नसेल. गोष्टी हाय, हेलो मध्ये संपून जातील...
काहीही असो म्हणा, पुन्हा अमेरिकेला आणि तेही कॅलिफोर्नियाला केव्हा जाईन तेव्हा जाईन पण अमेरिकेतल्या माझ्या आईच्या वयाच्या माझ्या मैत्रिणीच्या आठवणी मात्र कायम सोबत असतील...