Monday, February 1, 2010

माय बॉस... वैशाली

गेले दोन अडीच वर्षे वैशालीबद्दल आज लिहू, उदया लिहू असं चाललं होतं. पण लिहिणं मात्र राहून गेलं होतं. परवा वैशालीसाठी फेअरवेल दिल्यानंतर प्रत्येकाला काहीतरी बोलण्याचा आग्रह केला गेला. मलाही कुणीतरी विचारलं, तूही बोल. मी सुरुवातीला हो नाही करत फक्त दोन वाक्ये बोललो. म्हणजे बोलण्यासारखे काही नव्हतं असं नाही, पण का कोण जाणे आपली प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून आज वैशालीचा शेवटचा दिवस या भावनेनं मन थोडं उदास झालं होतं. इतरांबरोबर तसं हसणं खिदळणं चालू होतं, पण "वैशाली आहे ना, ती सांभाळून घेईल" असा विश्वास असणारी वैशाली सोमवारपासून आमची प्रोजेक्ट मॅनेजर असणार नाही ही भावना मनात नकळत डोकावत होती.

तीन वर्षांपुर्वी मी जेव्हा सध्याची कंपनी जॉईन केली तेव्हा मनाची अवस्था थोडीशी विचित्र होती. सोबत ईंजिनीयरींगची डीग्री आणि आय टी मधला जवळपास दिड वर्षाचा अनुभव असतानाही स्वत:बद्दल विश्वास असा वाटत नव्हता. त्याला कारणही तसंच होतं. या आधीच्या दिड वर्षात मी एकुण तीन नोकर्‍या केल्या होत्या. चार महिने, सात महिने आणि नऊ महिने असा त्या तीन नोकर्‍यांचा आणि "जवळपास" दिड वर्ष अनुभवाचा ताळेबंद होता. तिनही नोकर्‍यांमध्ये क्षमता, अपेक्षा आणि वास्तव यांची गल्लत झाली होती. अशा काहीशा विमनस्क मनस्थितीत मी सध्याची कंपनी जॉईन केली.

कंपनीच्या मुंबई ऑफ़ीसमध्ये मी रुजू झालो. मला ज्या टीममध्ये टाकण्यात आलं, वैशाली त्या टीमची प्रोजेक्ट मॅनेजर. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे टीममधले सारे डेव्हलपर्स मुंबई आणि चेन्नई ऑफीसला आणि एकटी वैशाली फक्त पुणे ऑफीसला. अजबच वाटला तो प्रकार तेव्हा. पण फक्त दोनच दिवस टीमसोबत घालवले आणि कळून चुकलं की वैशालीच्या नावाचा टीममध्ये खुप दरारा आहे. त्यामुळे ती प्रत्यक्ष ऑफीसमध्ये नसतानाही कामं बर्‍यापैकी व्यवस्थित होत असत. पुढे थोडया दिवसांनी सत्याने, टीममधल्या एका सिनियर डेव्हलपरने तिला फोन केला आणि मला आणि माझ्याच सोबत जॉईन झालेल्या केलेल्या दुसर्‍या एका मुलाला, विक्रमला बोलायला सांगितले. जेमेतेम चार पाच मिनिटं बोलणं झालं तिच्याशी. प्रश्नही अगदी टीपिकल होते, एच आर इंटरव्ह्यू मध्ये विचारले जातात तसे. कुठल्या टेक्नॉलॉजीवर काम केलंय, एक्स्पीरीयन्स किती वगैरे. पण त्या चार पाच मिनिटात अक्षरश: घाम फुटला होता, काहीच कारण नसताना.

थोडयाच दिवसांत विक्रमला प्रोजेक्ट मिळाला. मला मात्र रखडावं लागलं प्रोजेक्ट मिळण्यासाठी. (पुढे कंपनीत रुळल्यानंतर कळलं, मला प्रोजेक्ट मिळायला उशीर होण्यामागे माझा "दिड वर्षात तीन जॉब" हा पराक्रम कारणीभूत होता. कंपनीला भिती वाटत होती की न जाणो, हा मुलगा इथूनही लवकर गेला तर. तेव्हा वैशालीने रिस्क घेऊन मला प्रोजेक्ट दिला.) प्रोजेक्ट मिळाला खरा, पण सगळा आनंदी आनंद होता. दहा जणांची प्रोजेक्ट टीम. त्यातले नऊ जण अमेरिकेत, ऑनसाइटला. फक्त एक मुलगी मुंबई ऑफीसला. तिच्याकडून एखादी गोष्ट माहिती करून घेणं म्हणजे एखादया देवाला प्रसन्न करून घेण्याईतकंच कठीण काम. अगदी स्पष्टच बोलायचं तर त्या पोरीला काहीही विचारा, बिलकूल भीक घालायची नाही ती. एखादी गोष्ट तिला विचारायची म्हटलं तर अगदी "माय, दोन दिस झालं उपाशी हाय. काय भाकर तुकडा खायला दयाल तर देव तुमचं भलं करील" अशा स्टाईलमध्ये विनवण्या कराव्या लागत. आणि कहर म्हणजे ही मुलगीही ऑनसाईटला जाणार होती. त्यामुळे सगळाच फाल्गुन मास होता. हा सगळा प्रकार वैशालीच्या कानावर घातला. तिनंही हे सगळं टॅक्टफ़ुली कसं मॅनेज करायचं हे शिकवलं. वैशालीच्या युक्त्या अगदी बरोबर लागू व्हायच्या आणि मग मनातल्या मनात मी तिला सलामी देत असे.

यथावकाश ती मुलगी ऑनसाईटला गेली. तिच्या जागी मी ऑफशोअर डेव्हलपर म्हणून काम करू लागलो. आणि दहा ऑनसाईटवाले आणि एक ऑफशोअरवाला असा नवा प्रकार सुरू झाला. काही दिवसांनी माझ्या हाताखाली एक ट्रेनी ईंजिनीयर मिळाला. पोरगा अगदी गुणी. त्यामुळे ऑनसाईटवाल्या दहा जणांपासून त्याला "हाईड" करण्याची नवी जबाबदारी अंगावर पडली. मोठी कंपनी, मोठा प्रोजेक्ट. कधी कधी चुका व्हायच्या. वैशालीचा ओरडा खावा लागायचा. कधी कधी तीच चुक पुन्हा व्हायची. "सतिश, एखादी चुक एकदा केली तर समजू शकते. तू त्याच त्याच चुका करतोस. कसं चालेल असं?" अशा स्पष्ट शब्दांत ऐकावं लागायचं. कधी कधी वाईट वाटायचं. पण तिचं बोलणं आपल्या, टीमच्या आणि प्रोजेक्टच्या भल्यासाठी आहे ही जाणिव मनात असायची. त्यामुळे तिच्या ओरडण्याचा राग असा कधी आला नाही. तो प्रोजेक्ट संपेपर्यंत सात आठ महिने निघून गेले. कामासंदर्भात बोलत असतानाच कधी कधी होणार्‍या अवांतर गप्पांमधून तिची "वैशाली" म्हणून ओळख होत गेली आणि तिच्याबद्दल वाटणार्‍या भीतीची जागा आदराने घेतली...

कधी कधी एखादया शुक्रवारी वगैरे ती मुंबई ऑफीसला यायची, टीमला भेटायला. इतर दिवशी चौखुर उधळलेल्या घोडयासारखी वागणारी टीम त्या दिवशी मात्र अक्षरश: डोळ्याला झापडं लावून काम करायची. या गोष्टीचं हसू यायचं पण त्याबरोबरच वाईटही वाटायचं. एका चांगल्या व्यक्तीला ही मुलं चुकीचं समजतात हे कळायचं पण आपण त्यांचा गैरसमज दूर करू शकणार नाही याचीही जाणिव व्हायची. शक्य होईल तेव्हा मी टीममेट्सना सांगण्याचा प्रयत्न करत असे पण त्याचा फारसा उपयोग होत नसे. कधी कधी वैशाली मला टीमबद्दल फोनवरून विचारत असे. कधी कधी मी स्वत:हून सांगत असे. मग मुंबई ऑफीसची गोष्ट पुण्याला वैशालीला कशी कळली म्हणून आरडाओरडा होत असे. बरेच वेळा संशयाची सुई माझ्याकडे वळत असे. अर्थात मला काही फरक पडत नसे त्याने. एखादा टीम मेंबर काही चुक करत असेल किंवा गैर वागत असेल तर ते वैशालीला सांगण्यात मला कधीच वावगं वाटलं नाही. अगदी काही टीम मेंबर्सनी "वैशालीचा चमचा" असं विशेषण लावलं तरीही.

मी आधीच्या प्रोजेक्टवर मन लाऊन केलेल्या कामाचा चांगला फायदा झाला. अगदी थोडयाच दिवसांत मला दुसरा प्रोजेक्ट मिळाला. "क्लायंट खडूस आहे. सांभाळून काम करा" अशी आगाऊ सुचनाही मिळाली. काम सुरु झालं. क्लायंट खरंच खडूस निघाला. "हे असंच का किंवा हे मी दाखवतोय असंच करा" असा प्रकार तो वरचेवर करू लागला. याला आपला हिसका दाखवायचाच असं मनाने ठरवलं आणि मग मीही त्याचं म्हणणं अगदी पद्धतशीर खोडून काढायला सुरुवात केली. एकदा तर साहेबांना असा जोरात धक्का दिला की "मला तुझी काम करण्याची पद्धत आवडली. तुला जे करायचं ते करत जा. फक्त ते काम पक्क करण्याच्या अगोदर मला एकदा दाखवत जा" अशी साहेबांनी सपशेल शरणागती पत्करली. हाही प्रोजेक्ट आता संपत आला. मी आता कंपनीत बर्‍यापैकी स्थिरावलो होतो. घर विकत घेण्याचा विचार करू लागलो होतो. पण मुंबईत राहायचं नव्हतं. त्यामुळे पुणे हा पर्याय निघाला. मागच्या वर्षभरात पुण्याला टीम झाली होती. त्यामुळे मला पुण्याला बदली मिळायला काहीच हरकत नव्हती. मी वैशालीशी विषय काढताच तिने "हा प्रोजेक्ट संपला की ये" असं सांगून टाकलं. पुण्याला बदली आणि घर घेण्याचा विचारांनी आयुष्यात एका नव्या वळणाला सुरुवात झाली होती...

डीसेंबर २०००८ चा शेवटचा आठवडा. निखिल, माझा टीम मधला जिवलग मित्र ऑनसाईटला चालला होता. त्याच्या घरच्यांसोबत मीही गेलो विमानतळावर. साहेब मेन गेटमधून आत गेले अणि आतून कॉईन बॉक्सवरून फोन केला.
"अरे सतिश, थोडा प्रॉब्लेम आहे."
"काय झालं बाबा आता?"
"अरे मला एक फॉर्म भरायचा आहे. त्याच्यात एक पॉईंट आहे, "टाईप ऑफ व्हिजिट". बिझिनेस, टूर, एजुकेशनल, पर्सनल वगैरे ऑप्शन आहेत. पण कळत नाही काय उत्तर द्यायचं. तू वैशालीला फोन करून विचार ना जरा"
"निखिल वेडा झाला का तू? आता रात्रीचे दहा वाजलेत. एव्हढया उशिरा कसा फोन करणार तिला?"
"अरे विचार ना यार, प्लिज"
आता मात्र वैशालीला फोन करणं भाग होतं. मी घाबरतच तिला फोन केला. तिनेही लगेच उत्तर दिलं आणि पुढच्याच वाक्यात माझी विकेट काढली, "तू कशाला गेला आहे रे तिकडे? विमाने पाहायला का?" हे ऐकताच मी अगदी खळाळून हसलो. फोन करण्याआधी मनावर आलेलं दडपण गायब झालं होतं...

यथावकाश मीही माझ्या पुढच्या प्रोजेक्टसाठी अमेरिकेला गेलो. तिथे रुळलो. काही दिवसांनी ऑफशोअरला माझ्या प्रोजेक्टमध्ये मला पाच सहा वर्षांनी सिनियर असणारी एक बंदी जॉईन झाली. कामाच्या गडबडीत मला तिच्या बरोबर कामासंदर्भात व्यवस्थित इंटरॅक्ट होता आलं नाही. तिचा गैरसमज झाला. आणि मला बरीच सिनियर असल्यामुळे तिने माझी खरडपट्टी काढणारा ईमेल वैशालीला सीसी मध्ये ठेऊन टाकला. चुक त्या नव्या बंदीची नव्हती आणि माझीही नव्हती. पण तरीही मी थोडासा दुखावला गेलो. वैशालीला मेल टाकला वस्तूस्थिती सांगणारा. तिने रीप्लाय केला, "आय हॅव फुल फेथ ईन यू. मी समजावते तिला". तिचं ते "आय हॅव फुल फेथ ईन यू" वाचलं आणि डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या.

बघता बघता अमेरिकेत येऊन मला दिड वर्ष झालं होतं. परतीच्या वाटा आता खुणावू लागल्या होत्या. त्याचवेळी अमेरिकेत रीसेशन हा प्रकार जोरात होता. मी ज्यावेळी भारतात परत येण्याचा विषय काढला त्याचवेळी माझी पोझीशन ऑफशोअर होत आहे हे कळलं. देव पावला. मी अमेरिकेतूनच पुण्याच्या बदलीची रिक्वेस्ट टाकली. आणि भारतात आल्यानंतर अगदी आठवडयातच मी पुणे ऑफीसमधून काम करू लागलो...

पुणे टीम सोबत वैशाली खुपच मोकळेपणाने वागते. ती बॉस आहे असं चुकूनसुद्धा जाणवत नाही. मग मुंबईवाले तिला का एव्हढे वचकून असतात हा विचार मनात यायला लागला. थोडा फार अंदाज येऊ लागला होता. वैशालीचं पुणे ऑफ़ीसमधून काम करणं हेच मुंबईवाल्यांच्या वचकून असण्यामागचं कारण होतं. रीमोट ऑफ़ीसमधून काम करत असल्यामुळे बरेचवेळा फक्त कामानिमित्त बोलणं होत असे. आणि मग कामानिमित्त ती जर कुणावर रागावली तर "वैशाली रागावते" असं सरसकट विधान केलं जात असे.

पुणे ऑफीसमध्ये आल्यापासून बरेच वेळा तिच्यासोबत कॅंटीनला संध्याकाळी नाश्त्यासाठी जाणं होतं. खुप विषयांवर ती भरभरून बोलते. ती जेव्हा सानिकाच्या, तिच्या तीन वर्षांच्या मुलीच्या गमती जमती जेव्हा सांगायला सुरुवात करते तेव्हा ती तिच्यातील प्रोजेक्ट मॅनेजरला विसरून जाते. लाडक्या लेकीबद्दल किती बोलू अन किती नको असं तिला होऊन जातं. त्या "आईचं" बोलणं मग मीही कौतुकाने ऐकत राहतो...

पंधरा एक दिवसांपूर्वी कळलं की वैशाली आमच्या टीम मधून मुव्ह होणार आहे, कुठली तरी दुसरी टीम तिला मिळाली आहे. तसा हा बदल चांगलाच आहे. गेले चार साडेचार वर्ष ती या टीमची ती प्रोजेक्ट मॅनेजर आहे. ऑफशोअरला सहा सात जणांसहीत सुरु झालेली टीम आज चाळीसवर गेली आहे. याचं बरंचसं श्रेय वैशालीचं. तिनं टीम सांभाळली, वाढवली. जणू काही या बदलाने तिला आता दुसरी छोटी टीम सांभाळायला मिळाली आहे...

...सहज म्हणून कधी मागे वळून पाहतो. उलटून गेलेल्या भुतकाळाच्या पानांवर खुप काही दिसतं. तीन वर्षांपूर्वी जेव्हा ही कंपनी जॉईन केली तेव्हा मी एक गोंधळलेला, आत्मविश्वास नसलेला मुलगा होतो. आज कंपनीचा यू एस रीटर्न्ड सिनियर सॉफ्टवेअर ईंजिनीयर आहे. तेव्हा डोळ्यांत स्वप्नं होती पण त्या स्वप्नांना दिशा नव्हती. कारण दिशा देऊ शकेल असं आजूबाजूला कुणीच नव्हतं. ती पोकळी वैशालीने भरून काढली. कधी रागावत तर कधी समजावून सांगत तिने मनामध्ये आत्मविश्वास भरला, स्वप्नांना दिशा दिली. तिचं हे देणं मी कधीच चुकतं करू शकणार नाही...

7 अभिप्राय:

हेरंब said...

मस्तच. स्वत:च्या बॉस बद्दल एवढं चांगलं बोलणारी आणि लिहिणारी व्यक्ती प्रथमच बघितली मी आणि तेही आयटीत असून .. हा हा .. छान लिहिलंय

अपर्णा said...

हेरंब (+1)

Photographer Pappu!!! said...

खरच आपल्या बॉस बद्दल चांगलं बोलणारा मनुष्य पहिल्यांदा पाहिलाय. याचा अर्थ वैशाली अत्यंत चांगली बॉस असली पाहिजे. असले बॉस मिळायला खरच भाग्य लागत. तुला बे एरिया मध्ये भेटणे शक्य झाले नाही, पाहू पुण्यात शक्य होतय का :)

Satya said...

dosta lucky ahes tu

sakali he asala vachalyavar ugich changala changala vatayala lagalay :)

Ruminations and Musings said...

सुंदर.. कोणाचेही ऋण मान्य करणे हे फ़ार मोठेपणाचे लक्षण आहे..

भानस said...

इतके मनापासून कौतुक आणि तेही बॉसचे, सहीच. सुदैव तुम्हा दोघांचे.:) पोस्ट मनापासून लिहिली आहेस,मनापर्यंत पोहोचली.

Anonymous said...

खरचं इतक छान वर्णन ऐकून चित्र डोळ्यासमोर उभ राहिलं!!! खूप छान लिहिता तुम्ही.