Thursday, June 23, 2016

तो हा नाथसंकेतीचा दंशु

पिण्डे पिंडाचा ग्रासु | तो हा नाथसंकेतीचा दंशु | परि दाऊनि गेला उद्देशु | महाविष्णु ||ज्ञा. ६-२९१||

"अलख निरंजन"
आपेगांवच्या गोविंदपंत कुलकर्ण्यांच्या वाडयासमोर उभे राहून त्या कानफाटया जोग्याने आवाज दिला. दाढीजटा वाढवलेल्या, कमरेपासून छातीपर्यंत गुंडाळलेली मेखला, जानव्यासारखी शोभणारी शैली, हरणाच्या शिंगाची शॄंगी, पुंगी, कर्णकुंडले, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, हातात त्रिशूल, काखेत झोळी, पायात खडावा अशा काहीशा आदरयुक्त भीतीदायक वेशात तो जोगी घरातून भिक्षा येण्याची वाट पाहत होता. चेहर्‍यावरील सुरकुत्या जरी वय वाढल्याचे सांगत होत्या तरी चेहर्‍यावरील तेज लोपले नव्हते.
गोविंदपंतांनी बाहेरचा आवाज ओळखला. डोळे लकाकले, चेहर्‍यावर स्मित फुलले. त्यांनी माजघराकराडे आवाज दिला.
"अहो ऐकलंत का? लवकर बाहेर या. नाथबाबा आलेत."
गोविंदपंत लगबगीने वाडयाच्या दारावर आले. गहीवरुन जोग्याच्या चरणी लोटांगण घातले. पाठोपाठ गोविंदपंतांच्या पत्नी निराबाई आणि मुलगा विठ्ठल बाहेर आले आणि जोग्याच्या चरणी लागले.
"अलख निरंजन", जोग्याने पुन्हा एकदा खणखणीत आवाजात नमनाचा उच्चार केला.
"आदेश", गोविंदपंत, निराबाई आणि विठ्ठलाने नमनाला उत्तर दिले.
"उठा गोविंदपंत. आपेगांवाच्या कुलकर्ण्यांना एका जोगडयाच्या पायी असं झोकून देणं शोभत नाही." जोग्याने हसतच गोविंदपंताच्या दंडांना पकडून उठवले.
"उठ माऊली, विठ्ठला, ऊठ बाळा"
"नाथबाबा, असे नका बोलू. आपेगांवच काय, आपेगांवसारख्या दहा गावांचं कुलकर्णीपण तुमच्या पायी वाहीन मी." गोविंदपंतांचा स्वर व्याकुळ झाला होता.
"या गोरखनाथांच्या शिष्याला, या गहिनीनाथाला काय करायचं आहे तुमचं कुलकर्णीपण. मुक्त संचार करणारा जोगी मी. तुमच्यासारखा संसारी असा मायेच्या पाशात अडकवायला पाहतो आणि आम्हीही मग आमची पावले आपेगांवाकडे वळवतो. काय विठ्ठला, बरोबर ना रे?" त्या जोग्याने, गहिनीनाथांनी विठ्ठलाच्या पाठीवर मायेनं हात फिरवला. विठ्ठलाला अगदी बालपण सरल्यानंतर आईच पुन्हा एकदा पाठीवरून हात फिरवत आहे असं वाटलं.
गोविंदपंतांनी गहिनीनाथांचा हात धरुन वाडयात आणले. बसावयास घोंगडी अंथरली.
"काय म्हणता गोविंदपंत? कसे चालू आहे सारे?"
"काय सांगू नाथबाबा. वय झालं आता माझं. शरीर साथ देत नाही. पैलतीर साद घालत आहे. कुलकर्णीपण निभावत नाही. देवानं हे एक लेकरु पदरात घातलं. बुद्धीमान निघालं. अगदी पंचक्रोशीतील ब्रम्हवृदांना हेवा वाटावा असं हे ज्ञानी लेकरु आहे. पण चित्त संसारात नाही. विवाहाचं वय केव्हाच उलटून गेलं आहे मात्र विवाहाचं मनावर घेत नाही. सदा न कदा तिर्थयात्रेला जाण्याची भाषा. घरी असला तर कुलकर्णीपणाचं काही शिकून घे म्हणावं तर ते ही नाही. सतत त्या पोथ्यांमध्ये डोकं खुपसून बसतो. आमचं त्याबद्दल काहीच म्हणणं नाही. पण त्याच्या जोडीनं प्रपंच पाहायला नको का? नाथबाबा, तुम्ही तरी त्याला समजवा."
गोविंदपंत क्षणभर थांबले. पुढे बोलते झाले, "नाथबाबा, अजून एक मागणे आहे तुमच्या पायी"
"गोविंदपंत, मी कानफाटा जोगी तुम्हाला काय देणार?"
"नाथबाबा, विठ्ठलाला तुमच्या चरणी ठाव दया"
"गोविंदपंत, तुमच्या पिताश्रींना, त्र्यंबकपंतांना गोरखबाबांचा अनुग्रह होता. देवगिरीच्या यादवांच्या सेवेत असूनही त्र्यंबकपंतांना अवधूत पंथाचा ओढा होता. गोरखबाबांनी त्यांची तळमळ ओळखली आणि त्यांना अनुग्रह दिला. तीच गत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची. तुम्ही माझ्याकडून अनुग्रह घेतलात. तुमच्या धाकट्या बंधूराजांचं, हरिपंतांचंही तेच. यादवांच्या चाकरीत असताना लढाईत काळाने त्यांच्यावर घाला घातला नसता तर त्यांनीही अवधूतमार्ग अनुसरलाच असता. विठ्ठलाचे तसे नाही. हा मुक्त पक्षी आहे गोविंदपंत. त्याचा अवधूत मार्गाकडे ओढा नाही. त्याची ईच्छा नसताना मला त्याच्या अंगावर जोग्याची वस्त्रे चढवायची नाहीत."
निराबाईंनी आणलेली भिक्षा गहिनीनाथांनी आपल्या झोळीत घेतली. गोविंदपंतांचे हात हाती घेतले. मायेच्या नजरेने एकवार गोविंदपंतांकडे पाहीले.
"पंत, आदिनाथावर श्रद्धा ठेवा. सारे ठीक होईल. येतो मी. अलख निरंजन."
ज्या विठ्ठलाला गहिनीनाथांनी अनुग्रह देण्यास नकार दिला, त्याच विठ्ठलाची दोन मुलं पुढे अवधूत मार्गाची पताका जगी फडकवणार होती. आणि ते सुद्धा गहिनीनाथांकडूनच अनुग्रह घेऊन.
******************************************************

सकाळची कोवळी उन्हे घेत ती मंडळी ब्रम्हगिरीच्या भोवती असलेल्या पायवाटेनं चालली होती. माता, पिता आणि चार लेकरं असा तो लवाजमा अगदी रमत गमत चालला होता. सर्वात पुढे विठ्ठलपंत, त्यांच्या खांद्यावर चिमुरडी मुक्ता, त्या पाठोपाठ सोपान आणि रुक्मिणीबाई, त्या मागे ज्ञानदेव आणि सर्वात शेवटी निवृत्ती. खुप आनंदात होती सारी मंडळी. मुलं तर भलतीच खुश होती. बाबांनी त्यांना गौतम मुनींची गोष्ट सांगितल्यापासून मुलांना कधी एकदा ब्रम्हगिरी पाहू असे झाले होते. आणि आज तो योग आला होता.
"बाबा, मला गौतम मुनींची गोष्ट ऐकायची आहे" छोटया मुक्तेनं म्हटलं.
"ए मुक्ते, किती वेळा बाबांना तीच तीच गोष्ट सांगायला लावतेसस, छोटया सोपानाने मुक्तेला हटकले.
"मला पुन्हा ऐकायची आहे ना रे सोपानदादा"
"मुक्ते, या वेळी मी सांगू का ती गोष्ट तुला?", ज्ञानदेवाने विचारले.

ज्ञानदेव चालता चालता गौतम मुनींची गोष्ट सांगू लागला.

"खुप खुप वर्षांपूर्वी या ब्रम्हगिरी पर्वतावर गौतम नावाचे एक ऋषी आपली पत्नी अहिल्या हिच्यासह राहत होते. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन वरुण देवतेने त्यांना एक अक्षय पात्र दिले होते. या पात्रातून त्यांना अखंड धान्य मिळत असे. हे सहन न होऊन इतर ऋषींनी एक दिवस एक मायावी गाय गौतम मुनींच्या आश्रमात पाठवली. तिला हाकलण्यासाठी म्हणून गौतम मुनींनी दर्भाच्या काही काडया गायीच्या दिशेने फेकल्या. ती मायावी गाय गतप्राण झाली. गौतम मुनींच्या माथी गोहत्येचे पातक आले. या पातकातून मुक्त होण्यासाठी गंगास्नान आवश्यक होते. गंगेला आपल्या आश्रमात आणावी म्हणून गौतम मुनींनी शिवाची तपश्चर्या सुरु केली."

ज्ञानदेवाची कथा अगदी रंगात आली होती. सोपान, मुक्ता अगदी रंगून गेले होते कथेत. आपल्या लेकराचे कथा रंगवण्याचं कसब विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई कौतुकाने पाहत पुढे चालत होते. थोरला निवृत्ती मात्र जरा मागेच रेंगाळत चालत होता. बाकीचे सारे आणि निवृत्ती यांच्यामध्ये जरासे अंतर पडले होते. इतक्यात मागे झाडीत कसलासा मोठा आवाज झाला आणि पाठोपाठ वाघाची डरकाळी ऐकू आली. विठ्ठलपंत आपल्या सार्‍या कुटुंबाला घेऊन जीवाच्या भयाने पळत जाऊन दुरवर एका शिळेच्या आडोशाला जाऊन लपले. बराच वेळ आपल्यासोबत निवृत्ती नाही हे त्यांच्या ध्यानीच आले नाही. मात्र जेव्हा निवृत्ती सोबत नाही हे त्यांना कळले सार्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले. सारे निवृत्तीला साद घालू लागले.
"निवृत्ती.."
"दादा रे, कुठे आहेस?"
निवृत्तीला घातलेली साद ब्रम्हगिरीच्या कडयांवरुन घुमू लागली. मात्र निवृत्ती काही ओ देईना. सारे कासाविस झाले. सोपान आणि मुक्ता धाय मोकलून रडू लागले. ज्ञानदेवाच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. तशातही तो निवृत्तीला साद घालत होता.
"दादा रे, कुठे आहेस रे?" सादेच्या प्रतिध्वनीनंतर निरव शांतता.

सारे रान पालथे घातले. निवृत्ती कुठे दिसेना. येणार्‍या जाणार्‍या वाटसरुंना विचारले. कुणीच निवृत्तीला पाहीले नव्हते. मध्यान्ह झाली. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. धाकट्या लेकरांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई आंब्याच्या झाडाच्या सावलीत बसले. सोबत आणलेल्या शिदोरीचे चार घास छोटया मुक्तेला भरवले. इतरांच्या गळी काही घास उतरेना. दिवस कलताच पुन्हा निवृत्तीचा शोध सुरु केला. मात्र कुठेच निवृत्ती सापडेना. संध्याकाळचा प्रहर असाच गेला. विठ्ठलपंतांना काय करावे सुचत नव्हते. सूर्य मावळतीला गेला होता. अंधार पडून लागला. नाईलाजाने जड पावलांनी ते कुटुंब त्र्यंब्यकेश्वराच्या दिशेने उतरु लागले.

"आई, बाबा, मोठा दादा कधी येईल?" मुक्तेच्या या प्रश्नाला विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईकडे उत्तर नव्हते.

******************************************************

वाघाची डरकाळी ऐकू येईपर्यंत निवृत्ती भानावर नव्हता. पाय जरी पायवाटेने चालत होते डोक्यात भगवद्गीतेमधील श्लोकांची आवर्तने चालू होती. आपले आई बाबा आणि धाकटी भावंडं आपल्यापासून बरीच पुढे निघून गेली आहेत याचे भान त्याला नव्हते. इतक्यात गगन भेदून टाकेल अशी वाघाची डरकाळी झाली आणि निवृत्ती भानावर आला. त्याला क्षणभर काय करावे हे सुचेना. समोरच मुख्य पायवाटेहून दूर जाणारी एक छोटीशी पायवाट त्याला दिसली. काहीही विचार न करता तो त्या वाटेने पळत राहीला. किती वेळ पळत होता त्याचे त्यालाच कळले नाही. शेवटी धाप लागल्यामुळे थबकला तर समोर एक आश्रम दिसला. आश्रमासमोर काही जोगी ग्रंथपठण करताना दिसले. हे नाथपंथी म्हणजेच अवधूत मार्गी जोगी आहेत हे त्याने ओळखले. बाबांनी आपल्याला गोरक्षनाथांबद्दल आणि गहिनीनाथांबद्दल सांगितलेले सारे आठवले. निवृत्ती असा विचार करतो इतक्यात एका जोग्याने त्याला पाहीले. तो जोगी निवृत्तीच्या जवळ आला. निवृत्तीस हाती धरुन त्यास आश्रमात आणले. त्याला पाणी प्यायला दिले.
"काय नाव बाळा तुझे"
"निवृत्ती"
"एव्हढा पळत का आलास तू? हा रस्ता तुला कोणी दाखवला?"
निवृत्तीने झालेला वृतांत त्या जोग्यास सांगितला.
"चल मी तुला आमच्या गुरुदेवांकडे नेतो" तो जोगी निवृत्तीला आश्रमाच्या अंतर्भागात घेऊन गेला.

समोर एक मंद दिप तेवत होता. एक नाथजोगी ध्यानस्थ अवस्थेत बसला होता. बराच वृद्ध दिसत होता तो नाथजोगी. केस पांढरे झाले होते. चेहरा सुरकुत्यांनी भरुन गेला होता. काया थरथरत होती. या दोघांची चाहूल लागताच त्या वृद्ध नाथजोग्याने डोळे उघडले. समोर आश्रमातील एका शिष्यासोबत एक बारा तेरा वर्षांचा बालक उभा होता. वयाच्या मानाने चेहरा शांत आणि धीट होता.
आश्रमातील शिष्याने आणि निवृत्तीने नमस्कार केला.

"नाव काय बाळ तुझं?", नाथजोग्याने विचारले.
"मी निवृत्ती"
"इकडे कसा आला?"
निवृत्तीने आपण ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा घालत असताना अचानक वाघ आला आणि आपण पळत इथवर पोहचलो हे सांगितले.
"वडीलांचं नाव काय तुझ्या?"
"विठ्ठलपंत. बाबा मुळचे पैठणजवळील आपेगावचे. आजोबा गोविंदपंत तिथले कुलकर्णी होते. आम्ही सध्या आमच्या आजोळी आळंदीला राहतो"
"तू विठ्ठलाचा मुलगा? गोविंदपंतांचा नातू?"
"होय. आपण ओळखता का माझ्या बाबांना आणि आजोबांना?"
"होय बाळा. आम्हा संन्याशांना संसाराचे पाश कधी अडवत नाहीत. मात्र तरीही जीव कुठेतरी गुंतू पाहतो. असाच मायेचा एक धागा तुझ्या आजी आजोबांशी आणि वडीलांशी जोडला गेला आहे."
"म्हणजे तुम्ही गहिनीबाबा आहात का?"
"होय बाळा"
बालसुलभ आश्चर्याने निवृत्तीचे डोळे लकाकले. आपल्या आजोबांचे गुरु आपल्या समोर आहेत या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसेना.
"ये इकडे. बस माझ्या बाजूला."

निवृत्तीने गहिनीनाथांच्या चरणांवर मस्तक ठेवले. गहिनीनाथांच्या मनी विचार चमकला. अवधूत मार्गाला जनाभिमुख करण्याचा विचार गेली काही वर्ष त्यांच्या मनात रुंजी घालत होता. मात्र ते कसे करावे हे त्यांना कळत नव्हते. का कोण जाणे आज ती वेळ आली आहे असे त्यांना वाटले. त्यांच्याच शिष्याच्या या तल्लख बुद्धीच्या नातवाच्या रुपाने आज ती संधी आली आहे ही जाणिव त्यांना झाली.
गहिनीनाथांनी निवृत्तीच्या मस्तकावर हात ठेवला.त्यांनी आदिनाथांचे, मच्छिंद्रनाथांचे आणि गोरखनाथांचे स्मरण केले.
कापर्‍या आवाजात त्यांच्या तोंडून शब्द निघाले, "अलख निरंजन"
क्षणभर निवृत्तीचे शरीर थरारले. त्याच्या तोंडून शब्द उमटले, "आदेश".
"उठा निवृत्तीनाथ. आजपासून मी नाथपंथाची ध्वजा तुमच्या हाती देत आहे. आजवर कडयाकपार्‍यांमधील आश्रमांमध्ये मोठा झालेला, कानफाट्या जोग्यांनी लोकांपासून अलिप्त ठेवलेला हा अवधूत मार्ग तुम्ही लोकांपर्यंत न्या. नाथ संप्रदायाला लोकाभिमुख करा. मच्छिंद्रबाबा, गोरखबाबा आणि मी तिघांनी आदिनाथ शिवाला वंदनीय मानले. तुम्ही भगवान श्रीकृष्णाला मस्तकी धरा. हरि गुण गा. आम्ही ज्ञानमार्ग अनुसरला. तुम्ही भक्तीमार्गाने जा. या जगाला समतेचा संदेश द्या. मानवतेचा संदेश द्या."

निवृत्तीनाथांना आश्रमात घेऊन आलेला गहिनीनाथांचा तरुण शिष्य हे सारे आश्चर्याने पाहत होता. आज अघटीत घडले होते. गुरुंच्या चेहर्‍यावर आज आगळेच तेज होते. आपल्या गुरुबंधूंच्या या एव्हढयाशा नातवाने जणू गुरुंवर मोहिनी घातली होती. भल्याभल्यांना अनुग्रह न देणार्‍या आपल्या गुरुंनी आज या एव्हढयाशा मुलास पहील्याच भेटीत आपला शिष्य केले होते. चमत्कार झाला होता आज.

सांज ढळत होती. सूर्य मावळतीस चालला होता. गहिनीनाथांनी आपल्या दोन शिष्यांस निवृत्तीस त्याच्या आई वडीलांजवळ त्र्यंबकेश्वरी शिवमंदिरापाशी सोडण्यास सांगितले. निवृत्तीचे गुरु चरणांपासून मन निघेना. मात्र आपले आई वडील आपल्या चिंतेने कासावीस झाले असतील, ज्ञाना, सोपान आणि मुक्ता आपली काळजी करत असतील या विचारांनी तो परतण्यास तयार झाला. मात्र त्याने गहिनीनाथांकडून उद्या पुन्हा आपल्या आई वडील आणि भावंडांसह आश्रमात येण्याची आज्ञा घेतली.

******************************************************

त्र्यंबकेश्वर मंदिरापाशी येताच दुरुनच निवृत्तीने आपले आई बाबा जिथे उतरले होते तिथे मिणमिण तेवणारा दिप पाहीला. निवृत्तीने दुरुनच आवाज दिला, "आई बाबा, मी आलोय"
मंदिरासमोरील निरव शांततेचा भंग झाला. त्या दिव्याच्या उजेडात निवृत्तीस हालचाल जाणवली. आपल्या आई बाबांना त्याने पाहीले. धावत जाऊन त्याने आईला मिठी मारली. झोपी गेलेले सोपान, मुक्ता जागे झाले. विठ्ठलपंतांनी गहीवरुन निवृत्तीच्या पाठीवरुन हात फिरवला. ज्ञानदेवाने हलकेच निवृत्तीचा हात हाती घेऊन दाबला.
"कुठे गेला होता रे बाळा आम्हाला सोडून", रुक्मिणीबाईंच्या डोळ्यात आसवांच्या धारा लागल्या.
"दादा रे..." म्हणत सोपान आणि मुक्ता निवृत्तीकडे झेपावले.

विठ्ठलपंतांनी निवृत्तीस सोडावयास आलेल्या नाथजोग्यांची विचारपूस केली. त्या नाथजोग्यांनी विठ्ठलपंतांस निवृत्ती आश्रमात आल्यापासूनचा सारा वृत्तांत सांगितला. विठ्ठलपंत सद्गदित झाले. त्यांना काही वर्षांपूर्वी आपेगांवी घडलेला प्रसंग आठवला. आपल्या माता पित्यांची आपण गहिनीनाथांकडून अनुग्रह घ्यावा अशी ईच्छा असताना आपणास अवधूत मार्गाची ओढ नाही हे ओळखून गहिनीबाबांनी आपणास दिक्षा देण्यास नकार दिला होता हे सारे त्यांना आठवले. मात्र आज गहिनीबाबांनी आपल्या एव्हढ्याशा लेकराच्या मस्तकी आपला कृपाहस्त ठेवला. त्या महान जोग्याने आपल्या लेकरास आपल्या अनुग्रहाच्या योग्यतेचा मानले. विठ्ठलपंतांचे ह्रदय भरुन आले.

"निवृत्ती", विठ्ठलपंतांनी कातर आवाजात आपल्या जवळ बोलावले.
"काय बाबा?"
विठ्ठलपंतांनी निवृत्तीस मिठी मारली आणि म्हणाले, "लेकरा, तू आज धन्य झालास."

भावनावेग ओसरला. निवृत्तीस सोडावयास आलेले नाथजोगी ब्रम्हगिरीस निघून गेले. आपल्या आई वडीलांच्या डोळ्यातील समाधान पाहून निवृत्तीला खुप बरे वाटले. त्याला पुन्हा एकदा दुपारचा गहिनीनाथांनी त्याच्या मस्तकी हात ठेवल्याचा प्रसंग आठवू लागला. निवृत्तीच्या ओठी नकळत शब्द येऊन तो गाऊ लागला,

आदिनाथ उमा बीज प्रकटिलें | मच्छिंद्रा लाधले सहजस्थिती ||
तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली | पूर्ण कृपा केली गयनिनाथा ||
वैराग्ये तापला सप्रेमें निवाला | ठेवा जो लाधला शांतिसुख ||
निर्द्वंद्व नि:संग विचरता मही | सुखानंद ह्रदयी स्थिर झाला ||
विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख | देउनि सम्यक अनन्यता ||
निवृत्ती गयनी कृपा केली असे पूर्ण | कूळ हे पावन कृष्णनामे ||

1 अभिप्राय:

godbole sarat said...

गोष्ट आवडली. कधी सुरू झाली आणि संपली ते कळलंच नाही.