Saturday, July 23, 2016

तस्मै श्रीगुरवे नमः

"माझे नाव सतिश वसंत गावडे. रायगड जिल्हा परिषद शाळा वडगांवकोंड" आपल्या बोलण्यात "अशुद्ध" शब्द येणार नाही याची काळजी घेत मी वर्गाला माझी ओळख करुन दिली.

शाळेचा पहिला दिवस. गोरेगांवच्या ना. म. जोशी विद्याभवनचा इयत्ता पाचवी ब चा वर्ग. गोरेगांव तसं शहरवजा खेडेगांव. आजूबाजूच्या पंधरा-वीस खेडेगावांचे बाजार हाट करण्याचे ठिकाण. शाळा पुर्ण जिल्ह्यात नावाजलेली. अगदी माणगांव, महाड, म्हसळा आणि श्रीवर्धन या चार चार तालुक्यांच्या ठिकाणांहून मुलं ना. म. जोशीला शिकायला यायची. आजही येतात. असा शाळेचा नावलौकिक.

आमचं गाव वडगांवकोंड गोरेगांवपासून तीन किमी अंतरावर. गावातील जिल्हा परिषदेची शाळा चौथीपर्यंतच. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी ना. म. जोशीलाच प्रवेश घ्यावा लागे. तेव्हा गोरेगांव ते वडगांवकोंड रस्ता कच्चा होता. बस सेवेचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे गोरेगांवला जाण्यासाठी पायी चालत जाणे, सायकलने जाणे, बैलगाडीने जाणे किंवा स्वतःच्या वाहनाने जाणे हेच पर्याय होते. शेवटचा पर्याय उपलब्ध असणारे भाग्यवान पुर्ण गावात हाताच्या बोटावर मोजण्याईतके कमी होते. रस्त्यात वाटेत एक ओढा लागतो. पावसाळ्यात गावाशेजारून वाहणार्‍या काळ नदीला पूर आला की रस्ता पाण्याखाली जातो. आम्हा शाळकरी मुलांसाठी शाळेत पायी चालत जाणे हा एकमेव पर्याय होता तेव्हा.

ना. म. जोशीत तेव्हा नविन प्रवेश देताना तुकडी कशी ठरवत असत याची मला काही कल्पना नाही. मात्र पाचवीच्या तेव्हा अ पासून अगदी ग पर्यंत तुकड्या होत्या. सर्वात हुशार मुलं अ वर्गात तर सर्वात ढ, नापास झालेली मुलं ग वर्गात असा काहीसा मामला होता. मी खेडयातला असलो तरी त्यातल्या त्यात हुषार असल्याने मला ब वर्ग मिळाला असावा.

पहिल्या तासाला वर्गशिक्षिकेने दिलेल्या वेळापत्रकानूसार तो हिंदीचा तास असावा. एक उंच शिडशीडीत काळे सावळे सर वर्गावर आले होते. वय पन्नाशीचं किंवा थोडंफार कमी असावं. नाकावर जाड भिंगाचा चष्मा. करारी आणि खर्जातला आवाज. पाहताक्षणी दरारा वाटावा असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांचं नाव शेख सर हे नंतर वरच्या वर्गात शिकणार्‍या मुलांकडून कळलं. शेख सर हिंदी आणि पी. टी. चे तास घ्यायचे. खो खो हा बहूधा त्यांचा आवडता खेळ असावा. मुलांचा खोखोचा खेळ चालू असला की सर त्या मुलांना मार्गदर्शन करताना त्यांच्यातील एक होऊन जायचे.

सर हिंदीही खुप छान शिकवायचे. वर्गात शिकवतानाही ते खेळाच्या मैदानाईतकेच रंगून जायचे. मग ती "मेरा छाता" सारखी कविता असो किंवा "मामा की ऐनक" सारखा धडा असो, सर आवाजात चढ उतार आणून नाट्यमयता निर्माण करायचे. मुलं अगदी रंगून जायची. त्यातूनच एखाद्या मुलाचं लक्ष नसलं ते आवाज वाढवायचे. हातातील डस्टर त्या विद्यार्थ्यावर फेकल्याचा अभिनय करायचे. मात्र तो डस्टर ते हाताच्या मागे हळूच पाडायचे. मुलं खळाळून हसत. सर हिंदीचे व्याकरण शिकवायचे तेव्हा तर धमाल असायची. ते "यह गमला हैं, वह गमले हैं" मुलं त्यांच्या मागोमाग एका सुरात म्हणायची.

मला तिमाही परीक्षेत सार्‍याच विषयांत चांगले मार्क्स मिळालेले सरांना कळलं. त्यानंतर सर माझी विचारपूस करु लागले. माझ्यावर विशेष लक्ष देऊ लागले. त्यांनी एकदा मला माझ्या घरच्यांबद्दल विचारले असता आम्हा दोघांमधला वेगळाच ऋणानुबंध समोर आला. माझे बाबाही सरांचे विद्यार्थी होते. ते कळल्यानंतर सर माझ्या बाबांकडेही माझ्या अभ्यासाची चौकशी करु लागले.

पाचवीची परीक्षा झाली. निकाल लागला. मी पाचवी ब वर्गात पहिला आलो होतो. पुढचा वर्ग सहावी ब. यावेळी सर आमच्या वर्गाला कोणताच विषय शिकवायला नव्हते. शाळा सुरु होऊन दोन तीन दिवस गेले. एके दिवशी ते आमच्या वर्गाच्या बाहेर आले. सरांबद्दल इतर शिक्षकांमध्ये खुप आदर होता. वर्गावर शिकवणारे शिक्षक बाहेर गेले. त्यांचे सरांशी काही बोलणे झाले.

"गावडे, तुला शेख सरांनी बाहेर बोलावलं आहे." त्या शिक्षकांनी आत येताच मला सांगितले. मला कळेना. मी सरांचा तसा लाडका विद्यार्थी जरी झालो होतो तरी मला सरांची तितकीच भीतीही वाटायची.
"ऐक, उद्यापासून तू अ वर्गात बस. मी प्राचार्यांशी तुझी तुकडी बदलण्याबद्दल बोललोय. त्यांनी परवानगी दिली आहे."

माझीही खुप ईच्छा होती अ वर्गात बसण्याची. कारण अ वर्ग तेव्हा हुषार मुलांचा वर्ग मानला जायचा आणि मला त्या वर्गात बसायचे होते. माझी ही ईच्छा अगदी अनपेक्षितपणे पुर्ण झाली होती. शेख सरांनी माझ्याही नकळत माझ्यासाठी प्राचार्यांकडे शब्द टाकला होता. मात्र त्याक्षणी मला अचानक रडू कोसळले. ब वर्गातून अ वर्गात जाताना आपले गावातील सर्व मित्र ब वर्गातच राहणार आहेत हे मला अचानक आठवले. सारे मित्र मागे टाकून अ वर्गातील शहरी मुलांमध्ये जाण्याच्या कल्पनेचा मी आधी विचारच केला नव्हता. आणि याक्षणी मला ते सुचले. सरांनी मला शांत केले. माझ्या रडण्याचे कारण विचारले. मी ही निरागसपणे कारण सांगितले. त्यांनी मला ब वर्गातील माझ्या सर्वात जवळच्या दोन मित्रांची नावे विचारली. मी ती सांगितली. सरांनी त्या दोघांनाही बाहेर बोलावले. "उद्यापासून तुम्ही दोघे सतिशसोबत अ वर्गात बसा".

सर सहावी अ ला हिंदी शिकवायला होते. मी पुन्हा एकदा सरांच्या नजरेसमोर आलो.

आमच्या घरी तेव्हा गाई म्हशी होत्या. मी सकाळी शाळेत जायच्या आधी तीन चार तास गुरं चरायला नेत असे. गुरांच्या पाठी अनवाणी माळरानांवर, काट्याकुट्यांमधून वारं प्यायल्यागत हुंदडत असे. एके दिवशी कसा कोण जाणे, गुरांकडे गेलो असताना बाभळीचा काटा पायात अगदी खोलवर रुतला. पायावर भांबूर्डीचा पाला चोळून रक्त थांबवले. लंगडत लंगडत घरी आलो. घरी आल्यावर आईने काटा काढला खरा पण खोलवर गेलेले काट्याचे टोक आतच राहीले. एक एक दिवस जाऊ लागला आणि माझा पाय अधिक अधिक सुजायला लागला. पायात पू झाला. चालता येईनासे झाले. दोन तीन दिवस शाळा बुडाली. शेवटी डॉक्टरकडे जाऊन इलाज करुन घेतला.

शाळेत पुन्हा जाऊ लागताच सरांनी माझी शाळेत का येत नव्हतो म्हणून विचारपूस केली. मी जे घडले होते ते सांगितले. सरांनी बाबांना शाळेत बोलावून घेतले. माझ्या पायात चप्पल का नसते म्हणून बाबांची खरडपट्टी काढली. त्याच दिवशी संध्याकाळी बाबांनी माझ्यासाठी स्लिपर्स घेतले.

केव्हातरी बोलताना सरांनी मला अशफाकबद्दल, त्यांच्या मुलाबद्दल सांगितले. तो केमिकल इंजिनीयर झाला होता आणि आय आय टी मद्रास मधून तेव्हा एम टेक करत होता. "इंजिनीयर" या शब्दाशी सरांनी माझी ओळख करुन दिली. सर अशफाकबद्दल भरभरुन बोलायचे माझ्याशी. त्या प्रेमळ बापाला आपल्या हुषार लेकराचे किती कौतुक करु आणि किती नको असे होऊन जायचे. मात्र तेव्हा सर माझ्याही नकळत मला माझ्या आयुष्याचा मार्ग दाखवत होते हे मला खुप उशिरा कळले.

सर पाचवी ते सातवी या वर्गांना शिकवायचे. मी आठवीला गेल्यावर त्यांच्याशी माझे प्रत्यक्ष बोलणे कमी झाले. आठवीचा रिझल्ट लागला. सर रिझल्टच्या दिवशी माझ्या वर्गाच्या बाहेर उभे होते. पुन्हा एकदा सहावी ब ला असताना जसे घडले होते तसेच घडले. मुलांचे रिझल्ट देता देता वर्गशिक्षिका सरांना भेटायला बाहेर गेल्या.

"गावडे, तुला शेख सर बाहेर बोलावत आहेत", मॅडमनी आत येताच मला सांगितले.

"ऐक, तुला बाटू माहिती आहे का?", मी बाहेर जाताच सरांनी मला विचारले.
"बाटू बद्दल मी फक्त ऐकलंय. जास्त काही माहिती नाही मला"
"बाटू म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी. आपल्या लोणेरेला आहे. तिथे इंजिनीयरींगचे शिक्षण मिळते." सरांनी मला समजेल अशा शब्दांत सांगितले.
"बाटूला दहा दिवसांचे निवासी शिबीर आहे आठवी ते दहावीच्या मुलांसाठी. दहा दिवस तिथेच राहायचे. जेवण वगैरे तिथेच मिळेल. तिथे कॉम्पुटर शिकवणार आहेत. कारखान्यांना भेट द्यायला नेणार आहेत. मी तुझे नाव दिले आहे आपल्या शाळेकडून जाणार्‍या मुलांमध्ये. खुप शिकायला मिलेल तुला. तुझ्या बाबाला सांगतो मी तुला या शिबिराला पाठवायला."

सरांनी जर माझे नाव दिले नसते तर माझ्यासारख्या खेड्यातील मुलाचा कुणी कधी विचारही केला नसता तसल्या शिबिरासाठी.

पुढे चार वर्षांनी बारावीनंतर मी याच बाटूला इंजिनीयरींगला प्रवेश घेतला. नव्हे, सरांनी अप्रत्यक्षपणे माझे बोट धरुन मला तिथवर नेले होते.

मी इंजिनीयरींगला तिसर्‍या वर्षाला असताना एक गंमतीदार प्रसंग घडला. एके दिवशी संध्याकाळी बाबांनी मला "तुला शेख सरांनी भेटायला बोलावले आहे" म्हणून सांगितले. सर माझ्यासाठी निरोप द्यायला बाबांच्या ऑफिसला गेले होते. मी सरांना भेटलो.

"अरे माझी मुलगी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएससी कॉम्पुटर करत आहे. तिला एक कॉम्पुटर प्रोग्रामिंगची असाईनमेंट मिळाली आहे. तिला काही ते जमत नाही. मी माझ्या ओळखीतल्या खुप जणांना विचारले. सगळेच आम्हाला नाही जमणार म्हणत आहेत. आपल्या गोरेगांवचा एक मुलगा बाटूला तुला एक विषय शिकवायला आहे. त्याने कदाचित तू हे करु शकशील असे मला सांगितले", सरांनी मला बोलावण्याचे कारण सांगितले.

सरांनी असाईनमेंटचा पेपर दाखवला. कॉम्पुटर ग्राफिक्स संदर्भातील ती प्रश्नावली होती. संगणकाला सांख्यिकी विदा पुरवायचा आणि त्या विदापासून विविध प्रकारचे आलेख स्क्रीनवर दाखवायचे अशा आशयाचे प्रश्न होते सारे. मी होतो ईलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन इंजिनीयरींगचा विद्यार्थी. इंजिनीयरींच्या पहिल्या किंवा दुसर्‍या सत्रात कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचा एक विषय असतो. मात्र त्यातून मिळणारे कॉम्पुटर प्रोग्रामिंगचे ज्ञान खुपच जुजबी असते. दुसर्‍या वर्षापासून आयटी आणि कॉम्प्युटर वगळता बाकीच्या शाखांचे विद्यार्थी कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचा नाद सोडून देतात. मी मात्र या विषयाचा मनापासून अभ्यास केला. पुढच्या दोन वर्षात कॉम्प्युटर प्रोग्रामिंग बर्‍यापैकी येणारा मुलगा अशी माझी कॉलेजमध्ये ख्याती झाली होती. आणि यातूनच शेख सरांपर्यंत माझे नाव गेले होते.

आता यातील ग्यानबाची मेख अशी होती की मला आकडेमोड किंवा तार्किक बाबींचे प्रोग्रामींग जमायचे सी प्रोग्रामींग ही भाषा वापरुन. सरांच्या मुलीची असाईनमेंट ग्राफिक्स प्रोग्रामींगमधील होती. मला त्यातले ओ की ठो कळत नव्हते. मात्र मी सरांना तसे सांगितले नाही. ज्या गुरुंनी आजवर माझे बोट पकडून मला मार्ग दाखवला त्या गुरुंनी आज पहिल्यांदा माझ्याकडे काही मागितले होते. माझी गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली होती.

मी सरांकडून आठवड्याचा अवधी मागून घेतला. पुढच्या तीन चार दिवसांत कॉलेजच्या वाचनालयातील "ग्राफिक्स प्रोग्रामिंग" संबंधीच्या पुस्तकांचा फडशा पाडला. प्रकरण मी समजलो होतो तितके अवघड नव्हते. मला जमण्यातला प्रकार होता. आणि जमलेही. मी तयार केलेल्या प्रोग्राम्सच्या प्रिंटस काढून घेऊन ते प्रोग्राम्स सरांच्या मुलीला समजावून सांगितले. तिला स्वतः समजून घेऊन लिहून काढण्यास, स्वतः पुन्हा बनवण्यास सांगितले.

त्या असाईनमेंटला तिला खुप चांगला शेरा मिळाला. सरांनी मला त्यांच्या घरी बोलावले. कोकणातील खेडयात वाढलेल्या मुलांमध्ये मुस्लीम घरांबद्दल ज्या काही चित्र विचित्र कल्पना असतात तशा माझ्याही होत्या. मुख्य वस्तीपासून काहीसे वेगळे असलेले मुस्लीम मोहल्ले त्यात अधिक भर टाकतात. सरांचे घर तसे मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर होते. तरीही मी जरा बिचकत बिचकत सरांच्या घरी गेलो.

सरांनी माझे त्या असाईनमेंटबद्दल कौतुक केले. माझ्या पाठीवरुन हात फिरवला. त्यांच्या नजरेत कृतकृत्य झाल्याचे भाव होते. त्यांनी रुजवलेलं ज्ञानाचं रोपटं आज त्यांच्या पुढ्यात तरारुन उभं होतं. मी मनातील सारे किंतू झटकून देऊन सरांच्या घरुन चहा नाश्ता करुन सरांच्या पायाला हात लावून बाहेर पडलो.

मी आज जो कोणी आहे तो माझ्या इंजिनीयरींगच्या पदवीमुळे आहे. मात्र ही पदवी माझी एकट्याची कमाई नव्हे. माझ्या आई वडीलांच्या जोडीने अनेक ज्ञात अज्ञात हातांनी मला मदत केली. शेख सरांनी माझ्या मनात इंजिनीयरींगच्या शिक्षणाचं बीज रुजवलं, त्यांच्या मुलाबद्दल वेळोवेळी सांगून माझ्या मनात रुजवलेल्या त्या बीजाला पाणी घातलं. आठवी संपतानाच एका शिबिराच्या निमित्ताने मला माझ्या भविष्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दारात नेऊन सोडलं.

माझ्यासारखा अनवाणी पायांनी गुरं राखणारा, भातशेतीमध्ये कंबरडं मोडेपर्यंत लावणी, कापणी करणारा मुलगा जेव्हा शिक्षण संपल्यानंतर फक्त अडीच वर्ष भारतात काम केल्यानंतर पुढचे दिड वर्ष जेव्हा अमेरिकेत संगणक अभियंता म्हणून काम करतो तेव्हा त्यामागे शेख सरांसारख्या आपल्या शिष्याच्या हिताचा कायम विचार करणार्‍या प्रेमळ गुरुंची पुण्याई उभी असते.

माझ्या या गुरुने मी जवळपास अजाण वयाचा असताना मला माझं ध्येय काय आहे हे सांगितलं नसतं, वेळोवेळी मला तिथपर्यंत पोहचण्याचा मार्ग दाखवला नसता तर न जाणो मी आज काय असतो, कुठे असतो.

जगदगुरु महर्षी व्यासांचे शब्द उसने घेऊन मला माझ्या या गुरुला वंदन करताना म्हणावेसे वाटते,

 अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया |
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ||
त्वं पिता त्वं च मे माता त्वं बन्धुस्त्वं च देवता |
संसारप्रतिबोधार्थं तस्मै श्रीगुरवे नमः ||

3 अभिप्राय:

Akshay said...

अप्रतिम लेखन आहे...कृपया आपला इमेल एड्रेस द्यावा. काही बोलायचे आहे जे इकडे बोलणे शक्य नाही.

Unknown said...

सुरेख!

godbole sarat said...

भारल्यासालखं झालं. तुकडीबदल असेच होत राहो ही इच्छा.सरांबद्दल काय बोलणार. स्थान अढळ आहे.