Wednesday, August 4, 2010

मनामध्ये नवी उमेद पुन्हा एकदा भरून घे

जर तुझ्या जगात उलथापालथ होताना
कुणी तुझ्या हाकेला ओ दिलीच नाही,
तुला आधाराची नितांत गरज असताना
निसटत्या क्षणी मदत मिळालीच नाही,

कातरवेळी दूर जाणा‍र्‍या वाटेकडे पाहूनही
मायेचा स्पर्श करणारं कुणी आलंच नाही,
नजरेमध्ये गगनभरारीचं स्वप्न असताना
तुझ्या पंखांना कुणी जर बळ दिलंच नाही,

जर कधी झाकोळून गेलं निळं आभाळ सारं
तू भर दर्यात अन कधी बेईमान झालं वारं,
निरव एकाकी वाटेत तू अडखळत असताना
कुणीच नसेल बाजुला तुला आधार देणारं,

माझ्या खांद्यावर विश्वासाने डोकं ठेव अन
तुझ्या आसवांना तू वाट मोकळी करुन दे
विसरुन जा जिवलगा सार्‍या जगाला अन
मनामध्ये नवी उमेद पुन्हा एकदा भरून घे