Saturday, August 31, 2013

सच्चिदानंद बाबांची गोष्ट

गोष्ट तशी खुप जूनी. जवळपास आठशे वर्षांपूर्वीची. आताच्या आहमदनगर जिल्ह्यातील नेवासा नावाचं गाव. गावातील मोहिनीराजाचं मंदीर थेट समुद्रमंथनातील अमृतवाटप आणि विष्णूच्या मोहीनी अवताराच्या कथेशी निगडीत. या गावातील मुख्य रस्त्यातून एका सुंदर सकाळी संन्याशी वाटावीत अशी चार मुलं, तीन मुलगे आणि एक मुलगी मार्गक्रमण करत असतात. चौघांच्याही वयात थोडे थोडे अंतर असल्याचे जाणवत होते. एकमेकांच्या पाठीला पाठ लावून जन्माला आलेली सख्खी भावंडेच जणू. चौघांच्याही चेहर्‍यावर एक अतीव समाधान, शांती विलसताना दिसत होती. वाट चालत असताना या मुलांच्या समोरुन एक प्रेतयात्रा येते. प्रेतयात्रेच्या पुढे चालणारी एक स्त्री यातील एका बाल संन्याशाच्या पायावर भक्तीभावाने डोके ठेवते."अष्टपुत्रा सौभाग्यवती भव", तो बाल संन्याशी स्त्रीच्या चेहर्‍यावर हात ठेवून डोळे मिटून म्हणतो. स्त्री दचकते. दोन पावले मागे सरकते. संन्याशालाही प्रश्न पडतो.
"काय झालं माई? दचकलात का?" संन्याशी शांतपणे विचारतो.
"महाराज, तुमचा हा आशीर्वाद या जन्मी लाभणे शक्य नाही. ही माझ्या नवर्‍याची प्रेतयात्रा आहे."
संन्याशी क्षणभर विचारात पडतो. पुढच्या क्षणी तो खांदा देणार्‍यांना तिरडी खाली उतरायला सांगतो. प्रेत कफनातून मोकळे करण्याची आज्ञा देतो. संन्याशाच्या चेहर्‍यावरील तेज पाहून त्याच्या शब्दाचा अव्हेर करण्याचे धाडस कुणालाच होत नाही. प्रेत कफनातून मोकळे केले जाते.
"उठा सच्चिदानंद बाबा", तो बालसंन्याशी प्रेताच्या कपाळावर हात ठेवून म्हणतो.
आणि काय आश्चर्य, ते प्रेत जिवंत होते. त्या बाल संन्याशाला नमस्कार करते. या सच्चिदानंद बाबांना पुढे हा बालसंन्याशी आपल्या भगवदगीतेवरील टीकेचा लेखक व्हायला सांगतो.

ही त्या बालसंन्याशाची भगवदगीतेवरील टीका या सच्चिदानंद बाबांच्या उल्लेखाने संपते.

शके बाराशते बारोत्तरे | तैं टीका केली ज्ञानेश्वरें || सच्चिदानंद बाबा आदरें | लेखकु जाहला ||

अजून एक गोष्ट. ही गोष्ट अगदी अलीकडची. १९८२ सालातली. मेल्व्हीन मॉर्स हे अमेरिकेच्या सिअ‍ॅटल येथील एका बालरुग्णालयात स्थायी वैद्यकतज्ञ म्हणून काम करत होते. अचानक त्यांना आयडाहोमधील पोकाटेलो येथून तातडीच्या मदतीसाठी बोलावले जाते. क्रिस्टल मेझलॉक नावाची एक आठ वर्षांची मुलगी पोहण्याच्या तलावात बुडाली होती. मॉर्स त्या ठीकाणी पोहचले तेव्हा त्या मुलीच्या हृदयाची धडधड थांबून १९ मिनिटे झाली होती.तिची बुब्बुळे विस्फारीत होउन स्थिरावली होती.मॉर्सनी आपले कौशल्य वापरुन त्या मुलीच्या छातीवर दाब देऊन तसेच इतर उपायांनी तिचे हृदय चालू करण्याचा प्रयत्न केला. आणि ते चालू झालेही. मुलीच्या हृदयाची धडधड चालू होताच पुढचे उपचार स्थानिक वैद्यांवर सोपवून मॉर्स आपल्या रुग्णालयात परतले.

त्यानंतर काही आठवडे लोटले. मॉर्स दुसर्‍या एका रुग्णालयात काही कामानिमित्त गेले होते. त्याच रुग्णालयात क्रिस्टलवर उपचार चालू होते. मॉर्सना याची काहीच कल्पना नव्हती. क्रिस्टलला चाकाच्या खुर्चीवरुन एका खोलीतून दुसर्‍या खोलीत नेत असताना समोरुन मॉर्स गेले. त्यावेळी त्यांच्याकडे बोट दाखवून क्रिस्टल ओरडली, "हीच ती व्यक्ती, जिने माझ्या नाकात नळ्या खुपसल्या आणि त्यातून पाणी बाहेर काढलं." हे ऐकून मॉर्सना धक्काच बसला. कारण मॉर्सनी त्या मुलीवर जेव्हा उपचार केले तेव्हा ती मुलगी तांत्रिकदृष्ट्या म्रुतावस्थेत होती. त्यामुळे तिला आपल्यावर कोण उपचार करत आहे याची जाणिव होणे शक्यच नव्हते.

मॉर्स यांनी क्रिस्टलच्या अनुभवाचा अभ्यास करायचे ठरवले. थोडयाच काळात या प्रकाराला मृत्यूसमीप अनुभव (नियर डेथ एक्स्पेरियन्स) म्हणतात हे ल़क्षात आले. या प्रकारावर तोपर्यंत जरी विपुल लेखन आणि नोंदी झाल्या असल्या तरी त्या सार्‍या नोंदी प्रौढांच्या होती. आतापर्यंत लहान मुलांच्या बाबतीत अशी कुठलीच नोंद झालेली नव्हती. मॉर्स यांनी या विषयावरचे वाचन तर वाढवलेच परंतू स्वतःही इतर लहान मुलांच्या अशा मृत्यूसमीप अनुभवांची नोंद करायला सुरुवात केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सार्‍या मुलांच्या अनुभवात समानता होती.काळोखी बोगदे, मृत नातेवाईकांशी भेट, देव-देवता पाहणे असंच वर्णन सार्‍या मुलांनी केलं होतं. याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या या आठवणींमध्ये चक्क त्यांच्यावर उपचार होत असतानाच्याही आठवणी होत्या. आणि उपचार चालू असताना ती मुलं तांत्रिकदृष्ट्या मृत झाली होती.

विज्ञानाने या अनुभवांचा पाठपुरावा चालूच ठेवला. वैज्ञानिकांनी बरेच सिद्धांत मांडले. त्यातील सामायिक कारणे काहीशी अशी आहेतः रक्तप्रवाह थांबणे, डोळ्यांना ऑक्सीजनचा पुरवठा थांबणे, शरीर मृत्यूशी झुंज देत असताना एपिनेफ्राईन आणि अ‍ॅड्रनलाईन अतिरिक्त प्रमाणात शरीराबाहेर स्त्रवणे. हा प्रश्न अगदी सर्वमान्य पद्धतीने निकाला निघाला नसला तरी वैज्ञानिकांनी माणसांवर संप्रेरकांचे प्रयोग करुन कृत्रिमरीत्या मृत्यूसमीप अनुभव निर्माण करण्यात यश मिळवले आहे.

विज्ञान नविन असं काहीच निर्माण करत नसतं. ते फक्त निसर्गाच्या अज्ञात नियमांची उकल करत असतं. आता या क्षणी ज्या गोष्टी अतिंद्रीय, चमत्कार वाटत आहेत त्या तशा नाहीत. फक्त त्यामागचा कार्यकारणभाव आज तरी विज्ञानाला आपल्याला माहिती नाही. आणि या विश्वात निसर्ग नियमांपलिकडे जाऊन काहीही होत नसतं. त्यामुळे सच्चिदानंद बाबांची गोष्ट आपल्याला त्या बालसंन्याशाच्या योगसामर्थ्याचा चमत्कार वाटत असला तरी त्यामागेही अशीच काहीतरी वैज्ञानिक कारणे असतील. त्या बालसंन्याशाच्या नावावर खपवल्या जाणार्‍या इतरही चमत्कार कथा एकतर दंतकथा असाव्यात किंवा त्यात काही तथ्य असले तरी त्यामागे काहीतरी कार्यकारणभाव असावा. ज्यावेळी माणसाची मती कुंठीत होते, समोर घडलेल्या घटनेचं आकलन होत नाही त्यावेळी त्या घटनेला तो चमत्कार म्हणून मोकळा होतो. ही घटना एका पीढीकडून दुसर्‍या पीढीकडे गोष्ट स्वरुपात हस्तांतरीत होत असताना त्यावर अद्भुततेचा मुलामा अधिक अधिक दाट होत जातो आणि मग आपणही शाळेत विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये जडत्व, गती, न्युटनचे गतीविषयक नियम अभ्यासलेले असतानाही आळंदीला गेल्यावर निरागसपणे विचारतो, "ती भींत कुठे आहे हो?"