Tuesday, March 2, 2010

मायमराठीच्या नावानं...

दिनांक २६ फ़ेब्रुवारी.
जागतिक मराठी भाषा दिन.
एक "मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा" असा विषय असलेला विरोप उघडण्याची वाट पाहत मेलबॉक्समध्ये पडून होता.
पाठवणारा ओळखीचा होता. म्हणजे तशी ओळख नाही. तोही माझ्यासारखाच एक पुणेस्थित हौशी ब्लॉगर. कधीतरी त्याचं लेखन वाचतो. नेहमीच चांगलं असतं असं नाही, पण प्रामाणिकपणे लिहितो, त्यामुळे बरेच वेळा मनाला भावतं.

विरोप उघडला. विरोपातही तेच. "मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा" ही एव्हढी एकच ओळ. विरोपाला कचर्‍याची पेटी दाखवण्याआधी उत्सुकता म्हणून "टु" मध्ये कोण कोण आहेत पाहीलं. मोजायला सुरुवात केली. दहा, वीस, तीस... बापरे, यादी संपायलाच तयार नाही. पठ्ठयाने एव्हढे सारे ईमेल आय डी कुठून मिळवले असतील हा प्रश्न डोकं खाऊ लागला.

का कोण जाणे, पण हे असे एका ओळीचे शुभेच्छावाले विरोप किंवा चार ओळींचे ते र ला र आणि ट ला ट जोडलेले सणासुदीला पुढे ढकलले जाणारे लघूसंदेश (यसेमेस :प) डोक्यात जातात. अरे जर शुभेच्छाच दयायच्या आहेत तर करा फोन आणि बोला चार शब्द त्या व्यक्तीशी. ते नाही होणार. मी मला कुणाकडून तरी आलेला संदेश माझ्या नात्यातल्या, ओळखीतल्या, ऑफीसातल्या लोकांना पाठवला. माझ्या जबाबदारीतून सुटलो, अशी एकंदरीत भावना...

असो. दुसर्‍या दिवशी त्याच विरोपाला "रीप्लाय टु ऑल" उत्तर. उत्तर देणारा बहुतेक "पहील्या" विरोपाच्या "टु" मधला असावा. विषय होता "मराठी खरोखरच डाऊनमार्केट आहे काय?". विरोपामध्ये फक्त दोन ओळी खरडलेल्या होत्या. त्या दोन ओळींच्या खाली एक वेबदुनियावरील मुळ लेखाकडे घेऊन जाणारा दुवा. आपल्या वेबदुनियावरील लेखाचं मार्केटींग करण्यासाठी साहेबांनी किती कल्पक मार्ग शोधला...

"पहिल्या" विरोपाला अजून एक "रीप्लाय टु ऑल" उत्तर:
मित्रानो, मराठी दिनानिमित्त हार्दीक शुभेच्छा. प्रेषक: अ ब क. माझ्या ब्लॉगला भेट दया, अबक.ब्लॉगस्पॉट.कॉम
या शुभेच्छा आहेत की अ. ब. क. यांच्या ब्लॉगची जाहीरात? कहर म्हणजे या महाशयांनी चक्क होळीच्याही जाहीरातवजा शुभेच्छा देऊन टाकल्या. ते करण्यासाठी अ. ब. क. यांनी "पहील्या" विरोपाला "रीप्लाय टु ऑल" केले हे सुज्ञ वाचकांनी ओळखले असेलच.

अशा सहा सात जणांनी या वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले...

अर्थात हे सगळं मी लिहिलं म्हणजे मी मराठीद्वेष्टा आहे असं नाही. मलाही मराठी असल्याचा, मराठी भाषेचा अभिमान आहे. पण हा सगळा प्रकार खटकला.कुणी एक अतिउत्साही ब्लॉगर ८० - ९० ईमेल आय डी कुठूनतरी मिळवतो काय, एका ओळीचा विरोप त्या सगळ्याना पाठवतो काय, आणि त्या विरोपाला सात आठ "रीप्लाय टु ऑल" उत्तर देतात काय. सारंच विचित्र. शेवटी एकाने बिचार्‍याने "रीप्लाय ऑल" थांबवा अशी विनंती केली. आशा होती की त्यानंतर तरी हा प्रकार थांबेल. पण काही फरक पडला नाही. अजून एका गरीब बापडयाने विनंती केली. पण हे माय मराठीचे सरदार काही आपले घोडे मागे फीरवायचे नाव घेईनात.

आज मुळ विरोपास सात दिवस झाले. पण हा धागा काही शांत व्हायचं नाव घ्यायला तयार नाही. आज तर चक्क कहर झाला आहे. मराठीचा तथाकथित कैवार घेत सुरु झालेल्या या धाग्याला चक्क इंग्रजी उत्तर मिळालं आहे. "Dare to win" हा विरोपाचा विषय, आणि मुद्दाही तोच. जोडीला इंग्रजी लिखाण असलेली चार पाच चित्रे. विरोप पाठवणारा विरोपाच्या शेवटी आपल्या ब्लॉगचा दुवा द्यायला विसरलेला नाही हे सांगायची काही गरजच नाही.

आणि पुन्हा आपल्या विरोपाचा पत्ता या धाग्यामध्ये असल्यामुळे हताश झालेल्या ब्लॉगर आणि वाचकांची पत्रे...

माझी या धाग्याला उत्तर देणार्‍यांना कळकळीची विनंती आहे की, बाबांनो आपण सगळी माय मराठीची लेकरे आहोत. आपण सगळेच आपापल्या परीने जालावर मराठीत लेखन करून मराठीला "डाऊनमार्केट भाषा" म्हणणार्‍यांना सडेतोड उत्तर देत आहोत. पण तरीही, आपल्या ब्लॉगची माहीती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तुम्ही जी पद्धत निवडली आहे ती चूकीची आहे. अनोळखी व्यक्तीस त्याच्या वैयक्तिक विरोप पत्त्यावर विरोप पाठवणे हे जाल शिष्टाचारातच (नेटीकेट्स) नव्हे तर कुठल्याच शिष्टाचारात बसत नाही. यातले बरेचसे विरोपाचे पत्ते हे त्या त्या व्यक्तीसाठी अतिमहत्वाचे असतील. नव्हे त्यांचे दैनंदीन व्यवहार ते या विरोप खात्यांमधून करत असतील. असं असताना, जर कामाच्या गडबडीत असताना त्यांना यासारख्या धाग्यांमधून विरोप येत राहील्यावर त्यांची काय अवस्था होत असेल याचा विचार करा आणि हा प्रकार थांबवा... निदान मायमराठीसाठी तरी...

6 अभिप्राय:

अपर्णा said...

एकदम भिडलं मी पण सॉलिड वैतागलेय त्या थ्रेडला आणि तो पहिला मुर्ख आय.टी.वाला आहे...अरे साधं बिसीसी करायची पण अक्कल येत नाही काय??? त्याला म्हटलं की बाबा काढ मला तुझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमधुन तर साधं उत्तर किंवा उपाय नाही...इतकं वाटतं तर अशा व्यक्तीने जेवढ्या व्यक्तीना पिडलंय त्याऐवजी त्यांच्या ब्लॉगवर जाऊन लिहायचं ना काही लिहायचं ते....

HAREKRISHNAJI said...

संपुर्ण सहमत

भानस said...

सहमत. गेल्या दोन दिवसात एकंदरीत ५०-५५ विरोप आलेत.वैताग झालाय नुसता.

BEAUTIFUL BLOG TEMPLATES said...

सहमत आहे

Anonymous said...

मित्रा,
आलास का परत पुण्यात? भेटूयात ना यार एकदा... मला परत एकदा तुझ्याकडून सावित्री नदीच्या सूर्यास्ता वीषयी आणि लोणेरे, माणगाव विषयी ऐकायचे आहे !!!!!!!

Anonymous said...

अगदी बरोबर आहे तुमचं म्हणण. आणि मलाही ते सर्व मान्य आहे. सगळ्यांना होणाऱ्या त्रासाची सुरवात माझ्या त्या एका ओळीच्या इमेलमुळे झाली आहे. आपण उदार मनाने त्यावर तुमचे मत प्रकट केल्याबद्दल धन्यवाद. आणि माझ्या त्या घडलेल्या चुकीमुळे तुम्हाला जो त्रास सहन करावा लागला. जो वैताग आणि मनस्ताप झाला आहे, त्याबद्दल मी तुमचे हात जोडून माफी मागतो. आता सर्वांची माफी मी माझ्या नोंदीवर देखील मागेल. पण आत्ता तरी तुमची क्षमा मागत आहे. झालेला प्रकार खरचं दुखद होता. अस यापुढे माझ्या कडून घडणार नाही याची मी काळजी घेईल. आणि यावर आलेल्या प्रतिक्रियेतील सर्वांची देखील क्षमा मागतो. ह्या मुर्ख आय.टी वाल्याच्या चुकीचा त्रास तुम्हा सगळ्यांना झाला याबद्दल क्षमस्व.