Monday, May 24, 2010

इंद्रायणीकाठी

गुढीपाडव्याचा दिवस होता. गुरुवार. नेमका आठवडयाच्या मध्ये आलेला. एक दिवसाच्या सुटटीचं काय करावं हा प्रश्नच होता. आता तुम्ही म्हणाल पुण्यातले थियेटर काय ओस पडलेत? घ्यायचं कुठल्या तरी पोरीला घ्यायचं आणि मस्त ई स्क्वेअरला जायचं. निदान सिटीप्राईडला तरी जायला काहीच हरकत नाही. हाय काय ना नाय काय. पण प्रॉब्लेम असा हाये की ना आपण पोरीबाळींच्या वाटेला जातो ना आपल्याला पिच्चर बगन्यात यिंटरेष्ट हाये. असो. गावी घरी जावं तर जायचे दिडशे आणि यायचे दिडशे असा तीनशे किलोमीटरचा प्रवास एका दिवसात करायला जीवावर येतं. दुसर्‍या दिवशी यायचं ठरवावं तर सकाळी लवकर उठायचा कंटाळा येतो. आळंदीला जाऊया असाही एक विचार मनात आला. ज्याअर्थी ऑफीसच्या दारावरुन पीएमपीएलच्या आळंदी बसेस जातात त्याअर्थी इथेच कुठेतरी पुण्याच्या आसपास असणार आळंदी. पण लगेच जाणवलं की आता भयानक ऊन लागेल दुपारच्या वेळी. ऊनाच्या भितीने लगेच झटकून टाकला तो विचार. मग शेवटी पुण्यातच भटकायचं ठरवलं. तसाही पुण्यात नविनच असल्यामुळे फ़क्त जे एम रोड, एफ़ सी रोड आणि सिंहगड रोड आणि कर्वे रोड असे तीन चारच रस्ते ओळखीचे. काय म्हणताय, जे एम आणि एफ़ सी बरे माहिती आहेत? नाही हो, तुम्हाला वाटतंय तसं काही नाही. हे दोन्ही रस्ते एकेरी वाहतूकवाले असल्यामुळे ऑफीस ते घर हा प्रवास या दोन रस्त्यांवरून त्यातल्या त्यात सुखाचा होतो. बास, ठरवलं. एफ़ सी रोडवरून संचेतीपर्यंत आपल्या पायाखालच्या वाटेने जायचं आणि तिथून मात्र समोर दिसेल त्या रस्त्यावर गाडी टाकायची.

संचेतीवर आलो. डाव्या हाताचा रस्ता ऑफीसकडे जाणारा. ओळखीचा. म्हणून तो बाद. उजव्या दिशेला जात राहीलो. उजव्या हाताला रेल्वेची धडधड ऐकू येऊ लागली. म्हणजे पुणे स्टेशन आलं होतं तर. स्टेशन मागे टाकून पुढे जात राहीलो. एक तिठा आला. तिठा म्हणजे काय विचारताय? अहो जिथे तीन रस्ते एकमेकांना मिळतात त्या जागेला तिठा म्हणतात. तुमचं मराठीचं शब्दांचं ज्ञान खुपच तोकडं आहे बुवा. असो असो. "आज क्लासेस हा एक बिझनेस झाला आहे.परंतू बिझनेस करताना काही इथिक्स पाळायचे असतात" अशी वाक्यं असणारे "टॉपच्या" लेखकांचे लेख वाचले की होतं असं. तर आपण कुठे होतो. अहो असं काय करताय राव? तिठयावर होतो नाही का? तर माझ्या डाव्या हाताला जो रस्ता जात होता त्याच्यावर जे फलक होते त्यावर आळंदी, मुंबई असं लिहिलेलं होतं. मला ना आळंदीला जायचं होतं, ना मुंबईला. त्यामुळे तो रस्ता बाद. आता राहीला उजव्या हाताचा रस्ता. फलक वाचले. ती उडडाणपुलाची सुरुवात होती. सोलापूरला जाणार्‍या कुठल्यातरी महामार्गावर तो उडडाणपुल निघत असावा बहुतेक. किंवा आधी पुण्याच्याच कुठल्यातरी भागात जाऊन नंतर सोलापुरच्या दिशेने जाणारा रस्ता असावा तो. मी आपला उगाच नसते उपद्व्याप नकोत म्हणून उडडाण्पुलावर न जाता पुलाखालून जो छोटा रस्ता जात होता त्याच्यावरून मार्गक्रमणा करु लागलो. तो छोटा रस्ता ओकवूड की अशाच काहीशा नावाच्या एका झ्याकपाक सोसायटीच्या बाजुने घेऊन जाऊ लागला. थोडया वेळाने जरा मोठया रस्त्याला लागलो. फारसा विचार न करता गाडी उजवीकडे टाकली. आणि आश्चर्य. मी चक्क तिथेच आलो होतो. जिथे मी आळंदीला जायचं नाही म्हणून डावीकडे न जाता उजवीकडे वळलो होतो.

गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. थोडा वेळ विचार करू लागलो. बास का राव? विचार काय तुम्हालाच करता येतो. काय योगायोग पाहा. आळंदीला जायचं नसताना मी पुन्हा आळंदीला जाणार्‍या वाटेवर आलो होतो. ही माऊलींचीच ईच्छा तर नाही. नव्हे माऊलींनीच तर मला रस्ता चुकवून पुन्हा आळंदीच्या वाटेवर तर आणलं नाही ना? अन स्वत:चंच हसायला आलं. हा एक निव्वळ योगायोग. या असल्या चमत्कारावर तर माझे माळकरी बाबाही विश्वास ठेवणार नाहीत. तर मी असा विचार करणे हा मुर्खपणाच. आता मात्र मी फारसा विचार न करता आळंदीच्या वाटेला लागलो. अकरा साडे अकराचा सुमार होता. उन लागायला सुरुवात झाली होती. आणि त्यात मी टी शर्ट घातला होता. म्हणजे तसं उनाचं काही वाटत नाही. ईंजिनीयरींगला असताना अगदी बारा बारा तास शेतात भातकापणी केलीय. पण हल्ली वेगळंच टेन्शन येतं. लोक खुप चौकस झालेत हल्ली. मुलाने प्रोफाईलमध्ये तर वर्ण गोरा असं लिहिलंय. पण हा तर चक्क सावळा आहे. आमच्या पिंकीला की नाही गोरा मुलगा हवा आहे. हे असले प्रकार होतात. म्हणून मी कातडी उन्हाने रापू नये खुप काळजी घेतो. मागे सिंहगडावर गेलो तेव्हा आख्खी ८० मिलीची सन क्रीमची टयुब एकदाच तोंडाला आणि हाताला फासली होती.

आळंदीला आलो. पार्किंगमध्ये गाडी घातली. समोरुन एक माणूस पावतीपुस्तक नाचवत समोर आला. पाच रुपयांची पावती फाडली. गाडीची जबाबदारी आमच्यावर नाही असं त्या पावतीच्या खाली ठळक अक्षरात लिहिलं होतं. मग हे लेकाचे पाच रुपये कसले घेतात? जागा एक तर सरकारची असावी किंवा देवस्थानाची. पार्किंगची झाडलोट करायला पैसे लागतात म्हणावं तर जिकडे तिकडे कचरा अगदी भरभरून पडलेला. चालायचंच. मी इंद्रायणीच्या घाटावर आलो. हो. देवस्थानाच्या नदीला जर पायर्‍या बांधल्या असतिल तर त्याला घाट म्हणतात. नदीचं पाणी बर्‍यापैकी आटलेलं. काही ठीकाणी तर चक्क शेवाळ आलेलं. बाजुला कसलंसं कुंड. त्याची अवस्था तर अगदी भयानक. बेकार वास येत होता त्याच्या पाण्याचा. मी पटकन तिथून बाजुला झालो. बाया-बापे, पोरंसोरं त्या पाण्याने आंघोळ करत होते. काही गावाकडचे लोक तर काही शहरातले त्यातल्यात्यात सुशिक्षित वाटत होते. काही जण तर चक्क डिजिटल कॅमेर्‍याने फोटो काढत होते. हे फोटो ते नक्की ओरकुटवर टाकण्यासाठी काढत होते. हल्ली खुप फॅड आलंय या गोष्टींचं मध्यम वर्गामध्ये. विशेषत: आय टी वाल्यांमध्ये. देवस्थानाला पिकनिकसाठी जायचं आणि परत आल्यावर आख्ख्या हापिसाला मेल टाकायची अमुक तमुक प्रसाद ऍट माय डेस्क. दोन तीन दिवसांत ओरकुटवर फोटोही अपलोड करायचे. हेही चालायचंच.

मला काही स्नान वगैरे करायचं नव्हतं. इंद्रायणीचं असलं म्हणून काय झालं, त्या तसल्या पाण्यानं आंघोळ करायची मी कल्पनासुद्धा करु शकत नव्हतो. उगाच आपले पाय पाण्यात बुचकाळले. आणि मंदिराच्या दिशेने चालू लागलो. (इथे खरं तर एक पाणचट कोटी करावीशी वाटतेय. पण नको. उगाच देवाधर्माच्या लेखामध्ये तसले उल्लेख नकोत.) एक आजोबा हातात गंधाचा डबा घेऊन माझ्या दिशेने आले. थांब बाळा असं म्हणून हातातल्या तारेचा आकडा त्या डब्यात बुडवून माझ्या कपाळाला गंध लावला. मीही त्या आजोबांना नमस्कार केला. खिशातून दोन चार रुपये काढून त्यांच्या हातावर टेकवेले. उगाचच लहानपणी भजनांमध्ये तारस्वरात म्हटलेल्या "विठोबा तुझा मला छंद, कपाळी केशरी गंध" या गजराची आठवण झाली. मंदिर जवळ आले होते. हार फुले, प्रसाद आणि धार्मिक पुस्तकांची दुकाने दोन्ही बाजुला दिसू लागली होती. प्रत्येक दुकानदार अक्षरश: खेकसत म्हणत होता, "या साहेब. इथे चपला काढा. पुढे मंदिर आहे." च्यायला. काय कटकट आहे. माझ्या चपलांचं काय करायचं ते माझं मी बघेन ना. आणि मंदिरात चपला नेऊ नयेत एव्हढी अक्कल मलाही आहे. ठेविन की कुठेतरी बाजुला, मंदिरात शिरण्याआधी. एकजण खुपच मागे लागला. शेवटी काढल्या चपला आणि ठेवल्या त्याच्या स्टॉलच्या खाली तर भाऊसाहेबांनी माझ्यासमोर हार-फुले, पेढे असं बरंच काही धरलं. लोकांनी देवाला वाहिलेल्या या गोष्टी मागच्या दाराने दुकानात येतात हे माहिती असल्यामुळे मी देवाला फुलं वगैरे वाहायच्या कधी भानगडीत पडत नाही. पण तो दुकानदार फारच मागे लागला. मग मीही फार नखरे न करता पहिलीच वेळ आहे म्हणून फक्त फुलं घेतली आणि चालू पडलो.

देवळाच्या आवाराच्या मुख्य दरवाजातून प्रवेश केला आणि हादरलो. भली मोठी रांग होती दर्शनासाठी. अगदी क्षणभर ईथूनच नमस्कार करून माघारी फिरावं असा विचारही मनात चमकून गेला. पण तो विचार मनातून झटकून टाकला. रांगेच्या शेवटी जाऊन उभा राहीलो. पुढच्या एका आजोबांना विचारलं की दर्शन होण्यासाठी अंदाजे किती वेळ लागेल. "कमीत कमी अडीच तास" आजोबांनी अगदी निर्विकारपणे सांगितलं. "देवाचिये दारी, उभा क्षणभरी" म्हणणार्‍या ज्ञानदेवांच्या दाराशी अडीच तास उभं राहायचं या कल्पनेनेच मला कसंतरी होऊ लागलं. आता माझ्या मागे रांग वाढू लागली. मग मीही मनातले सगळे विचार झटकून ते वातावरण एंजॉय करू लागलो. नदीच्या घाटावर जसे सर्व प्रकारचे लोक म्हणजे गावातले, शहरातले लोक दिसले होते, तसेच इथेही होते. माझ्या थोडा पुढे एक माळकरी काका आणि आजोबा लोकांचा ग्रुप होता. ते हरीपाठाचे अभंग म्हणत होते. हरीपाठाचे अभंग माझ्याही आवडीचे. नामस्मरणाचे महत्व साध्यासोप्या शब्दांत सांगण्यासाठी ज्ञानदेवांनी हरीपाठाचे अभंग या नावाने एकुण अठठाविस अभंग लिहिले. लहानपणी शाळेतून आल्यावर गावच्या मारूतीच्या देवळात होणार्‍या हरीपाठाला मीही न चुकता जात असे. वारकरी लोकांमध्ये हरीपाठाचे अभंग म्हणण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. जमलेल्या लोकांचे दोन ग्रुप करायचे. एका ग्रुपने एक ओळ म्हणायची. दुसर्‍याने त्याच्यापुढची. मग पहिल्या ग्रुपने त्याच्यापुढची. आताही तसंच होत होतं. मी त्या ग्रुपच्याही पुढे पाहीलं तर एक बायकांचा ग्रुप होता. काकू कॅटेगरीतल्या बायका हिरव्यागार सहावारी नेसलेल्या तर आजी कॅटेगरीतल्या बायका नऊवारी. कपाळावर भलामोठा गंधाचा टीळा ही काकू आणि आजींमधली कॉमन गोष्ट. त्याही काहीतरी म्हणत होत्या. माझ्या पुढयातले काका लोक अंमळ जोरातच हरीपाठ म्हणत असल्यामुळे मला त्या काकू ग्रुपचं बोलणं निटसं ऐकायला येत नव्हतं. जरा कान देऊन ऐकल्यावर कळलं की त्या "ज्ञानोबा माउली तुकाराम" असा गजर म्हणत आहेत.

रांग आता बारीत शिरली होती. वरती सीसी टीव्ही कॅमेरे लावलेले दिसत होते. बरीच जळमटं साचली होती त्या कॅमेर्‍यांवर. बहूतेक कॅमेरे लावल्यानंतर पुन्हा काही त्यांच्याकडे कूणी पाहीलं नसावं. त्यामूळे ते कॅमेरे कुणी मॉनिटर करत असेल किंवा त्यांचं रेकॉर्डींग कुणी पाहत असेल याची किंचितही शक्यता नव्हती. या बारीचं वैशिष्ट्य म्हणजे लोकांना रांगेमध्ये अक्षरश: जखडून टाकलं जातं. जर कुणाला एकीला, दोनाला जायचं झालं तरी बारीतून बाहेर पडणं अवघड असतं. (आणि समजा बाहेर पडता आलं तरी जाणार कुठे हा प्रश्न आहेच. आपल्याकडे सार्वजनिक ठीकाणी स्वच्छतागृहांची बोंब असते.) पण मला खटकलं ते वेगळंच. या लोकांनी मारे जिकडे तिकडे लिहून ठेवलंय की शिस्त पाळा, रांग तोडू नका वगैरे वगैरे. देवाच्या दारी काही होऊ नये पण समजा दुर्दैवाने काही झालंच तर बारीतल्या लोकांना बाहेर कसं पडता येईल याबद्दल कुठेच काही सुचना नाहीत. किंबहूना बारीची रचनाच अशी असते की लोक बाहेर पडू शकत नाहीत. आळंदी काय किंवा ईतर कुठलेही देवस्थान, आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने खरंच काही करत असेल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.

खुप मोठं प्रश्नचिन्ह मनात ठेऊन मी बारीतून पुढे सरकू लागलो. गाभार्‍याच्या दरवाजाशी पोहचलो. भयानक गर्दी होती. जेमतेम एक माणूस आत जाऊ शकेल एव्हढया छोट्या दरवाजातून एका वेळी तीन चार माणसं आत जाण्याचा प्रयत्न करत होती. कसाबसा आत घुसलो. समाधीवर माथा टेकवला. जेमतेम दोन सेकंद झाले असतील ईतक्यात बडव्याने अक्षरश: पुढे ढकललं मला. संताप झाला जीवाचा. *डव्या समाधी काय तुझ्या बापाच्या मालकीची आहे अशी सणसणीत शिवी मनातल्या मनात त्या बडव्याला घातली. कबुल आहे, खुप मोठी रांग असते, लोक समाधीवर माथा टेकवल्यानंतर माथा बराच वेळ उचलत नसतील. पण म्हणून काय ढकलायचं माणसाला? एखाद्याला दरवाजा वगैरे लागला म्हणजे? मंदिरातून बाहेर पडलो. समाधीकडे तोंड करून माफी मागितली. आणि अश्वत्थ पाराच्या बाजुला येऊन बसलो.

थोरामोठयांनी गोष्ट म्हणून सांगितलेला, पुस्तकांमधून वाचलेला तो आठशे वर्षांपुर्वीचा ईतिहास नजरेसमोरून सरकू लागला. संसार सोडून संन्याशी झालेले विठ्ठलपंत. त्यांचं गुरुच्या आज्ञेवरून पुन्हा ग्रुहस्थाश्रम स्विकारणं. निवृती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता या चार मुलांचा जन्म. आळंदीच्या ब्रम्हवृंदानं विठठलपंताना समाज बहिष्कृत करणं. आणि शेवटी पापाचं प्रायश्चित्त म्हणुन ही चार लेकरं झोपेत असताना मात्यापित्यांचं इंद्रायणीच्या डोहात उडया घेणं. सारं विलक्षण. त्यानंतर स्वत:ला ज्ञानी म्हणवून घेणार्‍या ब्रम्हवॄंदानं या चार चिमुकल्यांचे केलेले हाल यांचं वर्णन तर अंगावर काटा आणणारं. नंतरचे त्यांचे चमत्कार तर आश्चर्याने तोंडात बोटं घालावीत असे. खरेच का निवृतींला अंधार्‍या रात्री ब्रम्हगिरीच्या निबिड रानात गहीनीनाथांनी गुरुपदेश केला असेल? खरेच का ज्ञानदेवाने रेडयामुखी वेद बोलविले असतिल, खरंच का त्याने वाघावर बसून आपल्या भेटीला येणार्‍या चांगदेवाच्या भेटीला जाण्यासाठी जड भिंत चालविली असेल? खरंच का त्याने प्रेतयात्रेमधील प्रेताला जिवंत करून आपल्या भावार्थदिपिकेचा लेखक बनवला असेल? ज्ञानदेव योगी होता. जिवंत समाधी घेऊ शकणारा योगी. आपल्या योगसामर्थ्याच्या जोरावर त्याने हे केलंही असेल. त्यामुळे कदाचित हे सारं खरं असेलही. कदाचित खरं नसेलही. कुठल्याही देवाच्या, संताच्या चरित्रात दंतकथा असतात, तशा कदाचित या गोष्टीही दंतकथा असतील. कदाचित या गोष्टी रुपकात्मक असतील.पण तरीही हे सारं खरं असो किंवा खोटं असो, त्यामूळे ज्ञानदेवाच्या संतपणाला कमीपणा येत नाही.

ज्या वयात आजची विज्ञान युगातील मुलं बारावीच्या सीइटीला सत्त्याण्णव अठठयाण्णव टक्के मार्क आणण्यासाठी रात्रंदिवस घोकंपटटी करतात त्या वयात ज्ञानदेवाने भगवदगीतेवर भावार्थदिपिका नावाचा टीकात्मक ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ जनसामान्यांमध्ये ज्ञानेश्वरी म्हणून प्रसिद्ध झाला. असे म्हणतात की ज्ञानेश्वरीच्या एकेका ओवीवर पिएचडी होऊ शकते. भावार्थदिपिकेच्या जोडीनेच अम्रूतानुभव, चांगदेव पासष्टी, हरीपाठाचे अभंग, आज वारकर्‍यांचं भजन ज्या अभंगाने सुरु होतं त्या "रुप पाहता लोचनी" या अभंगापासून "पैल तो गे काऊ कोकताहे" या बैरागी रागातल्या गीतापर्यंत सार्‍या साहित्यरचनेने अमृताते पैजा जिंकणार्‍या मराठीला समृद्ध करणारी ही कामगिरी त्याने वयाच्या अठराव्या वर्षाच्या आधीच केली. हा मात्र नक्कीच चमत्कार आहे. पुरावा असणारा चमत्कार. या वारकरी पंथाच्या संस्थापक असणार्‍या ज्ञानियांच्या राजाला आज आठशे वर्षानंतरही उभा महाराष्ट्र माउली म्हणून साद घालतो. हाही चमत्कार नाही काय?

पारावर बसून बराच वेळ झाला होता. पोटात कावळे ओरडू लागले होते. समाधीकडे तोंड करून मी पुन्हा एकदा नमस्कार केला आणि देवळाच्या आवाराच्या बाहेर पडलो. आजुबाजुला त्यातल्या त्यात बरं हॉटेल पाहीलं आणि आत शिरलो. साधी थाळी मागवली. घशाला कोरड पडली होती म्हणून थंडाही मागवला. ईतक्यात एक आजोबा बाजूला येऊन उभे राहीले. पांढरं मळकं धोतर, पांढरा शर्ट. कपाळावर टीळा. "बाला बसू काय रं हितं" आजोबांच्या बोलण्यात केविलवाणेपणा होता. बहुतेक त्यांना पांढरपेशांचा हाडूत हुडूत करण्याचा अनुभव असावा. मी बसा म्हणताच आजोबा बसले. वेटर थंडा घेऊन आला. मी एक रिकामा ग्लास मागवला. आजोबांना थंडा देता यावा म्हणून. ईतक्यात एक आजीबाई माझ्या पुढयात येऊन बसल्या. अगदी पार म्हातार्‍या. साठीच्याही पुढे असाव्यात. बहुधा इथेच मागून खात असाव्यात असं कपडयांवरुन वाटत होतं. समोर त्या आजी बसलेल्या असताना केवळ त्या आजोबांना थंडा देणं प्रशस्त वाटेना. म्हणून अजून एक रिकामा ग्लास मागवला. तिन्ही ग्लास समसमान भरले. आजोबांनी हसर्‍या चेहर्‍याने माझ्याकडे पाहीलं आणि मी देऊ केलेला थंडयाचा ग्लास लगेच घेतला. आजी मात्र थंडा घ्यायला तयार होईनात. शेवटी हो नाही करत घेतला त्यांनी तो ग्लास घेतला. थंडा पिताना एक अनोखं समाधान आजींच्या चेहर्‍यावर दिसत होतं. थंडा पिऊन होताच आजींनी ग्लास खाली ठेवला आणि चक्क मला हात जोडले. त्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर समाधानाची, कृतज्ञतेची भावना दिसत होती. घोटभर थंडयाने समाधान पावणार्‍या त्या साठ पासष्ट वर्षांच्या आजींकडे पाहून मला आम्हा आय़टीवाल्या काल परवाच्या शाळकरी पोरांची कीव वाटली. वर्षाला काही लाखांमध्ये कमवणारे आम्ही आयटीवाले "सालं माझंच पॅकेज कसं बकवास आहे" हे गावभर सांगत फिरतो. एखाद्या छोटया वाडीचं पुर्ण महिन्याचं वाण सामान येईल ईतका पगार महिन्याकाठी घेउनही आम्ही समाधानी असे नसतोच. मग त्याची कारणे घराचे हप्ते, गाडय़ांचे हप्ते अशी काहीही असोत.

जवळपास साडे तीन-चार वाजले होते. उन्हे खाली झाली होती. मंदिराच्या शिखराकडे पाहून मी पुन्हा एकदा ज्ञानियांच्या राजाला नमस्कार केला आणि परतीच्या वाटेला लागलो...