मेघना आज एक वर्षाची झाली. मेघना मी एक वर्षापूर्वी घेतलेली कार. ह्युंदाई आय टेन मॅग्ना १.२ या तिच्या पुर्ण नावामधल्या फक्त मॅग्नाचं मराठीकरण करुन आम्ही तिचं नाव मेघना ठेवलं.
गेल्या वर्षी साधारण सप्टेंबर मध्ये आयुष्य भयानक कंटाळवाणं झालं होतं. जे व्हायला हवं असं वाटत होतं ते होईल असं अजिबात वाटत नव्हतं आणि जे व्हायला नको असं वाटत होतं ते मात्र पिच्छा सोडायला तयार नव्हतं. यातलं एक म्हणजे माझं ऑफीसमधलं काम. मी वेब डेव्हलपर आहे या वाक्याचा भुतकाळ झाला होता. आता मी जगभरात तीन हजार युजर्स असलेल्या आणि रोज काही ना काही फाटणार्या वेबसाईटचा टेक्निकल लीड होतो, सोळा जणांच्या टीमचा टीम कॉर्डीनेटर होतो. पण हे दुरुन डोंगर साजरे त्यातला प्रकार होता. टेक्निकल लीड या नात्याने माझं काम काय वेबसाईटमध्ये काही फाटलं तर जोपर्यंत डेव्हलपर्स पॅच मारत नाहीत तोपर्यंत युजर्सना गंडवणं. डेव्हलपर्स टीम बिझी असल्यामुळे नविन युजर सेटप करणे, त्यांचे पासवर्ड रीसेट करणं ही असली बकवास कामे करावी लागायची. सगळ्यात अवघड काम काय तर वेबसाईटवर वापरलेला प्रोजेक्ट प्लानचा अॅक्टीवेक्स कन्ट्रोल लोड ब्राउजरमध्ये कसा लोड करायचा हे युजरला समजावणं.
टीम कॉर्डीनेटरचं काम म्हणजे तर आनंदी आनंदच होता. आमची बेचाळीस जणांची टीम. महापे, पुणे, चेन्नई, ह्युस्टन आणि सॅन रॅमॉन अशा पाच ठीकाणी विखुरलेली. प्रोजेक्ट मॅनेजर महापे, नवी मुंबईला. बाकीच्या टीम त्या त्या ठिकाणचे टीम कॉर्डीनेटर सांभाळायचे. आणि इतकी खत्रुड कामे करावी लागायची की विचारु नका. टीम मध्ये नविन डेव्हलपर आला त्याच्या साठी मशिन शोधा. ते मशीन वरच्या किंवा खालच्या फ्लोअरवर असेल तर ती मशिन आपल्या फ्लोअरवर आणण्यासाठी रीक्वेस्ट टाका, तिचा फॉलोअप करा. नाईट शिफ्टच्या डेव्हलपर्सना रात्री नाश्ता नाही मिळाला, कँटीनमध्ये जा, तिकडे चौकशी करा आणि मग पीएम सोबत हे सगळं डिस्कस करा. भारीच.
या अशा कंटाळवाण्या गोष्टींमुळे काहीतरी वेगळं करावसं वाटत होतं. ट्रेकींग वगैरे कधीतरी ठीक वाटायचं. आणि तसंही मला जय भवानी जय शिवाजी म्हणत उन्हातान्हात वणवण करत फीरण्यात काहीही रस नव्हता. हडपसरला ग्लायडींग सेंटर आहे असं ऐकलं होतं.त्याची माहिती काढली होती. पण प्रत्यक्ष जाणं मात्र होत नव्हतं. हे सगळं असं चालू असताना एका मित्राने सहज म्हटलं की ड्रायव्हींग शिक. कल्पना वाईट नव्हती. मला निखिलची आठवण आली. मी आणि निखिल महापेला असताना बेस्ट फ्रेंड होतो. पुढे तो अमेरिकेला गेला. दोन महिन्यांनी मीसुद्धा गेलो. दोघांची ऑफीसेस दोन वेगवेगळ्या शहरात होती. दोन शहरांमधलं अंतर कारने अर्धा तासाचं. तो म्हणे मी तुझ्यासोबत राहायला येतो, आपण दोघात कार घेऊ. म्हणजे मला तुझ्या तिकडून ऑफीसला येता येईल. मला काही प्रॉब्लेमच नव्हता. झालं. निखिल आला तो माझा शोफर बनुनच. मी काही कधी कारच्या व्हीलला हात लावला नाही.
त्यामुळे आता मात्र ड्रायव्हींग शिकायला काही हरकत नव्हती. हो नाही करता करता एक दिवस पैसे भरुन टाकले आणि आमचा ड्रायव्हींगचा क्लास सुरु झाला. बिच्चारा ट्रेनर. अक्षरशः झेलत होता मला. माझ्याईतका मंद त्याला कधीच भेटला नसेल. आपला राग मोठया मुश्किलीने कंट्रोल करुन तो समजावायचा, अहो सर एव्हढा अर्जंट ब्रेक लावलात तर मागचा गाडीवाला येउन आपल्याला धडकणार नाही का. ट्रेनिंगचे पंधरा दिवस संपले. हळूहळू का होईना, ड्रायव्हींग हा प्रकार आवडायला लागला होता. आता गाडी विकत घ्यावी असं वाटू लागलं होतं. नाही म्हणायला युएसला असताना भारतात परत गेलो की एक सेकंड हँड अल्टो घ्यायची असं ठरवलं ही होतं. अधून मधून मारुतीची ट्रु व्हॅल्यू वेबसाईट पाहत होतो. परंतू भारतात आल्यावर मात्र तो विचार बारगळला होता.
आता मात्र राहून राहून नवी कार घ्यावीशी वाटत होती. बाबांजवळ विषय काढला.
"अल्टो नको", बाबांनी स्पष्ट आणि नेमक्या शब्दात त्यांचं मत सांगितलं.
"का?"
"खुप छोटी आहे. बसल्यावर असं वाटतं की आपण जमिनीवरुन सरपटत चाललो आहोत."
"तुम्ही हे ज्या कारबद्दल बोलत आहात ती अल्टो नसेल. एट हंड्रेड असेल. अल्टो इतकीही छोटी नाही."
"पण नकोच."
अल्टोचा ऑप्शन बाबांनी निकालात काढला. दुसरा ऑप्शन पुढे आला तो वॅगन आर. वेबसाईटवर जाऊन डीटेल्स काढले. मला आवडली. घरच्यांना फोटो दाखवले.
"ही टुरीस्ट कार वाटते रे."
मी कपाळावर हात मारुन घेतला. एव्हाना मी कार घेतोय ही बातमी माझ्या मित्रमंडळीत पसरली होती. मी वॅगन आरचा विचार करतोय आणि ऑन रोड कॉस्ट फोर प्लस आहे हे सांगताच माझ्या बर्याच मित्रांनी "देन व्हाय डोन्ट यू गो फॉर आय टेन?" असा प्रश्न मला केला होता.
रस्त्यावर धावणार्या आय टेन पाहील्या आणि मी पाहता़क्षणीच त्या कारच्या प्रेमात पडलो. ऑन रोड पाचच्या आसपास जात होती. हरकत नव्हती. मी गाडी दिवाळीला हवीय म्हणून लगेच बुकिंग करुन टाकलं. ड्रायव्हींगचा क्लास लावणं ते गाडी बुक करणं हा जेमतेम महिन्याभराचा कालावधी होता. महिन्याभरात मी कार बुकसुद्धा केली होती. माझे डोळे भरुन आले. मन भुतकाळात गेलं...
बारावी झाली. ईंजिनीयरींगला ऍडमिशन घेतलं. ज्यावर्षी मी ईंजिनीयरींगला ऍडमिशन घेतलं त्याच वर्षी ईंजिनीयरींगच्या फ्री सिटची फी चार हजारांवरून दहा हजारावर गेली. बाबांना धक्काच बसला. कारण बाबांनी वर्षाला चार हजार रुपये फी गृहीत धरून माझ्या ईंजिनीयरींगच्या खर्चाचा हिशोब केला होता. माझ्या सुदैवाने एक गोष्ट चांगली होती. ईंजिनीयरींग कॉलेज माझ्या घरापासून आठ किलोमीटर अंतरावर होतं त्यामुळे मी घरुन रोज येऊन जाऊन कॉलेज करू शकणार होतो. माझा बाहेर राह्यचा खायचा खर्च वाचणार होता. झालं. हो नाही करता माझं ईंजिनीयरींग सुरु झालं. पाठच्या भावांमध्ये फक्त एकेक वर्षाचं अंतर असल्यामुळे आता एक बारावीला होता तर छोटा अकरावीला. खर्चाची थोडीफार ओढाताण सुरू झाली होती.कॉलेज थोडंसं आडवाटेला होतं त्यामुळे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याईतक्या कमी एस टी बसेस कॉलेजला जायच्या. घरी बाबांची एक जुनी सायकल होती. मी सोयीचे पडेल म्हणून सायकलने कॉलेजला ये जा करण्याचा निर्णय घेतला. जायचे आठ किलोमीटर आणि यायचे आठ किलोमीटर. सोळा किलोमीटर तर होतं. आणि तसं त्या सायकल वर मी एक वर्ष काढलं सुदधा.
दुसरं वर्ष सुरु झालं. भावाची बारावी संपली होती. पठठयाने मेडिकलची एंट्रन्स एग्झाम सुदधा क्लियर केली.
"बाबा त्याच्या मेडिकलच्या फीचं काय करणार आहात तुम्ही?"
"बघूया. त्याची या वर्षीची फी भरण्याइतके पैसे आहेत माझ्याकडे जमा. या वर्षीची फी भरुया आपण त्याची. पुढच्या वर्षीपासूनची फी भरण्यासाठी आपण बॅंकेकडून शैक्षणिक कर्ज घेउया"
"बाबा, त्याने फीचं भागेल. मेडीकल कॉलेज दापोलीला आहे. त्याला हॉस्टेलला राहावं लागेल. त्याच्या खर्चाचं काय?"
"होईल काहीतरी. तू काळजी करू नकोस." बाबा माझ्या खांदयावर थोपटत मला धीर देत होते.मी मान वर करुन बाबांच्या चेह-याकडे पाहीलं. बाबांचे डोळे अश्रूने डबडबले होते.
माझं सेकंड ईयर चालू होतं. भावाचं मेडीकल कॉलेज चालू झालं होतं. सर्वात छोटा भाऊ आता बारावीला होता. खर्चाचा ताण वाढला होता. गरीबी काय असते हे आता जाणवायला लागलं होतं. अशातच माझी सायकल आता रोज काहीबाही दुखणं काढू लागली होती. जुनीच सायकल ती. त्यात जवळ जवळ दिड वर्ष मी तिला रोज सोळा किलोमिटर दामटलेली. आज काय तर चेन तुटली. उदया काय तर पेडल तुटलं. असं रोज काहीतरी होऊ लागलं. राहून राहून वाटत होतं की नवी सायकल मिळाली तर. पण ते तितकं सोपं नव्हतं. नवी सायकल आणण्यासाठी पैसे कुठून येणार होते. नाही म्हणायला मी सायकलींच्या वेगवेगळ्या दुकांनांमध्ये मी मला हव्या तशा सायकलच्या किंमती काढल्या होत्या. साधारण सतराशे अठराशे पर्यंत चांगली सायकल मिळू शकत होती. पण एव्हढे पैसे आणणार कुठून. खुप विचित्र दिवस होते ते. माझे क्लासमेट ज्या दिवसांमध्ये चाळीस पन्नास हजारांच्या मोटार सायकल घेऊन कॉलेजला यायचे त्या दिवसांमध्ये मला सायकल घेण्यासाठी अठाराशे रुपये कुठून आणायचे किंवा तेव्हढे पैसे बाबांकडे कसे मागायचे हा प्रश्न मला पडला होता.
शेवटी एक दिवस थोडं घाबरत घाबरतच मी बाबांसमोर विषय काढला.
"बाबा, हल्ली सायकल खुप काम काढते"
"चालवून घे ना राजा"
"नाही हो बाबा. मला खुप त्रास होतो. आठ किलोमीटरच्या अंतरामध्ये तिची चेन इतक्या पडते की विचारू नका. जरा टाईट करून घेतली सायकलवाल्याकडून की मग सायकल चालवताना खुप जोर लावावा लागतो. आणि मग दम लागतो मला"
"अरे पण नवी सायकल दोन हजाराच्या आत येणार नाही. तेव्हढी महाग सायकल नाही परवडणार आपल्याला"
"बाबा, बघा ना थोडं"
बाबांचा नाईलाज आहे हे मलाही कळत होतं पण त्या जुन्या सायकलमुळे रोजचं सोळा किलोमीटरचं सायकलिंग करताना मलाही खुप त्रास व्हायचा. शेवटी बाबांनी पाचशे पाचशे रुपये जमेल तसे देईन असं एका ओळखीच्या सायकलवाल्याला सांगितलं आणि मला नवी सायकल मिळाली....
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
"ओ साबजी उठो. अगर सोनाही हैं तो घरपेही सो जाओ ना. यहापे क्या सोफापें एसीमें सोनेको आते हो क्या?"
मी डोळे चोळत उठलो. नाईट शिफ्टच्या सिक्युरीटीला सॉरी म्हटलं. त्याचंही बरोबर होतं. मी सीडॅ़कच्या जुहू, मुंबई सेंटरच्या पार्टटाईम डिप्लोमाला अॅडमिशन घेतलं होतं. विकडेजला ऑफीस. शनिवारी आणि रविवारी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा ईन सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कोर्सचे थेअरी क्लासेस असायचे. जॉबला असणार्यांसाठी विकडेजना रात्री प्रॅक्टीससाठी लॅब्ज ओपन असायच्या. मीही दिवसा ऑफीसला जाऊन संध्याकाळी गोरेगांवला रुमवर न जाता सरळ अंध्रेरीला उतरून जुहूला सीडॅकला जात असे. बरेच वेळा उशीर झाला की नउ साडे नउनंतर बस मिळायची नाही. मग अंधार्या जुहू गल्लीतून घाबरत घाबरत तंगडतोड मी कॉलेजला जात असे. दिवस ईतके वाईट होते की माझ्याजवळ इंजिनीयरींगची डीग्री होती, प्रोग्रामर म्हणून नोकरी होती. पण पगार होता साडेतीन हजार. आणि या साडेतीन हजारात मला माझं मुंबईतलं राहणं, खाणं, प्रवास आणि माझी पीजीची फी हे सगळं भागवायचं होतं. परीस्थीती माझा अंत पाहत होती. पण माझ्या डोळ्यात आकाशात भरारी मारायची स्वप्नं होती. मला कुठल्याही परिस्थीतीत माघार घ्यायची नव्हती. त्यामुळे दिवसा ऑफीसला जायचं. संध्याकाळी ऑफीस सुटलं की सरळ जुहू गल्लीतून रात्री नऊ साडे नऊच्या सुमारास अर्धा तास चालत सीडॅकला जायचं. रात्रीचं जेवण परवडणारं नव्हतं, त्यामुळे कॉलेजसमोरच्या एका वडापावच्या गाडीवर दोन वडापाव किंवा भजीपाव असं जे काही मिळेल ते खायचं. साडे अकरा बारा पर्यंत सी, सी प्लस प्लस आणि जावाच्या कोडींगची प्रॅक्टीस करायची. आणि मग सिक्युरीटीची नजर चुकवून तिथेच सोफ्यावर पायाचं मुटकुळं करुन झोपायचं. सकाळी सहाला उठायचं, गोरेगांवला रुमवर जायचं, आंघोळ वगैरे उरकून लगेच वेस्टर्न रेल्वेने धक्के खात चर्चगेटला, ऑफीसला...
सहा वर्ष झाली या सार्याला. माझ्या लाईफस्टाईलमध्ये ड्रास्टीक ट्रान्स्फॉर्मेशन झाले आहेत. सुखं, समृद्धी, पैसा सारं काही आहे. पण सोबत त्या वडापाव खाऊन काढलेल्या रात्रींच्या आठवणीही सोबत आहेत. आणि का कोण जाणे येणार्या सुखांच्या जोडीने त्या आठवणीही येतात. आणि येताना एकटयाच न येता डोळ्यात पाणीही घेऊन येतात...
Friday, October 28, 2011
हॅप्पी बर्थडे प्रिन्सेस !!!
Tuesday, October 18, 2011
मदत
का कोण जाणे, हरेषकाकांचे हात कात्री आणि कंगवा माझ्या डोक्यावर चालवत होते खरे परंतू काहीतरी गडबड आहे हे मात्र मला जाणवलं होतं. हरेषकाकांचं सलून हे माझं गेली सहा वर्ष केस कापण्याचं ठीकाण. अगदी इंजिनीयरींगच्या फायनल ईयरला असल्यापासून मी त्यांच्याकडे केस कापायला जात आहे. यात मी अमेरिकेला असताना दिड वर्षाचा जो खंड पडला तेव्हढाच. गेली दोन वर्ष पुण्यात राहूनही मी केस कापायला मात्र न चुकता गावी हरेषकाकांकडे जातो.
"काका, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का?" मी न राहवून त्यांना विचारलं.
"अरे छोटयाचा स्कॉलरशीपचा फॉर्म भरायचा आहे. हल्ली हे सगळे फॉर्म्स इंटरनेटवर भरावे लागतात. आपल्या गोरेगांवात आणि लोणेरेला बीएसएनएलची लाईन आहे. बरेच वेळा चालू नसते आणि चालू असलीच तर ती साईट ओपन होत नाही."
काकांचा मोठा मुलगा रत्नागिरीला फिनोलेक्स कॉलेजला ईंजिनीयरींगला आहे. छोटा मुलगा बाटूला डीप्लोमाला आहे. त्याचा स्कॉलरशिपचा ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणी येत होत्या. आणि फॉर्म भरायची शेवटची तारीख दोन दिवसांवर आल्याने काका हवालदिल झाले होते. जर वेळेत फॉर्म भरला नाही तर मुलाला स्कॉलरशीप मिळणार नाही या चिंतेने त्या बापाच्या चेहर्यावर भीती दाटली होती. बहुतेक स्कॉलरशीप नाही मिळाली तर मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा या विचारांनी ते काळजीत पडले होते.
"या सरकारी वेबसाईटसचं असंच असतं. जरा रीक्वेस्ट वाढल्या की यांचे सर्वर आडवे होतात. लेकाचे लोड टेस्टींग करतच नाहीत. वेबसाईट बनवली, सर्व्हरवर टाकली की झालं यांचं काम" मी उंटावरून शेळ्या हाकल्या. काका चेहर्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह घेऊन पाहत होते. आपण पाजळलेलं ज्ञान काकांच्या कामाचं नाही हे माझ्या लगेच लक्षात आलं.
"काका मी लॅपटॉप आणला आहे. आणि माझ्याकडे इंटरनेट कनेक्शनसुद्धा आहे. पण आमच्या गावात लाईट नाही. मी संध्याकाळी लॅपटॉप घेऊन येतो. तुम्ही तुमच्या मुलाला सलूनमध्ये बोलवा."
संध्याकाळी त्यांच्या मुलाला बाजूला बसवून मी फॉर्म भरायला सुरुवात केली. फॉर्म बर्यापैकी भरुन झाला असतानाच लोड शेडींगमुळे इलेक्ट्रीसिटी गायब झाली. माझ्या लॅपटॉपची बॅटरी गेलेली असल्याने इलेक्ट्रीसिटी जाताच माझ्या लॅपटॉपनेही दम तोडला. आज बदलूया उदया बदलुया करत बॅटरी बदलण्यात चालढकल केल्याचा आज पहिल्यांदा पश्चाताप झाला. मी काकांना झाला प्रकार पुन्हा एकदा समजावला. काकांच्या चेहर्यावर पुन्हा एकदा भलं मोठं प्रश्नचिन्ह.
"काका मी लॅपटॉप ठेऊन जातो. लाईट आली की तुम्ही मुलाला फॉर्म पुन्हा एकदा भरायला सांगा."
"त्याला जमेल का?"
"जमेल हो. डीप्लोमाला आहे तो. मी समजावतो त्याला कसं करायचं ते."
"अरे पण तुझा एव्हढा किमती लॅपटॉप कसा ठेऊन घेऊ? काही बिघडलं तर?"
"काही बिघडत नाही. आणि बिघडलंच तर दुरुस्ती करायला मी समर्थ आहे."
काकांना हेही झेपलं नाही.
"अहो काका, काही होत नाही. फक्त मोडतोड व्हायला नको. बाकी काही बिघाड झाला तर तो मी दुरुस्त करु शकेन. मी ऑफीसमध्ये हेच धंदे करत असतो."
हे मात्र काकांना पटलं आणि त्यांनी लॅपटॉप ठेऊन घेतला.
त्या दिवशी रात्री कधीतरी साडेदहा अकरा वाजता भावाकडे लॅपटॉप दिला. सकाळी भावाला विचारलं की त्याने फॉर्म भरला का तर त्याने माहिती नाही म्हणून खांदे उडवले. मी ही कामाच्या गडबडीत विसरुन गेलो.
आणि आज काकांनी फोन केला. फॉर्म भरुन झाला होता. त्याची अॅक्नॉलेजमेंटही मिळाली. मी लॅपटॉप दिल्यामुळे खुप मोठया संकटातून आपण कसं वाचलो हे सांगून काका पुन्हा पुन्हा माझे आभार मानत होते.
मलाही खुप बरं वाटलं. एरव्ही मी सिनेमे पाहण्यासाठी आणि सोशल नेटवर्किंग साईट्सवर चकाटया पिटण्यासाठी वापरत असलेला लॅपटॉप खर्या अर्थाने कुणाच्यातरी उपयोगी पडला होता.