Saturday, January 16, 2010

जावे त्यांच्या देशा...

गेल्या वर्षीच्या ख्रिसमसची गोष्ट. आमच्या क्लायंटच्या ऑफीसमध्ये खिसमसच्या दिवसांमध्ये "पॉटलक" साजरा केला जातो. हा पॉटलक म्हणजे आपल्या कृष्णाच्या गोपालकाल्याचं अमेरिकन रुप. प्रत्येकाने आपापल्या घरून शिदोरी आणायची आणि सगळ्यांनी मिळून खायची. तसाच काहिसा हा पॉटलक असतो. आमचे अमेरिकन सहाध्यायी तसेच घरदार वाल्या आमच्या भारतीय सहकार्‍यांनी आपापल्या घरून काही न काही बनवून आणलं होतं. अगदी आमच्यातल्याच हौशी "बॅचलर" स्वयंपाक्यांनीही चांगलं चुंगलं बनवून आणलं होतं. परंतू माझ्यासारखे जे आळशी नमूने होते त्यांनी बिलकूल तसदी न घेता शहाजोगपणे जवळच्याच एका भारतीय रेस्टॉरंटमधून खाणं उचललं होतं (आणि वर हे सगळं आम्ही घरी बनवलं असं बिनधास्त सांगून टाकलं होतं) खाणं सुरू झालं. आम्ही तीन चार "पोरकट" मित्र एका कोप‌र्‍यात उभे राहून खात होतो. कुणी अमेरिकन सहाध्यायी बाजुने हाय, हेलो करत गेला तर आम्हीही त्याला "हाऊ आर यू" असं वरचढ उत्तर देत होतो.

खाणं झालं. एक खेळ सुरु झाला. प्रत्येकाने आपल्या घरच्या जेवणाबरोबरच काहीतरी भेटवस्तू आणायची असं ठरलेलं. त्या सगळ्या वस्तू एका कोपर्‍यात जमा केल्या होत्या. खेळ असा होता की प्रत्येकाला एक चिठ्ठी दिली होती. त्यावर एक नंबर होता. आपला नंबर आला की कोपर्‍यात जायचं, एक भेटवस्तू उचलायची. किंवा, आधी जर कुणाला काही चांगली भेटवस्तू मिळाली असेल तर ती त्याच्याकडे जाऊन मागायची. अशी एकदा उचललेली वस्तू दोनवेळा मागता येत होती. माझा नंबर आला. कोपर्‍यात काही चांगलं दिसेना म्हणून मी लोकांच्या हातातल्या वस्तूंवर नजर टाकायला सुरुवात केली. एका अमेरिकन सहकारीणीच्या हातात एक छान छोटंसं कॅलेंडर मला दिसलं. मी ते मागितलं. "नो. यु कान्ट गेट इट. इट्स ऑलरेडी टेकन ट्वाईस." समोरुन हसत हसत उत्तर आलं. मला मग एका मेणबत्ती स्टॅंडवर समाधान मानावं लागलं...

दुसर्‍या दिवशी ऑफ़ीसला आलो. काम सुरू झालं. एक तासाभराने ती कालची अमेरिकन सहकारीणी माझ्या क्युबमध्ये आली. तसा वयाचा अंदाज लावता येत नव्हता. पण ती माझ्या आईच्या वयाची नक्कीच होती. (अमेरिकेत रीटायरमेंटचं असं ठराविक वय नसतं. जोपर्यंत हातपाय चालतायत तोपर्यंत लोकं काम करतात.) तिच्या हातात ते मी काल मागितलेलं कॅलेंडर होतं.
"हाय. आय ऍम बेटी. यू वॉंटेड धिस कॅलेंडर. राईट?"
मी हो म्हणायच्या आधीच तिने ते कॅलेंडर माझ्या हातात ठेवलं...

आम्ही ऑफ़ीसमध्ये एकाच फ़्लोअरवर बसत असल्यामुळे आमच्या वरचेवर गप्पा होऊ लागल्या. ती तिच्या घराबद्दल, नवर्‍याबद्दल, बालपणाबद्दल अगदी भरभरून बोलायची. मीही अगदी आईशी गप्पा मारतोय इतक्या सहजतेने "इन अवर ईंडीया..." अशी सुरुवात करून अगदी रामायण महाभारतापासून आताची शिक्षण व्यवस्था अशा कुठल्याही विषयावर तिच्यासमोर बडबडत असे. गणपतीचे दिवस होते. मी तिला गणेशोत्सवाबद्दल बरंच काही सांगितलं. अगदी गणपतीला हत्तीचं तोंड कसं लागलं हेही सांगितलं आणि चांगलाच फसलो. माझं गणेश जन्माख्यान सांगून झाल्यानंतर तिने अगदी सहज प्रश्न विचारला.
"हाऊ लॉर्ड शिवा कॅन बी सो रुड? हाऊ ही कॅन किल अ किड?"
क्षण, दोन क्षण माझ्या नजरेसमोर काजवे चमकले. अक्षरश: बोलती बंद झाली. आता या प्रश्नाचं उत्तर काय देणार. मी आपलं उगाचच, "लॉर्ड शिवा इज गॉड ऑफ डीस्ट्रक्शन. सो ही कॅन डू दॅट" असं म्हणून वेळ मारून नेली.

बेटीने यापूर्वी आमच्याच ऑफीसमध्ये भारतीय लोकांबरोबर काम केलं होतं. ते लोक अगदी तिला हिंदी चित्रपट पाहायला घेऊन जायचे. अमेरिकेतल्या चित्रपटगृहांमध्ये जेव्हा हिंदी चित्रपट दाखवला जातो, तेव्हा तो इंग्रजी उपशिर्षकासहीत दाखवला जातो. त्यामुळे अमेरिकनांनाही तो चित्रपट कळायला फारशी अडचण येत नाही. कुठल्यातरी दिड शहाण्याने तिला दोस्ताना हा चित्रपट दाखवला होता. त्यातल्या अभिषेक बच्चनचं वर्णन जेव्हा तिने "बिग स्टार्स सन" असं केलं तेव्हा मला हसू आवरेना. त्यानंतर तिने एकदा मला आऊटसोर्स्ड या चित्रपटाची डीव्हीडी पाहायला दिली. चित्रपटाच्या शेवटी दिला जाणारा संदेश सोडला तर बाकी चित्रपट निव्वळ अप्रतिम आहे. एका अमेरिकन कस्टमर केअर कंपनीचं काम एका भारतीय कंपनीला आउटसोर्स केलं जातं आणि भारतीय कंपनीच्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्या अमेरिकन कंपनीचा एक नोकर भारतात येतो आणि त्याला ज्या अडचणींना सामोरं जावं लागतं त्या अडचणींचं गमतीदार चित्रण म्हणजे हा चित्रपट. तिने स्लम डॉग मिलेनियर पाहील्यानंतर पहीला प्रश्न हा विचारला की, भारतात सगळीकडे असंच असतं का. मी तिला मग व्यवस्थित समजावलं. म्हटलं, आहे, जरुर आहे. अगदी चित्रपटात जे दाखवलं आहे त्यापैकी काही गोष्टी तशाच आहेत. पण म्हणून काही संपुर्ण भारतात हेच घडत असतं किंवा असंच आहे असं नाही.

एकदा बेटीने तिच्या घरी बनवलेला निळसर रंगाचा केक आणला आम्हा मित्रांसाठी. आम्हाला तो खुप आवडला. आम्ही कुतुहल म्हणून हा केक निळा का असं सहज विचारलं. तर तिने ते सांगताना तो केक ब्ल्यू बेरीचा आहे एव्ह्ढ्यावरच न थांबता चक्क पुर्ण रेसिपी सांगून टाकली. त्यानंतर जेव्हा कधी ती केक बनवत असे तेव्हा तेव्हा ती आमच्यासाठी न विसरता केक आणत असे ऑफीसला. एकदा तर चक्क तिने आमच्यासाठी केक बनवला होता. हे सगळं ती अगदी आईच्या मायेने करायची त्यामुळे आम्हाला ती आमची क्लायंट आहे वगैरे कधीच वाटलं नाही. मायेला जातीपातीची, धर्माची आणि देशाची बंधनं नसतात हेच खरं.

मला ईलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचं खुप वेड आहे (आणि या गोष्टीशी माझ्या ईलेक्ट्रॉनिक्स ईंजिनीयरींगच्या डीग्रीचा काहीही संबंध नाही.) त्यामुळे मी कधीही कुठल्याही मॉलमध्ये गेलो की अगदी काही ना काही ईलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन येत असे. बरेच वेळा तर मी एकच वस्तू दोन दोन वेळा विकत घेत असे, स्पेअर असावी म्हणून. माझी ही अनावश्यक खरेदी बेटीच्या कानावर गेली. मग ती मला समजावू लागली. म्हणे मला पैसे जपून वापरायला हवेत. पुढे लग्न झाल्यावर संसार करताना मला पैशाची खुप गरज भासेल. मग मी तिला माझं लॉजिक समजावून सांगत असे. एखादी वस्तू मी जेव्हा इथे डॉलरमध्ये घेतो तेव्हा खुप कमी डॉलर मोजावे लागतात. पण हीच वस्तू मी जर भारतात घेतली तर खुप रुपये मोजावे लागतात. मी तरी असं समजतो की कमी डॉलर म्हणजे स्वस्त आणि जास्त रुपये म्हणजे महाग. आय जस्ट थिंक अबाउट फ़िगर ऑफ़ करंसी नॉट व्हॅल्यू ऑफ करंसी. मग ती अगदी खळखळून हसे आणि म्हणे, माय डीयर फ्रेंड यू आर जस्ट मॅड...

बेटीला भारतीय संस्कृतीचं खुप आकर्षण, विशेषत: लग्नपद्धती. तिला जेव्हा कळलं की माझे आई बाबा माझ्यासाठी मुलगी पाहत आहेत, तेव्हा ती खुप खुश झाली. मला खुप काही विचारू लागली तर कधी समजावू लागली. अगदी मला कशी मुलगी हवी ईथपासून ते मला काही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागेल ईथपर्यंत. मी भारतात सुट्टीवर आलो होतो तेव्हा कोल्हापूरला गेलो होतो. तिथला महालक्ष्मीचा एक फोटो सोबत नेला होता अमेरिकेला. तो मी तिला दिला होता, धिस इज गॉडेस ऑफ वेल्थ असं म्हणत. माझ्या वधू संशोधनाबद्दल माहिती झाल्यानंतर ती मला अधुनमधून सांगत राही, आय प्रे टू युवर गॉड टू गिव्ह यू अ नाईस गर्ल...

... माझा भारतात परत येण्याचा दिवस जवळ येऊ लागला. आणि परत यायला आठवडा असताना आजारपणामुळे माझ्या आजोबांचे निधन झाले. त्यांचं बरं वाईट व्हायच्या आधी त्यांना एकदातरी भेटण्याची माझी ईच्छा अपूरी राहीली. बेटीला हे कळताच तिलाही वाईट वाटलं. कुणा जवळच्या नातेवाईकानं सांत्वन करावं असं तिनं समजावलं. मी कायमचा भारतात येणार म्हणून चक्क तीने मला व माझ्या मित्रांना तिच्या घरी नेलं. तिचं ऐसपैस घर लहान मुलाच्या उत्साहाने दाखवलं. जिम, तिचा नवरा पुर्वी स्वत:चं गॅरेज चालवत असे. पण आता वयोमानामुळे तो घरीच असतो. तो किती उत्कृष्ट स्वयंपाकी आहे हे सांगताना तिचा चेहरा अभिमानाने फुलून आला होता तेव्हा. आणि ते पाहून आम्हीही थक्क झालो होतो...

आता भारतात येऊनही तीन महीने झाले मला. अगदी काल परवापर्यंत सेकंड शिफ्टमध्ये काम करताना तिच्याशी मेसेंजरवर बोलणं होत असे. सोमवार पासून जनरल शिफ्ट. त्यामुळे मेसेंजरवरचं का होईना प्रत्यक्ष बोलणं बंद होईल. ईमेलच्या माधमातून संपर्क चालू राहील पण त्यात तितकसं तथ्य नसेल. गोष्टी हाय, हेलो मध्ये संपून जातील...

काहीही असो म्हणा, पुन्हा अमेरिकेला आणि तेही कॅलिफोर्नियाला केव्हा जाईन तेव्हा जाईन पण अमेरिकेतल्या माझ्या आईच्या वयाच्या माझ्या मैत्रिणीच्या आठवणी मात्र कायम सोबत असतील...