Tuesday, October 18, 2011

मदत

का कोण जाणे, हरेषकाकांचे हात कात्री आणि कंगवा माझ्या डोक्यावर चालवत होते खरे परंतू काहीतरी गडबड आहे हे मात्र मला जाणवलं होतं. हरेषकाकांचं सलून हे माझं गेली सहा वर्ष केस कापण्याचं ठीकाण. अगदी इंजिनीयरींगच्या फायनल ईयरला असल्यापासून मी त्यांच्याकडे केस कापायला जात आहे. यात मी अमेरिकेला असताना दिड वर्षाचा जो खंड पडला तेव्हढाच. गेली दोन वर्ष पुण्यात राहूनही मी केस कापायला मात्र न चुकता गावी हरेषकाकांकडे जातो.

"काका, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का?" मी न राहवून त्यांना विचारलं.

"अरे छोटयाचा स्कॉलरशीपचा फॉर्म भरायचा आहे. हल्ली हे सगळे फॉर्म्स इंटरनेटवर भरावे लागतात. आपल्या गोरेगांवात आणि लोणेरेला बीएसएनएलची लाईन आहे. बरेच वेळा चालू नसते आणि चालू असलीच तर ती साईट ओपन होत नाही."

काकांचा मोठा मुलगा रत्नागिरीला फिनोलेक्स कॉलेजला ईंजिनीयरींगला आहे. छोटा मुलगा बाटूला डीप्लोमाला आहे. त्याचा स्कॉलरशिपचा ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणी येत होत्या. आणि फॉर्म भरायची शेवटची तारीख दोन दिवसांवर आल्याने काका हवालदिल झाले होते. जर वेळेत फॉर्म भरला नाही तर मुलाला स्कॉलरशीप मिळणार नाही या चिंतेने त्या बापाच्या चेहर्‍यावर भीती दाटली होती. बहुतेक स्कॉलरशीप नाही मिळाली तर मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा या विचारांनी ते काळजीत पडले होते.

"या सरकारी वेबसाईटसचं असंच असतं. जरा रीक्वेस्ट वाढल्या की यांचे सर्वर आडवे होतात. लेकाचे लोड टेस्टींग करतच नाहीत. वेबसाईट बनवली, सर्व्हरवर टाकली की झालं यांचं काम" मी उंटावरून शेळ्या हाकल्या. काका चेहर्‍यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह घेऊन पाहत होते. आपण पाजळलेलं ज्ञान काकांच्या कामाचं नाही हे माझ्या लगेच लक्षात आलं.

"काका मी लॅपटॉप आणला आहे. आणि माझ्याकडे इंटरनेट कनेक्शनसुद्धा आहे. पण आमच्या गावात लाईट नाही. मी संध्याकाळी लॅपटॉप घेऊन येतो. तुम्ही तुमच्या मुलाला सलूनमध्ये बोलवा."

संध्याकाळी त्यांच्या मुलाला बाजूला बसवून मी फॉर्म भरायला सुरुवात केली. फॉर्म बर्‍यापैकी भरुन झाला असतानाच लोड शेडींगमुळे इलेक्ट्रीसिटी गायब झाली. माझ्या लॅपटॉपची बॅटरी गेलेली असल्याने इलेक्ट्रीसिटी जाताच माझ्या लॅपटॉपनेही दम तोडला. आज बदलूया उदया बदलुया करत बॅटरी बदलण्यात चालढकल केल्याचा आज पहिल्यांदा पश्चाताप झाला. मी काकांना झाला प्रकार पुन्हा एकदा समजावला. काकांच्या चेहर्‍यावर पुन्हा एकदा भलं मोठं प्रश्नचिन्ह.

"काका मी लॅपटॉप ठेऊन जातो. लाईट आली की तुम्ही मुलाला फॉर्म पुन्हा एकदा भरायला सांगा."
"त्याला जमेल का?"
"जमेल हो. डीप्लोमाला आहे तो. मी समजावतो त्याला कसं करायचं ते."
"अरे पण तुझा एव्हढा किमती लॅपटॉप कसा ठेऊन घेऊ? काही बिघडलं तर?"
"काही बिघडत नाही. आणि बिघडलंच तर दुरुस्ती करायला मी समर्थ आहे."

काकांना हेही झेपलं नाही.

"अहो काका, काही होत नाही. फक्त मोडतोड व्हायला नको. बाकी काही बिघाड झाला तर तो मी दुरुस्त करु शकेन. मी ऑफीसमध्ये हेच धंदे करत असतो."

हे मात्र काकांना पटलं आणि त्यांनी लॅपटॉप ठेऊन घेतला.

त्या दिवशी रात्री कधीतरी साडेदहा अकरा वाजता भावाकडे लॅपटॉप दिला. सकाळी भावाला विचारलं की त्याने फॉर्म भरला का तर त्याने माहिती नाही म्हणून खांदे उडवले. मी ही कामाच्या गडबडीत विसरुन गेलो.

आणि आज काकांनी फोन केला. फॉर्म भरुन झाला होता. त्याची अ‍ॅक्नॉलेजमेंटही मिळाली. मी लॅपटॉप दिल्यामुळे खुप मोठया संकटातून आपण कसं वाचलो हे सांगून काका पुन्हा पुन्हा माझे आभार मानत होते.

मलाही खुप बरं वाटलं. एरव्ही मी सिनेमे पाहण्यासाठी आणि सोशल नेटवर्किंग साईट्सवर चकाटया पिटण्यासाठी वापरत असलेला लॅपटॉप खर्‍या अर्थाने कुणाच्यातरी उपयोगी पडला होता.

1 अभिप्राय:

ispeak said...

hey hi i m Ninad , elder son of ur hareshkaka .. Nice blog and thanks a lot for the help , its god dam hard to find people like you who are willing to help someone doesnt matter how big or small the help is ..so once again thanks ...